फक्त निमित्त कोरोनाचे....

 

फक्त निमित्त कोरोनाचे....


2 जुलै रोजी एक जवळची बहिण वजा मैत्रिण कोकणात गणेशोत्सवासाठी गेली.  जवळपास पंधरा दिवस जायचे की नाही...या वादात गेले.  आणि त्यानंतर जायचेच असे ठरल्यावर दोन दिवसात जेवढी शक्य तेवढी तयारी करुन गावाला गेली.  दोन मुलं, नवरा आणि ती...भल्या पहाटे तीन वाजता निघाले...वाटेत काही खायला घ्यायला नको  म्हणून मेधानं रात्रभर जागून डबे बनवले...मी थालीपिठं आणि पुरणपोळ्या दिल्या.  तीन वाजता ती निघाली तेव्हा फक्त वॉटस्अपवर गणपती बाप्पा मोरया म्हणत मेसेज टाकून ठेवला होता.  मी सकाळी सात वाजता फोन केला तेव्हा तिचा फोन लागला नाही...आता फक्त ती गावाला कधी पोहचतेय याची प्रतीक्षा होती...तिचा फोन आला...तब्बल अठरा तासांनी...गावाला एकदाची पोहचली...मी आत्ता पोहचलेय...तुला सावकाश फोन करते..म्हणत फोन ठेवला...अठरा तास...अवघ्या आठ तासांच्या प्रवासासाठी...त्यात पाऊस...नक्कीच वैतागली असणार....

गेल्या दोन महिन्यापासून मेधाच्या घरात ऐतिहासिक वाटेल अशा विषयावर चर्चा आणि मग वादविवाद होत होते.  विषय गणपतीचा.  कोरोनाचा बदलता आणि परसता रागरंग पाहून दोन महिने आधीच मेधा नव-याच्या पाठीशी लागली होती, यावेळी गणपतीला गावी जाता येणार नाही.  आपण गणपती इथे, शहरातल्या रहात्या घरी आणूया...पण बघूया...तेव्हाच तेव्हा...सर्वांन विचारावं लागेल...या तिच्या नव-यानं केलेल्या टोळवाटोळवीत एक महिना गेला.  अखेरीस मेधानं हा विषय कुटुंबातील काही मोठ्या महिलांपुढे मांडला.  फोन सुरु झाले.  पण उत्तर नाहीच...डोकेदुखीच जास्त झाली.  देव आहे तो...तुमच्या मर्जीनुसार का त्याला आणायचा...गावी तर जावेच लागेल.  मेधाचा गावी जायला नकार नव्हता.  तिच्या लग्नाला बारा वर्ष झाली.  या बारा वर्षात एकदाही गणपतीची फेरी तिनं चुकवली नव्हती.  पण यंदाचा रागरंग वेगळा आहे.  मेधानं आपल्या परीनं कुटंबातील अडून राहिलेल्यांची समजूत काढली.  मग शेवटी तू काही बघू नकोस...भाऊ निर्णय घेईल...भाऊ म्हणजे मेधाचा नवरा...असा आदेशच तिला मिळाला.  भाऊ निर्णय घेईल...पण करायला तर मलाच लागणार ना...यावर्षी गावी जाण्यात धोका आहे.  कोरोनाची भीती आहे.  मुलांच्या ई शाळा सुरु आहेत.  गावी किमान 15 दिवस अगोदर जावं लागणार आहे.  तिथं नेटवर्क मिळालं नाही तर आधीचे पंधरा दिवस आणि नंतर दहा दिवस अशा तब्बल पंचवीस दिवसांच्या शाळेचं काय करायचं हा प्रश्न होता.  अवघे वीस-पंचवीस दिवस राहिल्यावर मेधाचा नवराही जागा झाला.  त्यानंही कुटुंबाला सांगण्याचा प्रयत्न केला...यावर्षी गणपती इथेच शहरात आणतो...पण बायकोसारखं बोलू नकोस म्हणून त्याला गप्प बसवण्यात आलं.  शेवटी दोघांनी हार मानली.  शाळेत कळवलं...काही दिवस नेट नसेल.  नव-यानं ई खरेदी आधी केली.  कारण दोन मुलांच्या शाळा आणि त्याचं ऑफीसच कामही त्याला गावी जावून करावं लागणार होतं...त्यामुळे नेटपॅक खरेदी केले.  या दोन दिवसांत मेधानं अक्षरशः बाजार पिंजून काढला.  आधीच ठरावीक वेळेत दुकानं उघडी होती.  त्यावेळा बघून रांग लावून सामान खरेदी करत होती.  एकदिवस तर सकाळी नऊ वाजता तिनं खरेदी सुरु केली ती दुपारी दोन वाजेपर्यंत चालू होती.  त्यातच कुटुंबातून अन्य कोणीही येणार नव्हतं...कोरोनाचं कारण आता पुढे करत बाकी जणांनी प्रवास जमणार नाही...ई पास मिळत नाही...अशी कारणं देत सर्वांचे नकार आलेच...पण सर्व निट करा...असे सल्लेही आले...

सर्व खरेदी...सामानाच्या केवढ्यातरी बॅंगा आणि भरपूर खाऊ घेऊन मेधा 2 तारखेला निघाली...अठरा तासांनी आपल्या गावी पोहचली...पोहचल्याचा फक्त फोन आला...नंतर जवळपास दोन दिवस गेले.  फोन करु की नको म्हणून मी सुद्धा विचारात होते...शेवटी दोन दिवसांनी तिनंच निवांत फोन केला...दुपारी दोन वाजता...एक-दोन वेळा फोन कट झाला...मध्ये एकदा मी केला...चांगल्या चारवाजेपर्यंत गप्पा झाल्या...नशीबानं लेकाची तेव्हा ई परीक्षा चालू होती...त्यामुळे मी सुद्धा निर्धास्त फोनचा वापर केला. 

भल्या पहाटे तीन वाजता निघालेली मेधा गावी पोहचेपर्यंत रात्रीचे दहा वाजले होते...घरी पोहचल्यावर कोणाच्यामध्येही त्राण नव्हतं...त्यात गावी कोरोनाची आणि मुंबईकरांची अधिक भीती होती.  चौदा दिवस सक्तीचे कोरंटाईन व्हावे लागले.  घरी पोहचल्यावर सर्वांनी रात्रीच्या जेवणात मॅगीचा आधार घेतला.  सोबत नेलेले सर्व डबे संपले होते...आणि काही अन्न खराबही झालं...सकाळी उठल्यावर गावीतील काही मंडळी त्यांच्याकडे आली...त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी बनवलेले नियम त्यांना सांगितले.  चौदा दिवस घराच्या बाहेर यायचं नाही...कोणाच्या घरी जायचं नाही...पण काही मदत लागली तर नक्की सांगायचं...दूध, भाज्या आणि आवश्यक सामान घरपोच मिळणार होतं...त्यासाठी थोडे अतिरिक्त पैसे द्यावे लागणार होते.  पण घरपोच सोय होती...या दोन दिवसांत ती, मुलं आणि तिचा नवरा आपापल्या परीनं गावी सेट होण्याचा प्रयत्न करीत होते.  नेटचा प्रॉब्लेम होता...पाऊसही चांगलाच होता...पण आता त्यावर उपाय नव्हता...

मेधा घराच्या साफसफाईचा विचार करत होती...आता कोणी काम करायला येणार नव्हतं..त्यामुळे घराची सफाई करणं भाग होतं...या सर्वांतून वेळ काढत आमची फोनाफोनी झाली...वैतागलीस का म्हणून मी विचारलं...तेव्हा म्हणाली वैतागणार कशाला...गणपतीला गावी जायला लागणार हे माहित होतं.  तो कोरोना असो की नसो...काही फरक पडत नाही...किती जणांची आणि कशी समजूत काढणार आम्ही....आता इथे येणार म्हणून सगळी काळजी घेतलीय.  कितीतरी औषधं गरज नसतांनाही सोबत आणली आहेत.  खर्च किती झाला हे विचारू नकोस...पण त्याचं काहीच नाही...एरवीही सर्व ठिक असतं तर हौस म्हणून बाप्पाला सजवण्यासाठी कितीतरी गोष्टी घेतल्या असत्या...त्यांचाही खर्च झालाच असता ना...मुलांचं कौतुक आहे...काहीही न बोलता समजून गेलीत...मलाच फार त्रास झाला आल्यावर...नव-यानंच पहिल्या दिवशी खिचडी पापड केले...त्यावर राहीलो एक दिवस...एवढं काय झालं...मेधाला जे झालं ते ऐकून अंगावर काटा आला. 

पहाटे निघालेली मेधा आणि तिचं कुटुंब रस्त्यात एकटीच नव्हती.  अनेक गाड्या कोकणाकडे...गणरायाच्या ओढीनं निघालेल्या होत्या...पहाट असूनही रस्त्याला ब-यापैकी गर्दी होती.  लॉकडाऊन झाल्यानंतर हे कुटुंब पहिल्यांदाच बाहेर पडलेले...त्यामुळे रस्त्यांचा अंदाज नाही...कोरोनांनं सर्व बदललं असलं तरी रस्त्यांची अवस्था मात्र जशी दरवर्षी असते तशीच होती.  अनेक खड्डे...लाईटचा पत्ता नाही...अशी नेहमीसारखी अवस्था...खूप दिवसांनी गाडी बाहेर काढल्यानं तिच्या नव-यालाही खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता...त्यामुळे गाडी सावकाश चालवावी लागत होती.  सकाळी नऊच्या सुमारास एके ठिकाणी गाडी थांबवून सर्वांनी नाष्टा केला.  रस्त्यातली हॉटेल बंद...त्यामुळे सर्वांनी सोबत आणलेलाच खाऊ खाल्ला होता...खाण्याचा प्रश्न नव्हताच...मेधा त्या तयारीनं गेली होती.  पण प्रश्न आला तो बंद असलेल्या बाथरुमचा...पुढे सोय असेल म्हणून नव-यानं गाडी पुढे पुढे नेली.  शेवटी दुपारी एके ठिकाणचा बाथरुम तिनं वापरला...पण ते एवढं अस्वच्छ होतं की,  नंतरच्या प्रवासात तिनं साधा पाण्याचा घोटही घेतला नाही...आणि अन्नही मोजकंच घेतलं...दुपारपर्यंत गावी पोहचू असा अंदाज होता...तो खोटा ठरला.  कारण रस्ता प्रचंड खराब....सोबतीला पाऊस...रस्त्यातील खड्डे पावसाच्या पाण्यानं भरलेले.  त्यामुळे गाडी सावकाश..कोणाला बोलणार...प्रत्येक गाडीची आणि त्यातील प्रवाशांची अशीच अवस्था...पुढे तर घाटात तर रांगा लागलेल्या...त्यात दरडी कोसळल्यानं काही काळ वाहतूक थांबवली...पुरुष गाडीतून उतरुन पाय मोकळे करत होते...महिलाही उतरल्या होत्या...कुठे आडोसा मिळतो का...याची पहाणी करुन पुन्हा गाडीत बसत होत्या...एवढ्या वावरात लघुशंकेसाठी आडोसा कसा शोधायचा...या संकोचानं मेधाही पुन्हा गाडीत बसली...शेवटी चेकींग...खड्डे...पाऊस चुकवत ती गावी अठरा तासांनी पोहचली.  घर उघडल्यावर तिनं पहिल्यांदा बाथरुम गाठलं...खूप त्रास झाला.  मुलांना काही समजलं नाही...नवरा समजून होता...पण उपाय काहीच नव्हता...रात्रीही तिला त्रास झाला.  सकाळी उठल्यावर नवरा बायकोंनी पहिल्यांदा फॅमिली डॉक्टरला फोन केला.  त्यांना परिस्थिती सांगितली.  मेधाच्या पोटात दुखत होतं.  सर्व औषधं सोबत होती.  फक्त हे एकच औषध नव्हतं...डॉक्टरांनी काही घरगुती उपाय सांगितले.  आणि मेधाला आराम करायला सांगितला.  थोड्या आरामांनी तिला आराम पडला...आता बाई गणपतीच्या तयारीला लागल्यात...पण तिला चिंता पडलीय ती परतण्याची...तेव्हाही अशीच परिस्थिती असेल तर पुन्हा असाच त्रास होईल का अशी चिंता सतावतेय...

रोग काय येईल आणि जाईलही...पण आपल्या भोवतालची परिस्थिती कधी बदलेल का हा प्रश्न कायम रहाणार आहे.  गेल्या बारा वर्षापासून मेधा गावी जातेय...दरवर्षीची ही ओरड आहे...एवढ्या वर्षात कधीही रस्त्यात खड्डे नाहीत असं झालंच नाही...गणपती येणार म्हणून त्या खड्डात खडी, माती टाकून चिखल केला जातो...त्यातूनच आम्ही गाडी हाणतो...असं सांगतांना ती निराश नाही हताश झाली होती...सोबत सण कसा साजरा करावा ही मानसिकतता कशी बदलणार याचाही विचार होता...कोरोना फक्त रोग आहे...तो जाणारच...पण सुविधांच्या नावानं भकासपणा देणा-या सिस्टीमचा रोग कधी जाईल का हा तिचा प्रश्न अधिक बोचरा होता...निमित्त फक्त कोरोनाचे आहे...बाकी आपली मानसिकाता कधी बदलणार हा प्रश्न बाकी आहेच....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

Comments