दत्त
नावाचा
संस्कार
कोरोनानं आणखी एका परंपरेचा बळी घेतला. मंगळवारी दत्तजयंती झाली. चौल येथील दत्तमंदिरात गेल्या अनेक वर्षापासून दत्तजयंतीला पाचदिवस यात्रा भरते. कोरोनामुळे यंदा ही यात्रा रद्द झाली. पेपरमध्ये आलेली याबाबत एक छोटी बातमी फेसबुकवर वाचायला मिळाली. बातमी छोटी होती...पण या बातमीमुळे अनेक आठवणींना उजाळा मिळाला...यात्रेबाबतच्या आठवणी आणि दत्ताच्या....दत्ताच्या डोंगराच्या आठवणी...
रेवदंडा, चौल, नागांव या गावांमधील बहुधा प्रत्येक रहिवाशांचं दत्ताबरोबर अनोखं नातं आहे. तसंच माझंही...अगदी जन्मापासून...दत्तमहाराज म्हणजे कोण...देव...श्रद्धेचं स्थान...एक शक्ती...की यापलीकडे कोणी...हे काही माहीत नाही. पण हे दत्तमहाराज म्हणजे एक संस्कार म्हणून आम्हाला नेहमी भेटले. कितीवेळा या मंदिराच्या साडेसातशे पाय-या चढल्या...एवढ्यावेळा चढल्या की आताही डोळे बंद करुन जरा आठवण काढली तरी त्या पाय-या समोर येतील. या मंदिराच्या परिसरात अनेक कार्यंक्रम झाले. पूजा झाल्या. जेवणावळी झाल्या. या प्रत्येक कार्यक्रमानं लहानपण
घडवलं...चांगले मित्र मिळाले...मैत्रिणी मिळाल्या...रक्ताच्या नात्यासारखेच काका, मामा, भाऊ मिळाले...ही नाती या दत्तामुळेच एवढी घट्ट झाली की, आता कितीतरी वर्षानंतरही या मंडळींची जरा आठवण काढली आणि फोन केला की, तासनतास गप्पा मारल्या जातात. मन हलकं होतं. कधी या भागात गेले तर हक्कानं ही मंडळी घरी बोलवतात...आणि तेवढ्याच प्रेमानं स्वागत करतात...अगदी कालपरवाही असेच फोन आले...यावर्षी यात्रा नाही....पण येऊन जा...हे हक्काचं आमंत्रण होतं...हे सर्व संस्कार..सहकार्याची भावना...आपुलकी...हे सगळं या दत्तानं दिलं.
दत्त महाराज म्हणजे काय...देव...पण त्यापलीकडेही जाऊन त्यांच्याकडे बघितले गेले. आयुष्यातल्या अनेक चांगल्या गोष्टी त्यांनी नकळत...एका जागी राहून शिकवल्या....चौलचे दत्त महाराजांचे डोंगरावरील मंदिर म्हणजे आमच्यासाठी एक शाळा ठरली. या दत्ताच्या सावलीत आणि वार्डेगुरुजींच्या प्रेमाच्या धाकात आम्ही घडलो...या मंदिरात अनेकवेळा पुजेनिमित्त जेवणाचे कार्यक्रम असायचे...हजारो लोकांचे जेवण असायचे...आम्हा सर्व बच्चे मंडळींसाठी हा मोठा उत्सवच असायचा...नशीबानं तेव्हा टीव्ही किंवा मोबाईलचं फॅड नव्हतं...त्यामुळे सर्व निर्मळ वेळ या कार्यक्रमात गुंतला
जायचा...डोंगरावर जेवणाची भांडी चढवायची...सामान चढवायचं...जेवण करणा-या आई आणि काकूंच्या मध्ये थोडी लूडबूड करायची...की आमचं काम झालं...मग बाकी वेळ वडाच्या पारंब्यावर अगदी पोटात दुखेपर्यंत लोंबकाळायचं...निखळ आनंद म्हणजे काय, याचे धडे येथे मिळाले. खेळायला फारशी साधनं नसली तरी मैत्रीच्या दो-या चांगल्या होत्या...इथे कोण कुठल्या घरातले हा भेदभाव नव्हता...मुली म्हणून मुलांनी कधी त्रास दिला नाही...की कमी लेखलं नाही...वडाच्या पारंब्यावर घेतलेले हे झोके कधीही चुकीचे ठरले नाहीत...त्यांनी जन्मभराचा मित्रपरीवार दिला...समांतरची भावनाही त्यांच्याकडूनच मिळाली....आजही याच दत्ताच्या कृपेनं हा मित्रपरिवार भक्कम आहे...त्यामुळेच शाळा सुटून अनेक वर्ष झाली तरी वार्षिक गेटटूगेदर ठरल्यावर कुठे जायचं हा प्रश्न आला की सर्वानुमते एकच उत्तर...दत्तावर...जणू हा दत्त आमच्यातलाच...आमचा सर्वांचा कॉमन फ्रेंड...
या दत्तावर चालणा-या पूजा आणि जेवणावळी म्हणजे एक मोठा धडा होता. इथेही सर्व समान...गरीब-श्रीमंत...जात-पात यापलिकडे गेलेली फक्त निर्मळ माणसं दत्ताच्या छायेत एक होत असत...अशा वातावरणात, आम्ही छोटी मंडळी खेळात मग्न असतांना इकडे मस्त चुलीवर जेवणाची तयारी सुरु असायची...जेवण झालं की ते पानावर वाढण्यासाठी रांगा लावायच्या...पानात काय, कुठे वाढायचं...याचं पहिलं शिक्षण याच शाळेत मिळालं...या सर्वांत दुपार पार जायची...सायंकाळचे चार वाजले की शेवटची पंगत बसायची...पंगत शेवटची असली तरी स्वादाची...मेनू काय तर खिचडी...एखादी उसळ...वडे...मठ्ठा आणि टोमॅटो, काकडीच्या कोशिंबीरीच्या वाट्या. या वाट्यांमध्ये कोशिंबीरीचे पाणीच खूप असायचे...सगळा छूपा स्वाद तर त्यातच असायचा...ते कोशिंबीरीचे पाणी आणि खिचडी यांचे भन्नाट कॉब्मीनेशन...आयुष्यात साधेपणा असावा...हा साधेपणाचा आनंद कसा घ्यायचा, हेच या प्रसादावरुन कळायचं...हे सगळं पोशाखातही असायचं...अशा कार्यक्रमात भरजरी कपडे घातले तर पहिले वार्डे गुरुजी म्हणायचे, हे काय देवाला दाखवायला घातलंय का...या सर्वांमागची भावना तेव्हा कधी कळली नाही...पण ज्याला आपण वंदन करतो त्यापुढे त्याचे सर्व भक्त समान
असतात...दत्तापुढेही तसेच होते...कोणी भरजरी साडी घातली तर त्याला जास्त मोठा आशिर्वाद...आणि कोणी साधे कपडे घातले तर त्याला कमी असा भेदभाव तर इथे होणार नाही...ही जाणीव गुरुजी आम्हाला त्यांच्या शब्दात करुन द्यायचे...हा गुरुजींचा धडा अद्यापही अंगात मुरला आहे. साधेपणा पहिला आहारात असावा...मग आपल्या दिसण्यात...आपले साथसोबती उत्तम असले की साधेपणातही सोन्यापेक्षाही अमुल्य असे क्षण आपल्याला अनुभवायला मिळतात...हा धडा या दत्तानं दिला...अगदी नकळत...अनुभवातून...
दत्ताची यात्रा म्हणजे आम्हा सर्वांचा वर्षाकाठचा मोठा उत्सव...सर्व गावच्या यात्रा भरतात तशीच ही सुद्धा एक यात्रा...अगदी पाच दिवस या यात्रेला जायचं म्हणजे जायचंच...बहुधा चालतच किंवा सायकली वरुन...कुटुंबासोबत असेल बैलगाडी किंवा रिक्षा....या रंगीबेरंगी वातावरणातरही पहिली आठवण दत्ताची...यात्रा कितीही मनमोहक असली तरी पाचही दिवस साडेसातशे पाय-या चढायच्या आणि त्याच्या चरणी नतमस्तक व्हायचं...प्रत्येक पायरीची वेगळी ओळख...वर्षातून एकदा यात्रा भरत असली तरी बहुधा प्रत्येक वर्षी प्रत्येक पायरीवर काय असणार याचं गणित आधीच सुटलेलं असायचं...इथे हेच असणार हे जणू ठरलेलं....पाय-या चढतांना या सर्वांची उजळणी करायची...गजरे, वेण्यांच्या दुकानात थांबायचं...दत्ताला हवी म्हणून मनासारखी वेणी घ्यायची...कधी पिवळी तर कधी पांढरी शेवती...क्वचित अबोलीचीही वेणी असायची...यातच वरणभात वेणीही यायची...पांढरी आणि पिवळ्या शेवंतीचे सुंदर मिश्रण...थोडी जाडजुड असलेली ही वेणी मनात एक स्वार्थी हेतू ठेवून कितीतरी वेळा आईला घ्यायला लावलीय...ही थोडी खरेदी
झाली की थेट दत्ताच्या दरबारात...मंदिर जवळ आलं की एक वेगळ्या सुगंधांची दरवळ जाणवायची...सगळं मंदिर गजरे, फुलं, हारांनी सजलेलं असायचं...या फुलांचा आणि उदबत्तांचा सुवास सर्वत्र दरवळत असायचा...याच्या सोबतीला डोंगरावर असलेल्या चाफ्यांच्या फुलांचा दरवळ...या सर्वांचा मिलाफ झाल्यावर एक मनाला ओढून घेणारा मोहक सुवास मंदिरात पसरलेला असायचा...मग दर्शनाचा नंबर लागायचा...यावेळी आपली वेणी दत्ताला द्यायची...मग तिच वेणी परत घेण्याची धडपड व्हायची...दत्तच तो...त्याच्यापासून हा स्वार्थीपणा कधी लपून राहीला नाही...आपण त्याला दिलेली वेणी परत घेतली याचं समाधन...तोही किती निस्वार्थी...त्या वेणीचा नुसता दरवळ घेऊन ती परत आणणा-याच्या पदरात घालायचं त्याचं काम...मग ही वेणी जपून ठेवायची. दुस-यादिवशी शाळेत जातांना ही वेणी घालूनच जायची. प्रार्थनेसाठी उभं राहिलं की मग सर्व मैत्रिणींची मज्जा...कोणीची वेणी कुठली...छोटी की मोठी...साधी की वरणभात...याची नुसती डोळ्यांनी चाचपणी व्हायची...मग चौकशी...ही दत्ताची वेणी दिवसभर केसात असायची...देवाला व्हायलेली वेणी म्हणून ती सुकल्यावर कोणाचा पायही त्यावर पडू नये म्हणून आई ती एका खड्ड्यात टाकायची...त्यात खतामध्ये सामिल व्हायची...आणि काही खत म्हणून झाडांच्या मुळाशी जायची
आता मागे वळून पहायल्यावर समजतं...हा दत्त म्हणजे खुल्या हाताचा...त्याला
देण्याच्या नावानं वेणी, पेढे घेतले जायचे...प्रत्यक्षात हे दत्तानं कधी घेतलंच
नाही...ते त्यांनी तसंच्या तसं देणा-याला परत दिलं...म्हणजेच आपण जेवढं दुस-याला
देतो....तेवढ्याची परतफेड होते. त्यामुळेच
आपल्याला देणा-याचा दिलदारपणा बघण्यापेक्षा आपण कोणाला काय दिलंय याचं मोजमाप केलं
की आपोआप सर्व कोडी सुटतात...
अशी आयुष्यातील अनेक कोडी या दत्ताच्या छायेत सोडवली...अजूनही सोडवतो...कालपरवा वाचलेली बातमी पुन्हा पुन्हा नजरेसमोर येते...यंदा यात्रा नाही...पण यात्रा नसली तरी तो तिथेच उभा आहे...कायम मार्ग दाखवण्यासाठी...तो म्हणजे दत्त...देव...शक्ती...की एक मार्गदर्शक...कोण ते माहीत नाही...कदाचित या सर्व भूमिकांमध्ये त्याचं अस्तित्व आहे...त्याचा दरवळ आहे...त्याला वाहिलेल्या चाफा आणि शेवंतीच्या फुलांच्या सुवासासारखा त्याचं अस्तित्व आहे...आपल्याला त्याच्यात खेचून घेणारं...आपलंस करणारं....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Khup Sundar lekh
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteखूप सुंदर वर्णन केखले आहे
Deleteखूप छान सुंदर लिहीलाय
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteखूप छान लिहिलंयस, मी दत्तभक्त असल्यामुळे लेखातला सगळं मनाला भावलं!! भक्तीचा सुगंध मनात दरवळला.
ReplyDeleteललिता मॅडम, खूप धन्यवाद...
Deleteखूप खूप धन्यवाद शिल्पा, खूप सुंदर
ReplyDeleteधन्यवाद प्रविण...
DeleteMastach ,ek no
ReplyDeleteधन्यवाद....
DeleteKhup chhan lekh aahe sai..
ReplyDeleteधन्यवाद....
Delete