कोरोनाची भाजी.....
कोरोनाची चाहूल लागली तेव्हा कितीतरी भीतीदायक वातावरण होतं. सर्व बंद होणार. काहीही मिळणार नाही. किराणा सामाना साठवता येत होता. दहा-बारा दिवसांचं दूध फ्रीजच्या कोल्डमध्ये जाम करुन राहीलं. प्रश्न होता तो भाजीचा. एरवीही भाजी आणणं हे आवडीचं काम...तेच आता करता येणार नव्हतं. बरं भाज्या आणल्यावर त्यांच्या सफाईचा सोपस्कारही बराच आला. सरुवातीला ज्या मिळतील त्या भाज्या घेण्यावाचून पर्याय नव्हता. कडधान्य मदतीला आली. पण या सर्वात पालेभाजीची सवय काही जात नव्हती. त्याच दरम्यान फेसबुकवर एक ग्रुपला जॉईन झाले. बागकामाची माहिती या ग्रुपवर देण्यात येत होती. शिवाय घरगुती, अगदी बाल्कनी नसणारेही कशाप्रकारे कुंडीत भाजी लावू शकतात याच्या चांगल्या टिप्स त्यातून देण्यात येत होत्या. सहज म्हणून त्यांनी सांगितलेला पहिला प्रयोग केला. मेथी लावली. काही तास मेथीचे दाणे भिजवून ते एका पार्सलसोबत आलेल्या एका साध्याश्या डब्यात पेरले. चार पाच दिवसांनी हे मेथीचं कोंब चांगलेच तरारुन आले. आणि आठवड्याभरात घरची भाजी तयार झाली. मग काय...नवं व्यसन लागलं. त्या फेसबुवरील ग्रुपच्या प्रत्येक पोस्ट काळजीपूर्वक वाचल्या. मेथीसोबत मग कोथिंबीर लावण्याचा प्रयत्न केला. पहिला प्रयत्न
फसला. अगदी दोन चार धण्यांच्या दाण्यांना कोंब फुटले. काहीतरी चुकले म्हणून बरेच दिवस हा प्रयोग टाळला. मेथी मात्र आता चांगलीच होत होती. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी मेथीची भाजी...तिही घरच्या मेथीची भाजी व्हायला लागली. सोबत जोड म्हणून मिरची आणि टोमॅटोच्या बियाही रुजायला टाकल्या. सोबत भेंडी आणि वांग्याच्या बियाही टाकल्या. काही दिवसांनी त्यांनाही कोंब फुटले. चक्क कारल्याचा वेलही आला. याच कारल्यासोबत एक वेल वाढत होता. महिन्याभरांनी त्याला मोठं पिवळं फुल आलं, तेव्हा कळलं आपल्या खिडकीच्या छोटुश्या जागेत मिरची, टोमॅटो, वांग, भेंडी, कारलं यासह भोपळ्याचा वेलही बहरत आहे. सुरुवातीला कितीतरी अप्रुप वाटत होतं. या सर्वांना जोड म्हणून काही वाल रुजायला टाकले. त्या वालाचेही वेल या भाज्यांसोबत वाढू लागले. मुळात प्रश्न जागेचा होता. हौस कितीतरी. पण खिडकीत झाडं लावायला सोसायटीची बंदी. त्यात कुंड्या कमी पडू लागल्या. मग चक्क तेलाचे डबे
कापले. एका डब्यात दोन कुंड्या झाल्या. खिडकीत त्यांना ठेवण्याचा विचार बदलला. वॉशिंग मशीन ठेवण्याची जागा कामी आली. मशिन थोडी सरकवून या भाज्यांच्या कुंड्याना जागा केली. असं करुन काही रोजची भाजी मिळेल अशी शक्यता नव्हतीच. पण जी मिळेल ती थोडीशी आपण केलेली, आपल्या घरची असेल हे समाधान खूप मोठं होतं. त्यामुळे कितीतरी खटाटोप झाला तरी कंटाळा येत नव्हता. शेवटी केलेली मेहनत कामी आली. एकीकडे मेथी येत असतांना आता कोथिंबिरही छान फुलून आली. किचनमध्ये असलेल्या कट्ट्यावर कोथिंबिर लावलेल्या नारळाच्या करवंट्या शोभून दिसू लागल्या. एकदा भाजीमध्ये पुदीना आणला होता. त्याच्या काड्या पाण्यात ठेऊन त्या अशाच नारळाच्या करवंट्यामध्ये लावल्या. चक्क त्यालाही कोंब फुटले. रोज फोडणीमध्ये ही ताजी ताजी पुदीन्याची पान टाकतांना किती बरं वाटतं हे सांगता येत नाही.
आता ही हिरवळ लावून चार महिने तरी झाले आहेत. मिरच्या आल्या.
टोमॅटोही मिळाले. कारल्याच्या
वेलाला कारलंही लागंल. नव-यानंच हे वेलात
लपलेलं कारलं शोधलं. काय अप्रुप वाटलं
आम्हा दोघांना. असंच वालाच्या वेलीला
वालाच्या शेंगा लागायला लागल्या तेव्हा वाटलं.
भोपळाही आला. पण नेमकं त्याला
पक्षांनी टोच मारुन मोठं भोक तयार केलं. छोटा
हिरवागार भोपळा वेलीवरच खराब झाला. पण या
सर्वात आनंद खूप झाला. एरवी कुठल्याही
बिया फेकून दिल्या जात होत्या. आता
प्रत्येक भाज्यांच्या-फळांच्या बिया नारळाच्या करवंट्यामध्ये साठवून ठेवते. करवंटी साधारण भरली की त्याच वरुन माती
टाकायची. काही दिवसांनी कोंब आले तर ठिक
नाहीतरी पुन्हा नव्यानं बिया साठवायच्या.
खरंतर आत्तापर्यंत या घरच्या भाज्या पुरेश्या पडल्यात असं कधी झालं
नाही. त्यांना जोड म्हणून बाहेरुन आणलेल्या भाज्या वापराव्या लागल्या आहेत. पण त्यातही एक समाधान आहे. ताटात वाढलेले सर्व पदार्थ संपलेच पाहिजेत...दोन घास कमी खाल्ले तरी चालतील पण अन्न जास्त झालं म्हणून टाकून द्यायला नको...हे दोन डोस जेवतांना कायम दिले गेले. आता तेच डोस मी माझ्या लेकाला पुढे देत आहे. पण आता यात घरची भाजी आहे, टाकू नकोस या प्रेमळ वाक्याची भर पडली आहे.
कोरोना आणि त्यानंतर आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना एकाकी भावना
निर्माण झाली. भीती वाटली. काय होईल याची धास्ती पडली. घरात वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडला. या सर्वांवर हा घरगुती भाजी लावण्याचा प्रयोग
एकदम मस्त आहे. अगदी थोड्या जागेत, थोड्या
सामानासह भाजी लावता येते. फक्त त्याची
माहिती योग्य अशा साईटवरुन वाचवी लागते. पण
या सर्वात एक गोष्ट छान होते. ती म्हणजे
मनातले सर्व विचार नाहीशे होतात. या हिरव्या रंगात मन गुंफले जाते...आणि
त्यासारखे फ्रेश होते....मंडळी हा अनुभव नक्कीच घ्या...एकदा तरी...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Comments
Post a Comment