सणांची एक गोळी....
रविवारी लेकाच्या एका परीक्षेची तारीख आली...पेपर दुस-या शहरात...तीन तासांच्या पेपरला अख्खा दिवस द्यायला लागणार...त्यामुळे सोबत नेण्यासाठी लागणा-या वस्तूंची यादी तयार झाली. अर्थात पहिला नंबर होता तो डिस्पोझेबल मास्कचा. समोरच्याच मेडिकलमध्ये गेले. या मेडिकलचा सर्व कारभार एक महिला बघते...दुकानात फार गर्दी नव्हती. एक महिला काहीतरी घ्यायला आली होती. मी जाऊन मास्कची मागणी केली. दुकान चालवणा-या ताई ओळखीच्या असल्यामुळे त्यांनी चार प्रकारचे मास्क पुढे केले. आणि यापैकी कुठला ते पसंत करा असं सांगून त्या परत आधी आलेल्या महिलेबरोबर बोलू लागल्या. मी सहज बघितलं, त्या महिलेसमोर चार प्रकारच्या गोळ्या ठेवल्या होत्या...त्यापैकी कुठली गोळी कशी आहे, याची माहिती ती महिला घेत होती. दोन दिवसांवर संक्रांतीचा सण आलेला. त्याच दिवसात तिची मासिक पाळीही येणार होती. पाळी आली तर संक्रांतीची पुजा करता येणार नव्हती. त्यामुळे पाळी पुढे जाण्यासाठी चार दिवस गोळ्या घेतल्या जाणार होत्या. डॉक्टरची कुठलीही नोट नव्हती. सर्व माहिती दुकानदार महिलेकडून घेण्यात येत होती...दोघींची बराच वेळ चर्चा झाली...शेवटी एक गोळी त्या महिलेनं निवडली....पाच गोळ्यांची स्ट्रीप घेतली...त्याची किंमत मोजकी...आणि त्या महिलेला चारच गोळ्या हव्या होत्या...चार दिवसानंतर पाळी आाली तर चालणार होती...ही मोलाची खरेदी झाल्यावर त्या महिलेनं माझ्याकडे बघितलं...मास्क घातलेल्या आम्ही दोघी एकमेकींकडे बघून हसलो...सण आला की आपली ही खरेदी पहिली करावी लागले...असं वाक्य माझ्या तोंडावर मारुन ती पुन्हा हसली...पैसे देऊन निघालीही...मी तिच्याकडे बघत होते...ती निघून गेल्यावर मला हवे ते मास्क घेतले...सहज म्हणून त्या दुकानदार महिलेला विचारलं...अशा गोळ्यांचा त्रास होत नाही का...ती दुकानदार महिला म्हणाली...त्रास कसला...एखादा सण आला की आम्ही या गोळ्यांचा जादा स्टॉक मागवतो...इतकी त्यांची विक्री होते. त्रास होत असता तर झाली असती का एवढी खरेदी...मी मनातल्या मनात माझ्या डोक्यावर हात मारुन घेतला. जे सण महिलांसाठी आहेत. महिलांचा हक्क म्हणून साजरे केले जातात, त्या सणांना त्या स्त्रीच्या स्त्रीत्वाचाच त्रास होतो...ही कसली पद्धत....आणि कसला सण....
अगदी सुरुवातीला मी सुद्धा अशा प्रकारच्या गोळ्यांच्या आहारी गेले होते. कुठे बाहेर कार्यक्रमाला गेले तर तिथल्या कार्यक्रमात मासिक पाळीचा त्रास नको...बाजुला बसायला नको....म्हणून या गोळ्यांचा आधार घेतला गेला. पण निसर्गाच्या विरुद्ध केलेली कुठलीही गोष्ट निसर्ग सव्याज परत करतो. हाच अनुभव मला या गोळ्यांच्या बाबतीत आला. अनेक शारीरिक त्रास सहन करावे लागले. नंतर अशा प्रकारच्या गोळ्यांना कायमचा नकार दिला. आणि ज्यांना माझा, माझ्या स्त्रीत्वासह स्विकार नाही, अशांचा मला स्विकार नाही...हा थोडा क्रांतीकारक विचार मी तेव्हापासून सुरु केला....अंमलात आणला...कोणी मागे काय बोलेल...याचा विचार होता...पण या सर्वांपेक्षा मला माझे आरोग्य महत्त्वाचे वाटले. मुख्य म्हणजे, जे निसर्गानं दिलं आहे, त्याचा आपण तसाच स्विकार केला पाहिजे, त्यात मोडतोड करण्याचा हक्क...अधिकार आपल्याला नाही याची जाणीव आपण आपल्यालाच करुन दिली पाहिजे...तेव्हाच या दुष्टचक्रातून सुटका होईल. आता जेव्हा या महिलेला अशाच गोळ्यांच्या आहारी गेलेले पाहिले, तेव्हा या सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. काहीवेळा मासिक पाळीमुळे ठराविक कार्यक्रमांना जाता आले नाही. अशावेळी समोरुन एखादी महिलाच विचारायची आणि न विचारताही सल्ला द्यायची...गोळी घेतली नव्हतीस का...माहित होतं ना कार्यक्रम आहे ते...आता पुढच्यावेळी लक्षात ठेऊन गोळी घे...जणू ती गोळी म्हणजे साधी लेमनेटची गोळी...
असो...या सर्वातही अनेक चांगल्या माणसांचे मार्गदर्शन मिळाले. त्यातल्या प्रमुख म्हणजे
डॉ. स्नेहलता देशमुख...मॅडमच्या नावातच स्नेह...विद्वत्ता म्हणजे काय हे मॅडमबरोबर बोलले की कल्पना येते. मॅडमच्या घरी गणपतीचा सण मोठ्या उत्सवात साजरा होतो. खूप छान गौरीची सजावट केली जाते. या गणेशोत्सवासाठी पहिल्यांदा मॅडमनी मला फोन करुन आग्रहानं बोलावलं...आमच्याकडे चालतं हं...पाळी असली तरी ये...चालेल...असा प्रेमळ आग्रह होता. त्यांनी फोनवरुन केलेल्या आग्रहामुळे आणि अशा आगळ्या आमंत्रणामुळे डोळ्यात पाणी आले होते. हिच खरी विद्वत्ता....स्त्रीला तिच्या स्त्रीत्वासह स्विकरण्याची मानसिकता...वास्तविकता ही मानसिकता दाखवण्यात महिलाच कमी पडतात, असा अऩुभव आहे. आपण ज्या दिव्यातून गेलो, त्याच दिव्यातून दुसरीला जातांना बघणं...आणि त्याचा आनंद घेणं...हेच एकमेव कारण असावं त्याच्यामागे बहुधा...
दोन वर्षापूर्वी प्रसिद्ध लेखक, वक्ते देवदत्त पटनाईक यांचे भाषण ऐकण्याचा योग आला होता. त्यांच्या भाषणानंतर एका महिलेनं त्यांना प्रश्न विचारला होता की, पुराण काळातही महिलांना मासिक पाळी आली की पुजेच्या कार्यापासून दूर ठेवलं जायचं का....अर्थात देवदत्त यांनी त्याला नाही उत्तर दिलं होतं...पण सोबत महिलांची मानसिकताच याला जबाबदार असल्याचं सांगितलं होतं. हे खरचं आहे. मला आठवतं लहानपणापासून संक्रांत आली की, संक्रांतीच्या आदल्या दिवशी, भोगीला केस धुतले पाहिजेत हे मनावर बिंबवलं गेलं. असं केलं नाही तर नव-याला रोग होतो, अशी भीती घातली गेली....भविष्यात नवरा निरोगी मिळावा म्हणून हा सगळा खटोटोप केला जायचा. तेव्हा संक्रातीला ब-यापैकी थंडी असायची...सकाळी सातची
शाळा...त्यातल्या त्यात केसही मोठे...तरीही त्या कडाक्याच्या थंडीत कुडकुडत केस धुतले जायचे...का, तर नव-याला काही व्हायला नको. चुकून शाळेत केस न धुता गेलं तर मैत्रिणी चिडवून हैराण करायच्या...भविष्यात होणा-या नव-यासाठी हा खटाटोप...पण समजदार झाल्यावर मासिक पाळीला मात्र कसे स्विकारावे हे शिकायचे राहूनच गेले...त्याऐवजी ती पाळी कुठल्या कार्यात अडचण असल्याचे मनावर ठासले गेले. मग ही अडचण तात्पुरती दूर करायची असेल तर एक गोळी काफी है...हा विचार आला...पण या गोळीचे त्या बाईच्या शरीरावर काय परिणाम होत असतील हे जाणणेही गैर ठरले...नव-याच्या आरोग्यासाठी न कळत्या वयातही तयार होणारी बाईंची मानसिकता जेव्हा कधी स्वतःच्या आरोग्याबाबत विचार करायला तयार होईल, तेव्हाच या अशा गोळ्यांचा वापर कमी होईल...
मास्कची खरेदी झाली...आणि नकळत भेटलेल्या महिलेमुळे अस्वस्थता
आली. घरात लेकाचा अभ्यास जोरात चालू
आहे...मनात विचार आला या परीक्षांबरोबर बाहेरच्या जगातील अशा नकळत येणा-या
परीक्षांसाठी याची तयारी झाली पाहिजे...निदान पुढची पिढी तरी ख-याखु-या
शिक्षणाच्या आधाराने साक्षर झाली पाहिजे...सर्वच बाबतीत...हेच वाण असेल या नव्या पिढीसाठी....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
योग्य लेखन, योग्य मुद्दा आहे. गोळ्या देणारीही महिला, घेणारीही महिला आहे. अश्या गोळ्यांचा हा अयोग्य वापर आहे.
ReplyDeleteअगदी योग्य... मी ही पूर्वी घेतल्या होत्या या गोळ्या... त्याचा त्रासही झाला पण नंतर मात्र गौरी पूजन, पारायण अशा प्रसंगी पाळी आली किन्वा येणार असली तरी मोकळ्या मनाने मी माझ्या सासुबाईंना सांगायला लागले... त्यांनी ही समजून घेतलं हे ही विशेषच... असे बदल व्हायला लागलेत ही खरच चांगली गोष्ट आहे... छानच लिहिलस सई
ReplyDelete