शिक्षणाचा मार्ग....
शिक्षण म्हणजे काय...त्याचा उपयोग काय...हे प्रश्न एका काळडोहासारखे आहेत. त्यांची उत्तरं कधी सापडणार नाहीत. प्रत्येकानं आपल्या सोईप्रमाणे याचा अर्थ लावला आहे. शिक्षण आणि त्याचा उपयोग म्हणजे केवळ आपलं ब्रेड-बटर कमावता आलं पाहिजे...आणि आपल्या कुटुंबाचंही...अर्थात आपण आपली पोटपुजा आणि कुटुंबाचीही पोटपूजा आणि अन्य गरजा भागवण्यासाठी सक्षम बनलं पाहिजे. ही समजूत नव्वाण्णव टक्के समाजाची असते. या नव्वाण्णव टक्क्यात माझाही समावेश आहे, हे सांगण्यास संकोच नक्कीच वाटत नाही...पण कधी कधी या समजूतीला धक्का बसतो. तोही अगदी नवशिक्या...असा शिक्का मारला जातो, त्या तरुण वर्गाकडून...तोच हा अनुभव....
नव-यानं सहज म्हणून एका ग्रुपच्या साईटला भेट दिली. त्यांची पर्यटनस्थळी हॉटेल्स आहेत. काही वर्षाचे पैसे भरले की ठराविक दिवस त्या हॉटेलमध्ये मुक्काम ठोकता येतो. कोरोनामुळे जवळपास वर्षभर घरी बसलेल्या नव-यासमोर नेटवर सर्च करतांना ही साईट आली. त्यांनी सहज म्हणून क्लिक करुन चौकशीचा फॉर्म भरला...आणि काही तासाभरातच त्यांच्याकडून एक फोन आला. या ग्रुपची माहिती देण्यासाठी त्यांचा एक माणूस थेट घरी येऊ शकतो याची माहिती मिळाली. नव-यानं संध्याकाळी सात नंतर त्याला बोलावलं. साधारण अर्धातास लागेल असा त्याचा अंदाज होता. पण या सर्वांना
लागला तो दोन तासांचा अवधी...दोन तास असेच कोणाचेतरी ऐकण्यात गेले. पण आम्ही दोघांनीही त्याबाबत आक्षेप घेत समोरच्याला रोखले नाही...याला कारण म्हणजे तो बोलणाराच...अत्यंत सुस्पष्ट माहिती...आणि आत्मविश्वास...पंचवीसीला आलेला हा तरुण मुलगा नव्या पिढीचा प्रतिनिधी वाटला. त्याचं शिक्षण झालंय ते एका शाखेमध्ये...त्यानं नोकरी स्विकारली ती दुस-या शाखेची...का...त्याच्याच भाषेत बोलोयचे तर ट्राय करायला...अनुभव घ्यायला काय जातंय...कदाचित हा मार्गच आवडला तर...आम्ही दोघंही खरंतर त्याच्या आत्मविश्वासानं आणि जीवनाकडे बघण्याच्या सकारात्मक विचारानं भारावल्यासारखे झालो होतो.
शिक्षणाच्या बाबतीत आपल्या काही ढोबळ भावना असतात...ज्या शाखेतलं
शिक्षण घेतलं...त्याच शाखेचं बोट धरुन मग पोटापाण्याचा व्यवसाय-नोकरी बघायची. सेटल व्हायचं...हाच मार्ग बदलून बघितला
तर...यात यश आलं तर ठिक..पण अपयश आलं तर...तर मात्र काही खरं नसतं...त्या मुलानं
काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय, याकडे दुर्लक्ष करत तो कसा हरला याकडे लक्ष
देण्यात येतं. त्याला बोल लावण्यात येतात. आयुष्यभर काय शिकलास...ते करायचं सोडून दुसरं
केलं तर असंच होणार...असे सूर त्याला ऐकावे लागतात. पण शिक्षण या शब्दाचा अर्थ हा असा चौकटीत
बसण्यासारखा आहे का...तर नक्कीच नाही.
शिक्षण म्हणजे मेहनत करण्याची वृत्ती, परिश्रम करण्याची क्षमता, प्रवाहाविरुद्ध जाऊन भक्कमपणे उभं रहाण्याची
शक्ती आणि आत्मविश्वासानं बोलण्याची...आपलं म्हणणं समोरच्याला सांगण्याची
ताकद...यापेक्षाही शिक्षणाचा अर्थ नक्कीच व्यापक आहे. मला तरी तसाच अनुभव आला.
आम्ही सहज म्हणून भरलेल्या एका फॉर्मबद्दल आणि संबंधित ग्रुपबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी त्यांचा माणूस आमच्याघरी येणार होता. नव-यानं त्याला सातची वेळ दिली. साधारण पंधरा-वीस मिनिटात हे सर्व आवरेल असा त्याचा अंदाज...मग साडेसातपर्यंत संध्याकाळच्या वॉकसाठी बाहेर जाऊ म्हणून त्यांनी मलाही तयारी करायला सांगितलं. बरोबर सात पाचला एक फोन आला. त्या येणा-या व्यक्तीचाच होता...बिल्डींगच्या आसपासच होता...पाच मिनिटात पोहचतो असा निरोप मिळाला. बाहेरुन व्यक्ती येणार
म्हणून नवरा मास्क लावून बसला. बरोबर पाच मिनिटात बेल वाजली. चेह-यावर मास्क लावून आणि हातात स्वतःचं ओळखपत्र घेऊन एक तरुण उभा होता. घरात आल्यावर सॅनेटायझरचा वापर झाला. त्यानं पुन्हा स्वतःची ओळख, त्या ग्रुपमधली त्याची पोझिशन सांगितली. मग तो कामाला लागला. आमची चौकशी...घरात कितीजण...कुठे फिरायला जाता...कसं वातावरण आवडतं...अशी कामाची चौकशी सुरु झाली. घरात तीन जणं म्हटल्यावर मुलालाही बोलवण्याचा त्यानं आग्रह धरला. पण लेक अभ्यासात...मग त्यानंही अभ्यासाची चौकशी केली. त्याला सांगितल्यावर सहज म्हणाला, करुदे अभ्यास...मी पण या परीक्षेची तयारी केली आहे. त्यासाठी किती परिश्रम करायला लागतात याची मला माहिती आहे. पर्यटनाची माहिती सांगणारा...हॉटेलचं मार्केटींग करणारा हा युवक इंजिनिअरींगची तयारी करत होता, हे ऐकून माझी उत्सुकता चाळावली. मी त्याचं शिक्षण विचारलं. तेव्हा म्हणला, मी इंजिनिअर आहे. मॅकॅनिकल इंजिनिअर...मग तो मार्ग सोडून इथं मार्केटींगकडे कसा वळला. तेव्हा म्हणाला, पहिल्यापासून मला बोलायची आवड. सोबत फिरायचीही आवड...लोकांना भेटायला आवडतं...हे सगळं मॅकॅनिकल इंजिनिअरींगमध्ये काही मिळेना...म्हणून सहज ट्रायल म्हणून या व्यवसायात आला...जमलं तर ठिक नाहीतरी हातात तर इंजिनिअरींगची पदवी आहे. इथे काही वर्ष बघायचं...आवडलं तर याच क्षेत्रात पुढे जायचं...नाहीतर ज्याच्यात पदवी घेतली ते आहेच जोडीला...एक ट्राय घ्यायला काय जातंय...मी त्या तरुणाकडे बघत राहीले. तो एवढ्या सहजपणे बोलत होता. आत्मविश्वास होता...पण त्यात घमेंड नव्हती.
नंतर जवळपास दोन तास तो त्याच्या ग्रुपची माहिती. त्यांची हॉटेल्स...भारतातील उत्कृष्ठ
पर्यटनस्थळं...तिथली वैशिष्ट्, ग्रुपतर्फे देण्यात येणा-या सुविधा...आदी सर्व
माहिती देण्यात आली. कुठेही घाई
नाही. काही ठिकाणचे व्हिडीओ दाखवले. आम्हा दोघांचीही पसंत विचारली...मग तशा काही
पर्यटन स्थळांची माहिती सांगितली. हे
सर्व सांगतांना तिथली भौगोलिक
माहिती...खाद्यसंस्कृती...आदींचीही माहिती आम्हाला हा तरुण पद्धतशीर देत
होता. हे सांगतांना मराठी, हिंदी, इंग्रजी
या तिनही भाषांचा वापर...पण तोही अगदी सराईतासारखा. सर्व सांगितल्यावर व्हिटॅमिन एमची वेळ आली. अर्थात या सर्वांसाठी किती पैसे भरायचे आहेत
याची माहिती सांगितली. आम्हाला कसं
सोयीस्कर वाटेल याची आधी काळजी घेत त्यांनी अगदी चार पर्याय आमच्यापुढे
ठेवले. सर्व छानच होतं. जवळपास दोन तास तो मुलगा बोलत होता...पण
आम्हाला या दोन तासात थोडाही कंटाळा आला नाही....कारण होतं त्याची सांगण्याची सहज,
सोप्पी पद्धत...आणि परिपक्व माहिती. मी
राहून राहून विचार करत होते. हा मुलगा याच
क्षेत्रात रहाणार...त्यांनी ज्या शाखेतलं शिक्षण घेतलं ते वाया जाणार...आम्ही
दोघांनीही त्याचं पहिल्यांदा कौतुक केलं.
त्यांनी सांगितलेली योजना आम्हाला आवडली होती. नव-यानं त्याला दोन दिवसांनी फोन करायला
सांगितला. त्यांनी वेळ विचारली. मग मी
माझ्या मनातला प्रश्न त्याला विचारला...तू या क्षेत्रात स्थिरावलास तर तुझं
इंजिनिअरींगचं शिक्षण वाया जाणार की...तेव्हा तो हसून म्हणाला...तेवढा हिशोब मी
केलाच नाही....मी बोलायला चांगला आहे. मला
फिरायला आवडतं...हे पहिलं मी पाहिलं...त्यामुळे आपल्या आवडीचं काम मिळाल्यावर ते
करायला प्राधान्य दिलं. इंजिनिअरींगची
पदवी काय आपल्या सोबत आहे. त्यात नोकरी
नक्की मिळेल...पण आवडीचं काय...पुढे वय झाल्यावर फिरण्यापेक्षा या कामाच्या
निमित्तानं फिरता येतंय...हे मोठं नाही का...
माझ्यापुढे हा प्रश्न ठेऊन तो तरुण निघून गेला. रात्रीचे नऊ वाजले होते. संध्याकाळचा वॉक आता रात्री करायचा का...म्हणून नव-याला विचारलं...तोही हो म्हणला...दोघंही बाहेर चालायला पडलो. नकळत माझ्या मनात त्या तरुणाची आणि माझ्या लेकाची तुलना चालू होती. माझ्या लेकानं असंच केलं तर...त्याला नक्की काय आवडतं. त्यालाही इंजिनिअरींगचं वेड...त्या परीक्षेसाठी झटून अभ्यास करतोय...पण पुढे त्याचं मन यात रमेल का...की आता आवड बदलली आहे, म्हणून वेगळा मार्ग शोधेल...मी या विचारांबद्दल नव-याबरोबर बोलले...तो हसला...म्हणला शिक्षण म्हणजे काय हे विचारतेस ना...शिक्षण म्हणजे, बदलांना स्विकारण्याची क्षमताही आहे. आपल्या लेकानं नंतर काही वेगळा मार्ग स्विकारला तर त्याचं कौतुक करुन त्याला भक्कम पाठिंबा आणि हिम्मत द्यायला हवी...त्यातच आपल्या शिक्षणाचं सार दडलंय...मी हळूच हसले...मनातून मोकळी झाले...त्या तरुणाचे आभार मानले...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
आदरणीय सई जी नमस्कार
ReplyDeleteअपन अतिशय सुंदर लिहले आहे
आणि ह्या सर्व लेखा च मर्म
शेवटच्या दोन ओळीत लपलय...
शेवटी प्रामाणिक पने सांगतो...
प्रयेक पालकांच एकच ध्येय असत की आपला पाल्य हा वीणा कस्ट वेवस्थित जगला पाहिजे!!
मात्र ह्यात चढाओढ असते ती पालकांच्या महत्वाकांक्षे ची आणि पाल्याच्या स्वप्नाची..
ह्यात तेच कुटुंब यशस्वी होत जे...
ह्या दोन्हीत सांगड घालून स्वप्नासोबत महत्वाकांशाला गवसनी घालतात ते...
धन्यवाद
दादा पाटिल
Khup chhan lekh
ReplyDelete