तगमग.....

 


तगमग........












वॉटस्अपवर कितीतरी मेसेज आणि फोटो पडले होते...सकाळपासून एकही मेसेज ओपन करता आला नव्हता...कोरोना काळात घरात एक साखळी तयार झाली आहे...घरातील कामं कधी संपतच नाहीत...सतत घाणा चालू...अखेर दुपारी तीनच्या सुमारास थोडा कामांचा उरक झाला...मोबाईल घातात घेतला...मेसेजचं द्विशतक चालू होतं...काही नेहमीचे शुभसकाळ सांगणारे....नेहमीचेच फोटो आणि जोक...ते पाहून झाल्यावर मग लेख आणि काही वाचायला हवे असे मेसेज हातात घेतले...त्यात एकीने पाठवलेले दोन फोटो नक्की कसले आहेत हे समजत नव्हतं...आमचा शाळेचा ग्रुप...खूप दिवसात बोलणं नाही.  तिचंही माझ्यासारखंच असणार...फोन लेकाकडे...आणि घरच्या कामांचा ताण...कसल्यातरी पॅकींगचे फोटो होते.  नवीन काही घरगुती विक्री व्यवसाय सुरु केला का...म्हणून थेट फोन केला...सायंकाळी चारची वेळ...फोनची रिंग झाली.  पण उचलला गेला नाही...फोन कट...पुन्हा रिंग करु की नको या विचारात होते.  तितक्यात तिचाच फोन आला.  मला नावही निटसं लक्षात येत नाही तिचं कधीकधी...अर्थवची आई असंच नाव फोन सेव्ह केलेलं...तिला हे माहीत आहे,  त्यामुळे सुरुवात करतांना ती नेहमी सांगते...मी बोलतेय, अर्थवची आई, सीमा...तशीच सुरुवात झाली...अग कसले फोटो पाठवलेस...काही समजलं नाही...म्हणून फोन केला होता...काही घरगुती सामान विक्री व्यवसाय चालू केलास का...चांगलं आहे...नाही ग...तसंल काही नाही...फोटो नीट बघ...पार्सलचाच आहे.  पण मी मागवलं आहे...उदबत्या....बाप्पासाठी...काय दिवस आलेत बघ...गणपतीची खरेदी अशी करावी लागतेय...

दरवर्षी गणपतीला काही पाहुणे, मित्र मंडळींच्या घरी भेट देतोच.  आता त्यामध्ये वरदच्या मित्रांचीही भर पडली आहे.  त्यापैकीच एक घर या अर्थवच्या आईचं...सीमाचं...वर्षातून बहुधा एकदाच तिच्या घरी जाणं होतं.  तेही गणपतीच्या निमित्तानं...चारजणांचं कुटुंब.  नवराबायको, सासू आणि अर्थव.  गणपतीला मात्र तिचा धाकटा दीर रहायला येतो.  ती दोघं नवरा बायको आणि त्यांच्या जुळ्या मुली...आठवडाभर त्यांची चीवचीव घरात चालू असते.  सीमाच्या मते गणपतीमध्ये तिचं घर जागं होतं.  तीसुद्धा एका छोट्या कंपनीमध्ये कामाला आहे.  वर्षभर एकही सुट्टी घेत नाही.  अगदी दिवाळीत सुद्धा ऑफीस गाठते.  पण गणपतीसाठी दहा दिवसांची सुट्टी ठरलेली.  तिची धाकटी जाऊही मनमिळावू आहे.  गणपतीच्या आधी चार दिवसांपासून ती सीमाकडे रहायला येते.  मग या दोघी सगळा बाजारच खरेदी केला की काय...अशी खरेदी करत सुटतात...घरची पुरुष मंडळी, मखर घरी करतात...सासूबाई नातवंडांची जबाबदारी आणि फराळ याकडे बघतात.  सीमाच्या म्हणण्यानुसार एकवेळ दिवाळीला फराळ कमी होईल, पण गणपतीसाठी काही कमी नाही.  पै पाहुणे भरपूर...मित्र मंडळीही...आता मुलांच्याही मित्रांची भर...प्रत्येकाला देण्यासाठी दरवेळी काहीतरी नवा खाऊ...त्याचे पार्सल...तिही स्टाईल वेगळी...

गणपतीबाप्पांचा त्यांच्याघरचा देखावा तर खास असतो.  मी बहुधा गणपतीला सगळीकडे धावत भेट देते.  पण सीमाच्या घरी थोडा वेळ काढून जावं लागतं.  ते हा खास देखावा बघण्यासाठी.  कधी ट्रेन, कधी टेकडी, कधी लिफ्ट...गेल्यावेळी मंगळयान असं तिच्याकडे...गेल्या काही वर्षापूर्वी त्यांनी मोठी गणेशाची पितळी मुर्ती खरेदी केली.  आता दरवर्षी तिच मु्र्ती मखरात बसवतात...आणि त्याची पूजा करतात...संपूर्ण घराला लायटींग...रांगोळ्या...खूप घमाल असते या सीमाकडे.  पंधरा वर्षापूर्वी सीमाचे सासरे वारले.  तेव्हा तिच्या सासूबाई शाळेत क्लार्क म्हणून काम करत होत्या.  एरवी गणपती गावी आणायचे.  पण सीमाचे सासरे गेल्यावर तिच्या सासूबाईंनी नोकरी सांभाळून गणपती बाप्पा आपल्या राहत्या घरी आणायला सुरुवात केली.  आधी काही नातेवाईकांनी नावं ठेवली...विरोध केला.  पण त्या एकट्या होत्या.  दोन मुलांची जबाबदारी.  त्यांच्या शाळा...अभ्यास...आणि स्वतःची नोकरी सांभाळनं गरजेचं होतं.  त्यामुळे त्यांनी सर्वांना विनंती केली...आणि गणपती शहरात आणायला सुरुवात केली.  पहिल्यांदा थोडा विरोध स्विकारला...पण आता ही प्रथा कायम झालीय.  मुलं मोठी झाली...लग्न झालं...नातवंडही आलीत.  नातेवाईकांचा राग गेला...आता सगळे इथेच येतात...

सीमाच्या या गोकूळाला यावर्षी करोनाची नजर लागलीय...म्हणूनच तिनं ते अगरबत्त्यांचे फोटो पोस्ट केले होते.  काय करावं ते समजत नाही.  गणपतीमध्ये तिच्या घरी येणा-या पाहुण्यांना यावर्षी गळती लागलीय.  मुख्य म्हणजे तिचा दिरही आता येणार नाही.  तो पुण्याला रहातो.  दोन मुली लहानच...त्यामुळे त्यांना घेऊन येऊ नये, म्हणून सर्व कुटुंबाचं एकमत झालं.  यावर्षी सीमा घरच्याघरी गणपती साजरा करणार आहे.  दोन्ही जावा एकत्र खरेदी करत असत...त्यामुळे यावर्षी धाकट्या जावेनं पुण्याहून खरेदी करत सामान कुरीअरनं पाठवायला सुरुवात केलीय.  सीमाच्या म्हणण्यानुसार घरात ना उस्ताह ना आनंद...कसलीतरी शांतता पसरलीय....अगरबत्याही कुरीअरनं पाठवायची वेळ आली...म्हणून ती निराश झाली होती....म्हणून फोटोतून निराशा व्यकत करत होती...खरी तगमग तर तिच्या सासूची चालू होती.  आता त्यांनी सत्तरी पार केली होती.  हा रोग काय आहे, हे समजून घेण्याची त्यांची मानसिकता नाही.  पण यामुळे माझं कुटुंब धोक्यात येऊ शकतं याची कुठेतरी नोंद त्यांनी घेतली आहे.  त्यामुळे त्या प्रत्येकाला फोन करुन सांगत आहेत.  येऊ नका रे बाबा यावेळी...मी शक्य झालं तर प्रसाद पाठवायची व्यवस्था करते.  हे सांगताना त्यांचा पदर सारखा डोळ्याला असतो.  घरी सणाला येऊ नका, हे सांगण फार अवघड आहे.  दरवर्षी गणपती यायच्या आधी फराळाची यादी करणा-या सासूबाई शांत बसून वाती वळत आहेत...मध्येच त्यांचा प्रश्न येतो,  झाला का ग कमी तो करोना...या त्यांच्या प्रश्नाचं उत्तर ना सीमाकडे ना तिच्या नव-याकडे...त्यांचा एक मुलगा दुस-या शहरात आहे.  त्याच्या दोन मुलींची त्यांना खूप आठवण येतेय.  त्यामुळे सर्वजण न चुकता रात्री व्हीडोओ कॉल करतात.  पहिल्यांदा...अगदी नवा प्रकार वाटला तेव्हा सासूबाई खूष होत्या...पण आता त्या म्हणतात..या व्हिडीओतून माणूस जवळ आला असता तर बरं झालं असतं...यावर्षी गणपतीला आरास नको, म्हणून त्यांनी आधीच सांगितलं आहे.  त्यांनीच घरी काही कापसाचे दागिने बनवले आहेत.  तेच दागिने घालून त्या गणपतीची सजावट करणार आहेत. 

सीमाच्या म्हणण्यानुसार गणपती जवळ आल्यावर सासूबाई आनंदाचे झाड व्हायचे बाकी असतात...पण यावर्षी हेच तिचं आनंदाचं झाड सुकलं आहे,  सीमाची हीच तगमग आहे.  माझ्याशी बोलतांना तिने किमान चारवेळा तरी विचारलं असेल,  कधी जाणार ग हा रोग...श्रावण आला नि गेला...आता देवाला पण काही करता येणार नाही...एकूण सीमाच्याही मनचीही तगमग चालू होती.  फोन वर ब-याच गप्पा झाल्या.  फोन ठेवता ठेवता ती म्हणाली, तू काय करणार ग गणपतीला...आमच्याकडे सोसायटीनं आधीच सर्वांना सांगितलं आहे,  पाहुण्यांना बोलवू नका...त्यामुळे तुलाही येता येणार नाही...मी हो म्हणेपर्यंत तीनं तिची तगमग माझ्यापर्यंत पास कली...तू काय करणार...आईकडे जाणार का...आईच्या सोसायटीमध्ये परवानगी आहे का बाहेरच्यांसाठी...

सीमाचा प्रश्न माझ्यासाठी त्रासाचा ठरला.  तसं यावर्षी आमचे पप्पा नाहीत.  गणपती साधेपणानं होणार...बाप्पा येणार...त्यांचं स्वागत होणार...पण त्यासाठी आपल्याला जाता येणार का हा नवा प्रश्न...सीमाची तगमग माझ्याकडे आली...दरवर्षी गणपतीचे पाच दिवस हक्काच्या माहेराचे...यावर्षी हा हक्कही कोरोनामय झालाय...आता काय माझीही तगमग सुरु...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

Post a Comment