कॅलेंडर नावाचा मित्र....

 

     कॅलेंडर नावाचा मित्र....

यापैकी कुठलं टाकू...एकाला तर दोन वर्ष झालीत...आता कशाला हवंय...नव-याच्या दोन्ही हातात कॅलेंडर होतं...नुकत्याच सरलेल्या वर्षाचं एका हातात, तर दुस-या हातात त्यापेक्षा मागच्या वर्षाचं...नवं कॅलेंडर लावतांना ही दोन्ही जुनी झालेली कॅलेंडर त्याला त्रासदायक वाटत होती...त्याच्यादृष्टीनं रद्दी...खिळ्यावरचं ओझं...या जुन्या कॅलेंडरचा काय उपयोग म्हणून त्यांना टाकायची घाई झालेली.  मी मानेनं नाही म्हटलं...तरीही तो तसाच हातात कॅलेंडर घेऊन उभा राहीला...शेवटी जोरात निक्षून नाही म्हटलं...पुढे होऊन त्याच्या हातातली कॅलेंडर घेतली आणि पुन्हा त्यांच्या जागी लावली....फक्त आता त्यांच्यावर नवीन कॅलेडर येऊन बसलं होतं...बाकी त्यांची जागा तिच होती.  मी पुन्हा माझ्या कामाला लागले...नव-याची बडबड सुरु झाली.  त्या जुन्या कॅलेडरला काय सोनं लागलंय...एवढं त्यांना जपून काय ठेवते...मी तेव्हा काहीतरी बनवत होते.  किचनमध्ये बरोबर गॅसच्या समोर आमच्या कॅलेंडरची जागा...गॅससमोर उभं राहीलं आणि काहीतरी आठवलं की मागे वळून बघितल्यावर बरोबर डोळ्यांच्या टप्प्यात येणारं हे वर्षाचं कॅलेंडर आणि माझं बहुधा सर्वच महिलांचं एक प्रेमाचं नातं...हे नव-याला कसं सांगणार...वर्षभराच्या आवश्यक टिपण्या त्यात आहेत.  महिन्याचं दूध, गॅस,  लेकाच्या परीक्षा,  मित्र-मैत्रणींचे वाढदिवस,  सुट्टीचे दिवस...ते अगदी पिरेडची तारीख सगळं या कॅलेंडरमध्ये नोंद आहे...प्रत्येक वर्षी असतं...कधी काहीही वाचायलं नसलं की कॅलेंडर काढून वाचत बसायला मला आवडतं...त्यामुळे अजूनही घरी तीन वर्षापूर्वीची कॅलेंडर सांभाळून ठेवली आहेत.    


दरवर्षी कॅलेंडर घेण्याचा एक ठराविक दिवस ठरलेला आहे.  रिवाज हवं तर म्हणा...पण दरवर्षी त्याच दिवशी येणारं कॅलेंडर यावर्षी मात्र अगदी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घरी आलं.  आत्तापर्यंत दिवाळीच्या पहिल्या दिवशी हे कॅलेंडर घरी यायचं.  दिवाळीच्या पहिल्या दिवशी कितीही गर्दी असली तरी न चुकता फडके रोडचं दर्शन आणि मग गणपतीला नमस्कार...हे सर्व झालं की मोजकी खरेदी....त्यात हे कॅलेंडर...कॅलेंडर एकदा घेतलं की त्याची पानं उलटून पाहण्याची कोण उत्सुकता.  दिवळीत,  दिवाळी अंक घेतांना आणि वाचतांना जी उत्सुकता असते तशीच उत्सुकता कॅलेंडरच्या बाबतीत...प्रत्येक महिन्याचं पान आलटून-पालटून नजरेखाली घालायचं...पहिल्यांदा आपला,  आपल्या परिचितांचा वाढदिवस कधी आहे, हे फक्त नजरेखाली घालायचे...मागच्या पानावर कोणता लेख आहे...कोणती पाककृती आहे,  याचा धावता आढावा घ्यायचा...हे सर्व झाले की नव कॅलेंडर त्याच्या खिळ्यावर लावून ठेवायचे...मग दिवाळी संपली की मुरलेला फराळ खायला जसा चवदार लागतो,  तसंच घरात आलेलं कॅलेंडर निवांत काढायचं...एव्हाना दिवाळीची सुट्टी संपवून नवरा कामाला जात असे, आणि लेक शाळेला...मग पुढच्या वर्षाचं कॅलेंडर,  त्याच्यासोबत मागच्या दोन वर्षाचे कॅलेडर,  लेकाच्या शाळेतून मिळालेलं वार्षिक टाईमटेबल,  डॉक्टरांच्या फाईल, नेहमीच्या नोंदी असलेली डायरी,  पेन हे सर्व घेऊन खाली मस्त फतकल घालून बसायचं.  सोबत वाफाळत्या कॉफीचा मग...या सर्वात पहिला मान तो दोन वर्षापूर्वीच्या कॅलेंडरचा.  त्याची पानं उलगडून बघतांना पुन्हा नव्यासारखाच उत्साह...लेकाची परीक्षा दोन वर्षापूर्वी कधी झाली होती,  गॅस किती चालला,  दूध,  महिन्याचे पिरेड अशा सर्व तारखा डोळ्यासमोर यायाला लागणार...अमिर खानचा तो चित्रपट नाही का आलेला...तारे जमिन पर...त्यातल्या इशानसमोर जसे आकडे-शब्द फिरायला लागतात...तशाच या कॅलेंडर मधील नोंदी समोर यायला लागतात.

ब-याच वेळा काही गम्मतीही व्हायच्या...कॅलेंडरवर नोंदी लिहीतांना शॉर्टफॉर्म लिहीले


असतात...एकदा असाच शॉर्टफॉम काय हे शोधायला दोन कॉफीचे मग रिचवायला लागले.  तो शॉर्टफॉर्म होता...ते.पि.सु....ही काय भानगड म्हणून बराच वेळ डोकं चालवंलं...शेवटी तासाभरांनं कळलं...तेव्हा बारीक व्हायचं फॅड चालू झालं होतं...त्याचा पहिला उपाय म्हणजे जेवणात तेलावर नियंत्रण...त्यामुळे एक तेलाची पिशवी किती दिवस चालते हे पहाण्यासाठी कॅलेंडरवर  ते...पि...सु...ही नोंद केली होती...तेलाची पिशवी सुरु....नशिबानं हे फॅड जास्त दिवस चाललं नाही.  त्यामुळे त्यावर्षीच्या कॅलेंडरवर तेवढी एकच नोद होती.  एकदा कॅलेंडर भरायला सुरुवात केली की,  मागच्या दोन वर्षाच्या कॅलेंडरवरील सर्व नोंदी नव्या कॅलेंडरवर करायच्या...वाढदिवस, परीक्षा, दूध,  गॅस या सर्वांसाठी वेगवेगळ्या रंगाचा पेन...म्हणजे लांबून बघितलं तरी लक्षात येईल असं...लेक शाळेत असतांना कॅलेंडर हा अधिक अभ्यासाचा विषय असायचा...शाळेतून जूनच्या पहिल्या आठवड्यात वर्षभराचे वेळापत्रक मिळायचे.  त्यात चारवेळा होणा-या परीक्षा,  वेगवेगळे दिवस,  इतर स्पर्धा यांचा समावेश असायचा.  त्यामुळे हे शाळेचे वेळापत्रक आले की कॅलेंडरमधील प्रत्येक महिना लाल-हिरव्या पेनानं सजला जायचा.  परीक्षांच्या तारखांसाठी लाल रंग आणि इतर स्पर्धांच्या तारखांसाठी हिरवा रंग...शाळा संपली आणि कॅलेंडरमधील ही एक मजा मागे राहिली.


एरवी कॅलेंडर भरणे हा मजेशीर दिवस असायचा.  आठवणीत सर्व नोंदी यात करण्यासाठी अख्खा दिवस गेला तरी काहीही वाटायचं नाही.  वर्षाचा मसाला,  पापड करण्यात जसा आनंद तसंच हे कॅलेंडर भरण्याचे काम....मात्र 2020 हे कोरोना वर्ष या कॅलेंडरवरही भारी पडले.  दरवर्षी दिवळीच्या पहिल्या दिवशी घरी येणारे कॅलेंडर निवांतपणे डिसेंबरमध्ये आले...याशिवाय नेहमी घरी आल्या आल्या कॅलेंडरचा ताबा घेण्याची घाईही झाली नाही.  आल्यावर एका कोप-यात गुंडाळून शांतपणे पडून राहिलेले कॅलेंडर सॅनिटाईज करुन तिस-या दिवशी हातात घेतले.  2020 मध्ये अशा अनेक घटन घडल्या ज्याची नोंद या नव्या वर्षात करतांना अनेक आठवणी येत होत्या.  त्यापैकीच एक आठवण आमच्या पप्पांची....जुलै महिन्याच्या सुरुवातीला पप्पा गेल्याला वर्ष पूर्ण होईल...त्यामुळे कॅलेंडरवर त्या तारखेला फक्त पप्पा लिहून झालं.  पुन्हा कॅलेंडर बाजुला ठेवलं...आता लेकाच्या परीक्षाही ऑनलाईन होत आहेत...कॉलेजचे त्याचे टाईमटेबल सुरुवातीला मिळाले.  पण कोरोनानं सर्वांच्याच टाईमची वाट लावली...त्यात हे टाईमटेबलही विस्कळीत झाले आहे.  आता ऑनलाईन परीक्षा होतात.  त्यानं त्याच्या लॅपटॉपवर त्याची नोंद करुन ठेवली आहे.  दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीनंतर पुढच्या वर्षीचं माझं कॅलेंडर तयार होतं.  यावर्षी आत्ता कुठे मी हे काम करायला सुरुवात केली आहे.  आताशा एक-दोन महिने पूर्ण झालेत...बाकी कॅलेंडर माझ्या दृष्टीनं अद्यापही कोरं आहे.  तरीही त्याची ओढ काही कमी झालेली नाही...लेकांनं एक-दोन वेळा सुचवून बघितलं, आता डीजिटल कॅलेंडर वापर...पण त्यात ऐवढी मजा नाही, याची कल्पना त्याला येणार नाही...मान्य आहे गेल्या वर्षात सर्वकाही चांगल्या बातम्या आल्या नाहीत.  त्याची थोडीबहुत छाप या वर्षीच्या कॅलेंडरवर पडणार...पण त्यामुळे त्याचं महत्त्व कमी होणार नाही.  सर्व काही सुरुळीत झाल्यावर या कॅलेंडरबरोबर पुन्हा पूर्वीचेच मित्रत्वाचे नाते तयार होईल...जेव्हा मोकळा वेळ असतो तेव्हा त्याला साद घालायची आणि त्याच्या तारखांत गुंतून जायचे...नक्कीच...लवकरच अशी वेळ येईल....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. You're blogs are really nice... you always pick up the routine things with different thought. really appreciated

    ReplyDelete
  2. कॅलेंडर वरच्या नोंदी हा खूप छान विषय आहे आणि तो तू सुरेख खुलवून लिहीला आहेस.

    ReplyDelete
  3. धन्यवाद प्रिया....

    ReplyDelete

Post a Comment