भीक नको....पण.....

 

भीक नको....पण.....

काल पुन्हा तिच पोस्ट फेसबूकवर दिसली....काही वेळानं वॉटस्अपच्या माध्यमातून पुन्हा आली आणि डोक्यात तिडीक देऊन गेली...काय करावं ते सुचेना...मी थेट ती पोस्ट पाठवणा-याला फोन केला...बाबा का पाठवली ही पोस्ट...तुला काही अनुभव आला का असा...त्याचे उत्तर अधिक डोकेदुखवणारे...छ्या...मला कशाला अनुभव येतोय....आमचं कोण आहे गावी...पण टाकलं असचं म्हणून...असंच...या असंच मधून आपण आपल्याच गावाची...गावच्या लोकांची बदनामी करतो असं नाही का वाटतं...तर उत्तर आलं...तुम्ही जास्तच मनाला लावून घेता...वादळ काय आलं आणि गेलं...आता सगळं सुरु होईल बघा परत...एवढं बोलून त्यानं फोन ठेवला...माझ्या मनात त्याचे ते निर्धास्त बोल पुन्हा पुन्हा घुमत होते...खरंच फार हळवे झालो आहोत का आपण...एक वादळ काय आलं आणि मनच जणू समुद्रातल्या बोटीसारखं हेलकावे खावू लागलं...

ही सर्व मनाची अस्वस्थता वाढली ती एका पोस्टमुळे...कोरोनाचं संकंट शहरावर जसं वाढलं तसा शहरातून गावाकडे जाण्याचा ओघ वाढला.  पण आघीच गावांची अवस्था बिकट.  त्यामुळे गावांमध्ये चौदा दिवस क्वारंटाईनचा नियम लावण्यात आला.  काही ठिकाणी बाबांनो आहात तिथेच रहा...असा संदेश देण्यात आला...त्यानंतर आलं निसर्ग चक्रीवादळ....या वादळानं कोकणाची पार दैना केली.  अद्यापही काही भागात लाईटचा पत्ता नाही.  काही भागात पोलही उभे राहीले नाहीत...त्यामुळे पुढचे पंधरा दिवस तरी लाईट आले तरी ते कधी जातील याचा जातील अशी परिस्थिती...पडलेल्या...तुटलेल्या झाडांचा....मोडलेल्या घरांचां...संसाराचा प्रश्न त्यापुढे...एकुण काय गावाकडे रहाणारा माणूस एकाकी पडलाय...याच माणसाला आधार देण्याऐवजी काही त्याच्या या असह्यतेवर टिका करण्यात मग्न आहोत.  त्यातून कोरोनामुळे गावी यायला रोखणा-या भावानं, निसर्ग चक्रीवादाळानं झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी शहरातल्या भावाकडे हात पसरले...अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल झाल्या...या पोस्ट वाचून खूप वाईट वाटलं...आज फक्त पिकनीकसाठी किंवा मे महिन्याची मौजमजा मारण्यासाठी गावाकडे जाणा-यांनी कधी आपल्या गावाच्या ख-या विकासासाठी हातभार लावला आहे का, हा प्रश्नही मनामध्ये आला....

3 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळानं रायगड, रत्नागिरी जिल्हाला जोरदार तडाखा

दिला.  त्यात आमचा रायगड जिल्हा तर पार झोपला आहे.  कधी उंच हवेत गिरक्या घेणारे माड आता वाड्यामध्ये चिखलात पडले आहेत.  किंवा काही रस्त्यावर झोपले आहेत.  जोरदार वा-यासमोर त्यांचेही काही चालले नाही.  ज्या माणसांनी त्यांना लावलं...वाढवलं...काळजी घेतली त्यांच्याच घरावर हे माड कोसळले...सोबत इतरही झाड़ांचे तेच हाल झाले.  सर्वंत्र चिखल आणि तुटलेल्या झाडांचा खच आहे.  वादळ झाल्यावर चार-पाच दिवस या वादळाच्या बातम्या जोरात होत्या...आता पुन्हा सर्व निवळल्यासारखे वातावरण आहे.  वास्तवात या जिल्ह्यातील माणसांच्या आयुष्याला या वादळांनं पुरतं बदलून टाकलं आहे.  चार-पाच तासांच्या वादळान पारंपारिक उत्पादनाची साधनं संपली आहेत.  ही साधनं पुन्हा निर्माण करायची तर त्याला किमान दहा वर्षाचा कालावधी जाणार आहे.  शिवाय झालेले नुकसान भरुन कसे निघणार हा प्रश्न आहेच.  आज प्रत्येकाच्या वाड्यांमध्ये तुटलेल्या झाडांचा खच आहे.  ते साफ करण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध नाही...की झाडं तोडण्यासाठी हत्यारं नाहीत...त्यामुळे मिळेल त्या साधनांनं तात्पुरती साफसफाई करण्यावाचून वाडीमालकाला पर्याय नाही.  त्यात लाईट नाही.  कधी येईल त्याची खात्री नाही.  सकाळी उजेडात मिळेल तेवढी साफसफाई करायची...पाऊस असेल तर तेही नाही.  ही झाडं कापतांना हजार प्रश्न त्यांच्या मनात नाहीतच...त्यांच्या मनात फक्त एकच प्रश्न आहे...पुढे काय....हो पुढे काय....

चक्रीवादळ होऊन गेले.  आणि सोबत सर्व काही घेऊन गेले.  आता या जिल्ह्यातील गावांमध्ये अनेक पहाणी दौरे झाले.  मंत्री-संत्री येऊन गेले.  पॅकेज जाहीर होत आहेत.  पण मुळ प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष होतंय का अशी परिस्थिती आहे.  रायगड जिल्हा आणि किनारपट्टी भागात नारळाच्या..सुपारीच्या वाड्या पार भुईसपाट झाल्या आहेत.  या वाड्यांमधून निघणारे उत्पन्नही आता संपल्यासारखं आहे.  शिवाय या वाड्या म्हणजे या भागातील शान होत्या...त्यामुळे पर्यटकांचा रोख रायगड आणि किनारपट्टी भागात असायचा.  अनेक बागायतदारांनी या वाड्यामध्ये पर्यटकांसाठी फार्महाऊस बांधले होते.  वादळानं हा फार्महाऊसही भुईसपाट झाले आहेत.  याबरोबर बागायतदार रस्त्यावर आले आहेतच शिवाय या वाड्यामध्ये काम करणारे आणि पर्यटकांवर अवलंबून असलेल्या छोट्या उद्योजकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  यावर उपाय म्हणजे पर्यायी उत्पादनाची साधने काय हे सांगणे.

नारळ, सुपारी, जायफळ ही मुख्य पिके असणा-या या भागात शेतकरी म्हणून वाडीवाल्यांकडे कधी बघितले आहे का....बहुधा नाहीच.  इथेही पारंपारिक पद्धतीने सुपा-या आणि माडाची लागवड केली जाते.  आता या चक्रीवादळानंतर एक प्रश्न उभा राहीला आहे, आता जसं वादळ आलं तसंच भविष्यात येण्याची काही शक्यता आहे का...आणि असल्यास अशा उंच नारळी-पोफळींचे नुकसान कसे टाळायचे.  आता ऐंशी टक्के लागवड नव्यानं करावी लागणार आहे.  ही लागवड करतांना हा शास्त्रीय विचार करणे गरजेचे आहे.  कमी उंची, उत्पनात उत्कृष्ठ दर्जा आणि कमी वेळेत लागवडीस धरणा-या सुपा-या आणि नारळाची लागवड शक्य आहे का याचा विचार करायला हवा.  तसं मार्गदर्शन या भागातील वाडीवाल्यांना मिळायला हवं.  काही वर्षापूर्वी केरळच्या धर्तीवर रायगड जिल्ह्यात मसाले लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.  पण त्यात फारसे यश आल्याचे दिसले नाही.  कोकोपीट सारखे झाडंही लावण्यात आले.  पण त्यातही फारसे यश आले नाही.  एक जायफळ वगळता अन्य मसाल्यांच्या पदार्थांची लागवड या भागात फारशी झाली नाही.  ती का झाली नाही...आणि झाली असल्यास त्यात यश का येत नाही याचाही अभ्यास करण्याची आता गरज भासू लागली आहे.  कारण जर नारळ आणि सुपा-यांना उत्पादन यायला दहा वर्षाच्या वरचा काळ जाणार असेल तर त्या दरम्यान उत्पदनाचे साधन म्हणून या मसाल्यांच्या पदार्थांचा उपयोग होऊ शकतो का हा ही विचार करायला हवा. 

दुसरे म्हणजे कोवीडमुळे आयुर्वेदिक उत्पादनांना मागणी वाढली आहे.  वाड्यांमध्ये दोन

झाडांच्या आळी दरम्यान तुळस, कोरफड अशा आयुर्वेदी औषधात मागणी असलेल्या वनस्पतींची लागवड करता येऊ शकते. त्याचे उत्पादन आणि विक्रीचा मार्ग या भागात दाखवला गेला पाहिजे.  त्याशिवाय नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात.  त्याच्या शेंड्याचाही वापर करण्यात येतो.  आता जी काही नारळाची झाडं उरली आहेत,  त्याच्या झावळ्यांपासून अनेक उपयोगी वस्तू तयार करण्यात येतात.  त्याचा काही सामुहीक कारखान प्रत्येक गावांमध्ये किमान एक जरी काढला तरी उत्पन्नांचा पर्याय उपलब्ध होणार आहे.  सर्वांत महत्त्वाचा आणि हातातला मार्ग म्हणजे भाज्यांचे उत्पादन.  या भागात भाज्या मोठ्या प्रमाणात होतात.   पण त्यात अद्यापही पारंपारीक पद्धतीवर भर आहे.  या भाज्या नव्या तंत्राचा वापर करुन लावल्या तर मुंबईपासून काही तासावर असलेल्या रायगड जिल्ह्यातींल गावांना मोठा उत्पन्नांचा मार्ग निर्माण होऊ शकेल. 

अर्थात हे सर्व बोलायला आणि लिहायला जेवढे सोप्पे आहे तेवढे नक्कीच नाही.  आतापर्यंत या भागात ज्यांचे दौरे झाले, त्यातून नुकसानीचा आढावा घेण्यात आला आहे.  अद्यापही काही दौरे होत आहेत.  पण या दौ-यांमध्ये पहाणीपेक्षा पर्यटन अधिक होत आहे का, अशी ओरड आता ऐकू येत आहे.  शिवाय देण्यात येणा-या नुकसान भरपाईपेक्षा अधिक खर्च पहाणी दौ-यावर होत आहे.  अशावेळी येथील मंडळी भीक नको...पण पार्टी आवर असं म्हणत आहेत.  त्यात सोशल मिडीयावर चाललेले हे ट्रोल मेसेज...मार्च महिन्यापासून सुरु झालेल्या या कोरोना वॉरच्या काळात गावांत रहाणा-यांवर काही ना काही मेसेज टाकून त्यांना ट्रोल करण्यात येत आहे, ते अधिक दुःखदायक आहेत.  खरतरं

गावाकडे राहणा-या कोणत्याही नातेवाईकांनं इकडे येऊ नका...असा बोर्ड लावला नाही. 

उलट ही मंडळी गावी बोलवतच होती, फक्त चौदा दिवसांची क्वारंटाईन होण्याचा नियम पाळावा लागणार होता. त्यात चुकीचं काही आहे,  असं नक्कीच नाही...कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता ही काळजी प्रत्येकानेच घेणे गरजेचे आहे.  बरं शहरी भागात जशी आरोग्याची साधने उपलब्ध आहेत, तशी साधने या पट्ट्यात अभावानेच आढळतात.  त्यामुळे येथील मंडळींनी मुंबईकरांना जरा आस्ते कदमचा सल्ला दिला असेल तर त्यात काहीही वावगे वाटत नाही.  त्यामुळे गावातल्या लोकांना सोशल मिडीयावरुन ट्रोल करण्यापेक्षा त्यांची नेमकी अडचण काय आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे. 

निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या गावांना मदत म्हणजे पैसे नको आहे.  तर त्यांची अपेक्षा त्याहून वेगळी आहे.  या वादळानं दिलेला आर्थिक आणि मानसिक धक्का कधी भरुन निघेल हे सांगता येणार नाही.  निदान नव्या उत्पादनांची वाट दाखवली तरी खूप झालं. बाकी इथला बागायतदार आणि त्याची पुढची पिढीही कष्टाला मागे हटणारी नाहीच...त्याला योग्य मार्गाने प्रोत्साहन दिलं तर आमच्या वाड्या पुन्हा नारळी-पोफळीनं डोलू लागतील....

सई बने

डोंबिवली

-------------------------------------------------------------------------------------------------------

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

 

 


Comments

  1. छान लेख.खरंच लोक व्हाटस्पवर पोस्ट टाकताना विचार करत नाहीत.

    ReplyDelete

Post a Comment