नवी अ आ इ ई

 

 

नवी अ आ इ ई


वॉटस्अपवर सकाळी सहा वाजता फोन आला....नक्कीच अमेरिकेचा असणार...अल्पना...माझी नाशिकच्या कॉलेजमधील मैत्रीण...गेल्या वीस वर्षापासून अमेरिकेत स्थाईक आहे.  साधारण महिन्याच्या अंतरानं तिचा फोन येतो...यावेळी अगदी पंधरा दिवसांनी आला...अल्पनाचे आई-वडील दोघंही शिक्षक...अर्थात आता निवृत्त...मात्र दोघंही अजूनही शैक्षणिक क्षेत्राबरोबर जोडले गेले आहेत.  विशेषतः वडील.  काही वृत्तपत्रात त्यांचे लेखही येतात.  शिक्षण पद्धती आणि विद्यार्थी या विषयावर त्यांची काही पुस्तकेही आहेत.  या अल्पनाच्या वडीलांना टीव्हीवरील एका चर्चासत्रात बोलवलं होतं...विषय होता नवीन शिक्षण पद्धती....

संध्याकाळी सहा वाजता अल्पनानं सांगितल्या प्रमाणे टीव्हीवरील चर्चासत्र बघितलं.  वास्तविक दोनच दिवसापूर्वी केंद्र सरकारनं नवीन शैक्षणिक धोरण आणलं आहे.  त्यानुसार अनेक बदल सुचवण्यात आले आहेत.  मुख्य म्हणजे बोर्ड या शब्दाचा विद्यार्थ्यांवरचा बोजा कमी झाला आहे.  पण प्रामाणिकपणे सांगायचं तर अल्पनाचा फोन आला तोपर्यंत तरी मी या नव्या बदलांबाबत फार काही वाचलं नव्हत.  अगदी वरवर आलेली माहिती वाचली होती.  वॉटसअप किंवा फेसबूकवर येणारे मेसेज आणि त्यावरील माहिती किती ग्राह्य असेल याबाबत मी कायम साशंक असते.  त्यामुळे वेळ मिळाल्यावर सरकारी वेबसाईटचा आधार घेत हा विषय समजून घेण्याचा माझा विचार होता.  अल्पनानं फोन केला आणि माझी उत्सुकता चाळवली होती.  कारण तिकडे, अमेरिकेत बसलेली अल्पना मला आपल्या देशातील शिक्षणाच्या बदलाने काय परिणाम होणार हे भरभरुन सांगत होती...बदल काही खास नव्हते...सगळी भेळ करुन ठेवली आहे...मुलांकडून काम करुन घेणार...असं काही ती सांगत होती.  मला प्रथम तिचं कौतुक वाटलं.  तिकडे राहूनही इथल्या शिक्षण पद्धतीबाबत तिला किती आत्मियता आहे...असा विचार मनात येऊन गेला...अर्थात हे अगदी क्षणभर होते...कारण मला तिचं कौतुक वाटायला लागलं, तेवढ्या वेळात अल्पनानं सांगितलं की,  ती मला जी माहिती देत होती, ती माहिती तिला तिच्या वडीलांनी दिली आहे....या तिच्या माहितीच्या आधारे मला कळून चुकलं होतं की, संध्याकाळी तिचे वडील काय मत मांडणार...

संध्याकाळी टिव्हीवरील चर्चासत्र बघितलं...नेहमीसारखंचं होतं.  काही मिनीटाच्या चर्चासत्रासाठी चार पाहुणे बोलवले होते.  त्यापैकीच एक अल्पनाचे बाबा होते.  या नव्या शैक्षणिक धोरणावर त्यांनी भरभरून टीका केली.  फारफार तर चार ते पाच मिनिटे त्यांना मिळाली असतील बोलायला.  इनमिन अर्धा तासाची चर्चा...त्यात तीन ब्रेक...इतर तीनजणांची मतं आणि अॅंकरचं स्पष्टीकरण...एकाचा या धोरणाला पाठिंबा...एकानं तर सांगितलं की यामुळे आपला देश मागे जाणार आहे...अल्पनाचे वडीलही या नव्या शैक्षणिक धोरणाच्या विरोधात होते असं एकूण समजलं...मी अजूनही या नव्या शैक्षणिक धोरणाबाबत निट माहिती घेतली नव्हती...त्यामुळे लगेच काही अल्पनाला मेसेज पाठवला नाही...तिचाच रात्री आला...बघितला का म्हणून...मी हो म्हणून तिला रिप्लाय दिला...चांगली चर्चा झाली असा शेराही पाठवला.  तिनं बाबांचा फोन नंबर पाठवला...सांगितलं की बाबांनी या धोरणाचा अभ्यास चांगला केलाय.  त्यांनी काही स्थानिक वृत्तपत्रात लेखही पाठवला आहे लिहून...अनेक मुद्दे चुकीचे आहेत...या धोरणात...मुलांना काय कामाला लावणार का लहान वयात...अल्पनानं आपल्या वडीलांचे मुद्दे पुन्हा मला लिहून पाठवले होते. मी सर्वांना ओके...ओके करुन पाठवत होते...ज्याबाबत वाचलं नाही.  त्याबाबत बोलयचे कसे...पण अल्पनाला जणू वडीलांनी सगळचं शैक्षणिक धोरण समजावून सांगितलं होतं.  तिचे मेसेज चालू होते...मी तिला ओके म्हणून निरोप घेतला...पुन्हा तिनं मला वडिलांना फोन करुन माहिती घे...असा मेसेज पाठवला...मी आता शेवटचं ओके म्हणून विषय संपवला...

मुळात मला कळेना अल्पनाला नव्या शैक्षणिक धोरणात इंटरेस्ट आहे की देशाच्या प्रगतीचा कळवळा आहे...की तिला तिच्या वडीलांच्या अभ्यासाचं कौतुक आहे.  अल्पना आणि तिचा धाकटा भाऊ इथूनच शिकून त्या देशात सेटल झाले आहेत...तिचे शिक्षक असलेले आई वडील वर्षाला नेमानं अमेरिकाला जातात...(निदान यावर्षी करोनाचा कहर होईपर्यंत तरी...) दोन तीन महिने राहून परत आपल्या देशात येतात.  अल्पना आणि तिचा भाऊही दोन वर्षातून आईवडीलांकडे येतात...दोन वर्षापूर्वी ती भारतात आली होती,  तेव्हा आमची धावती भेट झाली होती.  तिचा मुलगा तेव्हा बारावी होऊन पदवीसाठी युर्निव्हसीत दाखल झाला होता...ती खूप कौतुकानं तिथल्या शिक्षण पद्धतीबाबत, त्यातील आधुनिक यंत्रणेबाबत सांगत होती. मध्येच माझी आणि सोबत असलेल्या एका मैत्रिणींच्या मुलांची चौकशी केली.  शिवाय इथे काही खरं नाही...बारावी किंवा पदवी झाल्यावर पुढे शिक्षणासाठी अमेरिकेतच पाठवा असा सल्लाही देऊन गेली. 

तिचा मेसेज आल्यावर मला हे सर्व मागचं प्रकरण आठवलं.  नाही म्हणायला माझ्यापेक्षा लेकानं सरकारी वेबसाईटवर जाऊन ब-यापैकी नव्या धोरणातील काही मुद्दे वाचले होते.  त्यांनी सांगितल्याप्रमाणे साईट ओपन करुन मी सुद्धा या नव्या धोरणातील ब-याच अन्य गोष्टी जाणून घेतल्या...माझ्या आधी लेकानं हे मुद्दे जाणून घेतले होते.  अर्थात त्यालाच आता या बदललेल्या धोरणाचा काय चांगला वाईट परिणाम असेल त्याला तोंड द्यायचे होतं...म्हणून मी सहजच विचारलं...तुला काय वाटतं रे...चांगलं आहे की वाईट हे धोरण...

हा प्रश्न विचारुन चूक केलं की बरोबर...माहित नाही...पण लेकानं शाळाच घेतली माझी...लगेच कसं सांगता येईल चांगलं आहे की वाईट...ती काय रेसिपी आहे...झालं की चांगलं वाईट सांगायला...आणि वाईट करायला थोडीच या कमेटीमध्ये आपल्या शत्रूराष्ट्रातील लोकांना बसवलं असणार...जे असतील ते आपल्या देशातलेच आहेत ना.  आणि केंद्रीय स्तरावर काम करतात म्हणजे नक्कीच हुशार असणार...देशाला ते खड्ड्यात घालतील का...नाही ना...आणि आता परदेशातली शंभर विद्यापिठे आपल्याकडे येणार आहेत....स्पर्धा वाढेल...स्पर्धा वाढली की फी कमी होईल...म्हणजे चांगलंच ना...जे काय होईल ते होईल...आपल्या ही फायद्याची गोष्ट आहे.  आत्तापासून कशाला नव्या धोरणाच्या फायद्या-तोट्याचा चर्चा करायच्या...इति माझा लेक...मी हात जोडले...

तरीही एक शंका होतीच...ते काम करायचं काय आहे रे...मुलांकडून काम करुन घेणार का आता...मग पुन्हा शाळा...अरे ते हॅन्ड ऑन एक्सपिरियन्स आहे...माझ्या तर हा शब्दच डोक्यावरुन गेला...म्हणजे ज्यात आपण शिकणार आहोत...त्याचा शिकतांनाचा अनुभव...आणि जर आवड असेल, तरच शिकणार ना...आणि शिकतांनाच कामाचा अनुभव आला तर चांगलंच आहे ना...मी सहज विचारलं हे वाचलंस कधी...तेव्हा समजलं हल्ला त्या ई लर्निंगच्या दरम्यान मध्ये येणा-या न्यूज फिडमध्ये ही माहिती मिळाली...मलाही अशा न्यूज फिड आल्या होत्या...पण त्या लिंक ओपन करुन वाचायचे कष्ट मी घेतले नव्हते...उलट लेकानं ते घेऊन बदलेली शिक्षण पद्धती म्हणजे नेमकं काय ते जाणून घेतलं होत.  कोणाला या बदललेल्या पद्धतीबाबत काय वाटतं हे ज्याचा त्याचा प्रश्न....पण ज्या पिढीला या बदलालाल सामोरे जावे लागते, त्यांची मते मला तरी योग्य वाटतात...

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 


 

 

 

 

 

 

 

 


Comments

  1. हा बदल‌ हळूहळू सर्वांनाच स्वीकारायला हवाय.

    ReplyDelete

Post a Comment