साथ सोबत.....

 

    साथ सोबत.....


गेल्या वर्षभरात अनेक कला आत्मसात कराव्या लागल्या आहेत.  त्यापैकी एक महत्त्वाची म्हणजे मास्कखाली लपलेला चेहरा ओळखण्याची कला.  मध्यंतरी यावर एक जोकही वॉटस्अपवर फिरत होता...असो...ही कला खरच मोठी आहे, याचा प्रत्यय मलाही आला.  सायंकाळी वॉकला गेल्यावर मास्क चेह-यावर लावला होता,  मात्र अजून एक साधन...म्हणजेच चष्मा लावला नव्हता...सायंकाळचे सहा वाजले होते...साधारण अंधूक वातावरण...सायकल चालवणा-या मुलांना चुकवत आम्ही दोघं नवरा बायको चालत होतो.  अशातच पहिल्या फेरीत एक ओळखीचा चेहरा दिसला...पण तरीही काहीतरी खटकलं...चालणं...साडी नेसण्याची स्टाईल...सर्व तसंच होतं...अगदी हातातली छोटी पर्सही...तरीही काहीतरी वेगळं वाटलं...चष्मा नसतांना उगाचच कोणाला तरी हाक मारायची...आणि ती व्यक्ती दुसरीच निघायची...त्यामुळे स्वतःवर कंट्रोल ठेवला..नव-याला विचारलं...तुम्हाला ओळखीचं वाटलं का...तर त्याचं उत्तर भलतंच..मी कोणाच्या चेह-याकडे बघत बसत नाही...मी बरं म्हणून पुन्हा त्याच्या वेगानं चालायला लागले...दुस-या फेरीतही ती व्यक्ती पुन्हा दिसली...आता मात्र त्या थोड्या हसल्या...मग मी सुद्धा...मास्कच्या आडून हसले...त्या नक्कीच वत्सला काकू होत्या...गेल्या काही वर्षापासून सकाळच्या फे-यांदरम्यान त्यांची ओळख झालेली.  दोन वर्षापासून मात्र त्या जवळपास गायब झाल्या होत्या...आता मार्चपासून तर मीच सकाळच्या फे-यांसाठी दांडी मारलेली...त्यामुळे ओळख पटायला थोडा वेळ लागत होता.  एवढं असूनही काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं...

तिस-या फेरीपर्यंत ब-यापैकी काळोख झाला होता...आता बस्स झालं म्हणून आम्ही शेवटची फेरी झपाझप मारायला सुरुवात केली.  तेवढ्यात मागून लेकाच्या नावानं हाक आली...मी वळून बघितलं तर त्या काकू उभ्या होत्या...वत्सला काकूच...सोबत कोणीतरी होतं...मी चार पावलं मागे गेले.  वत्सला काकूच ना तुम्ही...त्या हसून हो म्हणाल्या.  त्या म्हणाल्या, मला वाटलचं तुम्ही ओळखलं नाही...म्हणून हाक मारली...मग प्राथमिक चौकशी....लेकाची चौकशी...तोपर्यंत त्यांच्या शेजारचे गृहस्थ स्वस्थपणे उभे होते...काकूंनी आमची प्राथमिक बोलणी झाल्यावर त्यांची ओळख करुन


दिली...हे माझे मिस्टर...मी अगदी चपापले...एवढे की ते त्या दोघांच्याही लक्षात आले.  नंतर मलाच ओशाळल्यासारखे झाले.  मी आणि नव-यानं त्यांना नमस्कार केले.  पण आमच्या दोघांच्याही चेह-यावरचे प्रश्नचिन्ह त्यांना मास्कमधूनही दिसत होते.  ती दोघंही छान हसत होते...मी काकूंना फार ओळखत नव्हते...पण काही वर्षापूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले होते.  काकू साधारण तेव्हा चाळीस-पंचेचाळीशीच्या होत्या...त्यांना एक मुलगा...भावानं मदत केली...एका पतपेढीत काकू काम करीत होत्या...या सर्वांवर मुलगा शिकला...आता तो अमेरिकेत सेटलही झालाय.  लग्न झालंय...अगदी काकूंना नातवंडही आहेत...कारण काही वर्षापूर्वी जेव्हा आम्ही सकाळी फे-या मारायचो, तेव्हा काकूंकडे त्यांच्यामुलाशिवाय अन्य कोणताही विषय बोलायला नसायचा...तो मुलगा म्हणजेच त्यांचं विश्व...तो जेव्हा कायमस्वरुपी अमेरिकेला गेला तेव्हा काकू कोलमडल्या होत्या..मुलानं त्यांना तिकडे येण्याचा हट्ट धरला...पण वर्षातले दोन महिने वगळता काकूंना अमेरिका आवडली नाही. 

काकूंनी इकडे मन रमवण्याचे अनेक पर्याय निवडले होते...सकाळ संध्याकाळ फिरायला जाणे हा त्यापैकीच एक होता...त्यादरम्यानच आमची ओळख झाली होती...मुलगा शिकत असतांना नव-याचा आधार गेल्यानं त्यांनी काही वर्ष आर्थिक कसरती केल्या होत्या.  पण मुलगा सेटल झाल्यावर तो प्रश्नही सुटला होता.  आता प्रश्न होता तो मन रमवण्याचा...मधल्या काळात नातेवाईकांचा चांगला वाईट अनुभव गाठीशी आला होता.  त्यामुळे त्यांनीही आता ठराविक अंतर ठेवलं होतं.  एरवी त्या एकट्याच होत्या...कोणाची काही कटकट नाही...माझी मी एकटी...असं त्या नेहमी म्हणत असतं...पण घराचा दरवाजा उघडल्यावर एकाकी घरात हाच एकटेपणा त्यांना नकोसा होत असे...पण बोलायचे कोणाला...नाही म्हणायला सून चांगली होती...तीनं खूपवेळा आग्रह केला होता अमेरीकेत येण्यासाठी...तिच्या बाळतंपणासाठी त्या गेल्याही होत्या...पण ठराविक महिन्यांनी परत आल्या. 

इथपर्यंत मला माहिती होती.  पण अचानक त्याच वत्सला काकू नव्यानं भेटल्या...एव्हाना चांगलाच काळोख झाला होता...आम्ही चौघं एका लाईटच्या पोलखाली उभं होतो.  काकू काही बोलायच्या आत त्यांच्या सोबत असलेल्या गृहस्थांनी आपलं नाव सांगितलं...ते सीए होते.  याच परिसरात ते काही वर्ष राहिले.  त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा...दोघांचीही लग्न झालेली.  मुलगी जर्मनीत शिकायला गेली आणि एका जर्मन सहका-यासोबत लग्न करुन तिथेच स्थाईक झाली.  मुलगाही अमेरिकेत...त्याचंही लग्न झालेलं..त्यालाही आता इथे येणात रस नव्हता.  दोन्ही मुलांच्या लग्नानंतर हे काका त्यांच्या पत्नीसोबत कुठे बाहेर गेले असतांना त्यांच्या गाडीला अपघात झाला.  त्यात त्यांच्या पत्नीचे निधन झाले.  दोन्ही मुलं पंधरा दिवस त्यांच्या सोबत होती.  नंतर ती आपल्या नव्या देशाला रवाना झाली.  इथे काका एकटे पडले.  एवढी वर्ष पत्नीवर अवलंबून होते.  आता जेवायलाही पोळी भाजी केंद्रात जायला लागायचे.  वत्सला काकू या दरम्यान पतपेढीमध्ये कामाला होत्या.  त्यांच्या पतपेढीचे सल्लागार म्हणून हे काका काम पहात होते.  काकूंना त्यांच्या पत्नीची बातमी समजली तेव्हा त्यांना हाक मारण्यासाठी त्या महिनाभरांनी त्यांच्याकडे गेल्या.  तेव्हा फार परिचय नसतांनाही दोघांनी भरपूर गप्पा मारल्या.  काकांनी त्यांच्या घरातील सर्वांचे फोटो दाखवले...त्याचवेळी काकांचा जेवणाचा डबा आला.  घरभर पसरलेला पसारा पाहून काकूंना अंदाज आला होता.  काकाही तेव्हा सहज बोलले...जेवण बनवायची आणि घर आवरायची कधी वेळच आली नव्हती.  काकू तेव्हा घरी परतल्या.  नंतरही काही वेळा या दोघांची भेट झाली.  दोघांचीही मुलं अमेरिकेत होती....हा एक समान धागा बोलायला होता.  मध्यंतरी काकू सुनेच्या बाळंतपणासाठी अमेरिकेला गेल्या तेव्हा काकांनी आपल्या मुलासाठी त्यांनी मागवलेल्या वस्तू वत्सला काकंकूडे पाठवल्या...

एकूण या दोघांमध्ये चांगली ओळख झाली.  एकट्या असलेल्या वत्सला काकू


मध्यंतरी आजारी पडल्या.  तेव्हा डॉक्टरांनी त्या जेवणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदान काढले.  एकट्या असल्यामुळे त्या फार जेवणाचा घाट घालत नसत.  ही बाब जेव्हा काकांना समजली तेव्हा त्यांनी आपला डबाच काकूंना बनवायला सांगितला.  डब्याच्या निमित्तानं दोघांचाही परिचय वाढला.  घरी येणे जाणे वाढले.  मात्र यामुळे दोघांच्याही आसपास कुजबूज वाढली.  कोणीतरी थेट काकूंच्या मुलापर्यंत ही बाब सांगितली.  काकूंनी काकांचा डबा बंद करण्याचा निर्णय घेतला.  काकांनी कारण विचारल्यावर त्यांनी सर्व प्रकार सांगितला.  त्याचवेळी काकांनी वत्सला काकूंसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला.  पहिल्यांदा काकू तयार झाल्या नाहीत...कारण पहिला प्रश्न मुलाचा होता.  वयाच्या पंचावन्नाव्या वर्षात पुन्हा बोहल्यावर चढल्यावर समाज काय बोलेल याची त्यांना काळजी होती.  काकांनीही आपल्या मुलांना ही बातमी सांगितली.  मुलांनं आणि सुनेनं प्रथम नकारच दिला.  दोघांनीही अबोला धरला.  मुलीनंही त्यांनाच समजावलं.  एकटं वाटत असेल तर माझ्याकडे रहायला या, असा प्रस्ताव दिला.  पण तो परकीय जावई कामाला आला.  गुड....म्हणून त्यांनी आपल्या सास-याचं अभिनंदन केलं...आणि मुलीला समजावलं.  इकडे काकूंनाही मोठा विरोध झाला.  एरवी इकट्या असतांना न विचारणारेही विरोध करायला पुढे होते.  मुलाला मात्र सुनेनं समजावलं.  त्यांनी होकार दिला...पण बघ तुला काय वाटतेय ते कर...पण काही बिघडलं तर मला सांगू नकोस...असं सांगून नाराजीही व्यक्त केली.

हो नाही हो नाही करता या दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला.  काकांच्या काही मित्रांनी त्यांना साथ दिली.  रजिस्टर लग्न केलं.  आता प्रश्न रहाण्याचा होता.  दोघांचेही स्वतंत्र फ्लॅट होते.  पण आसपासची लोकं काय बोलतील हा प्रश्न दोघांनाही पडला होता.  म्हणून काकांनी शहराबाहेर नव्यानं उभारण्यात आलेल्या मोठ्या वसाहतीमध्ये एक नवा फ्लॅट घेतला.  त्यांनी त्यांचा आणि कांकूनीही त्यांचा फ्लॅट विकला.  दोघांनीही अर्धे अर्धे पैसे या नव्या फ्लॅटसाठी भरले.  लग्नानंतर दोघांनीही आपल्या जुन्या घरांची आवराआवर करुन नवं घर गाठलं.  या नव्या वसाहतीमध्ये कोणी ओळखीचे नव्हते.  त्यामुळे कोणीही काही वायफळ प्रश्न विचारले नाहीत की  विचित्र नजरेनं पाहिलं नाही.  हे सर्व फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान झालं. 

त्यानंतर कोरोनाचा अटॅक आला.  आईवर नाराज असलेल्या वत्सला काकूंच्या मुलाला या काळात एकाकी आयुष्याचं दुखणं काय हे समजलं.  काकांच्याही मुलाचा राग निवळला.  दोघंही अमेरिकेत काही तासांच्या अंतरावर रहात आहेत.  त्या दोघांनीही आपल्या आई-वडीलांनी एकमेकांना साथ दिल्याचे कौतुक केले.  आणि त्यांच्या नव्या नात्यानं परदेशी रहाणा-या या दोन मुलांमध्येही नवं नातं तयार झालं.  तिथेही कोरोना काळ कठीण आहे.  पण दोघंही कुटुंब आता एक झाली...ही त्यातल्यात्यात चांगली बातमी.  काकांची मुलगीही आता काकूंबरोबर चांगलीच रुळावली...अर्थात व्हिडीओ कॉलवरुन...कारण सध्याच्या परिस्थितीत आणखी सहा महिने तरी कोणाला भेटता येणार नव्हते.  या सर्व काळात आपली आई आणि वडील एकटे पडले असते...या जाणीवेनं मुलांना हळवं केलं होतं...कधी नव्हे ती ही मुलं आपल्या आई वडीलांबरोबर रोज न चुकता गप्पा मारायला लागले...दोन्ही मुलांच्या जीवनातही एक जागा मोकळी झाली होती.  काका काकूंच्या निर्णयांनं ती जागा भरुन निघाली होती...

आम्ही अजूनही त्या लाईटच्या खांबाखाली उभं होतो.  खूप बोलायचं होतं...पण आता निघायला हवं होतं.  काका या परिसरातील सोसायटीच्या कामासंबंधात आले होते.  ते काम करेपर्यंत काकू सहज चालायला गेल्या आणि आमची भेट झाली.  काकू दोन वर्षभर कुठे गायब होत्या हे मला समजलं...आम्ही दोघांनाही शुभेच्छा दिल्या...छान निर्णय घेतला म्हणून सांगितलं.  मोबाईल नंबर घेतले....मध्येच मला हसू आलं...काकूंनी कारण विचारल्यावर मी म्हटलं...तुम्ही तर एका जाहीरातीतली स्टोरी चोरलीत...त्या जाहीरातीमध्येही सेम टू सेम हीच स्टोरी आहे...काका लगेच हसून म्हणाले...नाही,  त्यांनी आमची स्टोरी चोरलीय...सेम टू सेम....यावर आम्ही चौघंही मनसोक्त हसलो...कोरोनानंतर सर्व सुरळीत झालं की घरी या म्हणून एकमेकांना आमंत्रण देऊन निरोप घेतला.  कोरोना काळतला आणखी एक अनुभव...थोडा वेगळा...पण काळाची गरज जाणणारा....

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. Chan katha, वेगळा विषय आणि सत्य परिस्थिती.

    ReplyDelete

Post a Comment