तुमच्यात.....आमच्यात.....आपल्यात....
काय ग संक्रांतीचं काय केलंस की नाही...यावर्षी हळदीकुंकवाचा काय बेत...करणार की नाही...की कोरोना...कोरोना करुन सगळं टाळणार की काय...वाण घेतलंस का काही...कोणोला बोलवणार का....श्वास न घेता, सलग प्रश्न विचारणारी एक मैत्रिण...साधारण फोन केल्यावर पहिला प्रश्न विचारला जातो...काय कसं काय...वेळ आहे ना...बोलूया का...पण या मैत्रिणीने असले कधी सोपस्कार केले नाहीत...तिची ती पद्धतच नाही....माझा हा नेहमीचा अनुभव...त्यामुळे तिच्या प्रश्नांचा भडीमार संपला की बोलायचं, हे जाणून होते...दहा-बारा सलग प्रश्न विचारल्यावर तिचा प्रश्नांचा ओघ संपला...मग मी एका शब्दात उत्तर दिलं...नाही...यावर्षी हळदीकुंकू नाही...मग पुन्हा प्रश्नांचा भडीमार...अशा प्रश्नांच्या फैरी आणि माझी मोजकी उत्तरे...साधारण अर्धा तासाचं आमचं बोलणं झालं...तिचं समाधान झाल्यासारखं वाटलं. बहुधा माझं मत ओव्हर वाटलं असणार...तिनं फोन ठेवल्यावर मी हुश्श म्हणत फोन बाजुला ठेवला....माझ्याकडेही हळदीकुंकवाची तयारी चालू होती...पण वेगळ्या पद्धतीची...
गेलं वर्षच वेगळं होतं. कोरोना नावाचा रोग काय आला...सर्व जगाची घडी विस्कटून गेली. पण या कोरोनामुळे ब-याच गोष्टी शिकताही आल्या...अनेक वर्ष जोपासलेल्या परंपरा नकळत पुसल्या गेल्या...नवीन पद्धती रुजू झाल्या...माझ्या मते तर या रोगानं आपल्याला आरसा दाखवला. ठराविक साच्यात बांधलेलं आयुष्य या कोरोनामुळे वेगळ्या वाटेवर आणलं. मैत्रिणीचा फोन आल्यावर कोरोनामुळे बदललेले वेळापत्रक आठवलं...माझं मलाच हसू आलं...आत्तापर्यंत सकाळी नव्हे पहाटे चार वाजता उठून सगळा स्वयंपाक करुन सात वाजता चालायला जाण्याचा माझा रिवाज होता...गेली दहा वर्ष तरी माझी अशीच जीनवशैली होती. मात्र कोरोनाच्या एका फटक्यानं या वेळापत्रकाला पार कोलमडून टाकलं. नव-याचं ऑफीस आणि लेकाचं कॉलेज थेट घरात आलं. दोघंही मध्यरात्रीपर्यंत लॅपटॉपसमोर...त्यामुळे सर्वच शेड्यूल बदललं...या सर्वात मला माझे केलेले काही नियमही बदलावे लागले. नेमानं पाळलेल्या काही परंपरांना मागे सोडून नव्याचा कास धरण्याची संधीही या रोगामुळं मिळाली. ऐरवी श्रावण महिन्यात आणि नवरात्रीमध्ये देवीच्या मंदिरात जाऊन देवीची ओटी भरत असे. मात्र नवरात्रीमध्ये देवळं बंद होती. मग देवीच्या ओटीचं काय...पण हा प्रश्न आपसूक सुटला...मंदिराच्या आसपास असलेल्या भाजी विक्रेत्यांना गाठलं...त्यांची ओटी भरली...नमस्कार केला...या कोरोना काळात या देवींनी कितीतरी घरातील भाजीची गरज भागवली होती. शिवाय स्वतःच्या संसाराचा गाडा या कठीण काळात चालवला होता. हीच दुर्गा आणि अन्नपूर्णा म्हणून या महिलांना देवी मानून नमस्कार केला होता.
आता संक्रांत आली. संक्रांतीमध्ये हळदीकुंकवाला काय करायचं म्हणून विचार चालू होता. शेवटी पाच साड्या घेतल्या. या साड्याचे ब्लाऊजपीस आणि प्रत्येक साडीसोबत एका पाकीटात शंभर रुपये आणि तिळगूळ...अशी पाच पार्सल तयार केली. मैत्रिणीचा फोन आला तेव्हा याच पाच पॅकींगवर शेवटचा हात फिरवत होते. तिला याची कल्पना दिली....पण तुझं काहीतरी वेगळंच असतं म्हणून तिनं लगेच मतंही व्यक्त केलं होतं...तिचंचं बोलणं ऐकत मी या साड्यांच्या पिशव्यांची पॅकींग करीत होते. या मैत्रिणीची मतं वेगळी होती...आपल्या परंपरा जपायला नको का...हे वाक्य तिच्या बोलण्यातून कधी आलं नाही असं झालं नाही...प्रत्येकाला परंपरांचा अभिमान असतो...पण त्या परंपरा जशाच्या तशा उचलायच्या आणि त्याच रस्त्यावरुन चालायचं हे माझ्या कधीच पचनी पडलं नाही. त्यामुळेच यावर्षी दरवर्षीचा एक पायंडा मोडला. हळदीकुंकू करायचं...पण ते वेगळ्या महिलांबरोबर...ज्या आपल्यासाठी झटतात...आपल्या अवतीभोवती असतात...अगदी आपल्या नजरेसमोर असतात...तरीही त्या आपल्या कंपूमध्ये कधीही येत नाहीत. त्यांच्याशिवाय आपली कामं होत नाहीत. तरीही आपण त्यांना आपल्यात सामावून घेत नाही...यावर्षी ही दरी दूर करायचं ठरवलं. आमच्या भागात साफसफाई करायला एक महिला येते...पन्नाशी ओलांडलेली असणार...साडीच्या नि-या खोचून एका लयीत कचरा काढणा-या या मावशी नेहमीच्या...ओळखीच्या....एरवी आमची फक्त हाक मारण्यापूरती ओळख...पण कोरोना काळात या दुर्गेची खरी ओळख पटली. आम्ही जेव्हा रोग आला...रोग आला...करत घरात बसलो होतो, तेव्ही ही दुर्गा हातात झाडू करुन सर्व परिसर स्वच्छ ठेवत होती...त्यामुळे यावर्षी हळदीकुंकवाचं निमित्त करत माझं वाण तिला देण्याचा निर्णय घेतला. अशीच एक महिला नेहमी बघत होते. अगदी बारीक अंगकाठी...सावळ्या रंगाची ही महिला भांड्याधुण्याची कामं करते. नेहमी दुपारी लेकाला शाळेतून घेऊन येतांना तिला बघायचे...गार्डनच्या शेजारी ठेवलेल्या बाकावर ती त्या ठराविक वेळी बसलेली असायची. हातात बिस्कीटांचा पुडा आणि पाण्याची बाटली...पण तिला कधी तिचं नाव काय...कुठे काम करतात हे विचारायची सवड झाली नव्हती...काही दिवसापूर्वी ती महिला पुन्हा तिथेच बसलेली दिसली. मी नकळत तिच्याकडे गेले. तिची
चौकशी केली. तेव्ही समजलं, नव-यानं सोडलंय, दोन मुलं आहेत...त्यांना आईच्या ताब्यात देऊन ही बाई धुण्याभांड्यांची कामं करते. लॉकडाऊनमध्ये सुरुवातीला सर्व जेव्हा बंद होतं, तेव्हा खूप हाल झाले...पण तेव्हाही आसपासच्या दुकानात घरपोच दूध आणि किराणा माल पोहचवण्याचं काम तिनं केलं. आता धुण्याभांड्यासाठी घरात येऊ देतात...त्यामुळे पुर्वीची कामं सुरु झालीत...याशिवाय माझ्या नेहमीच्या भाजीवाल्या मावशीही आहेत वाणाच्या यादीमध्ये...
या अशा गोष्टी ऐकल्या की विचार येतो,
आमच्यात...तुमच्यात...हे शब्द सोडून आपल्यात...हा शब्द कधी तरी आपलासा
करावा लागणार...परंपरा...आमच्यात...तुमच्यात...या शब्दांचा खरा अर्थ काय...माझ्यामते
तरी परंपरा म्हणजे जी, कणा कणानं बदलत जाते.
स्थळ, वेळ, परिस्थिती नुसार तिच्यात बदल होतात. माणसाच्या जीवनावर तिचा सकारात्मक परिणाम
होतो...आणि कोणालाही सहज आणि तेवढ्याच स्वच्छंदीपणानं तिचा स्विकार करावासा
वाटेल...परंपरा म्हणजे कसंलं तरी ओझं डोक्यावर घेतल्याचा भास होणार नाही...तर प्रत्येकवेळी
नाविन्याचा भास होईल असं काहीतरी...
यामुळेच की काय, आमच्यात असं
नाही...आपल्यात असं नाही....ही वाक्य तोंडावर फेकणा-या व्यक्ती मला तरी फसव्या
वाटतात. माझे असेच परिचित कुटुंब
आहे, त्यातील सून सर्व सणवार-सोहळे साजरे
करते...स्वतःची नोकरी सांभाळून हे सगळं ती साजरं करते म्हणून मला खूप कौतुक
वाटतं...मात्र पहिल्यांदा हे सर्व सासूच्या धाकापोटी करत असावी असा समज होता. मी तिला याबाबत विचारलं होतं...तेव्हा ती चक्क
नाही म्हणाली...तिच्या सासूनी पहिल्यांदाच सांगितलं होतं...हे सर्व माझं...माझ्या
पद्धतीचं...तुला आवडलं तर कर...नाहीतर नको...यानंतर काही वर्ष हिनंही घरात लक्ष
घातलं नाही...पण सासू सर्व सणवार एवढ्या आनंदानं साजरी करायची की, नाही म्हणूनही
ती त्यात ओढली गेली...आणि आता सासूपेक्षाही जोरात सर्व सण साज-या करतात बाई...या
सर्वांचे श्रेय ती तिच्या सासूच्या वागण्याला देते..
एकूण काय, हेच करा असा अट्टाहास करण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीच्या मताचाही आदर करायला हवा...आमच्या घरातही काही वेगळं नाही...मी कशी वागते, याचं श्रेय नव-याच्या विचारांना...कुठलीही कल्पना आधी त्याला सांगितली की, नकार नसतो...चालेल की...चांगला विचार आहे...अशा सकारात्मक विचारांनी तोही सोबत येतो....आता यात लेकाच्या विचारांचीही भर असते...त्यामुळे हे आमच्यात...तुमच्यात या शब्दांऐवजी आमच्या कुटुंबात आपल्यात हा शब्दच अधिक बोलला जातो....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Khup chhan lekh
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteछानच
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteसुरेख लेख. ह्या सर्व विचारांशी मी सहमत आहे.
ReplyDeleteधन्यवाद.
Delete