बंधनातला देव...
हा कॉलम लिहायला गुरुवारी सकाळी सुरुवात केली. इनमीन सातशे किंवा आठशे शब्दांची मर्यादा अगदी पहिल्यापासून मी माझ्यावर घातलेली. कधी विषय छान जमला की कधीकधी शब्दांची ही मर्यांदा हजारापर्यंत जाते...तरीही लिहायला फारतर एक-दिड तास लागतो. पण गुरुवार सकाळ अशीच गेली. फक्त नाव सुचलं...काय लिहायचं ते समजत नव्हतं...नुसतं कॉलमचं नाव वाचत आणि बधिर मनानं गाणी ऐकण्यात वेळ गेला....बाराच्या सुमारास वहिनीचा फोन आला...येता का दर्शनाला...आज विसर्जन...जेवायला या...काय सांगणार तिला...मन तिथेच होतं...पण या रोगानं मनात भीती एवढी भरली की, आपलं कुटुंब जपायचं असेल तर असं अंतर ठेवणं गरजेचं आहे, हे एक मन सांगत होतं...आईकडे गणपतीला जायला भरल्या मनानं नकार दिला. थोड्यावेळानं भावाचा फोन आला....खाली ये...मास्क घालून धावत खाली गेले...त्यानं गपचूप डबे हातात दिले आणि निघून गेला...डबा हातात घेतल्यावर डोळे भरून आले...आज गणपती बाप्पाचे विसर्जन...बाप्पाला खिर आणि पुरीचा नैवेद्य गेले कित्येक वर्ष आमच्या घरी होतो. आता वहिनीनं ही परंपरा सुरु ठेवली आहे. तोच प्रसाद माझ्याकडे आला...डब्यातून...
दरवर्षी गणपती म्हणजे माझ्यासाठी चंगळ असते. पाच-सहा दिवस भावाकडे मुक्काम...गणपतीसाठी पाहुण्यांची वर्दळ...प्रसादाची पंचपक्वाने...आई आणि वहिनीच्या हातचं जेवण...एकूण मज्जा...पण या मज्जेला यंदा कोरोनाचं ग्रहण लागलं...दादाकडे गणपतीचे सगळेच दिवस खास असतात. पण त्यातही ऋषीपंचमीच्या जेवणाचा थाट वेगळा असतो...अगदी सकाळी दादा आणि वहिनी बाजारात जाणार...मग तांदूळ, भाकरीचे पिठ, भाजी, आळू, मक्याची कणसं, चिंच अगदी मिठ यांची भरपूर खरेदी करणार...मग या भाज्या, अळू, भात, भाकरी आणि खोब-याची चटणी यांची मेजवानी...तेलाचा अगदी थेंबही नसलेले हे ऋषीचे जेवण म्हणजे गणपतीच्या दिवसातली सर्वात आवडती गोष्ट. वर्षभर कितीही चमचमीत भाजी केली तरी या ऋषीच्या भाजीची आणि जेवणाचीही चव येत नाही. त्यामुळे एरवी जेवतांना जरा जपून, ही माझी सवय ऋषीच्या जेवणाला मागे पडते. पण यावर्षी हा योग नव्हता. घरी नेहमीप्रमाणे जेवणाच्या तयारीला लागले. मध्येच आईकडे फोन केला. पूजा झाली का, चौकशी...आईनं विचारलं येतेस का...मग पुन्हा नकार...थोड्यावेळानं वहिनीचा मेसेज आला, मी डबा पाठवते...केवढं समाधान वाटलं. थोड्यावेळानं डबा आला. आळू, भात, भाक-या, चटणी आणि ऋषीची भाजी. सगळा डबा चाटून पूसून साफ करावा तसा झाला...पोटं भरलं..पण डोळ्यात पाणी...आमच्या भावा-बहिणीच्या घरात अतंर अवघं दहा पंधरा मिनिटांचं...पण आता या कोरोनानं आलेल्या सोशल डीस्टसिंग....या शब्दानं हे अंतर काही मैलाचं केलेलं...
हा कुठून रोग आला म्हणून माझी बडबड सुरु होती. खूप अस्वस्थ वाटत
होतं. त्यात कोणाकडे जायचंही नाही....नुसता मनाचा त्रागा...पण नंतर हा माझा गैरसमज थोडा दूर झाला. गणपतीला यावेळी परिचितांकडे प्रत्यक्ष जाता आले नाही, म्हणून फोनवरुन नमस्कार आणि गप्पा झाल्या. तेव्हा समजलं, प्रत्येकाचं हेच दुःख होतं. ज्यांच्याकडे बाप्पा आले होते, ते सांगत होते, निदान आता तरी...बाप्पांमुळे घर भरलेलं वाटतंय. पण बाप्पांच्या दर्शनाला साधे शेजारीही आले नाहीत. शेजारी आले नाहीत, यापेक्षा ते येऊ शकत नाहीत, आणि आपण त्यांच्याकड़े जाऊ शकत नाही. ही सल जास्त होती. एरवी आरतीचा टिपेचा आवाज ऐकू यायचा. यावर्षी तो आवाजही नाही. प्रत्येकानं आपापल्या घरात आरती आणि प्रसाद, पूजा करुन घेतली. एका मैत्रिणीकडे कुटंबात इनमिन तीन माणसंच...एरवी तिला आपण फक्त तिघंच, हे कधी जाणवलं नाही. पण यावर्षी जाणवलं. कारण दरवर्षी बाप्पाच्या आरतीला आणि बाप्पा घरात आल्यावर होणा-या पुजेला घर भरलेलं असायचं. नातेवाई आणि शेजारीही हक्कानं यायचे...वीस पंचवीस माणसाचं जेवण होत असे...ताटात एकाचवेळी चार चार गोडाचे पदार्थ असायचे...विसर्जनाची मोठी मिरवणूक नाही...पण बारा-पंधरा जणं नक्की असायची. यावर्षीचा नूरच वेगळा. तिघांनी बाप्पांना आणलं. पूजा, आरती आणि विसर्जनही तिघांनीच केलं. ती तर माझ्यापेक्षा जास्त रडत होती.
पण या सर्वाला काहीही इलाज नव्हता.
त्यातल्या त्यात मी समाधानी होते. आमच्या
सोसायटीतल्या एका कुटुंबानं मुलांच्या हट्ट म्हणून दीड दिवसांचा गणपती बसवला. कुटुंबाच्या एकत्र गणपतीला जाता आलं नाही
म्हणून मुलं नाराज झाली. मग त्यांच्या
हट्टासाठी घरीच गणपती बाप्पाची मुर्ती बनवली आणि दिड दिवसांनं बाप्पाचं विसर्जन
केलं. विसर्जन कुठे बाहेर न करता
सोसायटीच्या आवारात एका टबमध्ये केलं.
त्यावेळी आम्हाला फोन करुन खिडकीत उभं रहायला सांगितलं. आरती करुन त्यांनी बाप्पांचं विसर्जन
केलं...तेवढा एक विसर्जनाचा सोहळा बघता आला.
तेव्हाही डोळ्यात पाणी आलं. आईकडे
गणपती आणण्यासाठी....पुजेसाठी फारकाय बाप्पांच्या विसर्जनासाठीही जाता येणार नाही
याची जाणीव होती. त्यामुळे हा सोहळा
बघतांना डोळे पाणावले...
सकाळी लिहायला घेतलेला कॉलम रात्री उशीरा लिहून पूर्ण झाला. त्या दरम्यान दोन जवळच्या मित्रपरिवारांमध्ये
कोरोना झाल्याचा वॉटस्अपवर मेसेज आला. मग हातातलं
काम सोडून त्यांना फोनाफोनी...त्या कुटुंबांची अस्वस्थता. अवघं घर कोरोना बाधित झाल्यावर होणारी
तारांबळ. ओढाताण...त्यांना धिराचा
सल्ला...याच बराच वेळ गेला...दोन्हीही घरांनी खूप काळजी घेतलेली...पण तरीही
कोरोनाचा शिरकाव कसा झाला...या प्रश्नानं त्यांना त्रस्त केलेलं. माझ्यामते या प्रश्नाचं उत्तर कधी शोधण्याचा
प्रयत्न करायचा नाही...फक्त त्या रोगाला सामोरं जाणं हा एकमेव उपाय आहे. आणि दुसरा म्हणजे सोशल डिस्टटींग या शब्दाचा
शब्दशः वापर...
या वर्षीचा गणपती...माहेरचा सण मी मीस केला...पण हे सर्व आमच्या कुटुंबासाठी असल्याचं समाधान मिळवलं...बाप्पा आपल्या घरी गेले. अगदी साधेपणात आले आणि तशाच साधेपणात गेलेही. बहुधा पहिल्यांदाच गुलालांनी भरलेला आणि ढोल ताशाच्या नादात त्यालाही रंगता आलं नसणार...पण त्याच्यावर श्रद्धा आहे. बाप्पा विघ्नहर्ता आहे. सर्वव्यापी आहे. आज त्याचेच एक रुप रुग्णालयात अखंड रुग्णाच्या सेवेत आहे. आपल्या सगळ्यांना अश्वस्त करत आहे. त्यांच्यावर अधिक भार नको...मंडळी म्हणूनच काळजी करु नका...तर सावधानता ठेवा...लवकरच ही परिस्थिती निवळेल...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
सत्य, मनातील भावना छान व्यक्त केल्यात. ऋषीची भाजी त्याच दिवशी छान लागते, नंतर केले तर चव येत नाही.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteसाधेपणात बाप्पा असतो.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteसुंदर पारंपरिक गोष्टी आणि आनंदित नाती गणपतीशी जोडली जातात ती आरती, पूजा आणि प्रसादातून।
ReplyDeleteछान लेख।
साध, सहज आणि सुंदर. अगदी सोप्या शब्दात सगळ्यांच्या मनातले भाव उलगडले. 👌🏻
ReplyDeleteखुप छान लेख
ReplyDeleteSundar
ReplyDelete