दादा....धाक आणि माया

दादा....धाक आणि माया

काही दिवसांची सुरुवातच अत्यंत निराशाजनक होते.  2 जुलैचा दिवस त्यापैकीच एक...सकाळी उठल्यावर जाणवलं की डोकं प्रचंड दुखतंय...प्रचंड...डोक्यावर कोणीतरी घाव घालतात...तसंच...काही दिवस झोपेचा पत्ता नव्हता...सतत एक तणाव...त्याचाच परिणाम असणार...नव-यानंही समजूत काढली...आटपून घे लवकर आणि पुऩ्हा एक झोप काढ....कडक कॉफी घे...डोकेदुखी सोबत घेऊन सकाळची आवराआवर केली...थोडावेळ डोळे मिटून बघायचं होतं...त्याआगोदर आईकडे चौकशी करायची होती...वहिनीला फोन केला....ती काही बोलली नाही...फक्त ताई, पप्पा गेले...एवढाच संवाद...बाकी शांत आणि रडण्याचे हुंदके....

लॉकडाऊन जाहीर झालं...किंबहुना कोरोनाचं संकंट आपल्याकडे पसरायला लागलं, तेव्हापासूनच आमच्या पप्पांची तब्बेत बरी नव्हती.   जवळपास एक दिवसाआड दादा आणि आमचा इशान त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जात होते.  दोन दिवस ते ठिक असायचे...पुन्हा ताप किंवा त्यांना अन्य त्रास व्हायचा...मग पुन्हा डॉक्टरांकडे वारी...किंवा तपासण्या करण्यासाठी लॅबमध्ये फे-या...एप्रिल-मे-जून या तीन महिन्यात हे चक्र चालू होतं.  खरतरं आमच्या दादाचं घर अगदी पंधरा मिनाटावर. गाडीवरुन गेले तर पाच मिनीटं...पण कोरोनामुळे हे अंतर हजारो किलोमिटरसारखं केलेलं.  आमच्या आसपासच्या काही बिल्डींगमध्ये रुग्णांची संख्या वाढली होती.  त्यामुळे सर्व भाग बंद.  रोज फोन व्हायचा...आई आणि वहिनी बोलायच्या....यापलिकडे काहीच करता येण्यासारखे नव्हतं...ज्या दिवशी वहिनी फोनवरुन सांगायची, ताई आता आम्ही बाहेर पडणार नाही...नेमकं तेव्हाच दादाला पप्पांच्या तब्बेतीसाठी बाहेर पडावं लागायचं...सोबत त्याचा मोठा मुलागा, इशानही असायचा...या सर्वांत सर्व कुटुंबियांची मनस्थिती काय झाली असेल याची कल्पनाही करता येत नाही.  जूनच्या शेवटच्या आठवड्यात तर आई, वहीनी आणि भावाचा धाकटा मुलगा विदीश यालाही ताप आला.  त्यात पप्पांचीही तब्बेत बिघडली...एका आठवड्यात दोन वेळा सिटी स्कॅनला त्यांना नेण्यात आलं.  दुस-या वेळी कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला...मंगळवारची संध्याकाळ होती ती...दादा सोबत इशान आणि त्याचा मित्र होता.  दादानं तिथूनच इशानला घरी पाठवलं...तो पप्पांसाठी हॉस्पिटलचा शोध घेऊ लागला...शेवटी मुंब्र्याच्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांना बेडची व्यवस्था झाली.  दादा तसाच त्यांना घेऊन मु्ंब्र्याला घेऊन गेला...पप्पांना दाखल केलं...पण तेव्हा त्याला त्यांच्याबरोबर बोलता आलं नाही...

इकडे घरी पप्पांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानं सगळ्यानाच टेन्शन आलं...इशानही त्यांच्यासोबत होता...सायंकाळी दादा घरी आला तो निराश मनानं...घरी आल्यावर स्वच्छतेचे सर्व सोपस्कार झाले...तरीही दादा आणि अवघं घर अस्वस्थ...पप्पा कोरोना पॉझिटीव्ह झाले यापेक्षा त्यांना हॉस्पिटलमध्ये एकटेच ठेवावे लागले हे दुःख अधिक होतं.  आमच्या पप्पांचे घड्याळावर खूप प्रेम...त्यामुळे त्यांचे सर्व घड्याळानुसार व्हायचे...विशेषतः संध्याकाळचा चहा...संध्याकाळी चार ही त्यांची चहा प्यायची वेळ...पण त्यांना चेकींगला नेतांना नेमका चहा राहीला...आल्यावर चहा होईल, अशा विचारांनी पप्पा घराबाहेर पडले ते कायमचेच....ते हॉस्पिटलमध्ये गेल्यापासून दादाच्या घरी, दादा, वहिनी, दोन मुलं आणि आई सर्वांचे लक्ष उडाले...पप्पांचे काय होईल याकडे सर्वांचे लक्ष होते...

या सगळ्यांपासून मी काही मिनिटावर होते...पण मला तिथे जाता येत नव्हते...पप्पांना सोडून आल्यावर दादाचा फोन आला...फोनवर रडत होता...आमचा दादा म्हणजे एकदम कडक...नुसतं दादा आला म्हटलं तरी आवाज खाली येतो...एवढा त्याच्याबद्दल धाक...पण हा दादा, फोनवर रडत होता...पप्पांना तसंच सोडून आला,  त्यांना काही सांगता आलं नाही...त्यांना काय वाटलं असेल, या प्रश्नानं त्याला चैन पडत नव्हती.  मी फक्त फोनद्वारे या सर्वांचा आढावा घेण्यापलिकडे काहीही करु शकत नव्हते...मध्यरात्री अचानक जाग यायची...मग खिडकीजवळ बसून रहायचं...बाहेर कुठली गाडी गेली तर बघायची...नेमकं अशाच काही रात्री एक-दोन अॅब्युलंन्स जातांना पाहिल्या...माझ्या मनात काळजी आणि भीती यांची खूप गर्दी झाली होती...रात्रीची झोप पार उडाली...दादाकडे सर्वजण रोज पप्पांबरोबर फोनवरुन बोलत होते.  त्यांचे जेवण चालू असतांना हॉस्पिटलमधली मंडळी फोन लावून द्यायची.   इकडे इशान आणि विदीश हे दोघंही पप्पा जेवत असतांना अक्षरशः ते आपल्या समोर आहेत, असं समजून त्यांना जेवायला आग्रह करायचे...हे असतांनाच वहिनी आणि आईला ताप आला...एक दिवसाचा ताप आणि काही दिवसाचा थकवा...हा आजार काय आहे हे सांगणारे हे दिवस होते. 

पप्पा आजारी असतांना आमच्या दादांनी काय नाही केलं...कितीजणांना तरी त्याचे फोन चालू होते...अनेकांचे सल्ले घेतले.  औषधं तर विचारु नका इतकी...यासाठी दादा अनेकवेळा घराबाहेर पडता होता...आमच्या भागात त्या दरम्यान कोरोना पेशंटची संख्याही वाढत होती...सर्वत्र एक भीतीचे वातावरण...त्यात दादाकडेही तिच अवस्था...सर्वजण रोज पप्पांच्या तब्बेतीचा फोनवरुन आढावा घ्यायचे...आई आणि वहिनी या दोघींही खूप थकल्या होत्या...त्यांचा ताप गेल्यावर दोघींना कमालीचा थकवा आला...हे सर्व सावरत असतांना पप्पांची तब्बेत बिघडल्याचा हॉस्पिटलमधून फोन आला...पुन्हा घरावर चिंतेचे वातावरण...

2 जुलैच्या सकाळी पप्पा गेल्याचं हॉस्पिटल मधून कळवण्यात आलं...दोघं नातू पप्पांच्या खूप जवळचे...त्यामुळे वहिनी आणि दादांनी त्यांना आधी काहीच सांगितलं नाही...अगदी आईलाही...जवळपास दोन तास ती दोघंच रडत होते...नंतर मला, मुलांना ही बातमी कळली...आता पुढे काय हा प्रश्न होता...पप्पांना आम्हाला शेवटचं पहाता येणार नव्हतं...दादाचं कुटुंब काही दिवसासाठी कोरंटाईन...हॉस्पिटलमधून पप्पांना शेवटच्या प्रवासात नेलं तेव्हा वहिनी आणि इशान हट्टानं दादासोबत गेले.  दादाची मनस्थिती सांगता येणार नाही अशी...खरं तर त्या दोघांनी पप्पांसाठी खूप केलं...तरीही वहिनी सारखा प्रश्न विचारत होती...पप्पांनी शेवटच्या क्षणी आपल्या सगळ्यांना हाका मारल्या असतील...आपण कोणीच तिथे नव्हतो...त्यांना काय वाटलं असेल...तिच्या या प्रश्नाला उत्तर कधीच मिळणार नाही...

पप्पांच्या जाण्याची बातमी पटकन कोणाला सांगितली नाही...कशी सांगणार...आम्हीच एक वेगळ्या धक्यात होतो...त्यात या काळात कोणाला बोलवायचं नाही...काहींनी ही अवस्था समजून घेतली...तर काही याही अवस्थेत आम्हाला का आधी सांगितले नाही म्हणून हटून बसले...पण या कोरोनानं जे दाखवलं होतं,  ते या मंडळींना कसं कळणार....त्यामुळे याकडे दुर्लक्ष करण्यापलीकडे काहीही नव्हतं...ज्या कुटुंबातील व्यक्ती या आजाराने गेली आहेत,  त्या कुटुंबाची अवस्था काय होत असेल याची कल्पना कोणालाही करता येणार नाही...नशिबानं आमच्या दादाच्या मित्रांचं वर्तुळ खूप मोठं...त्याचे काही मित्र त्याही अवस्थेत त्याला भेटायला आले होते...त्याच्यासोबत सर्ववेळ होते...अशावेळी जी काळजी घ्यायला पाहिजे ती त्यांनी घेत, सर्वांनाच घरी येऊ नका म्हणून सांगितले...ज्यांना ज्यांना बातमी कळत होती, ते फोनद्वारे संपर्क साधत होते...पप्पा गेल्यावर दादांनी त्यांचे कार्यही एकट्यानं केलं...खूप कठीण दिवस...तो हे सगळं समर्थपणे करत होता...पण त्याच्या मनात काय चालू असेल हे फक्त त्यालाच माहीत असेल...

या सगळ्यात वाईट म्हणजे, अखेरच्या दिवसात पप्पांना भेटता आलं नाही...आणि पप्पा

गेल्यावर आईला जवळ घेता आलं नाही...एरवीही आईची आठवण खूप येते.  आमच्या घरी तिची बहुधा शनिवारची फेरी ठरलेली असते...का तर, शनिवारी जयंत घरी असतात...मग या दोघांचा चहा आणि चर्चा असा कार्यक्रम होतो...कोरोनाच्या काळात हा चहाचा कार्यक्रमही झालेला नाही...त्यात लेकही आजीची आठवण काढतो...पण कोरोना हा एक शब्द समोर आला की सर्व विचार थांबत आहेत. 

आज खूप दिवसांनी पप्पा गेल्यावर लिहीलं, त्याचं कारण म्हणजे आमचा दादा...दादाचं एक वेगळं रुप या दिवसात बघता आलं.  वास्तविक पप्पा असतांनाच तो एक कुटुंब प्रमुख म्हणून सर्व घराचा कारभार बघतोय.  अगदी माझ्या लग्नाचा भारही त्यानं एकट्यानं घेतला होता...लग्नानंतरचे माझे सगळे सण, सोहळे फार काय लेकाच्या जन्मानंतरचेही सोहळे त्यांनं समर्थपणे केले.  आताही मी त्याच्याकडून हक्कांनी वसूली करते...त्याच्याबद्दल कायम एक आदरयुक्त भीती मनात आहे...काहीही करतांना दादा काय म्हणेल, हा विचार पहिला मनात असतो...अगदी केस कापले तेव्हासुद्धा...तरीही त्याला चिडवायला लहानपणी वाटत होती तेवढीच मजा आजही येते...अर्थात काहीही झालं...काहीही बिघडलं की त्याला पहिला फोन होतो...कारण तो कशाही परिस्थितीत मदत करेल...सांभाळून घेईल हा विश्वास कायम असतो...त्याच्या ओरडण्याच्या मागे केवढीतरी काळजी असते हे सावकाश कळतं...पप्पा गेल्यावर त्यांची आमच्या कुटुंबातील जागा खाली झाली असं मी कधीही म्हणणार नाही...कारण या जागेवर आमचा दादा कायम असणार आहे...दोन दिवसांनी रक्षाबंधन साजरे होणार...या रक्षाबंधनला त्याला मी काय देणार...कारण तो संपूर्ण आहे...आणि तेवढाच संपन्न...इथे फक्त पैसे किंवा संपत्ती म्हणून मी संपन्न म्हणत नाही...तर त्याच्या मनाची संपत्ती खूप मोठी आहे...या संपत्तीचा एक अंश माझ्यासाठी आहे, ही भावनाच खूप सुखद आहे....

सई बने

डोंबिवली

------------------------------------------------------------------------------------------

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 


Comments

  1. अप्रतिम लिहिलंस, अभि अगदी असाच आहे...इतरांना मदत करण्यात त्याला जास्त आनंद मिळतो..सुदैवाने तुम्ही दोघेही बहीण भाऊ माझ्या अत्यंत जवळचे आहात , अगदी कुटुंबासारखेच... लव यू बोथ❤️❤️

    ReplyDelete
  2. खुप छान लिहिलंय. हल्लीची परिस्थिती अशीच आहे.

    ReplyDelete
  3. शिल्पा अभी खरच खूप ग्रेट आहे

    ReplyDelete
  4. खुपच छान लेख

    ReplyDelete
  5. शुभांगी सामंत2 August 2020 at 09:50

    अप्रतीम. सध्याचे दिवस ही नाते संबंधीचे परिक्षा घेणारे आहेत. त्यामद्ये तुमचा दादा एकदम छान!!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद...दादा म्हणजे आमचा मोठा आधार आहे...

      Delete
  6. खरच ज्या कठिण परिस्थितीतून अभिजितने मार्गक्रमण केले,व स्वता: बरोरोबर घरच्यांचीही काळजी घेतली,त्याला माझा सलाम

    ReplyDelete
  7. खूप मनापासून व्यक्त झाला आहात .
    हृदयस्पर्शी आणि अगदी खरे मनोगत

    ReplyDelete

Post a Comment