हुश्श.....झाली एकदाची......

 



हुश्श.....झाली एकदाची......

झाली...झाली....झाली...एकदाची परीक्षा झाली....गुरुवारी रात्री अकरा नंतर नेहाचा फोन आला.  एवढ्या रात्री तिचा फोन आला म्हणून राग किंवा काळजी न वाटता माझा चेहरा खुलला....मी बोल म्हणायच्या आत तिचा जोरदार आवाज आला...झाली ग एकदाची झाली....नेहा, माझ्या एका मैत्रिणीची मुलगी....गेले काही वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो...स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा आमचा एक मोठा ग्रुप आहे...माझ्या मुलामुळे मी या ग्रुपमध्ये सामिल झाले आहे.  स्पर्धा परीक्षा, जेईई आणि मेडीकल मध्येच करीअर करणार असा हट्ट घेऊन बसलेली ही मुलं...माझा मुलगा या प्रवाहात आला तो सहावीत असतांना...इतरही मुलं तशीच...पाचवी किंवा सहावीत आपल्याला या परीक्षांच्या मार्गावर जायचेय हे नक्की करुन अहोरात्र अभ्यास करणारी....शाळांचा अभ्यास आणि या स्पर्धा परीक्षांचा वेगळा अभ्यास कराणारी मुलं आणि आम्ही त्यांच्या आया...याच गोतावळ्यातली नेहा...गुरुवारी तिची जेईईची परीक्षा झाली...परीक्षा देऊन घरी आल्यावर मस्त झोप काढून आता सर्वांना फोन करुन स्वतःच्या भावना मोकळ्या करत होती.  गेले चार महिने नेहा आणि तिच्यासारख्याच काही मुलांच्या संपर्कात मी आहे...परीक्षा पुढे गेल्यामुळे आलेला तणाव...कोरोनाचा वाढता प्रभाव...आणि सततचा अभ्यास या सगळ्या चक्रव्युहात या मुलांची मानसिक अवस्था अतीशय नाजूक झाली होती...आता जेईई झाल्यामुळे हा सगळा तणाव एका झटक्यात मोकळा झाला आहे...हाच मोकळेपणा नेहाच्या बोलण्यात आला होता...परीक्षेला किती वाजता गेली...आईनं किती डबे...किती टिश्यू पेपर...किती सॅनेटायझरच्या बाटल्या घेतल्या होत्या हे उत्साहात सांगत होती...पेपर मस्तच गेला...आता अॅडव्हान्सची तयारी अशीच झटून करणार...त्याआधी सर्वांबरोबर बोलणार म्हणून रात्री साडेबारापर्यंत बोलत होती... लेकाबरोबरही बोलली...मग तिची आईही बोलली...दीड तास चाललेला नेहाचा फोन म्हणजे सर्व ताटकाळलेल्या विद्यार्थ्यांचे प्रतिक होता...


सहावीत असल्यापासून माझा लेक, वरद स्पर्धा परीक्षा देतोय.  शाळेच्या अभ्यासासाठी अन्य कुठलाही क्लास लावला नाही.  त्यामुळे शाळा सुटल्यावर बाकीच्या वेळामध्ये हे स्पर्धा परीक्षा आणि त्यांचे वेगळे क्लासेस...हे गणित त्यानं बसवलं...सहावीत होमी भाभा दिली तेव्हा मुलुंडच्या एका क्लासला मी रोज त्याला डोंबिवलीहून घेऊन जायचे...सुरुवातीला मला वाटलं एवढा लांबचा प्रवास, तोही ट्रेननं केल्यानं तो कंटाळेल...आणि माझी अनायसे या सगळ्यातून सुटका होईल...पण तिथे गेल्यावर त्यानं त्याच्यासारखेच मित्र मैत्रिणी जोडले...आणि त्यांच्या आया माझ्या मैत्रिणी झाल्या...एकएक नवीन माहिती मिळत गेली...अर्थात लेक कंटाळला नाही...उलट या स्पर्धांच्या ओघात ओढला गेला...सातवीपासून तर आमचं माय लेकांचं रोजचं शेड्यूल झालं होतं...शाळेतून तो आल्या आल्या जेऊन तयार होत असे...यात शाळेचा अभ्यास असेल तर तो आधी करुन मग आम्ही ठाणे गाठायचो...बारा महिने हेच शेड्यूल...अगदी रविवारीही...अगदीच भरपूर पाऊस होऊन ट्रेन बंद पडल्या किंवा अन्य काही कारणांनी ट्रेनचा मेजर प्रॉब्लेम असेल तरच हे श्येड्यूल ब्रेक व्हायचे...या सगळ्यात आमच्या प्रवासाची अनेकांनी थट्टा केली.  जवळपास नव्वद टक्के लोकांना वाटत होतं की मी, लेकाला आग्रहानं असं व्यस्त केलंय...त्याची ओढाताण करतेय...ब-याचवेळा यावरुन बोलही खावे लागले...पण लेक यापलिकडे होता.  मला जायचेच आहे...करायचेच आहे...हा त्याचा अट्टाहास कायम राहीला...मी जाणारच...मला हाच अभ्यास करायचा आहे, हा त्याचा आग्रह कायम होता आणि आहेही...जेईई किंवा तस्सम परीक्षा हा काही खेळ नव्हे.  त्यासाठी एक साधना...चिकाटी...सातत्य लागतं...ते ठेवलं तरचं त्यात यश मिळू शकतं...हे माझा लेक मला समजवून सांगायचा...तेव्हा तो शाळेत होता...पण समज मोठी आली होती...त्याची ही समज बघून मला कौतुक वाटायचं आणि त्यातूनच उत्सुकता वाढली...मग त्याच्या भोवती असलेला त्याच्या मित्र परिवाराचा गोतावळा बघितला...त्याच्यासारखीच मुलं होती...कुठल्यातरी जिद्दीनं अभ्यासाला लागलेली.  त्यांच्यात मैत्रीचा धागा होता...पण सोबतच एक निरोगी स्पर्धा लागली होती...ती आपापसात चर्चा करायची...आजच्या परीक्षेत कुठलं गणित अडलं...फिजिक्स मध्ये काय चुकलं...त्याचं केम किती छान आहेत, याच गप्पा...या मुलांच्या आयाही तेवढ्याच चौकस...जाणकार...हळूहळू या सगळ्यांबरोबर मैत्री झाली...माहिती मिळू लागली....अभ्यासाचा वेगळा मार्ग मिळाला.  मुख्य म्हणजे त्या सगळया एकसारख्या होत्या...प्रत्येकीची मुलं स्वतःहून या प्रवाहात आलेली..रमलेली...

याच सगळ्या प्रवासात अनेक मैत्रिणी जोडल्या गेल्या...लेकाचा मित्र-मैत्रिणींचा गोतावळा वाढला.  त्यातलीत ही नेहा...ती अंबराथला रहाणारी...माझ्या लेकापेक्षा एक वर्ष पुढच्या इयत्तेतील...हुशार...तिचा मामा आय.आय.टी. मुंबईचा विद्यार्थी...त्यानं एकदा ते कॅम्पस तिला दाखवलं...बस्स ते बघून मी पण येथच येणार असा ध्यास तिनं घेतला...आठवीत होती तेव्हापासून जेईई देणार असं अभिमानानं सांगणारी नेहा...अगदी दहावीची परीक्षा झाली त्यानंतर एक दिवसही सुट्टी न घेता, दुस-या दिवसापासून झट्टून जेईईची तयारी करत होती...हे वर्ष म्हणजे तिच्यासाठी तिचं स्वप्न पूर्ण होण्यासाठीचं महत्त्वाचं वर्ष होतं...मला माझ्या लेकाचंच कौतुक होतं...पण नेहा आणि तिच्यासारखी काही मुलं तर आमच्यापासूनही दोन तासाचं अधिक अंतर अशा ठिकाणी रहाणारी...आम्ही रोज स्पर्धा परीक्षांच्या क्लासवरुन नऊ पर्यंत पोहचायचो...तर ही मुलं त्याहून दोन तास उशीरानं...पावसात तर विचारु नका एवढा उशीर...पण हा उशीर कधी दुस-या दिवसासाठी कंटाळवाणा झाला नाही...जणू काल काही झालंच नाही अशा थाटात ही मुलं वावरायची...कोणत्याही आईवडीलांनी अभ्यासाची जबरदस्ती करुन हा उत्साह येत नाही...हा आत्मविश्वास असतो..अभ्यासाची ओढ असते...आपण जे करणार आहोत,  त्याची जाणीव असते...यातूनच या मुलांनी जेईई आणि मेडीकलचा अभ्यास करायला सुरुवात केली. 

मला आठवतं की दहावीची परीक्षा झाल्यावर ही सगळी मुलं त्याच दिवशी उद्यापासून जेईईची खरी तयारी सुरु म्हणून त्यांच्या क्लासला जमा झाली होती...किती हा उत्साह...दोन वर्ष अक्षरशः सगळ्यावर पाणी सोडून झटून अभ्यासाला लागली.  कुठलाही सण नाही की समारंभ नाही...फक्त अभ्यास एके अभ्यास...काही परिचितांनी तर मुलांना अभ्यासात काही अडचण येऊ नये म्हणून जिथे चांगला क्लास आहे, तिथे एखादी रुम घेऊन तात्पुरती रहाण्याची व्यवस्था केली.  मग आई-मुलगा एकीकडे आणि वडील दुसरीकडे अशी कुटुंबाची विभागणी झाली.  आमच्यासारखे जे जवळ रहातात त्यांची मुलं घरी असून नसल्यासारखी....एखादा समारंभ असेल तर तिथे ही मंडळी येणारच नाही...का..तर अगदी एक-दोन तासही महत्त्वाचे...ते वाया का घालवायचे...म्हणून...यावर अनेकवेळा परिचितांनी मुलांची, आमची टिंगल-टवाळी केली...आम्हा पालकांनी ती मुलांच्या जिद्दीकडे पाहून सहनही केली....


या सर्वात अचानक कोरोनाचं वादळ आलं....सर्व जग थांबलं...पण ही मुलं काही थांबली नाहीत....सततचा अभ्यास...आपली परीक्षा कधीतरी होईल हा आशावाद...बरं जी मुलं खरोखर जेईई आणि मेडीकलच्या प्रवेश परीक्षांचा अभ्यास करतात, त्यांना माहीत आहे की, हा अभ्यास म्हणजे एक ब्लॅक होल आहे...कधीही न संपणारं...कितीही वेळ मिळाला तरी कमीच वाटणारा...त्यामुळे पहिल्यांदा या परीक्षांना झालेला उशीर चांगला वाटला...अधिक अभ्यास करता येईल म्हणून मनाची समजूत काढण्यात वेळ गेला.  पण नंतर परीक्षाच नको अशी कोणीतरी टूम काढली....कोण कोरोनाचं कारण देऊ लागलं...एकीकडे कोरोनाबरोबर रहाण्याची सवय करा, सांगणारेही कोरोनामुळं परीक्षाच नको असं सांगायला लागले....आज होणार परीक्षा की उद्या होणार या तारखांवर लक्ष देण्यापेक्षा या मुलांनी अभ्यासावर लक्ष देण्याचा प्रयत्न केला...पण त्यातील काहींना मानसिक ताण अधिक आला.  असे काही पालक आणि मुलंही संपर्कात होती.  मुलांनी अभ्यास थांबवला होता...परीक्षाच होणार नाही मग आमच्या दोन वर्षाच्या परिश्रमाचं काय....हा प्रश्न ते पालकांना विचारत होते...पालकही संभ्रमात...आणि चिंतेत...एरवी मान खाली घालून अभ्यास करणारी मुलं नुसती शुन्यात बघत रहायची...मग पालकांच्याही जीवाचं पाणी पाणी होत होतं....काही पालकांची तर मुलांची ही अवस्था बघून झोप उडाली...कोरोनावर उपाय नाही...पण या मुलांच्या अवस्थेवर एकच उपाय होता...तो म्हणजे अडलेल्या परीक्षा पुन्हा घेणे...नशीबानं परीक्षा जाहीर झाल्या....दुर्दैवानं त्यावरही दोन तट पडले...परीक्षा घेऊ नयेत, मुलांचं आरोग्य धोक्यात येईल, म्हणून अनेक आंदोलनं झाली.  अर्थात त्यात सोशल डीस्टसिंगचा पार फज्जा उडत होता हा भाग वेगळा....पुन्हा परीक्षा होणार की नाही हा संभ्रम सुरु झाला...मुलं मात्र अभ्यासाला लागली...आया काळजीनं एकमेकींना फोन करत होत्या...रोजच्या बातम्यांनी हैराण झालेल्यां काहींनी तर चक्क टीव्हीच बंदच केला...यात मुलं सरसावली होती...ही सुद्धा एक परीक्षाच मानली त्यांनी...सुदैवानं या परीक्षांच्या अभ्यासाचा आवाका एवढा आहे की फेसबूक, वॉटस्अप सारख्या चक्रापासून ती दूर आहेत...त्यामुळे त्यावर येणा-या बातम्यांचा त्यांच्यावर परिणाम झाला नाही...नेहासारख्या अनेक मुलांना या परीक्षेचं महत्त माहीत आहे.  तिच्यासारख्या मुलांनी आणि त्यांच्या शिक्षकांनीही रात्रदिवस एक केला आहे, म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.  परीक्षा देऊ नका, बहिष्कार घाला, हे सांगणा-यांना त्याच महत्त्व समजणार नाही...

कोरोना आहे, मान्य आहे....साहजिकच आहे.  कोरोनाचा संसर्ग वेगानं पसरतो आहे.  त्यासाठी ठराविक अंतर राखणं हाच एक उपाय.  आणि जिथे लाखो विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, तिथे हा नियम लागू कसा करणार...परिणामी अनेक विद्यार्थ्यांना या संसर्गाचा धोका होता...पण कोरोना सारखा रोग एका झटक्यात जाणार नाही.  त्याचे परीणाम पुढेही काही काळ आपल्याला सहन करावे लागणार आहेत.  त्यामुळे थेट परीक्षा रद्द करुन तो बोजा पुढच्या वर्षीवर टाकायचा हा तर उपाय नक्की नाही...पण काळजी घेऊन परीक्षा घेणं...आणि पुढचा मार्ग सुकर करणं हा उपाय तर नक्की आहे.  जी मुलं आपल्या भविष्यासाठी रात्रदिवस एक करुन अभ्यास करतात,  त्यांना स्वतःची काळजी कशी घ्यावी याची साधारण जाणीव तर असणारच ना...मुलांचे आरोग्य जसे महत्त्वाचे तसेच त्यांचे मानसिक आरोग्यही मह्त्त्वाचे आहे.  परीक्षा थांबल्यावर हे मानसिक आरोग्यच अधिक बिघडले आहे.  त्यात सुधारणा करायची असेल तर सुरक्षेचे सगळे नियम पाळत परीक्षा घेणे, हाच एक उपाय सध्या मला तरी वाटतो...मंडळी आपलं मत काय.....

 

सई बने

डोंबिवली

--------------------------------------------------------------------------------------------------

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 


Comments

  1. खूप छान साई, फार छान लिहीले आहेस. मुलांचे परिश्रम, चिकाटी, त्यांची मानसिकता, इत्यादी पालक म्हणून छान ओघवत्या भाषेत शब्दबद्ध केले आहेस.
    छान लिहितेस, अशीच लिहीत रहा.👍

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मामा....आपल्याकड़ून आलेल्या शुभेच्छा खुप मौल्यवान आहेत.

      Delete
  2. आदरणीय सई जी प्रथम आपले आभार
    ह्याच कारण एकच आम्हा पालकांना वेदना होत्या पण वाचा नव्हती वाचेला शब्धानची किनार नव्हती
    ती अपन आज आपल्या लेखात बरोब्बर जोड़ली...
    खरोखर कठिन काळ आणि विचलित मनस्थिति आपली आणि मुलांची फक्त आता कोणाची मनस्थिति सांभाळायची हां प्रश्न होता..
    शासनाने कठोर पण अभ्यासपूर्ण निर्णय घेतला आणि मी एक पालक म्हणून ह्या निर्णयाचे स्वागत करतो..
    शेवटी एकच सांगणे आहे"जीवन हे चालत..असल पाहिजे"
    धन्यवाद
    नित्तिन पाटिल

    ReplyDelete
    Replies
    1. नितीनजी नमस्कार आणि मनापासून धन्यवाद....सगळ्या मुलांचे पालक याच मानसिकतेतून जात आहेत. मुलं मेहनती आहेत...त्यांच्या मेहनतीचे मुल्य सरकारने लक्षात घ्यावे हिच अपेक्षा

      Delete
  3. नमस्कार सई. ...पालक आणि मुले यांच्या मनतील परिक्षा बद्दलच्या सध्या च्या मानसिक तणावा बद्दल छान लिहिल आहे. मुलना परिक्षा द्यायच्याच आहेत पण राजकारणी लोक उगाच याच राजकारण करत आहेत आणि मुला मधे मानसिक तणाव वाढवत आहेत.
    एक पालक म्हणून मी स्वताला या लेखशी relate केल

    ReplyDelete
    Replies
    1. खूप धन्यवाद....सगळे पालक सध्या मुलांसाठी काळजीत आहेत...लवकरच सर्व सुरळीत होवो हिच सदिच्छा...

      Delete
  4. खूप सुंदर लेख

    ReplyDelete

Post a Comment