नेहमीचच जगणं.....
प्रत्येकाचं आयुष्य आखिव-रेखीव असतं का...नक्कीच नाही...कोणाचंही नाही. कधी, केव्हा, कोणत्या क्षणी काय होईल हे आपल्याला कळत नाही. फक्त त्या क्षणाला आपण सामोरं कसं जातो हा प्रश्न महत्त्वाचा असतो. गेल्या सहा महिन्यापासून आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोरोनामुळे असे अनेक क्षण आले, ज्यांची अपेक्षा आपण कधी केली नव्हती. प्रत्येकानं हे क्षण आपल्या परीनं सांभाळले...हाताळले. त्यातल्याच माझ्या परिचीत दोघींच्या आयुष्यातील काही क्षण मी आज शेअर करीत आहे. कोणाचे बरोबर, कोणाचे चूक हे सांगायची या मागची भावना नाही. कारण प्रत्येकजण प्रथम आपला विचार करणार...कोणाला काय वाटेल यापेक्षा आपली, स्वतःची सोय महत्त्वाची असते...
एक म्हणजे स्वरा...नुकतीच नर्स म्हणून एका सरकारी हॉस्पिटलमध्ये रुजू झालेली...गेल्या जानेवारीमध्ये तिला सरकारी हॉस्पिटलची नोकरी मिळाली. वय अवघं 22-23...आई-वडील खूष झाले. स्वरा गेले वर्षभर शहरात एकटीच रहात होती. आई-वडील, धाकटा भाऊ कोकणात. माझ्या एकदम दूरच्या नात्यातील. इथे फारसे कोणी परिचीत नाही. त्यामुळे तिच्या आईनं फोनवरुनच तिची जुजबी ओळख करुन दिली. जानेवारीमध्ये ओळख झाली. तिच्या आईनं लक्ष ठेवा म्हणून सांगितलं होतं. आठवड्यातून कधी तरी मी, तिची फोनवर चौकशी करायचे. नाहीतर तिचा फोन यायचा. स्वरा दिसायला कशी, हे फक्त मी तिच्या वॉट्सअप आणि फेसबूकच्या स्टेटसवरुन पाहिलं होतं. बाकी आमची अद्यापही प्रत्यक्ष भेटच झालेली नाही. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यातच त्या पोरीनं मन जिंकून घेतलं होत. मार्च महिन्यात लेकाची परीक्षा संपली की तिला मी रहायला बोलवणार होते. एरवी तिनं हॉस्पिटलच्या काही अंतरावर एक रुम भाड्यानं घेतली होती. चार मैत्रिणी मिळून तिथं रहात होत्या. स्वराच्या आईलाही कोण आनंद झाला होता. मुलीला नोकरी मिळाली की, सर्वसामान्य आईच्या मनात विचार येतो तोच त्यांच्याही मनात होता. तिचं लग्न लवकरात लवकर करुन द्यायचं होतं. त्यात स्वराला आता सरकारी नोकरी, म्हणजे तिच्या लग्नाच्या बायोडाटामध्ये चांगलंच वजन पडलं होतं. तिच्या आईनं फोन करुन तिला स्थळं बघायची विनंतीही केली होती. या सर्व फोनवरुन होणा-या बोलाचाली...पण मार्च महिन्यात नकळत सर्वांच्या पत्रिकेत कोरोनानं आक्रमण केलं. आणि सर्वच गणित बदललं.
स्वराचं तर विचारु नका. ती नर्स.
त्यात सरकारी दवाखान्यात. एरवी सरकारी दवाखान्यांना नावं ठेवणारी मंडळीही
कोरोनामुळे तिथेच जाऊ लागली. मार्च-एप्रिल
महिन्यातली आगतीकता आठवा....कोणालाही काहीही कळत नव्हते. काय होणार,
नेमका उपाय काय...कोरोना म्हणजे मृत्यूच...अशीच समजूत झालेली. नको नको त्या अफवा...आणि सल्ले यांचा मारा होत
होता. स्वरा आमच्याकडे रहायला येणार
होती. ही गोष्ट सध्यातरी स्वप्नासारखी
वाटू लागली. नवीनच नोकरी लागल्यामुळे
अंगावर पडतील ती कामं करावी लागत होती. ती
ज्या हॉस्पिटलमध्ये होती त्या हॉस्पिटलचे दोन वॉर्ड पहिल्यांदा कोरोनासाठी राखीव
होते. तिथे स्वराची नेमणूक नव्हती.
फोनवरूनच आता तिची मी चौकशी करत होते. पण
एप्रिल महिन्याच्या मध्यंतरात तिचे सर्व हॉस्पिटल कोरोना रुग्णांसाठी राखीव
ठेवण्यात आले. एकदिवस सकाळी संपूर्ण पीपीई
किट घातलेला फोटो स्वरानं मला पाठवला.
तिलाही आता कोरोना रुग्णां सोबत काम करायचं होतं. तिकडे गावी तिच्या आई-वडीलांना अगदी काळजी पडली
होती. बहुधा रोजच एक फोन...इकडे येता येत
नव्हतं. मुलीचं एरवी खूप कौतुक होतं...पण
आता त्यात काळजीची भर पडली होती. काहीही
होणार नाही...असं मी रोज सांगत होते, पण
एक मन मलाच खात होतं. कारण काय होणार हे
मलाही थोडंच माहीत होतं....आता तर स्वराला फोन करणेही अवघड होतं. हॉस्पिटलमध्ये फोन उचलता येत नव्हता...आणि ती
रुमवर आल्यावर जेवण करुन झोपणे हेचे मोठे काम होते. त्यातही फोन झाला तरी, गरम पाणी पी, वाफ घे....व्यवस्थित खा...या सूचनांपलिकडे मी
जात नव्हते.
आता या सर्वाला चार महिने उलटून गेले. स्वरा आणि माझ्या भूमिका आता बदलल्यात. ती या सहा महिन्यात चांगली तोलून सुखावून निघालीय...आधी तो पीपीटी किट घालायलाही घाबरणारी स्वरा...आता सहज झाली होती. मे महिन्यात तिचाही रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. जिथे काम करत होती, तिथेच पंधरा दिवस राहिली.....मग काही दिवस रुमवर आराम करुन पुन्हा कामावर रुजू झाली होती. तिच्या सोबतच्या मैत्रिणींनाही हा अनुभव घेतला होता. सुरुवातीला ती जिथे रहात होती, त्या इमारतीमध्ये तिला आणि तिच्या मैत्रिणींना अनेक सूचना देण्यात आल्या होत्या...त्यांना रुमच्या बाहेर पडायला बंदी होती. काही दिवस अगदी डाळ भात खायची वेळ त्यांच्यावर आली होती. पण आता त्या चौघीही सावरल्या होत्या. एक महिन्याचं अधिकचं सामान भरुन ठेवत होत्या. शिवाय चौघीही नर्स म्हणून काम करत असल्यामुळे कधी ना कधी हा रोग आपल्याला स्पर्ष करणार याची जाणीव होती. त्यामुळे माफक इंन्टंट फूडचा साठा केला होता. नशीबानं चौघीही जेवण चांगलं बनवत होत्या. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस वजा करता आपल्या जेवणात प्रोटीन, व्हिटामिन कसे मिळतील याची काळजी घेत होत्या. स्वरा तर याबाबतीत मलाही टिप्स देते. आवळ्याच्या पावडरच्या चटण्या आणि त्यांचा उपयोग मी तिच्या कडून शिकले. दरम्यान चौघींचेही पालक त्यांना भेटून गेले. आवश्यक आणि गरजेच्या वस्तू त्यांना देऊन गेले. यामध्ये पैसेही होते. कारण गेल्या तीन महिन्यापासून या मुलींचा पगार नियमीत होत नव्हता. हॉस्पिटलमध्ये रुग्णांची कमतरता नव्हती. अगदी एकाला डिश्चार्ज मिळाला की त्या मोकळ्या झालेल्या बेडसाठी चार तयार असायचे. पहिल्यांदा थोडी घाबरलेली स्वरा आता सारावली होती...नेहमीचेच...हा तिचा शब्द माझ्यासाठी कौतुकाचा झालाय...
स्वराचा हा कौतुकाचा शब्द अजून एक माझी मैत्रिणही नेहमी वापरते....मात्र तिच्या नेहमीचेच...मध्ये फरक होता. कोरोनाचा फटका तिलाही बसलेला. चांगली नोकरी...नवराही चांगल्या कंपनीत....दोन मुलं...घरी कामाला गावाहून आणलेली एक मुलगी...शनिवार-रविवार शक्यतो घराबाहेर साजरा करण्याची पद्धत...किंवा मित्र-मैत्रिणींच्या गोतावळ्यात पार्ट्या....कोरोनामुळं या सर्वांला ब्रेक लागला. तिचं आणि नव-याचं काम घरातून होऊ लागलं. मुलांनी अभ्यासासाठी लॅपटॉप पकडले. पहिल्यांदा कोरोनाची भीती होती. पण नंतर मात्र या बंधनाचा कंटाळा येऊ लागला. कुठेतरी फिरायला जायला हवं...नाहीतर वेड लागेल...हे तिचं वाक्य ठरलेलं...शेवटी लॉक़डाऊनमध्ये थोडी मोकळीक मिळाल्यावर आसपासच्या फार्म हाऊसवर जाऊन आली...एकदा गेल्यावर मनातली भीती पार गेली...आता कोरोना नेहमीचाच आहे...त्याला घाबरून घरात किती दिवस बसणार...म्हणत पुन्हा तिचं आयुष्य पूर्ववत होऊ पहात होतं. घरी पाहुणे आणि पार्ट्याही झाल्या...अर्थात याचा व्हायचा तोच परिणाम झाला. कोरोनाचा घरात शिरकाव झाला. नशीबानं लक्षणं एवढी नव्हती. त्यामुळे घरीच सर्वांना कोरोंटाईन करावे लागले. हे काय होणारच होतं...हे तिचं वाक्य या सर्वांवर कडी करणारे होते. बरं पैश्याची कमतरता नाही. कारण नवरा जिथं काम करत होता, तिथून वैद्यकीय खर्च सर्व करण्यात आला. आठवडाभर चक्क एका हॉटेलमधून दोन वेळेचे जेवण आणि नाष्टा येत होता...कोरोनाही एन्जॉय केला आम्ही...म्हणून तिनं वॉटसअपला अपडेट केलं. हे कौतुकास्पद होतं. पण कोरोना काय तिला स्वतःहून भेटायला गेला होता...की ती आ बैल मुझे मार म्हणत त्याच्या जवळ गेली होती...
खरंतर ही मैत्रिण आणि स्वरा दोघींनाही कोरोनाचा अनुभव आला होता. तरीही त्यांचा अनुभव वेगळा होता. एकीला तो येणे स्वाभाविक होते. तर दुसरीनं
त्याला ओढवून घेतले होते. दोघींचाही एकच
शब्द नेहमीचेच....
मी मात्र अलिप्तपणे दोघींकडूनही हा शब्द ऐकून घेतेय...नेहमीचेच आहे
ते...तेही अगदी अलिप्तपणे....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
प्रत्येकाचा दृष्टकोन वेगळाच असतो कोरोनाकडे पाहण्याचा , छान मांडणी केली आहे.
ReplyDeleteKhup chhan lekh
ReplyDeleteNice 👌👌👌
ReplyDeleteKhupch chan lekh...
ReplyDelete