हिचे खेळणे....त्याचे खेळणे....

 

  हिचे खेळणे....त्याचे खेळणे....


Yesss….Thankq….sooo…much….मला वाटलंच होतं...तू काहीतरी वेगळं गिफ्ट देशील म्हणून...मला पहिली गाडी मिळाली....मस्त....आता मी सुद्धा त्या सम्याबरोबर रेस लावेन.... Thankq  मावशी....खेळतानाचा व्हिडीओ शेअर करते....आता बाय.....असा अर्धा इंग्रजाळलेल्या आणि अर्धा मराठीतला आभार मानणारा फोन आमच्या ग्रुपमधल्या एका शेंडेफळाचा...मुलाच्या शाळेदरम्यान अनेक मैत्रिणी झाल्या...त्यातल्याच एका मैत्रिणीच्या मुलीचा.  दोन वर्षापूर्वी या मैत्रिणीनं मुलाच्या पुढच्या शिक्षणासाठी दुस-या शहरात घर घेतलं...ती या शहरातून गेली तेव्हा थोडी रुखरुख लागली...एकतर एक मैत्रिण दुरावणार म्हणून आणि दुसरं म्हणजे तिची लेक...या मैत्रिणीला मुलानंतर दहा वर्षानंतर मुलगी झाली.  गोरी गोरी पान...नाजूक...आमच्या सर्व ग्रुपमध्ये तिच छोटी....त्यामुळे सर्वांची लाडकी झाली....खरं नाव काहीही असूदे...आम्ही तिला छोटी, परी, लाडकी असंच बोलतो...मात्र तिच पण दुस-या शहरात गेली....तरी आमची मैत्री दुरावली नाही, हे विशेष...आणि तिची गोड परी मलाच काय पण आम्हा सर्व मैत्रिणींनाही विसरली नाही हेही तेवढेच विशेष...एरवी या गोड परीच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तिच्या घरी धडक द्यायचो...पण यावर्षी तिला ऑनलाईन भेट आणि शुभेच्छा दिल्या...कोरोनामुळं सगळंच बदललं...तसंच मी जरा गिफ्टचं स्वरुपही बदलायचं ठरवलं...एरवी कोणाचा वाढदिवस असला तर पुस्तक भेट देण्यावर माझा भर असतो.  या छोट्या परीलाही अनेकदा पुस्तकं गिफ्ट केली आहेत.  पण यावर्षी ऑनलाईन छान खेळण्यातल्या गाड्यांचा सेट दिसला...त्यातून या गाड्या मोडून आपल्याला हवं तसं गाडीचं डीझाईन करण्याचीही सोय त्यात होती...मुलीला हे गिफ्ट द्यावं का नाही...असला विचार न करता गिफ्ट बुक केलं...मैत्रिणीचा पत्ता घातला...आणि ऑनलाईन पाठवून दिलं...हे गिफ्ट आवडल्याचा जेव्हा छोट्या परीचा फोन आला तेव्हा माझ्या पसंतीची पोच पावती मिळाली....



गिफ्ट काय घ्यावं हा आपल्याकडचा मुख्य प्रश्न...वाढदिवसाचं आमंत्रण आलं की मुलगा की मुलगी ही वर्गवारी केली जाते...आणि मग गिफ्ट घेतलं जातं.  ही वर्गवारी एवढी आपल्या आणि विक्रेत्यांच्याही अंगात मुरली आहे की,  दुकानात पाय ठेवल्यावर दुकानदार आपल्याला पहिला प्रश्न विचारतो...मुलगा की मुलगी...ही विभागणी करुन दुकानदार आपल्याला वर्गवारीनुसार नक्की केलेली खेळणी पुढे करतो...मुलींसाठी बाहुल्या,  भातुकलीचे खेळ,  फार फार तर दोरीउड्यांची दोरी, क्ले चे खेळ...किंवा दागिने बनवता येतील असा एखादा बॉक्स असे काही ऑप्शन पुढे केले जातात.  मुलगा असेल तर गाड्या, स्पायडरमॅन पुढे येतात...फारकाय रुबीस्क्युब सारखे बुद्धीवंत गटात मोडणारे खेळणेही एकदा मला फक्त मुलांसाठीच्या कॅटगरीत दाखवण्यात आले होते.  माझ्या एका मित्राच्या मुलीचा वाढदिवस 8 मार्चला येतो.  आंतरराष्ट्रीय महिला दिवस....ही मुलगी पाच वर्षाची झाली तेव्हा तिच्या वाढदिवसानिमित्त या मित्रानं छोटी पार्टी ठेवली होती.  मलाही आमंत्रण होते.  तेव्हा मी जिथे नोकरी करत होते, त्या ठिकाणाच्या बाजुलाच खेळण्यांचे मोठे दुकान होते.  मधल्या सुट्टीत या दुकानातून मी गिफ्ट खरेदी केले.  अर्थात दुकानात पाऊल ठेवल्यावर मला वर्गवारी विचारण्यात आली होती.  मुलींच्या कोट्यातील खेळणी मला दाखवण्यात आली...पण ती दूर करुन मी हट्टानं एक गाडी घेतली.  हे गिफ्ट घेऊन मी जेव्हा ऑफीसमध्ये परत आले होते, तेव्हा मला गिफ्ट काय घेतलं अशी विचारणा झाली.  तेव्हाही एका मुलीसाठी गाडी घेतली म्हणून सर्वांनी माझी चांगलीच फिरकी घेतली.  वरुन महिला दिनाचा इफेक्ट अशी टिप्पणीही झाली होती.  पण तेव्हापासून हे हटके व्यसन मला लागलं.  मुलींना कधी गाड्यांबरोबर खेळावं वाटत नसेल का...हा प्रश्नही पडू लागला.  तेव्हापासून मी पहिल्यांदा माझ्या मनातली गिफ्टची संकल्पना बदलून टाकली.  जग बदलेल तेव्हा बदलेल...पण आपण तर पहिलं बदलून बघूया या न्यायानं...

याच बदलेल्या संकल्पनेतून नंतर अनेक गम्मती जमती झाल्या.  दरवर्षी पुस्तकांच्या प्रदर्शनात वारेमाप खरेदी होते.  त्याच प्रदर्शनात गिफ्ट देण्यासाठी पुस्तकं शोधायला लागले.  मेकींग प्रकारातली पुस्तकं चांगली कामाला येऊ लागली.  जहाज, विमान, गाड्या बनवा अगदी किचनमध्येही छान फायदा होणारी पुस्तकं अशा पुस्तक प्रदर्शनात मिळू लागल्यावर गिफ्ट म्हणून ती जास्त उपयोगी पडली. 

माझ्या मैत्रिणीच्या याच मुलीला मी आधीच्या वाढदिवसाला एक छानसं मेकींगवालं पुस्तक दिलं होतं...चार छोटी घरं आणि बगिचा असं पुढ्याचं कटींग असलेल्या या पुस्कतानं या छोटीची चांगलीच करमणूक झाली होती.  विशेष म्हणजे या उद्योगात ती चांगलीच बिझी झाली होती.  त्यामुळे जेव्हा मोठ्या भावाचा क्लास सुटायला वेळ असायचा तेव्हा आईला काहीही त्रास न देता ही छकुली आपल्या आपल्यातच खेळत बसायची.  मी घर बनवायला शिकले,  असं आम्हाला सांगायची...त्याचवेळी तिनं पुढच्यावेळी मला अशी बनवता येणारी एखादी गाडी दे हं...असा प्रेमळ आग्रह केला होता.  यावर्षी


असं पुस्तक बघायला मिळालं नाही.  शेवटी ऑनलाईन शॉपिंगमध्ये बरीच शोधाशोध केल्यावर एक गाडीचं गिफ्ट मिळालं.  एका गाडीपासून दुसरी गाडी बनवता येणार होती.  शिवाय सोबतीला दोन लहान गाड्याही होत्या...त्यांचा स्पिड भन्नाट होता.  आमच्या छोटीला हे नक्की आवडेल हा हिशोब करत मी गिफ्ट बुक करुन तिला पाठवून  दिलं....

अपेक्षेप्रमाणे छोटीनंच फोन केला...फोन करण्यापूर्वी गाड्यांची मोडतोड करुन त्याचे फोटो पाठवले होते.  एका गाडीतून दुसरी गाडी करुन बाकीच्या स्पीडच्या गाड्या भावाला दाखवून झाल्या होत्या...तिचा भाऊ म्हणजेच सम्या...समीर...माझ्या लेकाएवढा...आता काही त्याचे गाड्यांबरोबर खेळायचे वय नाही.  पण तरीही त्यानं त्याच्या गाड्या कोणीही हात लावू नये म्हणून वेगळ्या ठेवलेल्या...आपल्या लाडक्या बहिणीलाही या गाड़्यांना तो हात लावू देत नसे......आता या भावाला छोटीनं आपल्या नव्या गाड्या दाखवून चांगलंच चिडवलं होतं...अर्थात हे सर्व खेळात झालं होतं.  तिचा आनंद म्हणजे आपल्याला आपली गाडी मिळाली हा होता...तिच्या वाढदिवसाला तिला आणखीही काही चांगले गिफ्ट मिळाले होते.  मुलीला फक्त किचनसेट आणि बाहुल्या भेट देण्यामागे कोणाचा काही उद्देश असेल ते माहित नाही...पण


एखाद्या मुलीची आवड नक्कीच वेगळी असू शकते...आणि ही आवड जपायला हवी.  मुलगा की मुलगी हा भेदभाव नेमकं कोण आणि कसं करतं हे पाहिलं तर,  हा भेद आपल्या सर्वांच्याच कृतीत नकळत दडलेला आहे.  मुलींनी त्यांच्या साच्यातील भेटवस्तू न घेता त्यांना आवडलेल्या वस्तू घेतल्या...तर हे तुझ्यासाठी नाही...दादासाठी आहे...असं वर्गीकरण नकळत केलं जातं...ही नकळत केलेली तुलना मग ती मुलगी जन्मभर सांभाळते...त्यामुळे कुठे तरी आपणच आपल्या संकल्पना बदलल्या हव्यात...हळुवारपणे...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

 

 

 

 

 

Comments

Post a Comment