ती आणि तिचं काम...पण आपलं काय....
कोरोना प्रकरणाचे आपल्याकडे आगमन झाल्यापासून म्हणजे मार्च महिन्यापासून बंद केलेला मॉर्निंग वॉक दिवाळी निमित्त पुन्हा सुरु केला. कोरोनानं सर्वच जगभर अनेक वर्षाच्या परंपरा बंद केल्या. त्यात आमच्याही छोट्याश्या परंपरेचा....सवयीचा समावेश होता. ती म्हणजे सकाळी चालायला जायची. कितीही थंडी, पाऊस असो सकाळी, म्हणजे सक्काळीच...सहाच्या सुमारास चालायला जाणे...फारतर लेकाच्या शाळेसाठी किंवा डबा बनवायच्या गडबडीत सहाचे साडेसहा व्हायचे...पण चालणे मस्ट...गेल्या अनेक वर्षापासून लागलेली चालण्याची सवय नंतर दिनचर्येचा महत्त्वाचा भाग बनली. अगदी रविवार किंवा दिवाळीसारखी सुट्टी असली तरी चालायला जायचेच हे ठरलेले...किंबहुना सुट्टी असेल तर जरा लवकर जाऊन एक-दोन फे-या जास्त व्हायच्या...असो...कोरोनानं या अनेक वर्षाच्या सवयीला ब्रेक लागला. मग घरात चालण्याचे व्यायाम सुरु झाले. पण या सर्वात खूप फरक जाणवला. त्यावर एक मजेशीर कल्पना सुचली...थालीपिठाबरोबर ताजं लोणी खायची जी मजा असते ती बटर खाण्यात नसते....हाच फरक बाहेर चालणे आणि घरी चालण्यातला जाणवला...यातील मजेशीर भाग वगळता घरातही तेवढाच वेळ चालण्याचा प्रयत्न केला. पण त्यात तो आनंद मिळत नव्हता. दिवाळीच्या आधी अगदी पहाटे पाच पासून चालणा-या मंडळींची वर्दळ दिसू लागली. तसं आम्ही दोघंही रोज ठरवू लागलो. आज सुरु करु...उद्या सुरु करु...शेवटी दिवाळीचा मुहूर्त काढला. नेहमीच्या तयारीमध्ये मास्क आणि सॅनिटायझरची भर पडली होती. सर्व तयारीनं आणि तोंडावर मास्क लावून सुरुवात केली. नव्या नवलाईच्या दिवसांसारखा तो अनुभव होता. नंतर मात्र सवयीनं माणसं टीपायला सुरुवात झाली.
सकाळी येणारी सगळी मंडळी प्रामाणिक...सर्वांच्याच तोंडावर मास्क....अगदी काहीजणं ग्रुपकरुन फिरत होते. तेही मास्क घालून बोलत होते...नशीब, असं बोलून आम्ही दोघं चालायला लागलो. गेल्या अनेक वर्षाच्या या सवयीनं अनेक माणसांना जोडता आलंय. त्यातले ओळखीचे चेहरे पुन्हा अनेक महिन्यांनी दिसत होते. फे-या आवरत असतांनाच शेवटच्या फेरीला नेहमीच्या मावशी दिसल्या. सफाई कर्मचारी म्हणून काम करणा-या....आमच्या भागातील रस्त्यांची साफसफाई...कचरा काढण्याचे त्यांचे काम. गेली अनेक वर्ष मी त्यांना फक्त चेह-यानं ओळखते. अजूनही त्यांचं नाव माहीत नाही. कधी विचारायची वेळच आली नाही...मी त्यांना मावशी म्हणते तर त्या मला बाय बोलतात...एवढं बोललं की बोलायची सुरुवात झाली.
त्यादिवशी त्यांना बघितल्यावर कोण आनंद झाला. त्या सुद्धा चेह-यावर मास्क लावून झाडू मारत होत्या. दोघीनींही एकमेकींना ओळखलं...मी हाक मारल्यावर त्याही पुढे झाल्या. किती दिवसांनी दिसलो हाच पहिला दोघींचाही प्रश्न होता. मी घरातून मोजक्यावेळी निघणारी. मात्र पन्नाशीला पोहचलेल्या या मावशी रोज तिच्या कामावर येतात. सुट्टी वगळता त्या त्यांच्या कामात चोख होत्या. अगदी कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढल्यावरही त्याचं काम चुकलं नव्हतं. आमची बोलायला सुरुवात झाली पण त्याचवेळी मावशीनं त्याचं दुखणं सांगितलं. आम्ही सर्व नियमीत येतोय. साफसफाई करतो. कोरोनाची भीती वाटत नाही...पण माणसांच्या सवयीला त्या वैतागल्या आहेत. सकाळी रोज कच-यात मास्क सापडतात. वापरेलेले मास्क तसेच रस्त्यावर पडलेले असतात. ते मास्क हे कर्मचारी कच-यात गोळा करतात...पहिल्यांदा सक्तीची संचारबंदी होती, तेव्हा हा कचरा नव्हता. पण लॉकडाऊन शिथील झाला. माणसं घराबाहेर पडायला लागली...आणि हा असा कचरा रस्त्यावर टाकायला लागली अशी मावशीची तक्रार होती.
कोरोना आल्यावर सर्व काही बंद होतं.
फक्त आपले सफाई कर्मचारी तेवढे सकाळी रस्त्यावर दिसायचे. रोज विभागाची स्वच्छता...झाडलोट चालू
होतं. मला भेटल्या तेव्हाही त्यांचं काम
चालू होतं. एरवीही त्या कचरा काढतांना
तोंडावर पदर गुंडाळायच्या. आता त्या जागी
मास्क आला होता...आणि हातात पिवळ्या रंगाचे ग्लोज...कशा आहेत मावशी...असं
विचारल्यावर त्या त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये म्हणाल्या, मी मस्त...रोज येतेय...त्या करोनाला काय भीत
नाय...पण ही घाबरलेली माणसं काय सुधरतं नायत...काय झालं, म्हणून वाचारलं तर त्यांनी
डोळ्यांनी खाली बघ म्हणून खूण केली. मावशी
कचरा काढत होत्या, त्या कच-यात वापलेले मास्क टाकलेले होते. त्यामुळेच मावशी वैतागल्या होत्या....
मी कच-यात बघितलं...काही डिस्पोझिबल तर काही कापडीही मास्क तसेच टाकण्यात आले होते. एरवी जसा कचरा असतो, तसाच रस्त्याच्या आसपास पडलेला होता. कोरोनानं सर्व बदललं पण माणसांच्या काही सवयी मात्र बदलायला मागत नाहीत. थोड्या गप्पा मारुन मावशी निघून गेल्या...पुढचा भाग साफ करायला. पन्नाशीच्या मावशी सकाळच्या ड्युटीवर असतात...एरवीही त्या घरातून डबा आणायच्या...पण हे नियमीत नव्हतं. कोरोनाचं वारं आल्यापासून त्या सकाळी कामावर येतांना नियमीत डबा, पाण्याची बाटली आणि नॅपकीन घेऊन येतात. सर्व काम संपून घरी पोहचायला दुपार होते. पहिल्यांदा दुकानातून बिस्कीटचा पुडा किंवा वडापाव यावर त्यांची भूक भागायची. पण आता स्वतःच्या काळजीपोटी हे कटाक्षाने टाळतात...त्यांचे पतीही सफाई कर्मचारी म्हणून काम करतात...पण ते दुस-या विभागात असतात. तेही असाच डबा आणतात...त्यांना दोन मुली...एकीचं लग्न झालेलं...ती तिच्या गावाला. दुसरी मुलगी कॉलेजमध्ये. आता कोरोनामुळे सर्व बंद असल्यामुळे घरातूनच तिचं शिक्षण चालू आहे. दोघंही नवराबायको साधा, अगदी हजार रुपयांचा मोबाईल वापरतात...तोही फक्त मुलीला फोन करायला...मुलीसाठी चांगला मोबाईल अभ्यासासाठी घेऊन दिलाय. घरी गेल्यावर गरम पाण्यानं आंघोळ...गुळण्या आणि औषधी चहा घेतात...वन रुमचे भाड्याचे घर...घरात इनमीन तीन माणसं...पण कोरोना आल्यापासून तिघंही तिन दिशेला झोपतात...अगदी जेवणाची ताटवाटीही वेगळी ठेवतात. मुलगी त्यात वाढून देते. या मावशी सांगत होत्या...या रोगाचा काही भरवसा नाही ना...कधी होईल ते माहित नाही.
आणि या अशा कच-यामुळे आम्हाला धोका जास्तच...मग आमच्यामुळं मुलीला कशाला त्रास. तिला पहिल्या दिवसांपासून दोघांनी सांगून ठेवलं आहे. काम तर बंद करता येणार नाही. घर चालायला हवंय. पण ताप आलाच तर सरळ पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ठेवायचं...भेटायला यायचं नाही...पंधरा दिवस आम्ही तिथं राहू, तू इथं रहा...अभ्यास कर...परत आलो तर ठिक नाहीतर आपल्या ताईच्या घरची वाट धर...मावशीनं एका फटक्यात ही वाक्य मला सांगितली. काय डेअरिंग आहे.
माझी, लेकाची चौकशी करुन मावशी पुढच्या कामासाठी निघून गेल्या...मी त्यांनी
गोळा केलेल्या कच-याच्या ठिगाकडे बघत होते.
काचेच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या
पिशव्या, चॉकलेचे रॅपर आणि त्यात आता नव्यानं भर पडलेले मास्क...असा कचरा गोळा
केलेला होता. आता थोड्या वेळात कच-याची
गाडी येणार आणि त्यातील कर्मचारी हा कचरा गोळा करुन दुस-या ठिकाणी घेऊन जाणार...अर्थात
यात कोणा करोना रुग्णाचा किंवा त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा मास्क असेल तर
त्या सर्व सफाई कर्मचा-यांना त्याचा धोका होता.
पण मावशीसारखी मीही हताश होते...त्या मावशींनी तर अगदी टोकाचा विचार करुन
ठेवला होता. प्रत्येकालाच आपला जीव प्यारा
असतो. पण इथे एकाच्या अविचारानं दुस-याला
धोका होता. दुर्दैवानं हे बेजबाबदारपणे
वागणा-यांच्या ध्यानीही नाही, याचंचं दुःख
जास्त आहे.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Sensitive fact.
ReplyDelete