कोरोनासंग
माणसाचे रंग.......
खाली ये लगेच, मी खाली थांबलेय. माझ्या मैत्रिणींच्या कंपूमध्ये एक फास्टर फेणे टाईप मैत्रिण आहे...अचला...आता नाशिकला असते. तिचा फोन होता. या लॉकडाऊनमध्ये ही आली कशी...हा मला प्रश्न पडला. पण पु्न्हा तिचा फोन...मी खाली आहे...लगेच जायचेय...ये लवकर...मला निघायचंय...ही आलीच कशी असा प्रश्न माझा मलाच विचारत मी मास्क घेऊन खाली आले. खाली पाहिलं तर या बाई उभ्या. लॉकडाऊननंतर सोसायटीमध्ये काही नियम केले आहेत. त्यामुळे अचला खालीच थांबली होती....जवळपास सहा महिन्यांनी आम्ही भेटत होतो. ते सुद्धा लांबूनच....दोघींचेही डोळे पाणावले...आलीस कशी...कशाला...रिक्स का घेतेस...मी तिला विचारलं...ती म्हणाली थांब ग....खूप महत्त्वाचं कारण होतं...आईही सोबत आहे, गाडीत बसलीय...तिच्या कामासाठीच आलेय...फक्त तुला बघायचं म्हणून आले....चल, आता निघते...हा रोग गेला की भेटू चांगलं...म्हणतं अचला निघालीही...मी अजूनही कोड्यात....आली काय...निघाली काय...शेवटी तिच्या पाठोपाठ गेले. अचलाची आई, वंदना काकू गाडीत होत्या. मी जवळ येतांना पाहून त्यांनी गाडीच्या काचा खाली केल्या. त्याही मास्क लावून बसलेल्या...चेह-यावर ओळखीचं हसू आलं आणि डोळ्यात पाणी...अचलाही ऐवढ्या वेळेत गाडीत बसली...दोघींनी हात हलवले...फोनवर बोलते म्हणाली, आणि गाडी सुरु झाली...अवघी दहा मिनीटांची भेट...अनेक प्रश्न सोडून गेली....त्या दोघींची गाडी गेल्यावर पुन्हा घरी आले. हातपाय तोंड धुवेपर्यंत फोन आलाच...अचलाचाच होता...आज अचानक तिनं धाड का टाकली हे कारण ऐकून मी अवाक झाले...
अचला एकुलती एक मुलगी. तिची आई, वंदना काकू शिक्षिका म्हणून निवृत्त झालेल्या. अचलाचे वडील काही वर्षापूर्वी वारले. त्यांनी संसार अगदी काटकसरीनं केला. हौसमौज केली. पण उगाचचा खर्च नाही. वंदना काकू शिकवण्याही घेत असत. पुढे अचलाही कॉलेजला जायला लागल्यापासून शिकवण्या घेत असे. फार पैसे नाही. अगदी तिच्या फी पुरते पैसे मिळवायची. बाकी मुलांमध्येच वाटून टाकायची...काकूही आपल्याला मिळालेल्या पैशामधून ठरावीक रक्कम दर महिन्याला एका अनाथाश्रमाला द्यायच्या. अचलाच्या आई वडीलांचा स्वतःचा फ्लॅट होता. त्याच्याच बाजुचा फ्लॅटही विकायला काढला होता. तिच्या आईवडीलांनी थोडं डेअरींक करुन हा फ्लॅटही विकत घेतला होता. याच फ्लॅटमध्ये मग वंदना काकू शिकवण्या घेत असत. दोघी मायलेकी तिथं मुलांना शिकवत. दोन दोन फ्लॅट म्हणून मी अनेक वेळा काकूंना चिडवलं होतं...तेव्हा त्या म्हणायच्या अचलाचं लग्न झाल्यावर तिला शेजारीच ठेऊन घेणार...त्यासाठी घेतला...दुर्दैवानं अचला पदवीच्या शेवटच्या वर्षात असतांनाच काका अचानक वारले. त्यांच्या जाण्याने या दोघी एकाकी पडल्या. दुस-या फ्लॅटसाठी काढलेलं कर्जही बाकी होतं. पहिल्यांदा हा फ्लॅट विकण्याचा विचार आला. पण अचलानं नकार दिला. त्यांनी भाडेकरु ठेवला तिथं. या भाड्यातून मग फ्लॅटचे हप्ते भरायला सुरुवात केली.
पुढे अचलानं सीए केलं. तिच्यासोबतच यतिन नावाचा मुलगा होता. त्यानं अचलाला मागणी घातली. दोघंही सीए करीत होते. त्याच्या घरीही अचला पसंत होती. फक्त अट एकच होती, अचलाला नाशिकला जावं लागणार होतं. अचलाला हे मान्य नव्हतं. कारण आई एकटी पडणार होती. वंदना काकूंना यतिन पहिल्याच भेटीत आवडला होता. त्यांची एकटं रहाण्याची तयारी होती. कधीना कधी ही वेळ येणार हे त्या जाणून होत्या. त्यामुळे त्यांनी अचलाला खूप समजावलं...शिकवण्यांच्या मुलांमध्ये मी रमेन, हे ही सांगितलं. पण अचला तयार नव्हती. शेवटी यतिन मदतीला आला. त्याचे कुटुंबियही समजूतदार. त्यांनी अचलाच्या आईला त्यांच्याबरोबर नाशिकला रहायला बोलावले. अचलाही या प्रस्तावावर खूश होती. आवडलं नाही तर परत आपल्या घरी रहा...वाटल्यास काही दिवस इथे काही दिवस नाशिकला, लेकीकडे असा प्रस्तावही आला. थोडा मार्ग निघाला. शेजारच्या फ्लॅटमधले भाडेकरुनही आम्ही फ्लॅटची काळजी घेऊ...आमच्या घरासारखंच ठेऊ...असं म्हणाले. शेवटी एकदाची अचलाही हो म्हणाली. लग्न झाले. अचला नाशिकला गेली. वंदना काकू लगेच नाशिकला गेल्या नाहीत. पहिल्यांदा शिकवणीच्या मुलांना सुट्टी लागली की त्या लेकीकडे जायच्या. एरवी त्यांनी शिकवण्या वाढवल्या. शेजारच्या फ्लॅटचे हफ्ते फिटले होते. अचलानं आपल्या पगारातून ते नियोजन केले. आता त्या फ्लॅटचे आलेले भाड्याचे पैसे काकू पूर्णपणे अनाथाश्रमाला देत असत. त्या फार कुठे जायच्या नाहीत. दिवसभर शिकवण्यांमध्ये वेळ जायचा. त्यांच्या घरी कामाला येणारी बाईच बहुधा भाजी, पिढ आणण्याचे काम करत असे. फक्त महिन्यातून ठराविक दिवशी अनाथश्रमात मात्र जात...
यावर्षीच्या सुट्टीमध्ये वंदना काकू सिंगापूर
टूर करणार होत्या. लेडीज पार्टी होती
सगळी. अचलाची सासू, नणंदा, तिच्या
सासरच्या महिला, काकूंची बहिणही होती त्यांच्यासोबत. त्यांनी थोडी खरेदी सुरु केली आणि हा कोरोनाचा
खेळ सरु झाला. लॉकडाऊन जाहीर झालं. रोग वाढायला लागला. तशी अचलाची धाकधूक वाढली. ती काकूंच्या मागे लागली, नाशिकला ये
म्हणून...शिकवण्याही बंद झाल्यामुळे काकू घरात अडकल्या होत्या. एकट्या असल्यानं कंटाळल्या होत्या. जेव्हा लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता आली होती,
तेव्हा अचला परवानगी काढून काकूंना घेऊन गेली.
प्रश्न फक्त घराचा होता. त्यांचा
रहाता फ्लॅट पूर्ण बंद केला. काकूंनी
झाडांच्या कुंड्या सोसायटीच्या आवारात ठेवल्या.
वॉचमनला पाणी घालायला सांगितलं. शेजारचा
फ्लॅटही त्यांचाच. भाडेकरुंनी आम्ही नेट
बॅंकींगद्वारे भाडे देऊ असं आश्वासन दिलं.
ई पास काढून अचला आईला घ्यायला आली होती.
काकू जातांना न विसरता अनाथाश्रमात जाऊन महिन्याचे पैसे देऊन गेल्या
होत्या...पुढचा सगळा व्यवहार बॅंकेमार्फत करेन असं त्यांनी तिथं सांगून ठेवलं.
एप्रिल महिन्यात काकू नाशिकला गेल्या. आता कोरोना जाई पर्यंत तिथेच रहाण्याचे त्यांनी
ठरवले होते. फक्त अडचण एकच आली, ती म्हणजे
भाडेकरुची. एप्रिल पासून त्यांनी
महिन्याचं भाडंच दिलं नाही. सुरुवातीला
लॉकडाऊन, ऑफीस नाही, पगार अद्याप नाही, अशी कारणं पुढे आली. पण काकूंना दुस-या शेजारच्याकडून समजलं की,
त्यांचे भाडेकरु घरुन काम करीत आहेत. पगार
चालू आहे. फार काय घरी बाहेरच्या वस्तूही
येत आहेत. अगदी खाद्यपदार्थही मागवत
आहेत. काकूंनी परत भाड्याची चौकशी
केली. अचला आणि यतिनही बोलेल...थोडं दरडावलं...तेव्हा
लॉकडाऊनमध्ये सरकारनं भाड्यात सवलत द्यायला सांगितली आहे, असं उर्मट उत्तर त्यांना
ऐकावं लागलं. काकू अस्वस्थ झाल्या. यतिन हा जावई म्हणून चांगला होता. मुलासारखीच काकूंची काळजी घेत होता. तरीही काकू अस्वस्थ होत्या. त्यांनी आणि काकांनी पहिल्यापासून कुठल्याही
मंदिराला किंवा धार्मिक कार्याला देणगी दिली नव्हती. पण अनाथश्रामला न चुकता देणगी दिली होती. काकांनंतर काकूंनी हा नेम चालू ठेवला
होता. भाड्याचे पैसे त्या न चुकता अनाथाश्रमात
द्यायच्या...त्यांनी ही गोष्ट भाडेकरुंनाही सांगितली होती. त्यामुळे आता भाड्याचे पैसे मागितल्यावर
त्यांनीही या अनाथश्रमाचही उल्लेख केला होता.
नाहीतरी तुम्ही त्या अनाथाश्रमातच देणार ना पैसे...तुम्हाला स्वतःला काही
गरज नाही ना...मग कशाला आमच्या मागे लागता...असंही ऐकवलं होतं. त्यामुळे काकू एकट्या इकडे यायला निघाल्या
होत्या. अचलानं आई जेवढे दरमहिन्याला पैसे
अनाथाश्रमाला देते तेवढे दिलेही...पण ही गोष्ट वंदना काकूंना मान्य नव्हती. माझे स्वतःचे पैसे असतांना मी तुझ्याकडे कशाला
पैसे मागू असा त्यांचा घोषा चालू होता.
शेवटी यतिनंनं या दोघींना पास मिळवून
दिला. आणि या दोघी अचानक इकडे येऊन
धडकल्या. दोघी आल्या तो रविवार होता. भाड्यानं दिलेल्या रुमवर थेट गेल्या...बेल वाजवली. त्यांची ही अचानक धाड टाकायची आयडीया कामी
आली. कारण दरवाजा उघडला तेव्हा जेवणं चालू
होती. चांगला सामिष बेत होता. चिकन, मच्छी दोन-चार प्रकार केलेले. शिवाय बाहेरुन काही पार्सलही आणलं होतं. काकूंना बघून हे भाडेकरु कुटुंब हडबडून
गेलं. आम्ही या महिन्यात भाडे देणारच
होतो, असं बोलायला सुरुवात केली. काकू
घरात गेल्या नाहीत. अचलानं त्या जेवणाचे
फोटो काढले. ते पाहून ही मंडळीही गांगरली. एव्हाना सोसायटीमधील इतर घरांमधून लोकं बाहेर
आली. काकूंनी बाहेरुनच भाडेकरुंना दम
दिला. मला एप्रिल, मे, जून. जुलै आणि ऑगस्टचे
आगाऊ असं भाडं हवं आहे. लॉकडाऊनचा तुम्ही
फायदा घेत आहात...ज्यांना पगार मिळत नाही, त्यांना अशी चैन परवडते का...काकूंचा
पवित्र बघून त्या गृहस्थानं आणखी तमाशा नको म्हणून पाच महिन्याचे भाडे जमा
केले. या भाडेकरुंचे अकरा महिन्याचे
अॅग्रीमेंट सप्टेबर महिन्यात संपत होतं.
काकूंनी त्यांना तशी कल्पना दिली.
घर खाली करा...आणखी वाढवून देणार नाही...अशी समज दिली. या काळात आम्ही कुठे जाणार. आता नियमीत भाडं भरु म्हणून ही मंडळी गयावया
करत होती. पण काकू बधल्या नाहीत. त्यांच्या बद्दल सोसायटीच्या इतर सदस्यांनी
काही तक्रारीही त्यांच्याकडे केल्या होत्या.
त्यामुळे त्यांना तशी कल्पना दिली.
त्यानंतर दोघींनी आपला बंद फ्लॅट उघडला...काही गरजेच्या वस्तू कांकूंनी घेतल्या...अगदी तासाभरातच हे सर्व आवरलं. काकू अनाथाश्रमात गेल्या...तिथली परिस्थिती पाहून त्या गहिवरल्या. या कोरोनाच्या काळात त्यांच्याकडे येणा-या देणग्यांचा ओघ कमी झाला होता. तिथं लहान मुलं होती. बरं या दोन महिन्यात आणखी दहा अनाथ मुलं आली होती. त्यामुळं सर्वांना पोटभर अन्न देण्यासाठी खूप धडपड करावी लागत होती. शिवाय कोरोनाबाबत काळजीही घ्यावी लागत होती. काकूंनी त्यांनी मिळालेले भाड्याचे सर्व पैसे त्यांच्याकडे वळते केले....घरातून निघतांना त्यांनी तांदूळ-डाळ-कडधान्य भरुन पिशवीत घेतलं होतं. ते सामानही या मंडळींच्या ताब्यात सोपवलं.
वंदना काकू हे सर्व करीत असतांना अचला फक्त आईच्या चेह-याकडे बघत होती. काकूंच्या चेह-यावर तिला कमालीचे समाधान दिसत होतं. गेल्या पंधरा दिवसांपासून अस्वस्थ असलेल्या काकू शांत झाल्या होत्या. या मुलांना बघितल्यावर त्यांच्यात कुठूनतरी उत्साह आला होता. बॅंकेमध्येही त्यांचे काही काम होते. ते केल्यावर या दोघी माय लेकी माझ्याकडे आल्या होत्या. अगदी दहा मिनिटाची धावती भेट घेतल्यावर पुन्हा नाशिककडे रवाना झाल्या. गाडीत बसून अचलानं मला फोन केला होता. सोबत दोघीही घरुन आणलेले डबे खात होत्या...
अचला समाधानी होती. कारण वंदना काकू आमचं बोलणं चालू झालं तेव्हा झोपल्याही...गेल्या
काही दिवसांत त्यांना अस्वस्थ वाटत होतं.
आपल्याला कोणीतरी फसवतय आणि आपले पैसे आपण ज्यांना गरज आहे त्यांना देऊ शकत
नाही, अशा विचारांनी त्या बेजार झाल्या होत्या...पण हे दोन्हीही प्रश्न सध्यातरी
सुटले होते. अचला म्हणाली, या लॉकडाऊनंनं
खूप काही शिकवलंय....माणसाला माणूस म्हणून ओळखायला शिकवलंय...किती खरं होतं तिचं
म्हणणं...माणसाच्या स्वभावाचे कितीतरी पैलू या कोरोनानं सामोरे आणलेत....
सई बने
डोंबिवली
-----------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Khup chhan lekh
ReplyDeleteKhup chhan lekh
ReplyDeleteKhup chhan lekh
ReplyDeleteखरं आहे..... मस्त लेख ! 👍👍👍
ReplyDeleteसुंदर
ReplyDelete