दृष्ट

 

         दृष्ट


एखादी संध्याकाळ सावलीसारखी असते...सतत सोबत वावरते...जुन्या आठवणींचा पडदा उघडला जातो...आणि अजून कितीजणी या सावलीत वावरत असतील अशी शंका मन कोसत रहाते...संध्याकाळी चालायला जाण्याची सवय अलीकडे लावून घेतली आहे.  त्याच दरम्यान हा अनुभव आला.  वर्क फ्रॉम होम या संकल्पनेत नवरा चोवीस तास बांधला गेला.  थोडा मोकळा वेळ,  पाठीला आराम म्हणून संध्याकाळी चालायची सवय लावून घेतली.  गुरुवारी नेमकी त्याची त्याचवेळी मिटींग लागली.  मी रात्री जाईन चालायला...तू आता जाऊन ये...म्हणत तो पुन्हा त्याच्या घरगुती ऑफीसच्या कोप-यात बसला.   चुकत नाही तो नेम...या नियमानं मी माझी चालायला निघाले.  नेहमीचा रस्ता...आणि नेहमीचे चेहरे...फक्त आता तोंडावर मास्क आलेला...तरीही नजरेनं ओळखणारे...त्यात एक चेहरा नजर चुकवतांना दिसला...एकदा नजरा नजर झाली...ओळख पटली...आणि तिची नजर खाली गेली...ती माधुरी होती...नक्कीच...

एरवी गप्पा मारणारी...पण आज नजर चुकवत होती...तीही एकटीच होती...माधुरी, म्हणून हाक मारली तेव्हा तिची नजर पुन्हा वर आली.  भरलेले डोळे बरच काही सांगत होते आणि लपवण्याचा प्रयत्नही करत होते.  काही नाही ग सहज...म्हणून गप्प झाली.  दोघीही एकाच रस्तावरुन ठराविक अंतर ठेऊन चालत होतो...शेवटी मध्येच थांबली...मी एकटीच होते...तरीही विचारलं आज एकटीच का ग...मी हो म्हटलं...ती सुद्धा एकटीच होती...मला दिसत होतं...तरीही तोच प्रश्न तिला विचारला...तू पण एकटीच का ग...तिच्याकडेही माझ्यासारखचं कारण होतं.  नवरा ऑफीसचं काम घेऊन बसला होता.  त्यामुळे माधुरी एकटीच बाहेर पडलेली.  ठीक आहेस ना...म्हणून मी विचारल्यावर तिनं उत्तर देण्याच टाळलं...पण फोन दाखवला...हळूच म्हणाली आईचा फोन


होता...तिच्याबरोबर बोलत होते...खरं तर मला काही वेगळंच सांगायचं होतं...पण तिला कशाला पुन्हा त्रास म्हणून गप्प राहिले...अशाच गप्पा मारल्या...आणि फोन ठेवला...माधुरीचा वेगळा विषय माहित होता.  तिचं लग्न होऊन बारा वर्ष झालेली.  पण बाळ नव्हतं.  तिच्या सासरी आणि माहेरी या गोष्टीवरुन अनेकवेळा चर्चा व्हायची...माधुरीला खूप सल्ले मिळायचे...अलिकडे टोमणेही चांगलेच बसले होते.  पण दोन कानांचा चांगला उपयोग करते...हे तिचं वाक्य होतं.  म्हणजेच एका कानानं ऐकते आणि लगेच फिल्टर करुन दुस-या कानानं सोडून देते.  माधुरी आणि तिच्या नव-यानं बाळासाठी अनेक डॉक्टरांचे सल्ले घेतले होते.  फारकाय उपास तापास...पूजा अर्चा करुनही झालं होतं.  दोघांचेही डॉक्टरी चेकअप झालं होतं.  दोघांच्यातही दोष नव्हता...तरीही बाळ होतं नव्हतं.   पहिले काही वर्ष येणा-या प्रत्येक नातेवाईकांना हे सर्व सांगता सांगता त्या दोघांची दमछाक व्हायची...मग नंतर माधुरीनं ही केविलवाणी सफाई सोडून दिली.  जे जास्त चौकस नातेवाईक होते त्यांच्याकडे जाणे सोडून दिले.  अगदी सासरी आणि माहेरी दोन्हीकडे सारखाच न्याय...मी कोणाच्या फंदात नाही...कोणी माझ्या फंदात पडू नका...म्हणून काहींनी विनंतीही केली. 

या सर्वात जे होतं तेच तिच्याही वाट्याला आलेलं.  कोणताही दोष नसतांना तिला बोल ऐकावे लागले होते.  जवळपास तीन वर्ष या माधुरीच्या शेजारच्या घरात आम्ही भाड्यानं रहात होतो.  या तीन वर्षात तिची आणि माझी मैत्री झालेली.  पुढे हे भाड्याचे घर सोडून आम्ही नव्या घरात शिफ्ट झालो.  पण ही दोन्ही घरं जवळपास...त्यामुळे माधुरी कायम भेटायची.  तिच्या शेजारी आम्ही रहायचो तेव्हा माझा लेक पाच-सहा वर्षाचा होता.  त्याच्याबरोबर तिची चांगली गट्टी जमली होती.  ही ओळख नंतरही माधुरीनं कायम ठेवली...सहज म्हणून अनेकवेळा घरी येऊन गप्पा मारायची तिला सवय आहे.  या गप्पामधूनच तिच्या मनातली बाळाची आस अनेकवेळा तिनं बोलून दाखवली.  सर्व उपाय केल्यावर अलिकडे त्या दोघांनी मुलाला दत्तक घेण्याची प्रक्रीया सुरु केली आहे.  माधुरी त्यामुळे केवढीतरी खूष झाली होती.  मध्यंतरी कोरोना काळात आमची भेट झाली नाही.  ती सुद्धा घरी आली नाही.  लेकाच्या वाढदिवसाला तिनं यावेळी फोन केला.  तेव्हा ही सगळी माहिती मिळाली.  आता संध्याकाळी ती सुद्धा चालायला यायची...तेव्ही एक हात लांब राहून आम्ही गप्पा मारल्या होत्या...शनिवार रविवारी पाहुणे येणार इतपत मला माहिती होती.  त्यानंतर माधुरी दिसली ती अशी...भरल्या डोळ्यांची.  बाळावरुनच काहीतरी झालेलं असणार हा माझा अंदाज होता.  पण माधुरीनं जे सांगितलं ते त्याहून भयानक होतं.

लॉकडाऊन लागल्यापासून माधुरीकडे कोणीही पाहुणे आले नव्हते...आता सर्व सुरुळीत व्हायला लागल्यावर पाहुण्यांचीही वर्दळ सुरु झाली.  शनिवार-रविवार धरुन काही पाहुणे आले होते.  या नातेवाईकांच्या मुलीचं लग्न ठरलं होतं.  त्या लग्नाची खरेदी करण्याचं निमित्त करुन ही मंडळी माधुरीकडे दोन दिवस रहाणार होती.  ते आले म्हणून त्यांना भेटायला आणखी काही जण तिच्याकडे येणार होते.  लग्नात पाहुण्याचे बंधन होते.  त्यामुळे माधुरीकडे सर्वजण जमून त्या मुलीचे केळवण साजरं करणार होते...माधुरीनं खूप हौशेनं सगळी तयारी केली.  दोन दिवसांचा मेनू आधीच ठरवून तशी खरेदीही केली...शिवाय त्या मुलीला भेट देण्यासाठीही सोन्याचे कानातले घेतले.  हा कार्यक्रम छान झाला.  पण या पाहुण्यांमध्ये कोणीतरी कळ काढली.  त्या नव-यामुलीला दृष्ट नको लागायला...माधुरीसारखं नको व्हायला...घरात पाळणा हलला पाहिजे...मग यासाठी तिची दृष्ट काढायला हवी...ही दृष्ट कोणी काढायची...तर त्यासाठी माधुरीच हवी...का...तर तिला बाळ नाही ना...मग तिचीच दृष्ट लागू शकते...ही सर्व शहाणपणाची बोलणीही माधुरी समोरच केली.  माधुरीनं त्या मुलीचं गुमान दृष्ट काढली.  तिनं हौशेनं आणलेली भेटवस्तू दिली...सर्व पाहुणे खूष होते...आपण आपल्याच यजमानबाईचं मन दुखवलंय याची जाणीवही त्यांना झाली नाही.  त्यांच्यासाठी ती नेहमीची गोष्ट होती जणू...आपण किती कोणाच्या जीवनात हस्तक्षेप करतो याचं हे टोकाचं उदाहरण...नातेवाईक...आणि तेही वयानं मोठे म्हणून त्यांना कुठलाही अधिकार आहे...असं गृहित धरुन अनेकदा समोरच्याला नको नको ते सल्ले दिले जातात...आणि समोरच्यानंही ते सल्ले गुमान


ऐकावे ही अपेक्षा ठेवली जाते.  ते नाही ऐकले की अॅटीट्यूड हा शब्द तोंडावर फेकला जातो...माधुरीच्याही बाबतीतही हेच झालं होतं...पाहुणे गेल्यावर नव-यानं तिला बरचं समजावलं...ती तेवढ्यापुरती शांत झाली होती.  आता एकटी बाहेर पडल्यावर आईबरोबर बोलायची तिला संधी मिळाली.  पण नंतर आपणचं एवढं अस्वस्थ झालो,  आता आईला कशाला त्रास द्यायचा...असा विचार करुन तिनं आईला काहीही सांगितलं नाही...तिची तीच शांत होत असतांना नेमकी मी भेटले...

दोघीही खूप वेळ फे-या मारत होतो.  तिला मी धीर कसा देणार...काही वर्षापूर्वी मी सुद्धा याच सर्वांना सामोरी गेलेले....काही जखमा या आयुष्यभरासाठी असतात.  भळभळणा-या....मनाच्या एका कोप-यात सदैव त्या झोपलेल्या लाव्हारसासारख्या दडून रहातात...कठूनतरी एक अचानक ठिणगी पडायचा अवकाश..मन पुन्हा त्या जखमांच्या बरोबर वहावत जातं...कितीही आवरणं...सावरणं त्यावर घातली तरी या जखमा आयुष्याच्या सोबती ठरतात...यासाठी वेळ हाच उपाय असतो...माधुरीही या सर्वातून पार पडेल ही माझी खात्री होती...कोरोनावर लस येईल...पण मानवी स्वभावावर येणार कधीही येणार नाही.   

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

Post a Comment