फुकटाची मजा की माज.....
जवळपास वर्षभरानं ट्रेननं प्रवास केला. ठाण्याला लेकाच्या क्लासमध्ये काही कागदपत्र जमा करायची होती. इनमीन अर्धातासाचं काम. रेल्वेनं काही ठराविक वेळ सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी दिली आहे. ती वेळ बघून तयारी केली. एरवी रेल्वे प्रवास म्हणजे काही नवीन नाही. पण आता वर्षभरानं रेल्वेचा प्रवास म्हणजे एक उत्सुकता होती. थोडी भीतीही...गर्दी असेल का...नेहमीसारखी धक्काबुक्की असेल तर त्या कोरानाचं काय...सर्वांनी मास्क घातला असेल का...असे एक ना दोन प्रश्न मनात होते. पण त्या प्रश्नांना मनातच ठेऊन घरातून बाहेर पडले. एरवी माझा पास असतो...त्यामुळे तिकीटाच्या रांगेत थांबण्याची वेळ आली नाही. पण या पासची तारीख कधीच बाद झालेली...त्यामुळे तिकीट काढलं...फ्लॅटफॉर्मवर आल्या आल्या ट्रेन मिळाली...तिही ब-यापैकी खाली. फारशी गर्दी नाही...अगदी तिस-या सिटवर बसायला मिळालं. ठाणे येईपर्यंत मधल्या स्टेशनदरम्यान गाडीत थोडीबहुत गर्दी झाली...पण ती नेहमीसारखी नव्हती...बहुधा मधली वेळ असल्यामुळे असा सुटसुटीत प्रवास करता आला. ठाणे स्टेशनवर मात्र नेहमीसारखी गर्दी होती...त्यामुळे उतरतांना लगबग करावी लागली. वर्षाचा अवधी झाला तरी काही गोष्टी अंगात मुरलेल्या असतात...चांगल्याच सवयीच्या झालेल्या असतात. त्यापैकी एक म्हणजे, ठाण्याला ट्रेनमधून उतरल्या उतरल्या लगेच जीना चढायला नंबर चावायचा...आपसूक यावेळी तशीच घाई केली. तरीही मध्येच अडखळायला झालं. एक मोठा घोळका मध्येच होता. त्यातून वाट काढत जीना पकडला आणि चढायला सुरुवात केली. माझ्या पाठोपाठचं एक तरुण मुला मुलींचा ग्रुप आला. बहुधा एकाच कुटुंबातील होती ही सगळी मंडळी. त्यापैकी दोघांच्या हातात ब्लेझर पकडले होते. मुलीही लग्नाला जाण्यासाठी तयारीनं आलेल्या...सगळे हातावर टाळ्या देत हसत होते आणि घाई घाईनं चढत होते. त्यांच्या बोलण्यातून लक्षात आलं की त्यांनी कोणीच तिकीट काढलं नव्हतं. ती मंडळीही खूप अंतरानं रेल्वेनं प्रवास करीत होती. कुटुंबातील कोणाचं तरी लग्न होतं. डोंबिवलीहून ठाण्याला गाडीतून प्रवासात खूप वेळ जाणार...त्यापेक्षा रेल्वे कधीही चांगलीच....त्यामुळे सर्वांनी ट्रेन पकडली. घरातील बाकी मंडळी गाड्यांमधून लग्नासाठी आली. आता खूप दिवसांनी ट्रेन पकडली...त्यातून दुपारची वेळ...अशावेळी टीसी कशाला असेल...मग तिकीट कशाला काढायचे...हा विचार करत सर्वांनी तिकीट न काढताच प्रवास केलेला. ठाण्यात फ्लॅटफॉर्मवर टीसीला बघितल्यावर हे सर्व काळजीत पडले होते. पण सर्वांनी गाडी थांबल्या थांबल्या धावत जीन पकडला...आणि आता टीसीला कसं फसवलं...हे एकमेकांना सांगत टाळ्या देत हसत ही मंडळी जात होती. यापैकी एका अनुभवी मुलांनं तिकीट न काढता प्रवास करण्याचा हा त्याचा काही पहिलाच प्रयोग नव्हता...टीसीला आपण कसं कसं फसवलं हे सांगत आपले अनुभव शेअर केला...ही गॅग आपल्याच मस्तीच ब्रीजवरुन चालत होती...
या सर्वांच्या मागेच मी होते.
अन्य प्रवाशीही होते. ही मंडळी
चांगल्या घरातील होती. निदान कपड्यांवरुन तरी तशी कल्पना येत होती. मात्र विनातिकीट प्रवास केल्यावर ज्याप्रकारे
रेल्वेची आणि त्यातून आपल्याला काय सुविधा मिळतात याची टिंगल टवाळी चालली होती, ते
ऐकून माझ्या बाजूनच चालणा-या एका माणसानं क्या बोल रहे है...असं म्हणत डोक्याला
हात मारुन घेतला.
यापलिकडे तरी काहीही करता येणार नव्हतं. ही मानसिकता बदलणं कठीण आहे. उपनगरात जी मंडळी रहातात त्यांच्यासाठी ट्रेन किती गरजेची आहे, याची जाणीव पुन्हा कोरोना काळात झाली. कोरोनाचा उद्रेक वाढल्यावर ट्रेन पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या. एरवी एक मिनिटसुद्धा ट्रेन बंद असेल तर कासावीस होणारे प्रवाशी या फटक्यंनी पुरते हैराण झाले होते. अत्यावश्यक सेवेत असणारे कर्मचारी या काळात रस्तेवाहतुकीनं आपले कार्यालय गाठत होते. एरवी ट्रेननं जो प्रवास एक तासाचा होत असे, त्याला दोन ते तीन तासांचा अवधी लागत होता...पैसेही जास्त मोजावे लागत होते. या ट्रेनबद्दल कितीही बोललं तरी कमीच वाटेल अशी परिस्थिती...अर्थात कुठलीही सेवा ही पैश्यांशिवाय चालू शकत नाही. ट्रेनमधून लाखो प्रवाशी प्रवास करतात...अहोरात्र चालणा-या रेल्वेच्या सेवेमध्ये काही त्रुटी जाणवत असतील...पण त्यामुळे तिकीट न काढता प्रवास करायचा...हा उपाय नक्कीच
नाही..
मी या सर्वांकडून लक्ष बाजुला ठेवत लेकाचा क्लास गाठला. माझं काम झालं. स्टेशनच्या जवळपासच काही मोजकी खरेदी करायची होती. ती झाली. अगदी तासाभरातच ठाण्यातलं काम झालं...पुन्हा परतीचा प्रवास...परत जातांनाही ट्रेन खाली मिळाली. ठाण्याच्या पुढच्याच स्टेशनला डब्यात दोन विक्रेते चढले...एकाकडे कानातले तर दुस-याकडे नेलपॉलिश आणि मेकअपचे काही सामान...दोघंही एकाचवेळी चढले. दोन्ही बाजुंनी...एक फ्लॅटफॉर्मवरुन चढला तर दुसरा रुळांवरुन उडी मारुन चढला. दोघांनी आपल्याकडचे सामान एका गोलाकर हुकवर लावले होते. तो हुक दोन्ही बाजुला लावले आणि एका बाजुला जाऊन उभे राहिले. दोघेही एकमेकांची चौकशी करत होते. एक दिव्याला रहाणारा...दोघेही यापूर्वीही असेच विक्रेते होते. ट्रेन बंद झाल्यावर दुसरा काही कामधंदा सुरु केला. पण आता काहीप्रमाणात रेल्वे चालू झाल्यावर पुन्हा काही वेळ जुनं काम करत आहेत...त्यापैकी एक दिव्याला रहाणारा...दुसरा कल्याणला...कल्याणला रहाणा-याची ही शेवटची फेरी. एक दिव्याला रहाणारा...त्याची पहिलीच फेरी...का तर दिव्याला तिकीटाची रांग खूप मोठी होती. त्यात हा उभा राहीला. अर्धा तास रांगेत उभं राहिल्यावर तिकीट मिळालं. त्यानं पाकीटाच्या खिशातून तिकीट काढून दुस-याला दाखवलं. त्यातला कल्याणला रहाणारा अनुभवी होता...उद्या येणार का म्हणून त्यानं दिव्यावाल्याकडे चौकशी केली...येणार असल्यास जी ठराविक वेळ प्रवासासाठी दिली आहे, त्यापेक्षा थोडं आधी येऊन तिकीट काढ...गर्दी कमी असेल अशी टीप त्यानं दिली. ही सर्व माहिती देत असतांना दोघंही आपल्याकडील सामानाची विक्री करत होते. आपलं सामान विकत होते. मी माझ्या स्टेशनवर उतरले. मनात त्या दोन विक्रेत्यांचे विचार होते. दोघेही अगदी सामान्य...त्यांच्यासाठीही ट्रेन महत्त्वाची...त्यांचे ब्रेड-बटर या ट्रेनवर
अवलंबून...त्यामुळेच ते या ट्रेनप्रवासाबाबत अधिक जागृक होते. कसलीही तक्रार नाही. या मुलांचे कपडे साधेसे होते...पण तरीही दोघंही प्रामाणिक होते...रोज तिकीट काढून प्रवास करीत होते. दोघंही ट्रेन ठराविक काळासाठी का होईना पण सुरु झाल्या म्हणून आभार व्यक्त करीत होते. त्यामुळे त्यांचे पूर्वीचे काम त्यांनी सुरु केले होते आणि त्यातून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावता येत होता.
ठाण्याला जातांना भेटलेले तरुण आणि येतांना भेटलेले हे तरुण
दोघांच्याही वयात फार फरक नव्हता. फरक
होता तो फक्त रहाणीमानात आणि विचारात.
जातांना भेटलेले रहाणीमानात उत्तम विचारानी मात्र सामान्य होती. आणि ही विक्रेते तरुण रहाणीमानात सामान्य आणि
विचारांनी उत्तम होते....कुठल्याही सेवेचा फुकट स्वाद घ्यायचा आणि वरुन त्या
सेवेलाच नावं ठेवायची...यात मजा कधीच नसते.
हा फक्त माज असतो...हेच या तरुणांकडे बघून जाणवलं...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Khup chhan lekh
ReplyDeleteधन्यवाद...
DeleteSunder
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteनक्कीच....
Deleteशिकलेली लोकं कसे अशिक्षित आहेत आणि न शिकलेले कसे सुशिक्षित आहेत याचेच हे उदाहरण आहे.
ReplyDeleteनक्कीच....
Deleteखरंय हा माज असावा किंवा त्यांच्यात अजून तसा समंजसपणा आलेला नसावा. आई वडिलांच्या पंखाखाली ते सुरक्षित जीवन जगत असावेत.रोजगार,कामधंदा, हातावर पोट हे शब्द कदाचित त्यांच्यापासून दूर असावेत.आजच्या जगात स्वतःच्या हिंमतीवर जगणारी ती फेरीवाली मुलं, ही त्यांच्या परिस्थितीमुळे कसं जगायच ते शिकलेत.तिकीट काढण्याचा प्रामाणिकपणा त्या दोघांतही आहे.तेवढी जाणीव,सामाजिक भान हे सुस्थितीत जगणाऱ्या मुलांना नाही. हा संस्कारांचा भाग म्हणावा का ? ....
ReplyDeleteमला वाटतं प्रत्येक माणसाची वागणूक व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असते.चांगल्या, सुखासीन,घरातील मुलगा अप्रामाणिक असू शकतो तर एखाद्या दारू पिऊन शिव्या देणाऱ्या पोटचा मुलगा प्रामाणिक असू शकतो...तिकीट न काढणाऱ्या मुलांनी कदाचित लग्नवेळ साधण्यासाठी रांगेत उशीर होईल म्हणून तिकीट काढली नसेल.आपण तिकिटं काढीत नाही याचा अर्थ कदाचित टीसी आपल्याला पकडू शकतो,आपल्याला दंड होवू शकतो याची त्यांना कल्पना असेल व तशी त्यांची तयारीही असेल...त्यामुळे सुखासीन घरातील मुलांनी तिकीट न काढल्याने तो त्यांचा माज असावा अशा निष्कर्षाप्रत येणं हा त्या मुलांवर अन्याय ठरेल असं मला वाटतं !
आपले मतही विचार करण्यासारखे आहे. मुंबईत ट्रेनमधून लोखो लोक प्रवास करतात. आणि त्यातील बहुतांशी तिकीट किंवा पास काढतात....यातून रेल्वे म्हणजे आपल्या उपजिवीकेला हातभार लावणारे प्रमुख माध्यम हीच भावना असते.
ReplyDelete