कंगना…करोना…आणि फरफट...
अगदी काल-परवा ठाण्याच्या एका काकूंचा फोन आला. त्यांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह होता. बारा दिवस हॉस्पिटलमध्ये राहून आता परत आलाय. वय अवघं तेवीस. आता कोरोनानंतर काही अपाय व्हायला नको म्हणून आयुर्वैदिक औषधं घेण्यासाठी आमच्या भागात त्याला घेऊन त्या आल्या होत्या. तिथं सोशल डिस्टसिंगमुळे नंबर होते. त्यांना वेळ होता म्हणून मला फोन केला. तुझ्या भागात आलेय, पण आता भेटता येणार नाही....कोरोनाकाल संपल्यावर भेटू म्हणाल्या...चौकशी केल्यावर त्यांच्या मुलाचे समजले. खरतर त्यांचा मुलगा कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता...त्याला कसा झाला कोरोना हा प्रश्न विचारला...मग कळलं सध्या भाऊ कुठल्यातरी पक्षाचे कार्यकर्ते म्हणून मिरवत आहेत. कुठल्याश्या आंदोलनाला गेले होते...आई बाबांनी आडवलं...पण पक्षांनी सर्व काळजी घेतली आहे. मास्क, सॅनिटायझर देणार आहेत, हे सांगून तो गेला...आंदोलन झालं. घोषणा दिल्या आणि भाऊ घरी आला. त्यानंतर आठ दिवसांनी त्रास सुरु झाला. शेवटी कोरोनाच्या प्रवाहात आला....
थोडावेळ बोलल्यावर काकूंचा नंबर आला.
त्यांनी फोन ठेऊन नंतर फोन करते असं सांगितलं. दवाखान्यात दोन तास गेले. मग पुन्हा ओला करुन त्या ठाण्याला
परतल्या. जात असतांना प्रवासाच्या
रिकाम्या वेळेत फोन केला. त्यांचा मुलगा
तेरावीला असतांना कुठल्याशा पक्षाच्या कार्यलयात जाऊन बसायला लागला. पहिल्यांदा शनिवार-रविवार...मग रोज थोडा वेळ
जाऊ लागला होता. त्यांनंतर निवडणुकांत तर
भाऊ अभ्यास, कॉलेज सोडून पक्षासाठी झटत होते.
त्याच्या मार्कांवर परिणाम होत होता.
पण मुलगा मोठ्या नेत्यांबरोबर वावरतो म्हणून घरच्यांनाही आनंद वाटत
होता. आता कोरोनाकाळात तर नेत्यांना आवाहन
करायची खोटी, हा लगेच गरजेच्या वस्तूंचे वाटप,
अन्नधान्याची पाकीट वाटणे, रक्तदान
शिबीर अशी अनेक कामं करीत होता. आम्हालाही
कौतुक वाटत होतं. कौतुकास्पदच गोष्ट आहे
ही. पण आपल्याला सांभाळ, तुझा अभ्यास सांभाळ मगच ही कामं कर असा सल्ला
त्याला कुटुंबातील इतर सदस्यांकडून मिळत होता...पण मोठ्या वर्तुळात
वावरतो...मोठ्या लोकांबरोबर फोटो काढतो, म्हणून आई-वडीलांना कौतुक खूप...हळूहळू
कुटुंबानंही सल्ला देणं सोडलं. त्यामुळेच
गेले काही महिने आमचा संपर्क नव्हता. आता
जेव्हा झाला तेव्हा त्या मुलाची कोरोना गाथा कळली.
काही दिवस सर्दी होती. मग
खोकला...सोबत लहान बहिणही खोकू लागली म्हणून तपासण्या केल्या. तेव्हा दोघांचाही रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यातल्या त्यात बहिणीला कमी संसर्ग होता. त्यामुळे तिला घरी कोरंटाईन करण्याचा सल्ला
मिळाला. याला हॉस्पिटलमध्ये ठेवायला
लागलं. पहिल्यांदा कुठे बेड मिळेना...सोबत
वडील फिरत होते. घरी आईचा जीव
वरखाली. शेवटी ओळख ओळख करुन संध्याकाळी
एका हॉस्पिटलमध्ये सोय झाली. सगळे सोपस्कार
करुन वडील रात्री परतले. घरी मुलगीही
कोरंटाईन...त्यामुळे सोसायटीची बंधनं आली.
गरजेपूरतं सामान शेजा-यांनी भरून दिलं आणि आठवडाभर बाहेर न पडण्याचा सल्ला. मुलगा हॉस्पिटलमध्ये...फोनवरुन बोलायचा...तिस-या
दिवशी त्याचा धाप लागल्यासारखा आवाज आला...आई घाबरली...चौथ्या दिवशी थोडा फरक
पडला...नंतर प्रकृत्ती सुधारली...डिश्चार्ज मिळाल. घरी बहिणही ओके झाली. मात्र डॉक्टरांनी पुढचे पंधरा दिवस सगळ्यांना
घरात रहाण्याचा सल्ला दिला. वडीलांनी सगळं
सामान भरलं...पंधरा दिवस घराचे दरवाजे बंद करुन स्वतःला कोंडून घेतलं. या पंधरा-वीस दिवसाच्या एकांताने..कोरोनाच्या
अनुभवानं हा मुलगा जाणता झाल्यासारखा झाला.
त्याच्या सोबत आंदोलन करायला आलेल्यापैकी आणखीही काहीजण पॉझिटीव्ह आढळले. त्यांनाही दवाखान्यात दाखल करण्यात आलं. काही तर अद्यापही उपचार घेत आहेत. त्यापैकी काहीजण कुटुंब प्रमुख आहेत. घराचा कर्ता हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर घराची होणारी फरफट त्याला बघता आली. आपण या फंदातच नको पडायला होतं, याची जाणीव होऊ लागली. मग बातमी आली. नेत्यांनाही कोरोना झाला. त्यांना शहरातल्या फाईव्हस्टार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. ते तिथून सर्व काम करत होते. साहजिकच आहे, तिथे सगळ्या सुविधा होत्या. त्यांच्यासाठी बीलाचे बंधन नव्हते.
इकडे काकूंच्या घरची परिस्थितीही मध्यंमवर्गीय...काका घरातूनच काम करत आहेत. काकू डबे देण्याचं काम करत होत्या. आता कोरोना काळात काही दिवस त्यांचे डबे बंद होते. पण नंतर सर्व काळजी घेऊन त्यांनी हे काम सुरु केलं. आर्थिक नियोजन महत्त्वाचं...त्यांची मुलगी मदत करीत असे. एवढे दिवस घरात राहूनही लेकाला आई-वडीलांचे कष्ट कधी दिसले नाहीत. मात्र कोरोनामुळं झक्कत घरी बसावं लागलं. मग आई वडील काय करतात याची जाणीव झाली. काकूंनी महिनाभर डबे केले नाहीत. पण संपूर्ण घर, कपडे, चादरी यांची स्वच्छता केली होती. मुलगा ब-याच दिवसांनी घरात राहीला होता. गेल्या चार वर्षात आपण खूप मोठं झालो आहोत, मोठ्या लोकांबरोबर फिरतो...बाहेर आपली खूप ओळख आहे...आदी अनेक भावना त्याच्या मनात निर्माण झाल्या होत्या. पण कोरोनानं त्याला जमिनीवर आणलं...बाहेर काय आहे, आणि आपलं कुटुंब काय आहे याची जाणीव करुन दिली. बाहेर आयतं हॉटेलमध्ये जेवायला मिळत असलं तरी आता आईच्या हातच्या डाळभाताची गोडी पुन्हा एकदा कळली
होती. त्यातच कोरोनामुळं खूप थकवा आला होता. कोणीतरी आयुर्वेदिक उपचार घ्या, म्हणून सुचवलं...वडील या सर्वासाठी जेव्हा आर्थिक तरतूद करत होते...ती तगमग पाहून मुलाचा जीव तुटला...आई वडीलांना आता वचन दिलंय. बाहेरचं सर्व सोडून नेमानं अभ्यास करणार...या कोरोनाच्या महिन्यात काकूंनीही अनेक चांगले वाईट अनुभव घेतले. मुलाच्या आजारपणामध्ये साठवलेले पैसे कामास आले. आता पुढचे का ते माहित नाही...पण त्यात त्यांना एक चांगली गोष्ट मिळाली. मुलगा पुन्हा कुटुंबात आला. आपल्याला शिकायचं आहे, करिअर करायचं आहे...याची जाणीव त्याला झाली. बॅंकेत असलेल्या पैशापेक्षा काका-काकूंना हे त्याचे आश्वासन मोठे वाटले. कधी नव्हे तो घरात संवाद सुरु झाला, म्हणून त्या खूष झाल्या...आता मुलासाठी कितीही खर्च करावा लागला तरी चालेल...मागे हटणार नाही. हे सांगतांना त्यांचा आवाज जड झाला होता.
कोरोनाचा विळखा घट्ट झालाय. त्याला अटकाव कसा करावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अशावेळी काही राजकीय मंडळी नको ते राजकारण करुन फक्त जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न होतोय सध्या. मार्च पासून सुरु झालेलं कोरोनाचं वादळ आता प्रत्येकाच्या घराच्या आसपास घोंगवतंय. जवळपासचे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर समजतं की बील किती येतंय...खाजगी हॉस्पिटलमध्ये लाखो
लागतात...सरकारी मध्ये रांग आहे....या सर्वांपलिकडे कोरोना रुग्णांच्या कुटुंबाची अवस्था आहे. शारीरिक, मानसिक, आर्थित ओढाताण होतेय...भविष्यात काय वाढून ठेवलंय याची सर्वसामान्यांना काळजी आहे. त्यांना कोण कोणाला काय म्हणतो, कोण कोणाला काय धमकी देतोय याची उत्सुकता नसून त्याचा उबग आलाय...हजोरो कुटुंबाची फरफट होतेय...जीवाची तगमग...कुठेतरी हे चक्र थांबावं...आयुष्य पुन्हा सुरळीत व्हावं म्हणून सर्वांचे प्रयत्न आहेत. पण त्यामागे एक अनामिक भीती दडलेली आहे. ही भीती दूर करण्याचं काम ज्यांच्याकडे आहे, ते मात्र दुर्दैवानं आपलं सामर्थ्य नको त्या बतावण्यामध्ये खर्ची घालत आहेत...अर्थात हे आपलं दुर्दैवं...दुसरं काय....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
वास्तव आहे सगळा. छान
ReplyDelete