बा....विठ्ठला.......


बा....विठ्ठला.......

एकादशीला न राहून एक फोन केला.  काय, कसं काय...अशा फॉर्मल गप्पा मारल्या...मग मनातला प्रश्न विचारला...आज काय केलंत...आता कोरोनामुळे सगळं बंद आहे...पुजा केलीत का...विठोबाची पुजा केलीत का...उपवास धरलाय का...फराळाचं कुठे मिळालं...बाहेर पडत नाहीत ना...फुलं मिळाली का...कोणाला घरी बोलावलतं नाही ना...असे एक ना दोन अनेक प्रश्न मी विचारत होते...समोरच्या दामले काकू शांत होत्या...फक्त हो..हो...नाही हो...अशीच उत्तरं येत होती...माझे प्रश्न संपल्यावर काकू म्हणाल्या...यावर्षीही आम्ही विठोबाला भेटलो...पण वेगळ्या विठोबाला...तुला फोटो पाठवते, म्हणत काकूंनी फोन ठेवला.

मी विचारात पडले.  आमच्या परिचयाचे हे दामले काका-काकू म्हणजे हसतमुख जोडपं...काका, मुंबईला पोस्टात कामाला.  काकू घरीच...मुलबाळ नाही.  त्यामुळे काका ऑफीसला गेले की दिवसभर काकू घरी असत...दिवसभर वाती करण्यात त्यांचा वेळ जायचा.  देवपूजेसाठी लागणा-या सर्व प्रकारच्या वाती त्या घरी करतात.  काका येईपर्यंत काकूंचा हा घरगुती उद्योग चालू....मग काका आल्यावर जेवणं झाली की दोघंही मिळून त्या वाती पिशव्यांमध्ये पॅक करत.  काकांच्या ऑफसच्या रस्त्यावर एक देवपुजेच्या सामानाचे दुकान होते.  काका ठराविक दिवशी या वाती त्या दुकानात विक्रीला देत,  आणि येतांना काकूंसाठी पुन्हा भरपूर कापूस घेऊन येत.  काकूंचा हा नेम अगदी काका रिटायर होईपर्यंत चालला.  नाही म्हणायला संध्याकाळी काका ऑफीसवरुन यायच्या आधी त्या घराबाहेर पडत.  सोसायटीमधील रहीवाश्यांबरोबर गप्पा मारत.  मुलांची चौकशी होत असे.  तोपर्यंत काका भाजी आणि फळांच्या पिशव्या घेऊन येत.  मग सोबतीनं दोघंही घरी जात.

त्यांच्याकडे मे महिन्यात पाहुणे येत...आठवडाभर रहात.  पण काका-काकू फार कुठे गेल्याचे आठवत नाही.  पंढरपूर सोडलं तर त्यांचं कुठे जाणं येणंही नाही.  आषाढी एकादशी तर त्या दिवाळीसारखी साजरी करतात.  अगदी घरासमोर तोरणं.  रांगोळ्या.  फुलांची सजावट.  त्यांच्याकडे विठोबाची एक ब-यापैकी मोठी मुर्ती आहे.  त्या सावळ्या मुर्तीला दोघंही रात्रभर छान सजवतात.  फुलांच्या माळा काकू स्वतः तयार करतात.  त्या सर्व फुलांवर तुळशीच्या पानांची मंजी-यांसह एक माळ...शिवाय काकूंनी हातांनी केलेले विठोबाचे दागिने...दरवर्षी त्यांच्याकडे दिवाळीला जाता आलं नाही तरी चालेल,  आम्ही एकादशीला नक्की जातो.  काकू प्रत्येकाला बटाट्याचा चिवडा, राजगि-याचा लाडू आणि फ्रुट सॅलेड हा खाऊ देणार...सर्व सोसायटीमधील मुलं हजर असतात त्यांच्याकडे....त्यात आमच्यासारखी मोठी माणसंही...या वर्षीही मला या खाऊची आठवण झाली.  यावर्षी त्या कोरोनामुळे सर्व उत्सवांवर पाणी सोडावं लागलं.  देवही बंद...पै पाहुणेही नाही.  मग काकूंनी पुजेला कोणाला बोलावलं असेल.  दरवर्षीसारखा यावर्षीही फराळाचा थाट ठेवला असेल का, असे प्रश्न मनात येऊ लागले.  म्हणून त्यांनाच थेट फोन केला होता...पण त्यांनी फोटो पाठवते म्हूणून सांगत फोन ठेवला.

सत्तरीला पोहचलेले दामले काका-काकू वॉटस्अप चांगले वापरतात.  नेहमी त्यांचा

गु़डमॉर्निंगचा मेसेज असतोच...बाकीही काही चांगले लेख ते आवर्जून पाठवतात.  थोड्या वेळांनी काकांनी फोटो पाठवले.  सॅनिटायझर, मास्क यांचे घरगुती पॅक केलेले पाकीट.  सोबत चवनप्राशच्या बाटल्या.  पाणी गरम रहातं त्या स्टीलच्या बाटल्या.  असे फोटो होते.  मला काही समजेना. या वस्तू आणि एकादशीचा काय संबंध.  तितक्यात काकांनी फोन केला.  अग या वस्तूच या वर्षी विठोबाचा प्रसाद आहेत हो...आम्ही नेटद्वारे सर्व वस्तू घरी मागवल्या.  छान सॅनिटराईज वगैरे केल्या आणि आपल्या सफाई कर्मचा-यांना वाटल्या.  चवनप्राश आणि पाण्याच्या बाटल्या पाहून खूश झाली मंडळी.  आपल्याकडे तो गॅसवाला येतो ना, त्यालाही दिल्या या बाटल्या.  आता पावसाळ्यात ही मंडळी अशीच काहीही काळजी न करता भर पावसात फिरणार.  मग त्यांना हवं तेव्हा गरम पाणी या बाटल्यांद्वारे पिता येणार आहे.  यावर्षी एकादशीला काहीही केलं नाही.  पूजा केली विठोबाची साधी.  त्याला साकडं घातलं.  पण कोणाला बोलवलं नाही.  की कोणी आलं नाही.  आम्हालाही हे माहीत होतं.  त्यामुळं आम्ही आधी दहा दिवस ही
सगळी तयारी करुन ठेवली होती.  एकादशीच्या दिवशी सकाळी ही पाकीटं आणि बाटल्या घेऊन बाहेर उभे राहिलो.  कचरागाडी आली तेव्हा आपले सर्व सफाई कर्मचारी आले.  त्यांनी बाटल्या आणि सॅनिटाझर दिलं.  विठ्ठलाचे नाव घेतलं आणि घरी आलो...दुपारी गॅसवाल्यांची गाडी आली.  आवाज ऐकला आणि परत बाहेर पडलो...त्यांनाही या बाटल्या आणि सॅनिटायझरचा पॅक दिला.  मंडळी खूष झाली.  विठ्ठलाचा गजर केला आणि घरी आलो.  झाली एकादशी.  संध्याकाळी आम्ही दोघांनीच त्या सावळ्याची आरती केली.  अगदी साधा नैवेद्य दाखवला.   कशी वाटली तुला पुजेची ही कल्पना...काका सांगत होते मी फक्त ऐकत होते.  शेवटी त्यांनी मला प्रश्न विचारुन निरुत्तर केलं. 

काका खरचं ग्रेट होते.  मी विठ्ठलाचं नाव घेतलं.  काकांचं कौतुक केलं.  बाकी बोलणी चालू झाली.  सध्या लॉकडाऊनमध्ये काय करता हे विचारलं.  तेव्हाही असंच चाट करणारं उत्तर मिळालं.  मुळात काका निवृत्त झाल्यापासून फार कधी घराबाहेर पडलेच नाही.  यावरुन आम्ही त्यांनी खूप चिडवायचो.  पण म्हणायचे, तुझ्या काकूला खूप कमी वेळ दिलाय मी.  तो बॅकलॉक भरुन काढतोय.  एकादशी झाली की महिन्यांनी ते पंढरपूरला जायचे.  चांगले दहा दिवस रहायचे.  एकादशीनंतर गर्दी कमी असायची.  त्यामुळे विठोबाचं दर्शनही छान व्हायचं.  मग त्याचा प्रसाद घेऊन काका-काकू परतायचे.  आणि सर्वांना फोन करुन घरुन प्रसाद घेऊन जा, असं फर्मान काढायचे.  एरवी घरात त्यांनी त्यांचे शेड्यूल लावलं होतं.  आठवड्यातून एकदाच दूध आणायचे.  भाजीही तशीच.  किराणा सामान बरोबर महिन्याचे...आणि काही साठवणीचे वर्षाचे.  सकाळी रोज न चुकता एक तास योगा.  त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे, काकांनी स्वतः इंटरनेट वापरायचं शिकून घेतलं होतं. आणि काकूंनाही शिकवलं होतं.  दोघंही बॅंकाची काम करायची ती नेट बॅंकींगच्या माध्यमातूनच.  शिवाय काही पॉलिसी होत्या.  त्याही नेटच्या माध्यमातून करायला लागले होते.  काका प्रचंड वास्तववादी.  आपल्याला मूलबाळ नाही.  त्यामुळे भविष्यात काही झालं तर काकू एकट्या पडायला नको. किंवा काकूंना काही झालं तर त्यांनी एकटं व्हायला नको म्हणून काही वृद्धाश्रमाचे पत्तेही शोधून ठेवले होते.  त्यांचे नाव, पत्ते, फोन नंबर अगदी मोठ्या अक्षरात हॉलमध्येच लिहीले होते.  काकू त्याला गंमतीमध्ये आमचं भविष्य असं म्हणायच्या.  पण याशिवाय काकांनी काकूनाही बॅंकामधील गुंतवणूक, विमा पॉलीसी याची माहिती दिली होती.  ब-याच वेळा ते काकूंनाच ही सर्व कामं करायला लावत.  जेणेकरून त्यांना सगळी माहिती होईल.  रहाता राहीला प्रश्न वेळेचा.  काका घरकामात काकूंना मदत करत असत.  जेवण करायचे दिवस त्यांनी वाटून घेतले होते.  त्यामुळे दोघंही छान स्वयंपाक करायचे.  त्यांची छोटी बाल्कनी होती.  काकांनी तिथं मोठ्या कल्पकतेनं भाज्यांची लागवड केली होती. कमी जागेतली ही भाज्यांची बाग सगळ्यांसाठी नेहमी उत्सुकतेची जागा होती.  त्यात टोमॅटो, भेंडी, वांगी, मिरच्या ही झाडं होती.  तर काका नेहमी मेथी, पालक आणि कोंथिबीरची लागवड करायचे.  कधी त्यांच्या घरी गेलं की दोन वांगी किंवा मूठभर पालक नक्की मिळायचा.  या सर्वांत त्यांचा वेळ आरामात जायचा.  शिवाय वातींचा व्यवसाय होताच.

 

आता लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काकांचं हे शेड्यूल त्यांच्या मदतीला आलं.  ते नेहमी घराबाहेर एरवीही पडतच नव्हते.  तेव्हाही आठवड्याचं दूध, औषधं, भाजी असं सामान आणायचे.  त्यामुळे त्यांना लॉकडाऊनचा काहीही परिणाम झाला नाही.  फक्त वाती करायचा कापूस संपल्यावर प्रश्न निर्माण झाल.  पण नेट शॉपिंग जिंदाबाद.  त्यांनी चक्क नेटद्वारे वातींचा कापूस खरेदी केला.  आता या वातींची छोटी पाकीटं करुन ठेवली आहेत.  लवकरच श्रावण महिना लागेल.  तेव्हा सोशलमिडीयाच्या माध्यमातून त्यांची विक्री कशी करता येईल यावर ही दोघंही विचार करत आहेत. 

मी त्यांचं हे शेड्यूल आणि व्यस्तता ऐकून चाटच झाले.  जिथे तरुण मंडळी या लॉकडाऊन पुढे हरली आहेत.  एकाकीपणा त्यांना त्रस्त करतोय.  तिथे हे सत्तरीचे काका काकू वेळेचं नियोजन करत आनंदाने आलेल्या परिस्थितीला सामोरे जात होते.   मी मनोमन त्या विठोबाला साकडं घातलं...सध्याच्या परिस्थितीत सर्वांनाच असा सकारात्मकपणा दे रे बाबा....म्हणत हात जोडले...


सई बने

डोंबिवली

----------------------------------------------------------------------------------------

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 


Comments