पोहे आणि कांदेपोहे....

 

  पोहे आणि कांदेपोहे....

आज पुन्हा पोहे...अंघोळ करुन थेट किचनमध्ये घुसलेल्या मुलाचा पहिला प्रश्न...मग फोडणीला घातलेल्या पोह्यांच्या कढईत जवळपास घुसून नेहमीचा डायलॉग एकदा त्यानं रिपीट केला...पुन्हा पोहे...लॉकडाऊन लागल्यापासून सकाळचा नाष्टा हा प्रकार वाढला.  एरवी फक्त शनिवार आणि रविवारी नाष्टा व्हायचा...त्यात पोहे, उपमा, डोसा हे नेहमीचे पदार्थ...आठवड्यातून एकदा केले की काम व्हायचं...पण आता हेच पदार्थ रोज करायची वेळ आली आहे.  एरवी सकाळी सहा वाजता न कुरकुरता चपाती भाजी खाऊन जाणा-या लेकाची चव या लॉकडाऊनमध्ये आणखी वाढली आहे.  रोज काहीतरी नवीन कर...अशी भूणभूण...मग रोज काय नवं हवं...हा माझा पलटवार...शेवटी गाडी येऊन थांबते ती उपमा आणि कांदे पोह्यांवरच...त्यामुळे नाईलाजानं का होईना एखादा डायलॉग मारुन लेकाला किमान दोन ते तीन दिवसांनी सकाळी पोह्यांची डीश नाष्टा म्हणून संपवावी लागते. 


कांदा पोहे हा पदार्थ माझ्यासाठी परीपूर्ण असा आहार.  आमच्या रेवदंड्यापासून या कांदा पोह्यांबरोबर नातं जोडलं.  तिथं आई या पोह्यात पांढ-या कांद्याचा वापर करायची.  वर चांगलं मूठभर ओलं खोबरं आणि लिंबाची फोड...बरेचवेळा जेवढे पोहे तेवढेच कांदे-पोहे त्या डीशमध्ये असायचे.  पोह्यांचा घास घेतला की ओलं खोबरं दाताखाली यायचं...त्याचा तो पोह्यांमध्ये मिसळणारा स्वाद...आणि त्यातही नारळ मोहाचा असेल तर गोडूस स्वाद म्हणजे एक अवीट गोडीच होती.  सायंकाळी भूक लागली की याच कच्च्या पोह्यांमध्ये कांदा, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, शेव आणि पुन्हा ओलं खोबरं घालून मिळवलं जायचं.  ही पोह्यांची भेळ अगदी ढेकर येईपर्यंत खायची...वर ग्लासभर पाणी...मग भूकेचा अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत पत्ता नसायचा...अशीच बात गुळपोहे, साखरपोहे आणि दही पोह्यांची...त्यातल्या त्यात दहीपोहे आणि माझं कधी जमलं नाही.  पण गुळपोहे हा आवडीचा प्रकार.  आमच्या घरी गोकूळाष्टमीला हे पोहे होणारचं...अर्थात त्यातही ओलं खोबरं आलंच.  पुढे गाव सुटंल...पण पोहे नाही.  काही वर्ष आम्ही पेणला रहायला होतो.  पेण म्हणजे पोह्यांचं माहेरघरच....अनेकवेळा त्या पोहे घेण्यासाठी थेट पोह्यांच्या भट्टीवर जायचो...तिथे सगळा घमघमाट...पोहे भाजतांनाचा वास भूक वाढवायचा...मग तेव्हा त्या भट्टीपासून थोडं दूर गेल्यावर लगेच पोह्यांच्या कागदी पिशव्या उघडून अधाश्यासारखे गरम गरम पोहे खाल्ले जायचे.  ताज्या पोह्यांचा स्वाद काही औरचं...रेवदंडा..पेण येथे असतांना कांदे पोहे बनवतांना त्यात बटाटा...आणि मटारचा सिझन चालू झाला की हिरवे मटार असायचे...पण पुढे

धुळ्याला गेल्यावर या पोह्यांमध्ये फोडणीला अजून एक गोष्ट पडायला लागली...ती म्हणजे शेंगदाणे.  तेलावर आधी खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे..मग त्यात बाकीची फोंडणी आणि पोहे...हे समीकरण आमच्याकडे कायम झालं.  याबरोबर वारेमाप लोणचं.  धुळ्याला मैत्रिणींसोबत हुंदडतांना पोहे आणि लोणचं हे जेवणासारखं खाल्लं आहे.  पिवळ्या रंगाचे कांदे पोहे...त्यावर आंब्याच्या लोणच्याची फोड आणि भरपूर खार...त्यात हे लोणचं नुकतंच घातलेलं असेल तर अजून भन्नाट...ब-याचवेळा या कॉंबिनेशनवर जेवणही उरकलं आहे.

धुळ्यात हाताला लागलेली ही सवय अजूनही कायम आहे.  पोह्यात शेंगदाणे हा प्रमुख घटक झाला.  आत्ता लेकाला बटाटा आवडत नाही.  अगदी तो बारीक खिसून टाकला ती त्याला न जाणो तो जाणवतोच...चव लागतेच...मग पुन्हा कल्ला...त्यामुळे बटाटे वगळून शेंगदाणे, मटार पोह्यांमध्ये सामावून


गेले.  कधीतरी चेंज म्हणून किंवा इंदौरची आठवण झाली की इंदौरी पोह्यांचा बेत होतो.  फक्त धणे आणि बडीशेपवर पोह्यांची फोडणी.  थोडी हळद, मीठ आणि साखर...बस्स कढईतला एवढा सरंजाम आटपला की डीशमध्ये घेतांना या पोह्यांना आपल्या मनासारखं सजवायचं.  कच्चा कांदा, तिखट, कोथिंबीर, मिळाली तर रतलामी शेव नाहीतर कुठलीही शेव किंवा फरसाण, अजून चवीचे असाल तर भाजलेली चणाडाळ,  मूगडाळ, डाळींबाचे दाणे, कोथिंबीर, लिंबाची फोड,  आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंदौरी पोहा मलाला...वर भुरभुरायला हा पोहा मसाला हवाच, आणि तो नाही मिळाला तर चाट मसाला आणि तिखट काहीही चालतं.  इंदौरला मिळणारे हे पोहे आमच्या सर्वांच्या आवडीचे.  अगदी लेकही न कुरकुरता खाणार...आणि अजून मागून घेणार.  यावर्षी कोरोनामुळे इंदौरचा दौरा झाला नाही.  पण या पोह्यांपासून ते कचोरी आणि भरवा मिरचीपर्यंत सगळ्या पदार्थांची उजळणी घरी झाली.  पोह्यांची तर वारंवार. 

या कोरोनामुळे ऑफीस आणि लेकाचं कॉलेज घरातून चालू...त्यामुळे खाण्यापिण्याचे सर्व नियम बदललेले.  एरवी घरी चपाती भाजी हाच सकाळचा नाष्टा असायचा.  त्याला आता विराम मिळालाय.  पोहे आणि उपमा...कधीतरी डोसे आणि त्याच पंक्तीतले आणखी काही नाष्ट्याचे प्रकार होतात.  पण हे कधीमधी.  बाकी सर्व भार पोहे आणि उपम्यावर.  आपल्या मराठमोळ्या या पदार्थांची चव आणि त्यातील पोषक तत्वांची गुणवत्ता कुठल्याही इतर पदार्थांपेक्षा उजवीच आहे.  करायला सोप्पा आणि चवीला बहारदार...आता नाईलाज म्हणून का होईना पण लेकानं या पोह्याला आपलंसं केलंय.  पोहे, भात हे मराठी माणसाच्या विशेषतः कोकणातल्या माणसाच्या नातलगांसारखेच.  कुठेही गेलो तरी या दोघांपासून सुटका होत नाही.  नव्या


पिढीला मात्र यातलं सुधारीत रुप हवं असंत.  म्हणून या पोह्यांवर अनेक प्रयोगही करुन झाले.  त्याचे कटलेट, समोसे, भजी, डोसे, इडली अशा पदार्थात रुपांतरही केले.  अर्थात बरेचवेळा लेकाला यात पोहे आहेत, हे समजतही नाही, एवढा चवीत फरक होतो.  पण हे बदलही कितीवेळा करणारा...पुन्हा गाडी कांदे पोह्यांवर येते.  आत्ताशा लेकाला कळून चुकलंय,  यावाचून काहीही पर्याय नाही.  त्यामुळे का होईना त्यांनीही कांदे पोहे आणि सोबत शेंगदाणे हा मेनू आपलासा केलाय.  प्रत्येकवेळी मला आजपण पोहेच केलेस हे ऐकवल्याशिवाय त्याचा एकही घास घशाखाली जात नाही.  अर्थात या सर्वात अजून एक डॉयलॉग ठरलेला...पोह्यांचा पहिला घास घेतांना, आजी सारखे  पोहे तुला करता येत नाहीत...तिने केलेले पोहे  मस्तच लागतात...हा डायलॉग मारणार आणि मग सुरुवात करणार...अर्थात मला त्याचा हा   डायलॉग  पोह्यांवर असणा-या ओल्या खोब-यासारखा वाटतो...मधाळ...कितीही वेळा आला तरी प्रत्येकवेळा हवाहवासा वाटणारा.... पण हे लेकाला कसं सांगणार...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

Comments

  1. पोहे पुराण खूप चविष्ट झालंय! मनापासून आवडलं!

    ReplyDelete
  2. आदरणीय सई जी अपन अतिशय रुचकर लिखण केल आहे
    धन्यवाद..
    आज आईच्या हातच पोहे ची आठवण झाली!!

    ReplyDelete

Post a Comment