तुझ्यासाठी...माझ्यासाठी...समाजासाठी....

 

तुझ्यासाठी...माझ्यासाठी...समाजासाठी....


गेल्या कित्येक दिवसानंतर माझ्या मैत्रिणीचा, कविताचा फोन आला...लॉकडाऊन सुरु झाल्यावर तिचा सतत फोन येत असे...तेव्हा, आता कसं होईल...हा आजार कधी जाईल...सर्व पूर्वीसारखं होईल ना...अशाच प्रश्नांची सरबत्ती असे...नंतर तिचा फोन कमी झाला...घरातील कामांमध्ये एवढी व्यस्त झाली की करोनाची भीती थोड्याप्रमाणात कमी झाली.  आता खूप दिवसांनी फोन होता, तोही आनंदी स्वरातला...तिच्या एका भाचीचा साखरपूडा झाला...आणि त्या साखरपुड्याची मजा कविता सांगत होती...आता कोरोनामुळे सर्व समारंभावर मर्यांदा आल्या आहेत.  त्यात कवितानं तर कोरोनाची अती धास्ती घेतलेली...स्वतःवर खूप मर्यादा आखलेली कविता घरातूनही अगदी पंधरा दिवसांनी गरजेच्या वस्तू आणण्यासाठी बाहेर पडते...अशी ही माझी मैत्रिण चक्क साखरपुड्याला गेली हेच माझ्यासाठी मोठं आर्श्चय होतं...मी तिला काही विचारण्यापूर्वी तिनेच हे कोडं सोडवलं...तिच्या भाजीचा साखरपुडा हा ई साखरपुडा होता...कविता आणि तिच्या कुटुंबियांना एक लिंक पाठवण्यात आली.  त्या लिंकद्वारे ती त्या साखरपुड्याच्या घरी पोहचली...अर्थात हे सर्व व्हर्च्युअल होतं...कोरोनानं आणलेली नवीन पद्धत...पण या सर्वांमुळे कविता बेहद खूष झाली.  एकतर भाचीचा साखरपुडा...त्यात घरातल्या सर्वांबरोबर खूप दिवसांनी गप्पा मारता आल्या...आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे...हा सर्व सोहळा....पाहुण्यांच्या गाठीभेठी या तिला तिच्या घरातून करता आल्या...सोशल डिस्टसिंगचा नियम पाळत झालेला हा साखरपुडा आदर्श होताच पण बजेटमधलाही होता...

कविता तशी हौशी...कुठलाही सण असो वा समारंभ, बाई अगदी छान तयार


असणार...पण कोरोनामुळं तिचा सगळा उत्साह पार उतरला होता.  अगदी सुरुवातीला तर ती पार कोलमडल्यासारखी झाली होती.  उठसूठ सगळ्यांना फोन करायची...कुठेही जाऊ नका...बाहेरुन कोणाला येऊ देऊ नका...घरात रहा...या सूचनांसह आज परिसरात कोणाला कोरोनाची लागण झाली.  ती व्यक्ती कुठे कुठे गेली होती...त्यांना कुठे दाखल केलं आहे....याची माहिती ती देत असे...यात बरीचशी धास्तीच दडलेली असायची...पण महिन्याभरांनं तिला कोरोना हा स्विकारावाच लागला.  कारण वर्क फ्रॉम होम आणि स्कूल फ्रॉम होम या दोन नव्या व्याख्यांनी मग सगळा वेळ व्यापून गेला.  कधीकधी फोनवर बोलायलाच वेळ मिळत नसे...त्यामुळे मार्च-एप्रिल-मे नंतर तिच्या फोनचा फ्लो कमी झाला...आता तर पंधरा दिवसांतून फोन होतो...तोही अगदी मोजक्या वेळेपूरता...त्यातही काळजी होती...पण आलीया भोगासी...हा स्वर अधिक...दोन दिवसांपूर्वी आलेल्या फोननं मात्र पूर्वीची कविता परत मिळाल्याचा आनंद झाला. 

तिच्या मोठ्या बहिणीच्या मुलीचं लग्न ठरलं होतं.  कोरोनामुळे ते लांबणीवर पडलं.  पण आता किती वाट पहायची म्हणून त्यांनी घरच्याघरी निदान साखरपुडा करुन घेण्याचा विचार केला.  कविता आणि तिच्या दोन बहिणी हे त्रिकूट कुटुंबात खूप फेमस आहे.  कुठल्याही कार्यक्रमाला या तीन बहिणी एकत्र हजर असणारच अशी त्यांची ख्याती...पण आता मात्र तिघींना शक्य नव्हतं.  मोठी बहिण नागपूरला राहणारी...तर दुसरी पुण्याला...म्हणजे बहिणीकडे साखरपुड्याला गेलं तर निदान दोन दिवस तरी मुक्काम करायाला लागणार होता.  दुस-या बहिणीलाही आत्ताच्या काळात रहायला जायचं नव्हतं.  आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये आणि कुणामुळे आपल्याला त्रास होऊ नये...हे तिचं म्हणणं पडलं.  त्यात कविताची बहिण ज्या भागात रहात होती तिथे काही दिवसापूर्वीच मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले,  त्यामुळे तिच्या सासरच्या मंडळींचीही कुरकूर चालू होती.  त्यांच्या म्हणण्यानुसार साखरपुडा एका सुरक्षित अशा हॉलमध्ये घ्यायला हवा होता.  बहिणींनं या सगळ्याचा विचार केला.  तिच्या व्याही मंडळींचंही मत घेतलं होतं.  त्यांच्याकडेही असंच थोडफार वातावरण होतं.  मग यातून नव्या पिढीनं मार्ग काढला.  मुलगा आयटीत कामाला...त्यांनी यावर चांगलाच उपाय शोधून काढला.  या दोन कुटुंबानं ठरवलं की साखरपुडा ठरलेल्या वेळी आणि तारखेलाच करायचा.  पण


त्यासाठी अगदी नेमकी माणसंच बोलवायची...तिही अगदी दहाच...मुलाकडून पाच आणि मुलीची पाच...बस्स...बाकी सर्व नातेवाईकांना एक लिंक तयार करुन पाठवायची.  त्या लिंकद्वारे हा छोटासा सोहळा त्यांना बघता येणार होता.   सुरुवातीला कविता थोडी खट्टू झाली.  कारण तिच्या मोठ्या बहिणीची मुलगी तिची खूप लाडाची होती.  तिच्या साखरपुड्याला आणि लग्नालाही मोठी धम्माल करण्याचा या बहिणींचा विचार होता.  पण कोरोनामुळे या सर्वांवर बंधनं आली.  आता तर हा सोहळा एका लिंकद्वारे फक्त पहाता येणार म्हणून नाराज झाली होती.  पण जसजशी तारीख जवळ आली तशी तिची नाराजी दूर झाली.  सर्व कुटुंबियांच्या फोनमध्ये अचानक वाढ झाली.  पण त्यात एक वेगळा उस्ताह होता.  साखरपुडा नवरात्रातल्या शुक्रवारी झाला.  म्हणून मग हिरव्या साड्या नेसायचे नक्की झाला.  पुरुषमंडळींसाठीही ड्रेसकोड ठरला.  ठरलेल्या वेळी लिंक ओपन केली.  तिच्या बहिणीचा बंगला होता.  त्याच्या गच्चीवर हा सोहळा ठेवला होता.  एरवीही तिच्या ताईची गच्ची छान फुलांनी बहरलेली असते.  त्याच गच्चीला छान सजवलं होतं.  अगदी भटजीही मोबाईलमधूनच पुजा सांगत होते.  मुलासोबत पाचवा माणूस म्हणून त्याचे काका आले होते.  त्यांनीच फोटोची जबाबदारी उचलली होती.  सगळे फोटो आणि व्हिडीओ त्यांनी एकट्यांनी काढले.  त्यामुळे एरवी फोटो अर्थात मोबाईल फोटोसाठी लागणारा वेळ वाचला...छान जुनी हिंदी गाणी ऐकू येत होती...कुठेही गडबड नाही...गोंधळ नाही...दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या आणि ते हात समोरच्या लॅपटॉपसमोर धरले...सर्वांनी कौतुकांनं आपापल्या घरातून टाळ्या वाजवल्या...दोघंही आनंदी दिसत होते...कविता सांगत होती...साखरपुड्याला अंगठ्यांचा आणि कपड्यांचा खर्च सोडला तर अवघा हजार-बाराशे खर्च आला होता.  एरवी हाच खर्च लाखाच्या घरात जाईल असा अंदाज तिच्या ताईनं धरला होता.


आता या वाचलेल्या पैशातून काही रक्कमेतून एका अनाथाश्रमातील मुलांसाठी स्वेटर घेण्याचा निर्णय या दोन कुटुंबानी घेतला होता.  साखरपुडा झाल्यावर लग्नाची तयारी त्यांनी सुरु केली होती.  लग्नही असंच थोडक्या माणसांच्या उपस्थितीत करण्यात येणार होतं.  सुरुवातीला नाराज असलेली कविता आता खूष होती.  कारण साखरपुडा बघतांना तिला तिच्या सर्व कुटुंबालाही भेटता, बोलता आलं होतं.  प्रत्येक कुटंबानं आपला फोटो काढून तो ताईच्या मुलीला मेल केला होता.  तिनं मग आपल्या सर्व कुटुंबाचे समारंभाला न आल्याबद्दल आभार व्यक्त करुन या सर्व फोटोंना छान कोलाज केले होते.  या सर्वात कविताला आवडलेला प्रकार म्हणजे,  तिच्या ताईनं प्रत्येक नातेवाईंकांना स्वतंत्र पत्र लिहिलं होतं.  त्यात आपण हा असा निर्णय का घेतला याचं अत्यंत मार्मिक भाषेतून स्पष्टीकरण दिलं.  कोरोनाचं स्वरुप कधीही स्पष्ट होत नाही...त्यासाठी सर्वांनी एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणं हाच उपाय आहे.  आपल्या नातेवाईकांची आपल्याला काळजी आहे,  त्यांच्या सुरक्षितेसाठीच हा निर्णय घेलता आहे.  कोरोना झाल्यावर बरा होतो...पण त्या काळात होणारी धावपळ...त्याचा आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण...हे सर्व वाचवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं ताईनं सांगितलं...समजून घ्या...हे सर्व आपल्यासाठीच होतं...तुझ्यासाठी...माझ्यासाठी...आपल्या समाजासाठीच होतं...हे तिनं हात जोडून सांगितलं...साखरपुडा झाल्यावर आठवड्याभरात पत्र कविताच्या हातात आलं होतं.  एकतर आता पत्रच मुळात दुर्मिळ झालेलं...त्यातून तिच्या लाडक्या ताईचं पत्र...ते वाचून कविताच्या डोळ्यात पाणी आलं...तिनं पहिल्यांदा ताईला फोन केला.  तिच्या ताईचाही अनुभव असाच होता...पत्र वाचून सर्वांनी तिचं कौतुक केलं.  शिवाय लग्नाला बोलवलंत नाही तरी चालेल...आमचे आशिर्वाद कायम पाठिशी आहेत...असेही सांगितले होते.  कवितानं ताईबरोबर बोलल्यावर मला ही बातमी सांगायला फोन केला...मलाही समाधान...ब-याच महिन्यांनी मला माझी समजूतदार मैत्रिण भेटली...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

Post a Comment