पैशाचं तिकीट....
लेक छोटा असतांना त्याला सोबत घेऊन काही खरेदीला गेले की त्याचा नेहमीचा हट्ट असायचा...एखादी गाडी किंवा बेबलेट...काहीतरी हवं असायचं...अशावेळी नाही म्हटलं तर रडगाणं...मग त्याला पटवण्यासाठी पैसे नाहीत. बाबांनी थोडेच पैसे दिले आहेत...त्यातच सर्व खरेदी करायचीय...पैसे राहीले तर नक्की घेऊया म्हणून त्याची समजूत काढली जायची...ठराविक कालावधीनंतर आई आपल्याला फसवतेय याची त्याला जाणीव झाली...मग तोही एक पाऊल पुढे गेला. बाबांनी पैशाचं तिकीट दिलंय ना...त्यातून पैसे काढ...असं त्यानं मला एकदा ठामपणे सुनावलं...तेव्हापासून एटीएम कार्डचं नामकरण झालं...पैशाचं तिकीट...ते त्या मशिनमध्ये टाकायचं आणि आपल्याला हवे तेवढे पैसे काढायचे...आता हे नामकरण मागे पडलं...काही दिवसांपूर्वी एटीएममध्ये गेल्यावर पुन्हा त्याची आठवण झाली. एक आजी तिचं कार्ड घेऊन उभी होती...एका कागदावर त्याचा पासवर्ड लिहीलेला...तिला काही ते मशिन आणि कार्ड वापरता येत नव्हतं...त्यामुळे जो येईल त्याला ती विनंती करत होती...पैसे काढून दे...कार्ड आणि पासवर्ड अनोळखी माणसाकडे बेलाशक देत होती...त्या पैशाच्या तिकीटात पैसे होते आणि ते असूनही तिच्या चेह-यावर लाचार भाव....
कोरोना आल्यापासून ऑनलाईनची सवय लागली. हातात फार पैसे नको ठेवायला...कुठला स्पर्शच
नको ना...पैशाचाही...परस्पर ते एकमेकांना पाठवायचे...दूध, फळं, भाज्या...खाऊ...या
सर्व नेहमीच्या वस्तू घ्यायच्या म्हटलं तरी पैसे परस्पर द्यायचे...फारफार तर
कार्डाचा वापर करायचा...आता त्या कोरोनाचा कहर थोडा कमी झाल्यावर पुन्हा सर्व
व्यवहार सुरळीत व्हायला लागले...त्यात पहिले पैसे आले...आठवड्याची भाजी किंवा दूध
घ्यायची सवय लागली होती...ती आता मूळ पदावर येऊ लागली. त्यामुळे रोजच्या व्यवहारासाठी हातात पैसे
गरजेचे ठरले. त्यामुळेच आठवड्यातून एखादी
फेरी तरी एटीएममध्ये मारायला लागते. नेहमी
संध्याकाळी चालायला जातांना त्यातली एक फेरी कमी करुन ती एटीएममध्ये खर्ची
करायची. या आठवड्यातल्या फेरीत मात्र पैसे
हाती आले आणि एक मनात घर करणारी व्यक्ती भेटली.
नेहमीच्या एटीएमसमोर जाऊन आम्ही दोघंही उभं राहिलो. संध्याकाळी सातची वेळ...आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा इथे आलोय, तेव्हा आमचा थेट नंबर लागलेला. मात्र आता कोणीतरी आत होतं. त्यांच्याच बाजुला एक आजी उभी होती...कदाचित त्या माणसाची आई असेल म्हणून आम्ही गप्पा मारत राहीलो. पण पाच मिनिटं झाली तरी ते दोघं बाहेर येईनात...म्हणून बघायला लागलो...तर तो माणूस हातातील कागदावर बघून पुन्हा पुन्हा नंबर दाबत होता...ती आजी त्याला काहीतरी सांगत होती. तो माणूस वैतागला होता...रागानं त्यानं मशिनची बटनं दाबली....पण पुढचं काही होईना...बाहेर रांग वाढली होती...आमच्या मागे तीन नंबर लागले होते. सर्वजण आत बघत होते...त्या आतल्या माणसानं मशिनमधून कार्ड काढलं आणि आजीच्या हातात दिलं...आणि पासवर्ड लिहीलेला पेपरही दिला...हे मशिन चालू नाही आजी...दुस-या ठिकाणी जा...असं तिला जरा जोरात सांगून तो बाहेरही पडला. त्या आजीला काही समजत नव्हतं...ती तशीच हातात कार्ड आणि पासवर्ड लिहिलेला पेपर घेऊन उभी होती. एटीएम मशीनच्या केबिनमध्ये आम्ही दोघं नवरा बायको गेलो...नव-यानं मशिनचा ताबा घेतला...पण मशिन खरचं खराब झाली होती...कार्ड ताब्यात घेऊन मला म्हणला, चल, पुढच्या एटीएममध्ये जाऊ...मी त्या आजीकडे बघितलं...तिनं माझ्याकडे कार्ड सरकवलं...मी तिला मशीन बंद असल्याचं सांगितलं...आजी, पुढे चला..हे मशिन खराब आहे...तिनं कार्डासोबत आता तो पासवर्ड लिहीलेला कागदही माझ्याकडे दिला...त्याच्यावर अगदी मोठ्या अक्षरात पासवर्ड लिहीला होता. मी तिला सांगितलं, आजी इथे पैसे नाही मिळणार...पुढे चला...दुस-या एटीएममध्ये...आणि हा पासवर्ड आहे...असा प्रत्येकाला दाखवू नका...माझं बोलणं ऐकून आजी हताशपणे हसल्या...
एव्हाना नव-यानं पुढची वाट धरली होती. घरी लेकाचा ई-पेपर चालू होता. त्याला अर्धा तासात येतो, म्हणून आम्ही बाहेर
पडलो होतो. आता पुढच्या एटीएमवर जायचे
म्हणजे आणखी वेळ होणार...मी ते कार्ड आणि पासवर्ड लिहिलेला पेपर परत आजींच्या
हातात देऊन, पुन्हा त्यांना पुढे जायला सांगितलं आणि पुढे निघाले...पुढचे तीन
एटीएम खराब होते...एकही मशीन चालू नाही, घरी जाऊया...उद्या बघू..म्हणून मी नव-याला
सांगून बघितलं...पण पुढचं एकच मशिन ट्राय करुया...नाही तर घरी जाऊ...असं सांगून तो
पुढे चालू लागला...त्यामुळे मी सुद्धा त्याच्यासोबत गेले. नशिबानं पुढचं एक मशिन चालू होतं. नंबर होते. आमचा पाचवा नंबर लागला. अर्धा तासाच्या कामासाठी एक तासाच्या वर वेळ
गेला होता. पैसे घेऊन आम्ही त्या
केबिनमधून बाहेर आलो तर बाहेर रांग वाढली होती.
सर्वात शेवटी ती आजी...हातात ते कार्ड आणि पासवर्डचा पेपर...माझ्याकडे बघून
हसली...नशिबानं त्या रांगेत आधीच्या एटीएममध्ये असलेला माणूसही होता...तोही
हसला...आजी माझ्या मागोमागच आल्या...मी देतो पैसे काढून म्हणाला...त्यांना
सांगितलंय पासवर्ड बदलून घ्या मुलाकडून...आजी यावर हसल्या...अरे बाबा मुलगा
महिन्यातून एकदा पैसे भरले म्हणून फोन करतो...बाकी काय नाय...मी अशीच मग कोणाकडून
काढून घेते पैसे...पहिल्यापासून याच आकड्यांवर चाललंय सगळं...आजीनं तो हातातला
कागद नाचवला...आम्ही दोघांनीही डोक्यावर हात मारून घेतला. कोणं पैसे घेतंय...कोण घेत नाही...किती जणांकडे
हा कागद देते ते मलाच माहित नाही...हजार रुपयांसाठी असं कागद घेऊन फिरायला
लागतंय...या कार्डात किती पैसे आहेत माहित नाही...दर महिन्याला हजार-दोन हजार
रुपये काढते...पण लेक काही हातात पैसे देत नाही...हे कार्ड देण्यापेक्षा त्यानं
हातात पैसे दिले असते तर असं भटकावं लागलं नसतं...निदान त्याच्याबरोबर दोन शब्द
तरी बोलले असते...म्हातारपण वाईट ग बाई...म्हातारपण वाईट...
कसला सर्रकन काटा आला अंगावर...ती मग तोंडातल्या तोंडात पुटपुट राहीली. त्या माणसाचा नंबर आला...तो त्याच्यासोबत आजीला घेऊन गेला...आधी आजीचे पैसे काढून दिले...तिचं कार्ड आणि पासवर्ड लिहीलेला कागदही तिच्याकडे दिला. आजींनं पैसे, कार्ड आणि तो कागद आपल्या एका पिशवीत ठेवलं...त्या पिशवीला निट गुंडाळून दुस-या पिशवीत ठेवलं...ज्यांनी पैसे काढून दिले होते त्याच्यापाठीवर हात फिरवून ती त्या केबिनच्या बाहेर पडली. आम्हा दोघांनाही घरी जायची घाई होती...पण का कोण जाणे त्या आजीसाठी न सांगता थांबलो होतो. ती बाहेर आली...आणि परत तसंच हताश हसली...तिच्या रस्त्याला लागली...आम्ही बरोबर विरुद्ध दिशेला जाणार होतो...तिच्या पाठमो-या आकृतीकडे थोडावेळ बघितलं आणि आम्ही आमचा मार्ग पकडला....दोघेही बोलत नव्हतो...पण मनात विचार चालू होते...पैशाचं तिकीट माणुसकीचं तिकीट झालं असतं तर बरं झालं असतं...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Khup chhan lekh
ReplyDeleteखुप छान ...😊
ReplyDelete