एक ती.. एक ही..

एक ती..

एक ही..

एका नाण्याच्या दोन बाजू असतात...हे तर आपल्यापैकी सर्वांनाच माहित आहे.  पण या बाजू कशा आणि कुठे आपल्याला भेटतील हे माहित नसतं...नाण्यासारख्या दोन बाजू बहुधा आपल्या अवती भोवती असतात.  कधीकधी या बाजु आपल्या समोर येतात,  आणि मग अनेक प्रश्न सोडून जातात...पण त्याचबरोबर अनेक कोडी सोडवूनही जातात...

गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या दोन फोनमुळे अनेक प्रश्न मनात आले होते...फोन करणा-या दोघीही तशा ओळखीच्या...दोघींनाही काही माहिती हवी होती...दोन्हीही माहितीचे स्वरुप वेगळे...प्रत्येकीसाठी त्याचे महत्त्व वेगळे...यापैकी पहिला फोन होता तो मुलाच्या शाळेतील एका महिलेचा...शितल...ती एका मोठ्या कंपनीमध्ये कामाला...आता लॉकडाऊनच्या काळात ती, तिचा नवरा घरातून काम करत आहेत.  मुलाचा अभ्यासही घरुन...लॉकडाऊन...त्यात कोरोनाची भीती...शितल आणि तिचा नवरा घरातून बाहेरच पडत नव्हते....सर्व किराणा सामान...फळं...भाज्या...औषधं सर्वांची ऑर्डर...घरपोच सामान...दूध आणि अन्य किरकोळ सामान आणण्यासाठी तिचा नवरा आठवड्यातून एकदा बाहेर जात असे...बाकी सर्व नेट शॉपिंग जिंदाबाद...हद्द म्हणजे गेल्या आठवड्यात तिच्या मुलाचा वाढदिवस झाला...तेव्हा मुलाला हव्या असणा-या वस्तूही तिनं मागिवल्याच शिवाय नातेवाईकांच्या मुलांना रिटर्नगिफ्ट म्हणून काही वस्तू बुक केल्या...आणि त्या त्यांच्या पत्त्यावर पाठवल्याही...मला फोन केला होता ते व्हीटॅमिन सी साठी येणा-या काही औषधांसाठी...शितलही या कोरोना व्हायरला घाबरलेली...सोशल मिडीयावर काही मेसेज आला की बाई त्या गोष्टींची ऑर्डर करायच्या...आता असाच एक मेसेज आला होता तिला, व्हीटॅमिन सी बाबत...व्हिटॅमिन सी भरपूर घेतलं की कोरोनाचा धोका कमी होतो, अशा मेसेज तिला आला होता...त्यामुळे आहारात फळांचा समावेश जास्त असावा, असं त्यात सांगितलं होतं.  त्यात शितलकडे लॉकडाऊनच्या काळात ज्यांनी भाजी दिली होती, त्यांच्याकडे फळं कमी होती.  म्हणून कोणी ओळखीचे फळवाले आहेत का, जे घरपोच फळं पाठवतील याची माहीती तिला हवी होती.  तिला हवी असलेली फळं महागातली होती...एक्सपोर्ट

कॉलिटी...शितल भरभरुन सांगत होती...या फळांमध्ये कॅल्शियम जास्त असंत...किंमत जास्त असते...पण आपल्याकडील फळांपेक्षा त्यात जास्त व्हिटॅमिन सी असल्याचा शोध तिला लागला होता.  त्यामुळे त्या फळांची शोधाशोध चालू होती.  दरम्यान या फळांचं ज्युसही मिळतं असं तिला कळलं होतं.  त्यामुळे नेट शॉपिंगच्या आधारावर तिने ज्युस सॅशेसही मागवले होते...पण तिला रियल फ्रुट खायची होती...त्यामुळे या फळांचा शोध तिला माझ्यापर्यंत घेऊन आला...मी शांतपणे तिचं म्हणणं ऐेकून घेतलं...बाकी मी काहीच करु शकत नव्हते...माझ्या माहितीत जे फळवाले घरपोच सेवा देत होते, त्यांचा नंबर दिला...थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या...शितल सांगत होती...भरपूर काम आहे...घरात दोन नेट पॅक घ्यावे लागलेत...लेकाचीही शाळा घरातून...तिला आणि तिच्या नव-याला ऑफीसचे लॅपटॉप मिळालेले होते...तशात घरात दोन लॅपटॉप होतेच...मुलाची त्यामुळे मजा झालेली...शाळा...आणि त्यानंतर गेम वगैरे चालू होते.  एकूण काय कोरोनाकाळ थोडा तणावात असला तरी चांगला चालला जात होता....

शितलचा फोन आल्यावर काही दिवसांनी निर्मलाताईंचा फोन आला.  आमच्या इमारतीच्या पुढे काही चाळी आहेत,  तिथे निर्मलाताई रहातात.  दोन मुलं...नवरा असं चौकोनी कुटुंब...त्यांचा नवरा एका मोठ्या डिपार्टमेंट स्टोअरमधील गाड्यांवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता.  तर त्या स्वतः एका हॉस्पिटलमध्ये आया म्हणून काम करत होत्या...म्हणजे काय या कोरोना काळात दोघांचेही काम महत्त्वाचं होतं...दोघंही मोठ्या हुद्द्यावर नव्हते...पण त्यांच्याशिवाय ते जिथं काम करत होते.  तिथे त्यांनी सुट्टी घेतली तरी अडचण येऊ शकत होती.  त्यात घरी बसून सर्व मिळेल अशी त्यांची परिस्थितीही नव्हती.  जेवढं कमवणार तेवढं खाणार...त्यामुळे ही दोघंही नवरा बायको सकाळी कामावर जात होते.  आता या काळात बाहेर जाणं म्हणजे धोक्याचं...हे वाक्य त्यांनी प्रत्येकाकडून ऐकलेलं...पण बाहेर गेलं नाही तर खाणार काय...हा त्यांचा प्रश्न...हे दोघंही जिथं काम करत होते, तिथे पुरेशी काळजी घेतली जात होती.  त्यात निर्मलाताईंचा मोठा मुलगा वडीलांच्याच डिपार्टमेंट स्टोअरमध्ये कामाला लागला.  बारावीनंतर तो घरीच बसला होता.

  त्यामुळे त्यांच्या वडीलांनी त्याला नोकरी करण्याचा सल्ला दिला.  आता नोकरी कोण देणार हा प्रश्न होता...पण त्यांच्याच डिपार्टमेंट स्टोअरमध्ये त्याला नोकरी मिळाली...तिथे आता काम वाढलं होतं, त्यामुळे या मुलाला नोकरी मिळाली...त्यामुळं ही तिघंही दिवसभर घराबाहेर.  घरी फक्त निर्मलाताईंची मुलगी रहात होती.  ती नऊवीला आहे.  मोठ्या भावाने त्याचा फोन तिला अभ्यासासाठी दिला.  निर्मलाताईंना हॉस्पिटलमध्ये शिफ्टमध्ये काम करावं लागतं.  त्यांच्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे पेशंन्ट नव्हते...पण काळजी घेण्यात येत होती.  त्यामुळे सर्वांच्या ड्युटीटाईममध्ये बदल करण्यात आला होता.  दहा तासांची ड्युटी त्यांना होती.  त्यांच्या नव-याचीही अशीच कथा....त्याला सकाळी लवकर कामाला जावे लागत होते.  सध्या सर्वांना घरपोच सामान पोहचवायला लागायचे.  त्यामुळे त्यांचीही ड्युटी सकाळी सहा पासून सरु होत होती.  मुलगाही वडीलांसोबत लवकर बाहेर पडत असे.  निर्मलाताई लवकर उठून सर्वांचा डबा तयार करत असत...शिवाय घरी रहाणा-या मुलीसाठीही जेवण करुन ठेवत...ही मुलगी दिवसभर एकटी असायची...सर्व कामावर गेल्यावर कपडे, भांडी, घराची सफाई ही कामं करुन आपला अभ्यास करत असे.  संध्याकाळी जेव्हा आई, बाबा आणि मोठा भाऊ घरी येत असे तेव्हा त्यांच्यासाठी आंघोळीचे गरम पाणी आणि डाळभाताचा कुकर लावत असे...निर्मलाताईंनाही कोणीतरी व्हिटॅमिन सी खायला सांगितलं होतं.  इथं फक्त प्रश्न होता साधनांचा...त्या रोज आहारात लिंबाचा वापर करत असत.  त्यांच्या बजेटमध्ये ते साधन बसत होतं....त्यांच्या हॉस्पिटलच्या एका आयानं सांगितलं होतं त्यांना...प्रवासात जसं लिंबू मिठ जवळ ठेवतात तसं निर्मलाताई लिंबू जवळ ठेवत होत्या...त्यांच्या मुलाला आणि नव-यालाही असंच खारावलेलं लिंबू त्या देत होत्या...एवढं पुरेसं आहे का...हे विचारायला तिनं मला फोन केला होता...खरतर निर्मलाताईंएवढं साहस माझ्यातही नव्हतं...त्या रोज बाहेर पडत होत्या.  त्यातही हॉस्पिटलमधली नोकरी.  त्यांना  संसर्ग होण्याचा धोका सर्वात अधिक होता.  पण एकही सुट्टी न घेता त्या कामावर जात होत्या.  त्यांचा नवराही तसाच हिम्मतवाला...शिवाय आपल्या मुलालाही त्यांनी आत्ताच नोकरीला लावलं होतं.  घरच्या खर्चाला थोडा हातभार लागला होता. 

या सर्वात त्यांची सुरक्षाही महत्त्वाची होती.  पण खर्चाच्या मर्यादा होत्या...मला त्यांनी सल्ला विचारला त्यातलं मला खरच माहीत नव्हतं.  मला माहीत असलेल्या वैद्यांचा नंबर त्यांना दिला.  कोव्हीडबाबत हे वैद्य गरजूंवर मोफत उपचार करत आहेत.  शिवाय फोनवर उपलब्धही असतात...त्यामुळे निर्मलाताईंना त्यांना फोन करायला सांगितलं.  निर्मलाताईंनी माझे

खूप आभार मानले...त्यांना सहज विचारलं बाकी सामानाचे काय करता...खरेदी कशी करता...जवळच्याच एका वाण्याकडून त्या सामान खरेदी करत होत्या.  त्यांच्याकडे नारंगी रंगाचे रेशनकार्ड होते.  त्यामुळे त्याच्यावर सरकारतर्फे काही धान्य मिळालं,  पण ते आणण्यासाठी ब-याच मोठ्या रांगेत उभं रहावं लागलं.  आठवड्याच्या सुट्टीत ही काम त्या करत होत्या...तेव्हाच दळन, भाजी आणत असत...कोरोना...कोरोना...करत जी भीती निर्माण झाली आहे...त्या भीतीवर त्यांनी मात केलीय...आपल्याला घराच्या बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही.  हे मान्य केल्यावर सगळं नियमीत असल्यासारखं वाटतं..इति निर्मलाताई...मी आवाक होऊन ऐकत होते...मनोमनी मला माझीच लाज वाटत होती. 

निर्मालाताई आणि शितल या दोघींच्या बोलण्याची...त्यांच्या स्वभावाची मी तुलना करत होते.  दोघीही दोन टोकावर होत्या...दोघींचे जग वेगळं.  आणि स्वभावही...कोण बरोबर कोण चूक हा प्रश्नच इथे नव्हता...परिस्थिती कशी...आणि ती कशी आपण स्विकारतो...हाच प्रश्न इथे आहे...

 

सई बने

डोंबिवली

--------------------------------------------------------------------------------

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 


Comments

Post a Comment