घरबसल्या खर्च....
गेल्या आठवड्यात वर्क फ्रॉम होमची व्याख्या मला जशी समजली तशी मांडली होती. वास्तविक त्या आठशे शब्दांपेक्षा ही व्याख्या नक्कीच व्यापक आहे. कारण हा लेख वाचून काही मैत्रिणींनी आवर्जून फोन केला. त्याही या नवीन व्यवस्थेतून जाणा-या...अगदी प्रॅक्टीकल चालू आहे अशी त्यांची परिस्थिती. त्यांच्याकडे तर अनुभवांचे एक समृद्ध भांडारच झालेले. कोरोना अनुभव अशी मोठी कथाच लिहीली जाईल असेही काहींचे अनुभव. त्यात एक जाणवले की वर्क फ्रॉम होम या व्याख्येतून जे जात आहेत, त्यांना त्यांच्या कामाचा अंदाज आला आहे. कधीही थांबायचं नाही. घरात असल्यामुळे जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लॅपटॉप नावाच्या नव्या आवश्यक यंत्रासमोर बसायचे...महिला वर्गासाठी खरंतर हा प्रस्ताव खूप छान...पण त्याला योग्य साथ मिळायला हवी. आपली बायको, बहिण किंवा आई ऑफीसचे काम घरातून करत आहे, त्यामुळे तिला ऑफीससारखी स्पेस द्यायला हवी...ही महत्त्वाची गोष्ट घरातील पुरुषांनी मान्य करुन आपले व्यवहार आखण्याची गरज आहे. हा नवा पैलू मला माझ्या मैत्रिणींच्या बोलण्यातून समजला...आणि त्याहूनही एक नवीन पैलू समजला...खरतर ही समस्या मलाही काही दिवसांपासून जाणवत होती. घरातून काम करतात, म्हटल्यावर काहींनी एक गैरसमज करुन घेतला आहे, तो म्हणजे, घरातच काम करत असल्यानं खर्चावर लगाम लागलाय हा....
कोरोनामुळे साध्या साध्या गोष्टींची किंमत आपल्या आयुष्यात किती आहे याची जाणीव झाली आहे. गेल्या आठवड्यात काही मैत्रिंणींनी लेखाबाबत फोन केले तेव्हा याचीच चर्चा झाली. त्यापैकी एका मैत्रिणीचे अनुभव खूप बोलके होते. ही मैत्रिण आणि तिचा नवरा दोघंही सध्या घरी आहेत. घरातून काम चालू आहे. त्यापैकी नव-याला आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा कामावर जायचे असते. बाकी इतरवेळ दोघंही घरातून ऑफीसचे कामकाज करत आहेत. त्यांचा एक मुलगा. तो पाचवीला. त्याची ई शाळा आणि मग ई क्लासेस चालू आहेत. दिवसभर तो त्याच्यात व्यस्त...मग संध्याकाळी एक गिटारचा ऑनलाईन क्लास चालू केलाय. हे सर्व सहज सोप्प वाटत असलं तरी या सर्वांसाठी वेगळी आणि नवीन आर्थिक गुंतवणूक करावी लागली होती. मुलाला सतत मोबाईलवर अभ्यास करायचा. त्यामुळे त्याला पहिल्या दोन महिन्यातच डोळ्यांचा त्रास जाणवू लागला. डोकं सतत दुखायला लागलं...मग त्यासाठी डॉक्टर झाले. डोकं दुखतंय म्हणून काही एक्सरे काढायला लागले. अन्य काही तपासण्या झाल्या...मग सर्व मोबाईलच्या ओव्हरलोडमुळे होतंय असा निष्कर्ष काढण्यात आला. या सर्वात किमान पाच हजार तरी खर्च आला. मग डॉक्टरांच्याच सल्ल्यानुसार मुलाला रिलॅक्स करण्यासाठी काही वेगळ्या कामात गुंतवण्यात आलं. हे काम म्हणजे गिटारचा क्लास...तोही ऑनलाईन. अर्थात घरात राहून गिटार शिकायची. एरवी क्लासला जाऊन गिटार शिकायला मिळाली असती तर तेथील गिटारवर काम भागलं असतं. पण आता त्यासाठी गिटार घ्यावी लागली. तोही खर्च आला. हे सर्व खर्च नवीन होते...त्यांचे नियोजन करावे लागले.
याशिवाय कोरोना हा शब्दाच्या भीतीपोटी किंवा गैरसमजापोटी अनेक नकोशा
खर्चांना आमंत्रण द्यावे लागत आहे. एकतर
बाहेर पडण्यावर आलेल्या मर्यादा. त्यातून
करोनापासून बचाव ही एक मोहक टॅगलाईन...या टॅगलाईनच्या नावाखाली फळं, भाज्या, औषधं,
टॉनिक यांची घरात भर्ती झालेली. एरवी
भाजीवाल्याबरोबर दोन-चार रुपयांसाठी वाटाघाटी चालायच्या. पण आता भाजीवाल्यांनी जो भाव सांगितला तो गुमान
घेतल्याशिवाय पर्याय नाही. लिंबू, आलं,
लसूण यांच्या किंमती तर बघायला नको. पण
करोनाच्या भयामुळं या सर्व गोष्टी पानात गरजेच्या झालेल्या. त्यामुळे किंमतींकडे कानाडोळा करत या वस्तू
घरात आल्या.
एरवी ज्या वस्तू गरजेच्या वाटत नव्हत्या त्यांना नको एवढं महत्त्व आलंय. एक मैत्रिण
सांगत होती गरम पाणी करण्यासाठी दोन वर्षापूर्वी इलेक्ट्रीक किटली घरात आणली. एक-दोन दिवस वापरून मग ती सोयीस्कररित्या पोटमाळ्यावर जाऊन बसली. पण आता या किटलीचे महत्त्व कळलं. तिला आदरानं खाली काढण्यात आलं. मग लक्षात आलं की तिच्यासोबत आणखी एक इलेक्ट्रीक किटलीची गरज आहे. शिवाय सतत पाणी गरम करणं शक्य नाही. त्यामुळे गरम पाणी राहील अशा बाटल्या गरजेच्या वाटल्या. मग त्या बाटल्या, इलेक्ट्रीक किटली यांची ऑनलाईन खरेदी. मग मुलासाठी हेडफोन, तिच्यासाठीही, आणि नव-यासाठीही...अशा एक ना दोन अनेक वस्तू नाविन घ्याव्या लागल्या....शिवाय तिघंही जण घरी. त्यामुळे स्वयंपाकघरातील पदार्थांची रेलचल वाढली. हॉटेलचा खर्च वाचला तरी दामदुप्पट झालेल्या भाज्यांनी ती कमी भरुन काढलीय.
या सर्वात कमी की काय पण चोवीस तास संगणक, लॅपटॉप वापरून आता मैत्रिण
आणि तिच्या नव-यालाही पाठीच्या आणि मानेच्या दुखण्याला सामोरं जावं लागतंय. यासाठी डॉक्टर आणि त्यांची औषधांच्या फे-या
सुरु झाल्या. ज्या मैत्रिणीचा नवरा ऑफीसला
पंधरा दिवसातून जात होता, तिनं सांगितलेली
हकीकत आणखी काळजीत टाकणारी. पहिल्यांदा
उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाहतूक साधनांतून जाण्याचा प्रयत्न केला. पण तिथं प्रचंड गर्दी शिवाय वेळही खूप
लागला. मग उगीचच भीतीनं मनात घर
केलं. आपल्याला कोणाला स्पर्श झाला
का...ही शंका मनात येऊ लागली. मग
पुढच्यावेळी असा धोका नको म्हणून प्रायव्हेट गाडी केली...आणि ऑफीस गाठलं. येतांनाही हाच उपाय केला. नवरा खाजगी वाहन घेऊन गेला म्हणून मैत्रिणही
निर्धास्त होती. पण तो जेव्हा घरी आला
तेव्हा कळलं की एरवी प्रवासात जो खर्च व्हायचा त्यापेक्षा चारपट अधिक खर्च झाला
आहे. दोघां नवरा बायकोनी डोक्याला हात
लावला. पण हे कोणाला बोलू शकत
नव्हते. आरोग्यासाठी हा अधिकचा खर्च
त्यांना करणे भाग होते. काळजी काळजी
म्हणून किती...सॅनेटाईजर आणि त्याच्या नावानं आलेली सेफ्टी औषधं...भाज्याही फक्त
पाण्यानं स्वच्छ होत नाहीत म्हणून त्यासाठी वेगळं औषध...असे एक ना दोन प्रकार...
या सर्वातून मेटाकुटीला आलेल्या या मैत्रिणींना आता तुम्ही घरातूनच काम करत आहात ना...मग कसला खर्च हे वाक्य कोणी म्हटलं तरी चेव येतो. एकीला तर पैसे साठवून ठेवा...आता चांगलीच बचत होईल म्हणून एकानं नकोसा सल्ला दिला. तेव्हा तिनं चिडून महिन्याचा फक्त भाजीपाला तुम्ही आणून द्या...आम्ही त्याचे पैसे देतो...निदान तुम्हाला त्याची किंमत तरी कळेल. असा उलटा सल्ला दिला. एकूण काय जो दळला जातो ना...त्यालाच त्याची वेदना कळतेय...अशी अवस्था झाली आहे. समजुतीनं घेतलं तर कोरोनामुळं घरातील अन्नाची महती कळली. पण त्यासाठी जी किंमत मोजावी लागतेय, ती मात्र तोंड दाबून बुक्याचा मार अशी झाली आहे.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
छान सोप्या शब्दात सद्यपरिस्थिती ची योग्य ती विचार मांडणी
ReplyDeleteआणि फोटो ऍड केल्या मुळे आणि फॉन्ट साईज वाढल्यामुळे ब्लॉग वाचनीय आणि सुंदर वाटतो आहे
👍🏼✍️
धन्यवाद पुष्कर....
Deleteजणू काही आपल्याच घरातील अनुभव,छान लिहिले आहे
ReplyDeleteधन्यवाद मॅडम...
Deleteखुप सुंदर लेख.
ReplyDeleteधन्यवाद
Delete