एका कोथिंबीरच्या जुडीसाठी...
बाहेर पावसाळी वातावरण...टीव्हीवरच्या बातम्यांवर पुन्हा मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त होत होता. कोरोनामय वातावरण झाल्यापासून आठवड्यातून मोजक्यावेळी बाहेर पडायचे हा नियम झालेला...आठवड्याची किंवा पंधरा दिवसाची भाजी एकदाच आणायची...पण पावसाच्या बातम्यांनी धडकी भरली...दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास पिशवी आणि मास्क घेऊन बाहेर पडले...बाहेर वातावरण पावसाची वर्दी देणारे...त्यामुळे जवळपास जे मिळेल त्यावर भर होता...दुपार आणि संध्याकाळच्या मधली वेळ असली तरी बाजारात नेहमीसारखी गर्दी होती. बहुतेक सर्व माझ्यासारखाच विचार करुन बाहेर पडले असतील...अशी शंका मनात आली...मी आणि सोबत नवरा...त्यामुळे दोघांनी कामं वाटून घेतली.
भाजीचा वाटा माझा...चौकात एका ठिकाणी गाडी लावून मी भाजी, फळं घ्यायला गेले आणि नवरा इतर सामान घेण्यासाठी...सध्या भाजी घेतांना त्याचे दर विचारात घ्यायचे नाहीत, हे पक्कं केलेलं...त्यामुळे जी भाजी दिसली ती घेतली...फक्त मसाला राहीला..अर्थात, कोथिंबीर, मिरच्या, आलं आणि लिंब...या मसाल्याचं महत्त्व भाज्यांमध्ये जरा जास्तच वाढलेलं...कोरोनामुळे अनेकाच्या ताटात लिंबाला मानाचं स्थान मिळालंय...आल्याचा वापरही सध्या सढळ हातानं होतायं. त्यामुळे नेहमीपेक्षा त्याची गरज जास्त आणि भावही जास्तच...त्या मसाला विक्रेत्याकडे फार गर्दी नव्हती. एक-दोघीजणी कोथिंबीरच्या जुड्या बघत होत्या....सगळ्यानाच बहुधा कोथिंबीर, मिरच्या घ्यायच्या असतील...त्यांचे होईपर्यंत मी त्याच्या बाजुला असलेल्या फळवाल्याकडे गेले. फळं घेतली...पैसे देऊन झाले. तरीही या कोथिंबीर हाती घेतलेल्या बायका काही जाईनात...शेवटी मी पुढे झाले...कोथिंबीर विक्रेता आणि त्या बायकांमधला संवाद कानी पडला. त्यावरुन तरी त्यांची खरेदी लगेच होईल अशी आशा नव्हती. त्या महिलेला कोथिंबीर घ्यायची होती. पण त्या जुडीत चारच काड्या होत्या...त्याची किंमत वीस रुपये...चार काडीचे वीस रुपये कसे...यावरुन दोघांमध्ये वाद वजा चर्चा चालू होती. तो विक्रेता तिला परोपरी सांगत होता, पावसानं सर्व भाजी भिजलीय. त्यामुळे खराब लवकर होतेय...किंमती वाढल्यात...आम्हाला पण परवडत नाही...आम्ही काय करणार...पण ती महिला काही ऐकायला तयार नव्हती. दोन जुड्यांचे तीनं तीस रुपये करुन मागितले होते.
त्यावरुन हा वाद वजा चर्चा वाढत चालली होती. एवढा कधी भाव असतो का...कमी कर...म्हणून त्या
बाई धमकीवजा विनंती त्या भाजीवाल्याला करत होत्या...तो मात्र भाव कमी करायला तयार
नव्हता...कोथिंबीरीशिवाय जमतं का...त्या दोघी एकमेकींना सांगत होत्या. आमच्याकडे प्रत्येक पदार्थात थोडी तरी कोथिंबीर
लागतेच...त्याशिवाय जराही चालत नाही. मी
पुढे झालेली बघत त्या दोघींनी मलाही त्या चर्चेत घेण्याचा प्रयत्न केला. बघा, त्यांना
पण कोथिंबीर घ्यायचीय...त्या बाई माझ्याकडे मदतीसाठी बघत म्हणाल्या...मी
हसल्यासारखं केलं...अर्थात तोंडावर लावलेल्या मार्सबाबांमुळे ते त्यांना दिसलं
नसणार...आणि याशिवाय काही करता येत नाही...हे नसेल तर जेवणच होऊ शकत नाही....या
प्रकारात मी बसत नाही...त्यामुळे मी कोथिंबीरीशिवाय मसाला घेतला...दोन लिंब आणि
आलं जास्तीचं घेतलं...त्यानं जी किंमत सांगितली, ती त्याच्या हातावर दिली...काहीच
वाद नाही...त्यामुळं तो बहुधा खूष झाला...कडीपत्याच्या दोन काड्या माझ्या पिशवीत
जरा जास्तीच्या घातल्या...मीही खूष...मी निघाले...मागून कानावर पुन्हा कोथिंबीरच्या
किंमतीच्या वादाचे बोल पडत होते...
घरी येईस्तोवर पावसाच्या गडगडाट चालू झाला...भाज्यांची आवराआवर करुन
होईपर्यंत चांगला गडगडाटासह पाऊस पडला...टिव्हीवर काही जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाच्या बातम्या चालू होत्या...शेती...पिकं...फार काय पावसानं शेतीची सुपीक जमीनही वाहून नेली होती...सर्वत्र भयाण अवस्था...शेतक-यांचा टाहो बातम्यांमध्ये पुन्हा पुन्हा दाखवण्यात येत होता...खरतर या कोरोना काळात आपल्या सर्वांना सांभाळलं ते या शेतक-यांनी...कोरोना येवो किंवा अजून काही...पोटाला तर खायला लागतंच...आणि अशा रोगात रोगप्रतिकारक शक्ती किती महत्त्वाची आहे, याची जाणीव झाली...कोरोना आला तेव्हा सगळं ठप्प होतंय असं झालं होतं. पण शेतकरी बांधव त्यातही खंबीर राहीले...शहरात अगदी सुरुवातीला कोरोनाचं भय सर्वत्र पसरलं असतांनाही हा शेतकरी राजा आपलं कर्तव्य करत होता. अगदी नवीन पद्धती वाटेल अशी सोशल मिडीया प्रणालीही काही शेतक-यांनी वापरली. डीजीटल मार्केटींगचा पर्याय शोधण्यात आला. माझ्या परिचीत अशा काही शेतक-यांच्या मुलांनी सरकारी सोपस्कार पार पाडत भाजी घरपोच पोहचविली. रोजच्या आहारात आवश्यक अशी भाजी ठराविक किटच्या मार्फत मिळू लागली. मुंबई आणि परिसरातील उपनगरात असे भाजी आणि फळांचे किट मिळू लागले होते. हे आपल्या शेतक-यांचे कसब होते...जिद्द आणि चिकाटीचं प्रतिक होतं.
पण पावसाच्या मा-यापुढे हा शेतकरीच पार झोकाळलेला दिसत होता. हातात पडलेल्या पिकांना आणि फळांना घेऊन विलाप करणारे शेतकरी प्रत्येक वाहीनीवर होते...मला सहज एका सहका-याची आठवण झाली. माझ्या फेसबुकवर एका शेतकरी असलेल्या सहका-यानं दोन दिवसांपू्र्वीच त्याच्या मळ्यातील बहरलेल्या कोथिंबीर आणि भाजीचे फोटो शेअर केले होते. मी फेसबुकवर त्याला शोधू लागले. पण त्याचा पत्ता नव्हता. दुस-या दिवशी तो सहकारी मिळाला. त्यांच्या भागात जवळपास आठवडाभर पाऊस पडतोय...त्यामुळे त्याच्या मळ्याची पार दैना झालेली....भाजीची नासाडी झालीच होती...पण शेताचा बांध तुटलेला...काही मोठी झाडं पडली. पाण्याच्या पंपाचेही नुकसान झालेले...जी कोथिंबीर आणि भाजी फोटोच्या रुपात त्यांनी
आमच्यापर्यंत शेअर केली होती, ती आता पार वाहून गेली होती. एरवी शेतातील छोट्यातील छोटी गोष्ट फेसबूकवर शेअर करतांना त्याचा चेहरा नेहमी प्रसन्न असायचा...आता त्याच्या शेतीचा पावसानं पार चिखल झालेला...हा चिखल त्यांनी फोटो रुपात शेअर केलेला...कधी नव्हे ते त्याच्या चेह-यावरचं हसू पार गायब झालेलं...हताश झाल्याचं हे त्याचं रुप बघून अनेकांनी त्याला धिराचे बोल दिले होते.
नाण्याला दोन बाजू असतात...तशा दोन बाजू आयुष्यातही घडोघडी
भेटतात...बाजारात गेल्यावर कोथिंबीरीच्या एका जुडीच्या किंमतीमध्ये घासाघीस करणारी
महिला एका बाजुला तर आपली मेहनत, शेती, कुटुंबाची आर्थिक तरतूद पार उद्ध्वस्त झालेले
शेतकरी दुस-या बाजुला...यात आपली बाजू कोणती हा प्रत्येकाचा प्रश्न...पण प्रश्न
गंभीर नक्कीच आहे. आज जरा भाज्यांचे, कांद्याचे
भाव वाढल्यावर गळा काढण्यापेक्षा त्या अन्नदात्याची झालेली वाताहत काय आहे, हे
जाणण्याची गरज जास्त आहे.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
खूप सुंदर लेख.
ReplyDelete