भीती वाटतेय...कसली, कोरोनाची का...ह्यॅ...साधा सर्दी ताप आहे तो.....आपल्याला नाही का खूप सर्दी झाली की थकल्यासारखं होतं...झोपतांना नाक चोंदतं...मग असं आ...करुन झोपावं लागतं...त्याचाच पुढचा प्रकार हा...त्याची कशाला भीती वाटेल...असे दहा काय शंभर ताप-सर्दी-खोकले पचवलेत हो...मग कसली भीती वाटतेय...भीती ना, ती वाटतेय वेगळं रहायची...वेगळं रहायची...हो...तो कोरोना झाल्यावर चौदा दिवस वेगळं ठेवतात ना...त्या वेगळेपणाची भीती वाटतेय...हा छोटासा संवाद माझा आणि माझ्या सूलू आत्यामधला...कोरोनाबद्दल एवढा भारी विश्लेषण तिच देऊ शकते... करोना म्हणजे काय हे सुलू आत्यानं नेमक्या शब्दात सांगितलं...आमची लांबच्या नात्यातील आत्या...मुलं परदेशात...काही वर्ष एकटीत रहातेय...पण तरीही कधी एकाकीपणाला कंटाळली नाही...उलट त्यातच सुखी असणारी...अशी सुलू आत्या जेव्हा कोव्हीडला नाही तर क्वॉरंटाईन म्हणजे एकटेपणाला घाबरली, त्यातून या रोगाची नवीन व्याख्या मिळाली.
आमची सुलू आत्या मुंबईत रहाते. एकटी. दोन्ही मुलं परदेशात स्थाईक. नेहमी मार्च-एप्रिलमध्ये तीसुद्धा मुलांकडेच जाते. चार महिने राहून गणपतीला परत. यावेळी कोरोनामुळे तिचा दौरा चुकला. एरवी एकटीच रहात असली तरी ती खुशालचेंडू स्वभावाची. भरपूर मैत्रिणी. अनाथआश्रमामध्ये नियमीत जाणारी...तिथल्या मुलांमध्ये रमणारी. इतरही बरेच उद्योग. त्यात योगा, व्यायाम, जेवणाची पथ्ये असं बरच काही. वयाची साठी पार करुनही धावत लोकल पकडेल अशी....एरवी तिला फोन केला की तिच्याकडे खूप काही सांगायचं असतं...उत्साह तर विचारु नका...आता तिला काळजीपोटी फोन होतो. तिच्या परदेशात रहाणा-या मुलांनी तिला भरपूर सूचना दिल्या होत्या...त्यामुळे आत्यानं सर्व सामान कोरोनाचा पहिला-दुसरा पेशंट मिळाला तेव्हाच भरुन ठेवलं...डाळी, तांदूळ, गहू, कडधान्य, तेल, तूप सर्व काही...घरात खूप वर्षापूर्वी घरगुती चक्की घेतली होती. त्यामुळे पिठाचा प्रश्नच नव्हता...अगदी वर्षाची औषधं, मिल्क पावडरही...केबल, पेपर, सोसायटीचे वर्षाचे पैसे भरले...भाजी-फळं देणा-यांचे नंबर घेऊन ठेवले...ती तेव्हा आम्हालाही ही तयारी करुन ठेवा म्हणून सांगायची...पण कोरोना एवढा फैलावेल असं वाटलंच नव्हतं. त्यामुळे तिला फक्त हसून आम्ही हो-हो सांगितलं...ती मात्र मुलांनी दिलेल्या सुचनांनुसार वागत होती...नंतर जेव्हा आमची सामान भरायची धावपळ सुरु झाली, तेव्हा सुलू आत्या निवांत होती. तिने घरात बसायला लागेल...मग कंटाळा यायला नको म्हणून भरपूर लोकर, वेगवेगळे धागे, मण्यांचे दागिने करायचे सामान, शोभेच्छा वस्तू करण्यासाठी काहीबाही असं बरचं घेऊन ठेवलं होतं. आता बाहेर जायचं नव्हतं...त्यामुळे हे सर्व करण्यात तिचा वेळ छान जाणार होता....
तरीही सुलू आत्या काळजीत होती. फोन केला की तिची नाराजी जाणवायची. लॉकडाऊनमुळे तिला आमच्या घरी बोलवताही येत नव्हते. माझ्यासारखेच तिचे अन्य नातेवाईकही तिला फोन करायचे. शिवाय मुलांचाही नेहमीचा संपर्क होता. ती नेहमीसारखीच होती....तरीही मनात कुठेतरी खचलेली होती...मी नेहमी विचारायचे पण सांगितलं नाही...आता मुंबईत रुग्णांची संख्या वाढू लागली, तेव्हा निक्षून विचारलं, तेव्हा वर सांगितलेला उपदेश मला केला. एव्हाना कोरोनामध्ये तिने पीएचडी केली होती. कशाने होतो. कसा होतो. पहिल्या दिवसापासून चौदाव्या दिवसापर्यंत काय काय होतं....काय खावं...किती गरम पाणी प्यावं...असं काहीही विचारा...तिची उत्तरं परफेक्ट होती...उगीचच ऐकीव उपाय नाहीत...एरवीही ती नियमीत काढा पित असे...गरम पाणीही...त्यामुळे तिच्यासाठी फार काही नवीन नव्हतं. पण तिला त्रास होत होता तो, एकटेपणाचा...मी पुन्हा विचारल्यावर म्हणली, तो रोग कधी ना कधी होणारच आहे ग, मी स्विकारलं आहे...आणि झाला तरी मी बरी होणार आहे, हे ही माहीत आहे हो...मग घाबरतेस कशाला...मी पुन्हा विचारल्यावर म्हणाली, घाबरते म्हणजे, अग त्या चौदा दिवसांना घाबरते. तेव्हा अगदी एकाकी रहावं लागतं म्हणे...तिचं उत्तर ऐकून मी डोक्यावर हात मारला...आत्या एरवीही तू एकटीच रहातेस ना...मुलांसोबतही अगदी महिना दोन महिनेच रहातेस...तुला एकटेपणाची भीती कशाला...आत्या या प्रश्नावर हसली...मग बोलली...अग मी एकटी रहाते. पण माणसांची चाहूल मला आवडते. शेजारी पाजारी असतात...सकाळी दूधवाला, पेपरवाला आला की दरवाजे उघडले
सुलू आत्याचे बोल ऐकून हसावं की रडावं कळत
नव्हत. तिला काही कोरोना झाला नव्हता...पण
झाला तर....या काळजीनं तिला खाल्लं होतं. शिवाय रोग झाला तर बरं होणार हेही माहीत होतं. पण त्यासोबत येणारे एकाकीपण तिला आधीच त्रस्त
करीत होतं. काय बोलणार...मी तिला या
विचारातून मध्येच थांबवत विचारलं....तुला झालाय का कोरोना...नाही ना...अग तू घराच्या
बाहेरही पडत नाहीस...पंधरा दिवसातून एकदा दूध, भाजी, फळंं आणतेस आणि पुन्हा स्वतःला घरात कोंडून घेतेस...किराणा
सामान वर्षाचे भरलेस...त्यामुळे तुझा अन्य कोणाशी संपर्क नाही...तुला तो रोग होईलच
कसा....आणि होणारच नसेल तर एवढा विचारच कशाला करायचा...आत्या हो म्हणाली...तिला
विश्वास दिला तिच्या मैत्रिणी, सोसायटीमधील सहकारी अशा परिस्थितीत तिला एकटीला
सोडणार नव्हते...दूरून का होईना, तिच्याबरोबर त्यांनी संवाद साधला असता...कोरोना
होईल, या सर्व जर तर च्या गोष्टी होत्या...हे ही तिला पुन्हा निक्षून
सांगितले...मी आणि आत्या व्हिडीओ कॉलिंगद्वारे बोलत होतो. तितक्यात तिची बेल वाजली. रात्रीचे दहा वाजले होते...आत्या कोण ग...असं
मी काळजीत विचारलं, मला सांगण्याऐवजी तिने
दरवाजा उघडला...आणि मग लाईव्ह सांगू
लागली....माझी मैत्रिणी, याच
बिल्डींगमध्ये पाचव्या माळ्यावर रहाते...ती सुद्धा कुठेच बाहेर जात नाही....म्हणून
सोसायटीनं आम्हाला सर्व काळजी घेऊन एकत्र गप्पा मारण्याची परवानगी दिली आहे...इकडे
मला हाय करत त्या मैत्रिणीनं दरवाज्याजवळ ठेवलेल्या सॅनिटायझरनं स्वच्छ केले...आणि तिथून थेट
बाथरुमध्ये गेली. हातपाय स्वच्छ धूवून
बाहेर आली...आत्याचा आवाज आता परत पूर्वीसारखाच उत्साही होत होता...आता तिची सोबत
तिच्या जवळ होती...मी हसत आत्याला विचारलं, अशा मैत्रिणी असल्यावर तू कशाला त्या
कोरोनाला घाबरतेस...तस मला दुरुस्त करत म्हणाली...कोरोनाला नाही कॉरंटाईनला
घाबरते...पण तू म्हणालीस ते पटतंय या
मैत्रिणी काही एकट्या ठेवणार नाहीत मला...देतील साथ...
तितक्यात तिच्या मैत्रिणीनं तिच्या पाठीत हलकीशी थाप मारत म्हटलं, त्या कोरोनाला तुझ्यापर्यंत पोहचूच नाही देणार आम्ही...दोघीही मैत्रिणी दिलखुलास हसल्या...मी बाय म्हणत फोन कट केला...
कोरोनाची एक नवीन ओळख मला कळली होती....कोराना
हा माणसाला माणसापासून वेगळं करणारा आहे का...नक्कीच नाही...उलट तो माणसांना
जोडणारा आहे. चौदा दिवस वेगळं रहायचं ते
आपल्यापासून इतरांना त्रास होऊ नये म्हणून...आपल्यासोबत इतरांची काळजी म्हणून...या
काळात स्वतःला वेळ देता येणार आहे.
कॉरोंटाईन म्हणजे शिक्षा नसून आत्मशिक्षेचा भागच जास्त आहे. असो...याही जर तर च्या गोष्टी आहेत. सुलू आत्यानं नेमकं कोरोना होणा-याचं दुःख समोर
मांडलं ....कोरोना झाला की समाज कसं
वागवेल ही भीती अधिक येतेय....या रोगावर औषध नाही. आपली मानसीक तयारी हेच यावर औषध आहे. ही तयारी दोघांसाठीही गरजेची आहे. एक ज्याला कोरोनाची बाधा झाली आहे त्याला तर
गरजेची आहेच...शिवाय त्यापेक्षा समाजाची अधिक आहे, तेव्हाच कोरोनाला आपण कायमचा टाटा बाय बाय करु
शकू...
सई बने
डोंबिवली
-----------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Well written..
ReplyDeleteनक्की कशाची...यावर प्रतिक्रिया लिहिली,साधारण अकरा ओळीं झाल्या आणि फोन आला तो घेतला नंतर पाहतो तर मी लिहिलेली प्रतिक्रिया गायब....असो.लेख नेहमीप्रमाणे रंजकतेतून संदेश देणारा आहे.मला वाटत माणूस नात्यागोत्यात,मित्र-मैत्रिणीत रहात असला तरी तो एकटाच असतो.बघा कांही दुःख,वेदना अशा असतात की त्या आपण कुणाशी बोलू शकत नाही.त्या स्वतःकडे ठेवाव्या लागतात. सुलूआत्या सारख्या अनेक आत्या ,मावश्या,काकू, काका, मामा स्वतःची मुलं परदेशात असल्यानं,ती तिथेच स्थायिक झाल्यानं एकटेपणाच जीवन जगतायत.ही मंडळी स्वतःच मन रमवायचा प्रयत्न करतात,पण कधीतरी त्यांना ती एकटेपणाची जाणीव खूपच " एकटं एकटं".. करून जाते.ते विसरून बाजूला सारून त्या एकटेपणात आनंदाचे रंग भरण्याच कौशल्य सुलू आत्या सारख्याना उत्तम जमलेलं असतं !
ReplyDelete- विनायक जाधव
खूप सुंदर लेख.
ReplyDeleteCorona aaj hai kal nahi ,people should live brotherhood and peace
ReplyDelete