हा कसला निसर्ग

हा कसला निसर्ग

निसर्ग...नाव किती गोंडस......आणि रुपडं...भयानक....परिणाम...उद्ध्वस्त...उद्ध्वस्त...वाड्या...उद्ध्वस्त मनं....सगळं उद्ध्वस्त...कोकणाला तशी वादळं नवीन नाहीत...पण जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आलेल्या वादळानं कोकणाचं रुप बदललं...आमचं वैभव म्हणजे आमची नारळी-पोफळीची झाडं...आमची संपत्ती म्हणजे आंबा, फणस आणि जायफळाची झाडं...आमचं सौदर्य म्हणजे चाफा, बकुळी, गुलाब, जास्वंद, अबोली, अनंत याचं बहरणं...पण या निसर्गानं हे वैभव, ही संपत्ती, हे सौदर्यच आमच्याकडून हिरावून घेतलंय...लाल मातीच्या आणि रंगानं आणि मनानंही हिरव्या असलेल्या कोकणाच्या आणि तिथल्या जनतेच्या हदयावर उद्ध्वस्त अवस्थेची लाल रेघ मारली आहे.....


निसर्ग नावाच्या वादळानं आमच्या गावांची पार दैना केली.  रेवदंडा, चौल, नागांव ही गावं म्हणजे स्वर्गच जणू...नारळी, पोफळी, चिंच, आंबे, जाम, फणस, ताडगोळे, जायफळ अशा कितीतरी फळांची झाडं या गावात बहरलेली असतात.  फुलांचे काय बोलावे...आलिबागपासून या गावांचा प्रवास सुरु केला की स्वागत होते ते नागावमधील कमळाच्या तलावांनी...पुढे प्रत्येक घरापुढे बहरेली झाडं मन प्रसन्न करुन जातात.  प्रत्येक घरासमोर वेगळ्या रंगाच्या जास्वंदी, आबोली, चाफा, गुलाब ही आमची दौलत...बरं सायंकाळी फेरी मारली तर गुलबाक्षीच्या फुलांच्या सुवासानं मन प्रसन्न होऊन जाणार....हे चित्र अगदी कालपरवा पर्यंत होतं.  म्हणजे 3 जून पर्यंत...पण 3 जूनला निसर्ग नावाचे वादळ आलं आणि या गावांचं चित्र पलटून गेलं...अगदी सकाळपर्यंत हसणारी ही गावं सूर्यास्त होईपर्यंत भकास झाली होती...

पावसाळ्याची चाहूल लागली की या भागात जोरदार वारे वाहतात.  मग उंच असलेली नारळाची आणि पोफळीची म्हणजेच सुपारीची झाडं त्या वा-यासोबत डोलायला लागतात...पहिला पाऊस झाला की इथल्या बागा अधिक फुलतात...शेतात पडलेल्या वालाच्या दाण्यांना कोंब फुटतात...ही भाजी मग पालेबिरडं म्हणून तांदळाच्या भाकरीसोबत पावसाच्या पहिल्या सरींबरोबर गोड लागते.  पण ही सर्व गोडी हरवून नेली ती निसर्ग नावाच्या वादळानं...

या वादळानं ही गावं अक्षरशः उद्ध्वस्त झाली.  नारळी-पोफळीनं सजलेल्या

वाड्या जमिनदोस्त झाल्या...या वाड्या म्हणजे या भागातील प्रत्येकाची जान...कधी रेवदंड्याचं कोणी घरी आलं की त्याला रहायला आग्रह करा...पहिलं वाक्य असतं...हो तर...रहायचं कसं, तिथे शिंपणं कोण करणार...मग आग्रह करुन या पाहुण्यांना रहाण्याचा आग्रह केला तर कसाबसा एका रात्रीचा मुक्काम करुन सकाळच्या सहाच्या, कल्याण गाडीला या पाहुण्यांना बसवून द्यायला लागतं...ती सुद्धा किती कसरत....भल्या पहाटेच या वाड्या आणि शिंपणाची जणू त्यांना ओढ लागते...फक्त चहा कर...बाकी काही नको....गाडी चुकायला नको...म्हणून भूणभूण मागे लागेत...तो चहा आणि सोबत काहीतही घशाखाली टाकून मग कधी एकदाची गाडी पकडून वाडीत पोहचतो असं त्यांना होतं...येतांना नारळ, शहाळं, वालाची पुडी, चिंचेचा गोळा, पत्रीसहा जायफळं, फार काय दोन दिवसाच्या जास्वंदीच्या कळ्या....असं पिशवी भरुन आणणारे दादा, भाऊ रिकाम्या हातानं आणि भरलेल्या मनानं आमचा निरोप घेतात....त्यांना त्या वाड्यांचीच ओढ जास्त....चार  तास लागतात रेवदंडा, चौल गाठायला...गावी पोहचल्यावर पहिलं वाडीला शिंपणं द्यायला सुरुवात.  मग वाडीतूनच आपण व्यवस्थित पोहचल्याचा फोन करणार...वरुन शिंपणाला उशीर झाला तर झाडं कशी होतात,  यावर एक लेक्चर...एवढं ते नारळी पोकळीच्या झाडांबरोबर दृढं नात...एका मोठ्या वाडीत कमीतकमी शंभर तरी सुपारीची झा़डं असतील...नारळाची तेवढीच झाडं...त्यात जायफळ, आंबा आणि फणसाची झाडं मध्ये पेरलेली...या झाडांना फळं धरायाला साधारण दहा ते बारा वर्ष लागतात.  या सर्व काळात या झाडांची एखाद्या लहान मुलांसारखी काळजी घेण्यात येते.  अर्थात झाडांना फळं लागल्यावरही तेवढीच काळजी घेण्यात येते. नवख्या माणसाला प्रत्येक नारळी-पोफळीचं झाडं हे सारखचं दिसतं...पण वाडीवाल्यांना विचारा...इथे प्रत्येक झाडाच्या जन्माची एक गोष्ट असते. कुठलं झाड कधी लावलं...त्यावेळी कोणता सण होता...हे सर्व लक्षात असतं...ही सर्व वाडी आपल्या मुलांसारखी वाढवलेली असते.  आज या वाडीतील जवळपास ऐंशी टक्के झाडं पडली आहेत.  जी काही झाडं उभी आहेत ती सुद्धा आज ना उद्या पडण्याचा अवस्थेत आहेत...आता या सर्वांवर करवत फिरवतांना या माणसांच्या मनाची काय अवस्था असेल याचा विचारही करता येत नाही. 

वादळ झालं आणि गावी फोन केला...दहा ते बारा जणांना फोन लावण्याचा प्रयत्न केला...तेव्हा कुठे एकाला फोन लागला.   सकाळी डौलांनं उभी असणारी वाडी आता पार झोपली होती.  सोबत वाडीतले आणि गल्लीबोळातले लाईटचे पोलही पडले होते.  सांगणारा सांगत होता...समोर त्याचा चेहरा दिसत होता...तो रडत होता...नक्कीच...चित्रपटाच्या एका दृष्यासारखं सगळं बदललं होतं...उभी वाडी झोपली होती...सांगणा-याला फार बोलवेना...आणि मला ऐकवेहीना....मग काहींनी फोटो पाठवायला सुरुवात केली.  टीव्हीवर बातम्यामध्ये आमच्या उद्ध्वस्त गावच्या बातम्या सुरु झाल्या.  एकएक रस्ते दिसू लागले.  या रस्त्यावर कधी काळी सायकली सुसाट चालवल्या होत्या...त्या रस्त्यांवर आता झाडं आडवी तिडवी पडली होती.  वाड्यांनी सजलेल्या गल्या बंद झाल्या होत्या.  अनेकांची घरं तुटली होती...घरांवरचे पत्रे, कौलं फुटली...घरात पाणी...पण पिण्यासाठी पाणी नाही अशी अवस्था...या सर्वांत लवचीक अवस्था होती ती इथल्या माणसांची...कारण एवढं भयानक होईल याचा विचारच आला नव्हता...अनेकांचे घर, संसार उद्ध्वस्त झाले.  समुद्र किना-यावर असलेली घरं तर पार झोपली.  आणि वाडीवाल्याचं काय,  त्यांच नुकसान तर न मोजण्यासारखं...नुकसान हे नुकसानच असतं...त्याची तुलना करायची नाही.  पण शेतीचे नुकसान झालं तर पिक पुन्हा वर्षाच्या अंतरानं घेता येते.  पण या वाड्यांचं काय...नारळ, सुपा-या, जायफळ, आंबा, फणस ही झाडं दहा वर्ष वाढवावी लागतात....मग कुठे त्यातून उत्पादन सुरु होतं.  वर्षानुवर्षाच्या मेहनतीनं वाढवलेली झाडं आता कापली आहेत...किंवा कापण्याशिवाय त्याला पर्याय नाही अशी परिस्थिती आहे.  आता नव्यानं या झाडांची लावगवड केली तरी उत्पादन सुरु होण्यासाठी दहा वर्षाचा तरी काळ जावा लागणार...तोपर्यंत करायचे काय...यापैकी काही वाड्यांमध्ये अन्यही फळांफुलांपासून उत्पन्न मिळते.  जाम, काळीमिरीचे वेल, आबोली, मोगरा, गुलाब ही फुलझाडं..फार काय या भागात मोठमोठी कडीपत्त्याचीही झाडं आहेत.  या सर्वातूनही या भागात जोड उत्पादन काढण्यात येतं.  पण या वादळांना पडलेली मोठी झाडं या छोट्यांसाठीही घातक ठरली.

यासर्वांमुळे भविष्याचा प्रश्न आ वाचून उभा आहे.   गेल्या कित्येक वर्षात असलं वादळ झालेलं नाही...कधी असं होईल याचा साधा विचारही मनात आलेला नाही.  आता या भागाची पुरती दैना उडाली.  पण माणसं किती साधी बघा...साधारण सायंकाळी पाचच्या सुमारास सगळा प्रकोप थांबला...आजुबाजुची परिस्थिती बघितली....काही क्षण  सगळेच भांबावले...पण ते थोडावेळ...आसपास सगळे रस्ते बंद झाले होते.  हे रस्ते मोकळे केले पाहिजेत...कोणी आजारी झालं तर निदान त्याची तरी सोय व्हायला हवी...सामान यायला हवं.  त्यासाठी रस्ते मोकळे हवेत, हा विचार केला आणि ही मंडळी रस्ते साफ करायला लागली.  जोरदार वा-यानं पत्रे आणि कौलं उडून गेली होती.  कामाला कोण येणार...वादळांनं गरीब काय आणि श्रीमंत काय सर्वांचीच सीमारेषा पुसून टाकली होती.  त्यामुळे प्रत्येकानं जमेल तसं आपलं घर सावरण्याचा प्रयत्न सुरु केला.  आपली वाडी तात्पुरती साफ झाली...मग शेजारी मदत करायला ही मंडळी पुढे सावरली.  गावात लाईट काही दिवस येणार नाही, याची कल्पना असल्यामुळे दिवसा उजेडात साफसफाईची कामं सुरु झाली.  या नुकसानीचे आधी पंचनामे केले पाहिजेत...मगच मदत किती मिळेल याचा अंदाज घेता येईल, असा विचार इथे नव्हता. 

आमचं गाव अख्ख कोलमडलं...आणि आमची भूमिका काय...फक्त टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये आणि सोशल मिडीयामध्ये येणा-या फोटोमध्ये गावांची दुर्दशा पाहण्यापुरतीच होती...तिही नुसतं लांबूनच.  कोरोनामुळे पायावर बंधनं घातलेली.  आमच्या माणसांना मदतीची गरज आहे.  पण जाता येत नाही...यासारखी मानसिक होरपळ दुसरी नाही.  एरवी गावी असणा-या मित्र-मैत्रिणींना फोन होत होता तेव्हा कोरोनामुळे गावची वर्दळ थांबलीय...मे महिन्याता गांवी कितीतरी रानमेवा मिळतो...आंबे, फणस, काजू, ताडगोळे, जाम, जांभूळ, करवंद यांची नुसती रेलचेल असते.  भाज्यांही वारेमाप....मासेही तसेच...पण यावर्षी गांवी पाहुणे मंडळी फार नव्हती...त्यावरुन मैत्रिणींबरोबर गप्पा मारतांना भरपूर मस्करी होत होती...त्यांना आमची काळजी...म्हणून काळजी घ्या...सर्व व्यवस्थित झालं की भेटू म्हणून गप्पा रंगत असत...हे सर्व अगदी गेल्या आठवड्यापर्यंत चालू होतं...पण वादळाच्या तडाख्यांनी या आमच्या मित्र-मैत्रिणींचं हास्य दुःखात परावर्तीत झालं.  वाड्या झोपल्या...आणि घरंही...

एरवी ही आमच्या गावची माणसं खूप सुखी...त्यांच्या अपेक्षा फार कधी नसतातच...जेवणात वालाची पातळ आमटी, भात आणि पोह्याच्या पापडावर खूष होणारी...फारकाय ताकभाताचाही भुर्का मारणारी.... आम्ही इथे कोरोनाच्या चक्रात सापडलो तेव्हा या सर्वांचा जीव वर खाली होत होता....किती सूचना...बाहेर जाऊ नका...पोरांना सांभाळा...लवकर संपेल सगळं...कळजी करु नका...असे कितीतरी आपलेपणाचे सल्ले...आता हिच आमची माणसं हताश झाली आहेत.  वाडीतील सुपा-या हातानं कापण्याची वेळ आलीय...नारळाचीही तिच गत...फणस, आंबा, जायफळं यांचीही तिच गत...हे सर्व कापणार कधी...आणि नवीन रोपांची लागवड कधी करणार...आणि त्याचं उत्पन्न कधी सुरु होणार...या सर्वांची उत्तरं कोणाकडेही नाहीत.

सरकारी मदत काय मिळेल, किती मिळेल हे काही दिवसात ठरेल...पण ती मदत आमच्या माणसांना किती उभारी देईल हे समजून घेतलं पाहिजे.  कोकणची माणसं साधी भोळी....असं म्हणतात...एरवी कधी नुकसान भरपाई द्या म्हणून सरकार दरबारी भांडणं त्यांनी केलीच नाहीत...पण आजची वेळ ही वेगळी आहे.  हा सर्व उद्ध्वस्त झालेला पट्टा पुन्हा तसाच करण्यासाठी काही वर्ष तरी नक्की जाणार आहेत.  तोपर्यंत इथल्या नारळी, सुपारी सारखं इथल्या माणसालाही जपावं लागणार आहे...त्याच्या मनाला उभारी द्यावी लागणार आहे....

सई बने

डोंबिवली

----------------------------------------------------------------------------------------

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 


Comments

  1. खुप छान वर्णन........ तंतोतंत खर. 👌👌👌👌

    ReplyDelete
  2. You describe the kokan correctly The people of kokan very hard working , will stand up soon from this crisis Santosh Patil

    ReplyDelete
  3. खूप छान लेख वाचून मन खिन्न होते पण काय करणार हे quarantine che bhut kadhi संपणार कळत नाही केव्हा जाता येईल वाट बघत बसायचे

    ReplyDelete
  4. हेमू ने सुद्धा खुप छान लिखाण केले आहे तू सगळ्यांची प्रेरणा स्थान आहेस

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

Post a Comment