तिची नजर....

 

    तिची नजर.....


गेल्या आठवड्यात दोन डोळ्यांचे चार डोळे होण्याचा योग आला.  अर्थात अधिकृतरित्या चष्मा लागला.  एरवी रिडींगसाठीच आहे...असं सांगून काम भागत होतं.  आता तो चोवीस तास अंगाशी आला.  असो...त्यानिमित्तानं डॉक्टर आणि त्यानंतर चष्मेवाल्या काकांकडे जाण्याचा योग आला.  कोरोनामुळे सर्व जग घरी बसलं तरी ते संगणक आणि मोबाईलच्या एवढं आधिन झालं आहे की, कोरोना गेल्यावर बहुधा सगळ्यांनाच चष्मा लागला असणार...कारण डोळ्यांच्या डॉक्टरांकडे अगदी अपॉईंटमेंट घेऊन गेले, तरी चिक्कर गर्दी होती.  माझा दुसरा नंबर...पहिल्या दहा नंबर असलेल्यांना आत बसायला परवनागी होती.  बाकीचे सर्व पेशंट बाहेर उभे.  शिवाय पेशंट बरोबर आलेलेही सर्व बाहेरच उभे....त्यातल्यात्यात मी आधी अर्धा तास गेल्यानं बसायला एक कोपरा मिळाला.  माझ्याआधी एका आजींचा नंबर होता.  त्यांच्या नातवानं त्यांना आत सोडलं आणि तो मोबाईल घेऊन बाहेर बसला.  आजी पहिल्या नंबरच्या,  त्यामुळे डॉक्टरांच्या असिस्टंटने त्यांचे पेपर चेक केले.  त्याआधी सॅनेटाईजरचा मारा त्यांच्यावर केला.  आणि मुख्य म्हणजे त्यांचा मास्क निट लावण्याच्या सूचना केल्या...आजी, त्यांची फाईल घेऊन त्यांना दिलेल्या जागेवर बसल्या...त्यांच्या समोरच्याच बाकावर मी बसले होते...माझ्याकडे चार बोटं दाखवून म्हणाल्या, चार महिन्यांनी घराबाहेर पाऊल ठेवलंय आज...तू कधी घराबाहेर पडलीस...मला आजींच्या प्रश्नाचं नकळत हसू आलं.  मी त्यांना काही उत्तर देणार इतक्यात डॉक्टरांच्या असिस्टंटनं आजींकडे बोट दाखवून गप्प रहाण्याची सूचना केली.  आजींनी डोक्याला हलकेसा हात लावत मान हलवली.  त्यांच्या या छोट्याश्या कृतीनं पुन्हा हसायला आलं.


मी शांत राहून त्या आजींकडे बघत होते.  छान नऊवारी साडी नेसलेल्या आजी, त्यांचा चष्मा सारखा काढून पुसत होत्या.  बहुतेक डोळ्यातून पाणी येत होतं.  हातातील रुमालानं डोळे पुसत होत्या.  थोड्यावेळानं असिस्टंट आत गेल्याचं पहात आजीनं पुन्हा बोलायला सुरुवात केली.  चार महिन्यांनी बाहेर आलेय,  डोळे खूप दूखतात...पाणी येतंय...हे मोबाईल वापरुन झालं बरं...पहिलं बरं होतं...मोबाईल....मी चमकून त्यांच्याकडे बघितलं...कारण आजी सत्तरी पार केलेल्या नक्की होत्या.  पण तब्बेत सांभाळून होत्या.  या वयात मोबाईल इतका वापरला की चक्क डोळ्यांच्या डॉक्टरांकडे यावं लागलं.  असं काय करतात त्या मोबाईलवर म्हणून मला उत्सुकता वाटली.  मी हळूच दबक्या आवाजात विचारलं...आजी तुम्ही मोबाईल वापरता...त्या म्हणल्या...हो तर...माझ्या नातवांनं दाखवलंय...आता सगळे घरात आहेत ना..सर्वांना कामं आहेत...कोरोना नव्हता तेव्हा सगळे बाहेर पडले की मी सुद्धा मंदिरात जायचे सकाळ-संध्याकाळ...पण आता नाही हो शक्य...म्हणून नातवानं मोबाईलवरच देवाची पुस्तक काढून दिलीत...ती कशी वाचायची हे शिकवलं...अख्खा महिना गेला ते शिकण्यात...आता वाचत बसते मी माझं माझं...घराची कामं उरकली की, सून मुलगा आणि दोन नातू त्या लॅपटॉप समोर बसतात...मग मी सुद्धा माझ्या मोबाईलवर वाचत बसते...पण आता पाणी येतंय डोळ्यातून म्हणून नातू घेऊन आलाय...हे बघ...आजी मोबाईलवर काही दाखवायला गेल्या,  इतक्यात डॉक्टरांचा असिस्टंट पुन्हा आला...मी आजींना शांत रहाण्यास सांगितले...त्यांनीही मान हालवली....तेवढ्यात डॉक्टरही आले. 

आजींचा पहिला नंबर.  त्या आत केबिनमध्ये गेल्या,  प्राथमिक तपासणी


केल्यावर त्या डॉक्टरांपुढे जाऊन बसल्या.  त्यामुळे त्यांच्या जागेवर मलाही केबिनमध्ये बोलवलं.  आजींच्या डोळ्यांची आता डॉक्टर तपासणी करत होते.  त्यावरुन समजलं, काही वर्षापूर्वी त्यांच्या दोन्हीही डोळ्याचं मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेलं...डॉक्टारांबरोबर त्यांचा चांगला परिचय होता.  डॉक्टर आस्थेनं त्यांच्या कुटुंबाची चौकशी करत होत्या.  आजीही गप्पा मारत होत्या.  आजींना नवीन मोबाईल मिळाला होता.  त्यांच्या गप्पावरुन समजलं...आजींना पहिल्यापासून वाचनाची आवड...टीव्हीसमोर बसण्यापेक्षा त्यांचा देवळातल्या मोठ्या ग्रुपमध्ये जास्त वेळ जायचा...ग्रंथवाचन...भजन...असं काही चालू असायचं...आता सर्व बंद झाल्यानं पहिल्या दोन महिन्यात त्या खूप वैतागल्या होत्या.  त्याचा परिणाम त्यांच्या तब्बेतीवर झाला.  हात-पाय दुखू लागले...मग डॉक्टरांकडे फे-या.  बरं बाहेर कोरोनाची भीती...त्यात सत्तरी पार केलेल्या आजींना सारखं बाहेर नेतांना त्यांचा मुलगाही काळजीत पडला होता.  शेवटी त्यांच्या बोलण्यातून कंटाळा आलाय...हा शब्द काही जात नव्हता...तेव्हा त्यांच्या बिघडलेल्या तब्बेतीचं कोडं त्यांच्या मोठ्या नातवानं सोडवलं.  आजीला कंटाळा येतो म्हणून नेटवरुन काही मराठी पुस्तकं आणि ग्रंथ डाऊनलोड मारले.  मराठी पेपरही सस्क्राईब केले.  मुलांनी आजींना मोठ्या स्क्रीनचा मोबाईल घेतला.  आणि नातवानं आजीला हायटेक केलं.  कॉलेजला असणा-या या नातवांनं आपले ई लेक्चर सांभाळत आजीला मोबाईल शिकवला.  छोटा नातू, मुलगा आणि सूनबाईही या कामात त्याला मदत करत होत्या.  यात महिना गेला.  शेवटी आजी ट्रेन झाल्या...आता सकाळी सर्व मराठी पेपर मोबाईलवर वाचतात...आणि दुपारी आवडती पुस्तक वाचत बसतात...

पण या चांगल्या गोष्टीत एक अडचण आली, ती म्हणजे त्यांना डोळ्यांचा त्रास जाणवू लागला होता.  त्यामुळे आजची ही डॉक्टरांची फेरी.  डॉक्टर सांगत होते...घाबरु नका...मी आहे ना...डोळ्यांचा थोडा नंबर वाढलाय...बाकी काही नाही...डॉक्टरांनी त्यांचा नवीन नंबर काढला...आणि आजींची तपासणी पूर्ण झाली...निघतांना डॉक्टरांनी त्यांना घराबाहेर जास्त पडू नका म्हणून सल्ला दिला...त्यावर आजींनीही डॉक्टरांना काळजी घ्या म्हणून सांगितले...माझ्याकडे त्यांची नजर गेली...ओळखीचं हसून त्यांनी हात दाखवला...केबिनबाहेर ताठ मानेनं बाहेर पडणा-या त्या आजींकडे मी आणि डॉक्टर बघत होतो...


थोड्यावेळानं माझ्याही डोळ्यांची तपासणी झाली...मी सुद्धा डॉक्टरांकडून बाहेर पडले.  खाली केमिस्टकडे डोळ्यांचे ड्रॉप्स घेण्यासाठी गेले...तिथे आजी पुन्हा भेटल्या...दूरुनच त्यांनी नातवाकडे बोट दाखवलं...तो आजींची औषधं घेत होता...हा माझा मोठा नातू...आजी दूरवरुनच बोलल्या...नातवानंही बघून हसरा चेहरा केला...त्याची औषधं घेऊन झाली होती...अर्थात तिथंही नंबर होते. माझ्याआधी दोन नंबर होते...मी थांबून त्या आजी नातवाच्या जोडीकडे बघत होते.  दोघंही हात पकडून चालत होते...नातवानं आजीला आधार दिलेला कि आजीनं त्याचा आधारासाठी हात पकडलेला काही कळत नव्हतं...पण त्यातून त्यांचं पक्क बॉन्डींग समजत होतं...अजून एक आर्श्चयाचा धक्का मला पुढे बसला...नातवानं चक्क बाईक आणली होती...आजी सराईतासारख्या बाईकवर बसल्या...नातवाला घट्ट पकडून...आणि बाईक माझ्या डोळ्यासमोरुन वेगानं पार झाली...मी नकळत हसून त्या जोडीकडे बघत राहीले...राहून राहून आजीचं कौतुक वाटत होतं...खरंतर भलेभले आता घरात बसून कंटाळलेत...पण काळाच्या पुढे बघण्याची नजर असण्यापेक्षा काळाबरोबर चालण्याची नजर लागते...ती नजर त्या आजींकडे होती...नक्कीच...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. कोणतेही क्लिष्ट शब्द न वापरता अतिशय साध्या सुटसुटीत शब्दात रंगवलेली एक छोटासी सुंदर घटना"तिची नजर"आवडून पूर्ण वाचावीशी वाटली.
    नलिनी पाटील

    ReplyDelete
  2. Mast.. Sai... cham lekh... Good keep it up...

    ReplyDelete

Post a Comment