वर्क फ्रॉम होमची व्याख्या....

 

   वर्क फ्रॉम होमची व्याख्या....

माइक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांनी नुकतेच भविष्यात होणा-या कार्यालयीन कामकाजाबद्दल एक विधान केलं.  सध्या कोरोनामुळं अनेकांनी आपल्या घरात ऑफीस केलं आहे.  एक कोपरा पकडून लॅपटॉप आणि इंटरनेटच्या सहाय्यानं ही मंडळी जे काम ऑफीसमध्ये करत होती तेच काम घरातून करत आहेत.  सुरुवातीला घरातून काम चालू आहे...हे सांगण्यात जी मजा होती, ती आता मावळत असून त्या कामाबरोबर होत असलेली ओढाताण नव्यानं समोर आली आहे.  या नवीन कामकाज पद्धतीमध्ये अधिक भरडला जात आहे तो महिलावर्ग.  बिल गेट्स यांनी नेमकी महिलांची ही परवड जाणली आहे.  भविष्यात अशा पद्धतीनं कामकाज करण्याची पद्धत रुढ होईल, पण या सर्वात अधिक ओढाताण होईल ती महिला वर्गाची.  कारण घरातून काम करतांना त्यांना घराची, मुलांची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.  सोबत ऑफीसमधील जबाबदारीही पार पाडावी लागणार आहे.  त्यामुळे ही पद्धत महिलांसाठी तरी फारशी चांगली नाही असं मतही बिल गेट्सनी व्यक्त केलं.  बातम्यांमध्ये हे बिल गेट्सचं मत मी ऐकलं.  आमच्या घरीही हे वर्क फ्रॉम होम मार्चमहिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु आहे.  त्यामुळे कोरोनामुळे आलेल्या या नव्या पद्धतीचे फायदे आणि तोटे काय आहेत याची जाणीव झाली आहे.  दु्र्दैवानं मात्र ज्यांनी ही पद्धती अनुभवली नाही,  त्यांनी या कामकाजपद्धतीला अगदीच सहजपणे घेतलं आहे....घरातूनच काम करायचं ना...मग त्यात काय एवढं...अशी वाक्य फेकून त्याचं महत्त्व कमी करत आहे.  अशांनी निदान बिल


गेट्स यांच्या बोलण्यातून जरी थोडा बोध घेतला तर नक्कीच फायदेशीर होऊ शकेल. 

मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात आपल्याकडे कोरोनाचं संकट म्हणजे काय याची जाणीव व्हायला लागली.  परिणामी सर्व व्यवहार बंद झाले.  ऑफीस बंद. ज्यांचे काम घरुन होऊ शकते त्यांच्यासाठी संबंधित कार्यालयांनी तात्पुरत्या स्वरुपात घरातून काम करण्याची मुभा दिली.  पहिल्यांदा अगदी महिन्याभरात कोरोना आवरेल अशाच भ्रमात सर्वजण होते.  पण नंतर हा भ्रमाचा भोपळा फुटला.  कोरोनानं जणू सर्वांनाच आपल्या कवेत घेतलं.  मग घरातून काम हा पर्याय तात्पुरत्या या शब्दाच्या पुढे गेला.  वर्क फ्रॉम होम हा शब्द रुढ झाला.  आणि ते गरजेचं होतं.  कोरोनाचा फटका अनेक उद्योगांना बसला.  अनेकांचे रोजगार गेले.  नोक-या गेल्या.  काहींना महिना अर्ध्या पगारावरही काम करावं लागलं.  त्यामुळे घरातून काम करणं हे या सर्वांपेक्षा सोयीस्कर ठरलं.  त्यात जी माणसं रोजच्या प्रवासाला कंटाळली होती, त्यांनाही हा पर्याय उत्तमच होता.  रोज ट्रेनच्या प्रावसाची दगदग, धक्काबुक्की यातून सुटका होणार होती.  आधी हा पर्याय सर्वांनाच आवडला.  विशेषतः महिला वर्गांना.  माझ्या ज्या मैत्रिणी अशा पद्धतीनं घरातून काम करत होत्या, त्या सुरुवातीला आनंदी झाल्या होत्या.  घरचं काम पटापट आवरुन ऑफीसचं काम....मुलांबरोबर पुरेसा वेळ घालवता येईल ही कल्पना सुखावह वाटत होती. 


मात्र नंतर नंतर या वर्क फ्रॉम होमचं व्यापक स्वरुप पुढे येऊ लागलं.  त्यात पुढे शाळाही घरीच सुरु झाल्या.  मुलांचा अभ्यास समोरासमोर घ्यायचं नवीन काम लागू झालं.   त्यातल्या त्यात ज्या माझ्या मैत्रिणींना दोन मुलं आहेत त्यांनी तर मुलांसाठी नवीन मोबाईल खरेदी करण्याचं धाडस दाखवलं.  आता प्रश्न होता तो वर्क फ्रॉम होम या संकल्पनेचा आनंद घेण्याचा...तर तो या मैत्रिणींच्या वाटेला अभावानेच आलाय.  कारण एरवी ऑफीसमध्ये नऊ ते पाच किंवा अगदी सात ही घड्याळातली वेळ मर्यांदीत होती.  पण घरी काम यायला लागल्यावर भिंतीवरच्या काय पण मोबाईलवरच्याही घड्याळाची वेळ त्याला रोखू शकत नव्हती.  काहीवेळा तर सकाळी सात वाजल्यापासून फोन यायला सुरुवात झाली.  यातही अनेक अडचणी होत्या.  पहिल्यांदा नेट प्रॉब्लेम...मग मुलांच्या ई शाळेच्या वेळा....त्यात कोरोनामुळे घरातील बाई हा प्रकार बाद झालेला.  मग घरच्याच बाईवर सर्व कामाचा बोझा...त्यातून आई घरी आहे....हे वाक्य म्हणजे एक ब्रीद वाक्य....आई घरात असल्यावर काहीतरी छान खायला करणार हा समज कोठूनतरी रुजू झालेला...त्यानुसार मुलांच्या आणि नव-याच्या अपेक्षा...एकूण ऑफीसला जातांना सकाळी पाच वाजता उठणा-या माझ्या मैत्रिणी आजही सकाळी पाच वाजताच उठतात...सकाळची घरची सर्व काम उरकायची....मग नाष्टा...जेवणाची तयारी...हे सर्व घड्याळ्याच्या काट्यावर करायचं...मध्ये मध्ये येणारे ऑफीसचे कामाचे फोन घ्यायचे...मिटिंगच्या वेळा सांभाळायच्या...ही तारांबळ....आता एवढ्या महिन्यांच्या सरावानंतर नेट प्रॉब्लेम,  मुलांच्या शाळांच्या, क्लासच्या वेळा...यांची आखणी झालेली...तरीही सगळं सुरुळीत असतं असं नव्हेच...मध्येच कोणा नातेवाईकांचा फोन....मग घरीच आहेस ना...अशी ओरड...फोनवर बोलण्याइतका आता वेळ नाही, हे सांगायचीही चोरी...कारण  घरी असूनही साधं बोलली नाही,  हे बोल नंतर ऐकावे लागणार याची खात्री... 

माझा शाळेचा,  वरदच्या मित्र-मंडळींच्या आयांचा ग्रुप खूप मोठा...अनेक मैत्रिणी आम्ही जीवाभावाच्या...पण या कोरोना काळात आम्ही सर्वजणी फार कमी बोललो आहोत एकमेकींबरोबर...कारण हेच...यातील अनेकजणी ऑफीसला जाणा-या.  आता त्या सर्वंजणी घरून काम करतात....कामाच्यावेळा नियमीत होत्या तेव्हा, प्रवासात बोलणे व्हायचे.  शनिवार रविवार सुट्टीचे वार...तेव्हा कधी आरामात फोनवर गप्पा व्हायच्या किंवा एकमेकींची भेट व्हायची.  फारकाय ऑफीसवरुन एखादी मैत्रिणी सायंकाळी येतांना रिक्षा स्टॅडवर भेटली तर अगदी तासभर आम्ही गप्पा मारल्यात....पण आता हे सर्व बंदच झालंय...कारण प्रत्येकाची कामाची व्याख्याच बदलीय.  वेळेचं नियोजन बदलंलय...आणि हे सर्व समजून घेणं महत्त्वाचं आहे. 

आज माझ्या अनेक मैत्रिणी या वर्क फ्रॉम होमच्या चक्रात व्यस्त झाल्यात.  फोन होत नाहीत...पण त्यांची होणारी तगमग जाणून आहे.  एका रोगापासून वाचतांना काही मानसिक त्रासही आपसूक चालून आले आहेत.  काही शारीरिक रोगही आहेत...मान...पाठदुखी मागे लागलीय...त्यामध्ये घरातूनच काम करतेस ना...हे नकोसं वाटणारं वाक्यही आहे.  काहींना ही संकल्पनाच नीट न समजल्यामुळे घरात असलेल्यांना कधीही फोन करता येतो...हा एक समज झालेला...त्यामुळे हे आलेले फोन...त्यांच्या होणा-या चौकश्या...घरातून काम कसं चालतं...याचा रिपोर्ट...मुलांच्या अभ्यासाचे रिपोर्ट हे सर्व देता देता कधी-कधी नकोसं होत...काही दिवसांपूर्वी एका अशाच मैत्रिणीचा फोन आला होता तेव्हा ती सांगत होती की, अशावेळी नातेवाईकांना घरीच बोलवावंस वाटतंय...निदान त्यांना कल्पना तरी येईल, घरी बसून ऑफीसचं काम करतांना काय धावपळ होत आहे ते.  अर्थात या मैत्रिणीही अपवादात्मक आहेत.  माझ्या एका मै्त्रिणीची सासू तिच्यासोबत असते.  तिला या कोरोना काळात आपल्या सासूचं महत्त्व कळलं.  तिनं


खुल्या दिलानं सासूकडे ते मान्यही केलंय.  सासूबाई घरी असल्यानं त्यांनी स्वयंपाकघर सांभाळलंय.  मुलांच्या अभ्यासाची जबाबदारी तिनं घेतलीय...या सर्वांत नव-यावर बाहेरची कामं करायला सांगितली...त्यामुळे सर्व काम मॅनेज झालीत...

एकूण वर्क फ्रॉम होम याची व्याख्या मोठी आहे.  बील गेट्स यांनी ती जाणलीय...त्यामध्ये ज्या गृहिणीची फरफट होतेय,  त्यांच्यासाठी त्यांनी काळजी व्यक्त केलीय.  आता कुठेशी ही संकल्पना राबवण्यात आलीय...त्याचेही अनेक पैलू आहेत.  हे पैलू पुढे उलगडतील...आणि त्याच्यावर उपयही मिळतील...अपेक्षा ठेवूया की ज्या महिला या संकल्पनेत आहेत,  त्यांना ती सुखवह वाटेल...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. Yes agree there are some advantage as well as disadvantages.

    ReplyDelete

Post a Comment