अधिक महिना....आणि आठवणी...

 

    अधिक महिना....आणि आठवणी...




अधिक महिना आहे....लहानपणी आई जेव्हा हे वाक्य म्हणायची तेव्हा आगळीच दहशत वाटायची...आधीच श्रावण महिन्यात शाकाहरी जेवण...आणि हा अधिक महिना म्हणजे अजून एक महिना शाकाहार...ताज्या मासळीची चटक लागलेली जीभ वळवळायची...पण त्यावर काहीही उपाय नसायचा...आईबरोबर वाद घालायची हिम्मत नव्हती...अर्थात ती आत्ताही नाही...पण अधिक महिना म्हणजे काय हे गौडबंगाल मला तेव्हा कधी कळले नाहीच...वर्षातल्या बारा महिन्यातल्या 365 दिवसात हे अधिकचे तीस दिवस कसे आणि कुठे फिट्ट बसतात, हे तेव्हा कधी कळायचं नाही...पण नंतर या अधिक महिन्याची ओढ लागली...ती त्यामध्ये केलेल्या अनेक गम्मती जम्मती मुळे.  अधिक महिन्याला धार्मिक महत्त्व खूप आहे...उपास...पूजा....आमची आई या सगळ्यात पुढे....सुदैवानं या उपास आणि पूजेसोबत येणा-या खाद्यसंस्कृतीमध्येही आई तेवढीच सुगरण...त्यामुळे अधिक महिन्यात पुण्याचा किती साठा झाला याचा हिशोब केला नाही...पण समृद्ध असा खाद्यसंस्कृतीचा ठेवा अधिकाधिक मिळवला....


अधिक महिना म्हणजे कायत्याचं शास्त्रीय महत्त्व...धार्मिक महत्त्व...खगोलशास्त्रीय दृष्टीकोनातून तो कसा होतो....बारा राशींमधून सूर्याचा प्रवास आदी काही सांगायचं नाही...पण अधिक महिना म्हणजे एक आठवणींचा सुंदर खजिना नक्कीच आहे.  अर्थात पहिल्यांदा जेव्हा अधिक महिना हा शब्द कानी पडायचा तेव्हा आता महिनाभर जेवणात मासे मिळणार नाहीत इथपर्यंतच या महिन्याची महती मर्यादीत होती.  नंतर मात्र आईच्या सोबत अधिक महिन्यानिमित्तानं होणा-या पुजापाठांची माहिती मिळाली.  मुळात आमच्या आईचा स्वभाव धार्मिक...आमच्या गावात, म्हणजेच रेवदंडा-चौल भागात बहुतांश पुरातन मंदिरं आहेत.  अनेक पिढ्यांचा समृद्ध वारसा लाभलेल्या या मंदिरात एरवीही अनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात...श्रावण महिन्यात आणि तीन वर्षातून एकदा येणा-या अधिक महिन्यात हे कार्य़क्रम थोड्या मोठ्या प्रमाणात होतात.  आई आणि कुटुंबातल्या मोठ्या महिलांसोबत या कार्यक्रमांना हजेरी लावणं म्हणजे मोठी मौज असायची.  मुळात सर्व रेवदंडा-चौल पट्टा नारळाच्या बागांनी समृद्ध...ही सर्व समृद्धी अशा कार्यक्रमांच्यावेळी वाटण्यात येणा-या प्रसादात असायची.  खोब-याचा बेसुमार वापर असलेले सर्वच प्रदार्थ प्रसादाच्या रुपात मिळायचे...आणि या प्रसादाच्या ओढीनं आईबरोबर अनेक पुजांना हजेरी असायची.  अशीच एक आठवण म्हणजे समुद्रावर होणारे स्नान.  अगदी घराशेजारी समुद्र असला तरी समुद्रावर अंघोळ करणे ही खूप मोठी गोष्ट होती.  अधिक महिन्यात मात्र कधीतरी हा बेत व्हायचा.  आई  आणि कुटुंबातील सर्व मोठ्या महिला,  गल्लीतील महिला एक दिवस समुद्र स्नानाचा बेत करायच्या...अगदी पहाटे हा कार्यक्रम व्हायचा...समुद्रावर अंघोळ केल्यावर मग शेजारीच असलेल्या पुरातन शंकराच्या मंदिरात

पुजा करायची....

या महिन्यात अजून एक म्हणजे उपवासाचे अनेक प्रकार.  काहीजण एक धान्य खाऊन अधिक महिना पाळतात.  तर काही ठिकाणी एकवेळ भोजन करुन अधिक महिना पाळला जातो.  या सर्वांतून काही अप्रतिम पदार्थ मात्र जिभेवर रेंगाळले ते कायमचेच.  मूगाचं कढण हा साधा, सोप्पा आणि प्रचंड पौष्टिक पदार्थ हा त्यातल्या त्यात सर्वात भारी ठरावा असाच.   हिरवे मूग शिजवून त्यात थोडा गूळ आणि तूपाची धार...सोबत घरातील जायफळाची चांगली पूड आणि वरुन मूठभर ताज खोवलेलं खोबरं...आता या पौष्टीक, प्रोटीनच्या जमान्यात कळतं की या साध्या साध्या पदार्थांमधून शरीराचे किती चांगले पोषण होत होते.   मूग, गूळ, तूप, जायफळ आणि खोबरं या सर्वांची ही गोड भेळ अप्रतिम लागायची...एवढी की या सर्वांचा शेवटचा थेंबही चाटून पुसून स्वच्छ व्हायचा.   या चवीची भूरळ एवढी की लिहीतांनाही ओढांवर जीभ फिरवल्यावर गोड स्वाद यावा एवढी....याच गोड पदार्थासोबत एक संमीश्र चवीचा पदार्थ ताटात असायचा, तो म्हणजे पंचामृत.  सुकं खोबरं, शेंगदाणे, गुळ, चिंच, तिळ आणि भरभक्कम हिरव्या मिरच्या आणि घरचाच ताजा कडीपत्ता हे सर्व मिश्रण तूपावर परतून केलंलं पंचामृत ताटात जोड म्हणून असायचं...ब-याचवेळा चपाती किंवा भाकरी सोबत खाण्यापेक्षा बोटानं चाटून खाण्यात त्यातील सर्व स्वाद जास्त कळायचा...अधिक महिन्यात माश्यांची कमतरता जाणवू नये म्हणून अशा अनेक आठवणीतल्या पदार्थांची आळवणी व्हायची.  तोंडल्याचा वाफळता भात, सोबत पोह्यांचे पापड,  सुरणाच्या कापा,  ताकाचा भरलेला ग्लास हा बेतही मग मोठ्या मेजवानीसारखा वाटायचा.  उपवासाची भरली केळी हा आमच्या आईचा एक आणखी खास पदार्थ...कच्च्या केळ्यामध्ये ओले खोबरे आणि गूळाचा भरलेला चव...त्याला तूपावर परतल्यावर त्यातील वेलचीचा सुगंध सर्वत्र पसरायचा.   मात्र वेलची, केळं आणि तूपाचा


हा दरवळ फक्त मी घ्यायचे...बाकी या भरल्या केळ्यांबरोबर माझ्या जिभेचे गणित कधी जमले नाही. 

पुढे पेण तालुक्यातील गागोदे गावात आम्ही काही वर्ष राहीलो...त्या गावाच्या अगदी वेशीवर नदी...नदी जेवढी सुंदर...शांत...तेवढाच तो परिसर निसर्गानं नटलेला. देखणा.  खूप मोकळं कातळ असलं तरी त्यावर अनेक प्रकारच्या रानफुलांची कायम वस्ती असायची.  हे गाव म्हणजे एक कुटुंब...कुठलंही काम करायचं तर सर्व मिळून करणार.  आम्ही काही वर्ष या गावात राहीलो...पण तिथून बरच काही शिकलो...त्यातच या गावानं ज्या काही आठवणी दिल्या त्यामध्ये या अशा एकत्र होणा-या पुजेच्या आठवणी अनेक आहेत.  गणपती, हरतालीका, गौरी आणि अधिक महिन्यात या गावातील सर्व महिला नदिवर जमत...जे काही तिथे दगड, माती असायची त्यांचीच पूजा बांधली जायची.  सोबत रानफुलं असायची...कुठलाही मोठा बडेजाव नाही...मनापासून होणारी भक्ती तिथं दिसली....जे तिथं आहे, त्याचीच पूजा...एकप्रकारे त्या निसर्गाला,  तिथल्या संपन्नतेला मान देण्याचा प्रकार...ज्याची पूजा केली ते तिथंच ठेवायचं...निसर्गातील पुन्हा निसर्गाला अर्पण करायचं...


आज शहरांमध्ये राहतांना या अधिक महिन्याचे रुप वेगळे दिसायला लागले.  अधिक महिन्यात दान करणे चांगले असते.  पण दान म्हणजे फक्त पैसे देणे इथपर्यंत माहिती होती.  पण कळत्या वयात या दानाची व्याप्ती समजायला लागली.  ज्याला ज्याची गरज आहे, ते देणे.  अशावेळी व्यक्तीपेक्षा समाजोपयोगी काम करणा-या संस्थांना मदत देणे सोयीस्कर ठरलं.  अर्थात फक्त अधिक महिन्यापूरता हा नियम नाही हे ही या शहरामधूनच शिकता आलं. 

आताही आईचा फोन असतो....अधिक महिना आहे....त्यात अधिक महिना पाळला आहेस का, हे वाक्य अधोरेखीत असते.  पण आता या सर्वांवर लेकाची मर्जी जास्त चालते.  आम्ही लहान होतो, तेव्हा आई म्हणेल ती पूर्व दिशा होती.  ती म्हणाली असती तर संपूर्ण वर्षच श्रावण किंवा अधिक महिना म्हणून माश्यांपासून दूर रहायला लागले असेत...कारण तिच्यापुढे वादविवाद करण्याचा प्रश्नच नव्हता.  पण आता तो जमाना नाही...आईनंही काळानुरुप आपलं धोरण बदललं आहे...आता काय करावं यामध्ये लेकाची मर्जी जास्त चालते...त्यामुळे जेवणातलं सोवळी बाजुला...बरं आईही त्याची बाजूचं पहिल्यांदा घेणार...त्यामुळे अधिक महिना करत नवीन नियम लावला तर तोंडावर पडण्याचा धोकाच अधिक...तो घेण्यापेक्षा नव्या पिढीचा नियम अधिक चांगला...कालाय तस्मे नमः

सई बने

डोंबिवली

----------------------------------------------------------------------------------------

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

Post a Comment