सलाडच्या नावानं चांगभलं.....
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवसांत लेकाची परीक्षा होती ठाण्यात. पुढच्या शैक्षणिक प्रवेशासाठी महत्त्वाची...त्यामुळे आम्ही दोघंही त्याच्यासोबत ठाण्याला गेलो. तीन तासांचा पेपर आणि एक तास आधीचा...एकूण चार तास...भर दुपारची वेळ...त्यामुळे यावेळात काय करायचे हा प्रश्न होता. परीक्षेच्या आधी गुगल मॅपच्या आधारे आसपास काही आहे का याचा शोध घेतला होता. परीक्षा केंद्राच्या अगदी समोर एक मोठा मॉल होता. महिना अखेर....त्यामुळे मधल्या वेळात इथे जाऊन किराणा सामान भरण्याचा पर्याय शोधला. त्यामुळे चार तास काय करायचे हा प्रश्नही मिटला होता. लेक परीक्षेला गेला, तेव्हा आम्ही दोघांनीही वेळ न दवडता तो मॉल गाठला. सामानाची यादी घेऊन खरेदीला सुरुवात केली. तिथे किराणा सामानासोबत भाज्या आणि फळांचाही विभाग होता. वेळेची बचत म्हणून मी नव-याला फळांची खरेदी करायला सांगितलं आणि मी भाज्यांच्या विभागाकडे गेले. हा विभाग म्हणजे एक खजिनाच होता. एरवी भाज्या खरेदी हा माझाच काय पण प्रत्येक गृहिणींचा विकपॉईंट...त्यात इथे तर एवढ्या वेगवेगळ्या भाज्या पद्धतशीर मांडून ठेवल्या होत्या की काय घेऊ आणि काय नको असं झालं होतं. शेवटी नव-यानं आपली खरेदी आटपती घेत मला आवरतं घेण्याचा
आग्रह केला...तोपर्यंत माझं बास्केट पूर्ण भरलं होतं.
टिव्हीवर टीएलसी नावाचे चॅनेल येते. हे माझे सर्वाधिक आवडते चॅनेल. देशातील आणि परदेशातील विविध खाद्यसंस्कृती पहायची आणि शिकायची असेल तर हे चॅनेल नक्कीच पहावे. याच चॅनेलमधून परदेशातील सॅलेड संस्कृती आणि चटपट होणा-या भाज्यांचे प्रकार कळले. नंतर उत्सुकता म्हणून गुगल बाबांवर त्यांचा अधिक शोध घेतला. यात वापरण्यात येणा-या भाज्यांबाबत उत्सुकता होती. चव कशी असेल...आपल्याला जमतील का...हा प्रश्न नेहमी पडायचा. त्यातही या भाज्या मिळतील कुठे याचा शोधही होता. पण ठाण्यात भल्या सकाळी भाजी खरेदी करायला जायची हौस यासाठी कामी आली. ठाण्याच्या कौपिनेश्वर मंदिरासमोरच्या रस्त्यावर सकाळी सहापासून भाज्यांचा मोठा बाजार असतो. याच बाजारात अगदी कोरोना येईपर्यंत आम्ही दोघंही महिन्यातून दोन वेळा तरी भाज्या आणायला जायचो. याच बाजारात मला लेट्यूस, बेबी स्पिनीच, चेरी टोमॅटो, झुकीनी, सेलेरी, लाल पिवळ्या रंगाच्या सिमला मिरच्या, ब्रोकोली, बेसिल, अॅव्हाकोडा असे अनेक प्रकार मिळाले.
सुरुवातीला उत्सुकता म्हणून अगदी मोजकी खरेदी व्हायची. पण नंतर जेव्हा या बहुतांशी सॅलेड प्रकारातल्या भाज्या करता यायला लागल्या तेव्हा त्यांची चव कळली. शिजवायचं फार झंझट नाही. ब-याच भाज्या फक्त लसूण, आलं आणि काळ्यामिरीवर परतल्या किंवा काही हातांनी तोडून त्यावर ऑलिव्ह ऑईल पेरलं की छानसं सॅलेड तयार होतं. कोरोना आल्यावर मात्र ही ठाण्यातील भाज्यांची फेरी बंद झाली. त्यामुळे या सॅलेडच्या भाज्याही बंद झाल्या.
आता ब-याच दिवसांनी या भाज्या आणि सोबतीला आणखी नवनव्या भाज्या दिसल्यानं मला कोण आनंद झाला. जे जे दिसलं ते ते घ्यायला सुरुवात केली. इथे बरेच आर्श्चयाचे धक्के बसले. या भाज्यासोबत एका बाजुला चक्क कोरफडीचं पानं ठेवण्यात आली होती. एक-एक कोरफडीची पाती व्यवस्थित कापलेली होती. जेणेकरुन त्यातील चिक बाहेर येणार नाही. प्लॅस्टिक पेपरमध्ये व्यवस्थित गुंडाळलेल्या एका कोरफडीची किंमत शंभर रुपयांच्या वर होती. मला आठवलं लहान असतांना आमच्या वाडीत आईनं कोरफड लावली होती. तिचं छान रान झालं होतं. एरवी कोरफड बघायला जरी बरी असली तरी ती खायची म्हणजे नको व्हायचं. त्याचा तो लोंबकणारा चिक आणि ती चव...बापरे लहानपणी आईनं कोरफडीची पात कापली आहे हे समजलं तरी मी जेवायला टाळाटाळ करायचे. आई ही कोरफड व्यवस्थित कापून मधला गाभा चपातीमध्ये भरायची. आणि ती
चपाती मग मला खायला लागायची. कोरफड म्हणजे महिला वर्गासाठी सर्वात जवळची मैत्रिण. आईनं त्यामुळेच लहानपणी ही कोरफड खूप खायला लावली होती. आता कळते झाल्यावर या कोरफडीचे गुण समजायला लागले. त्यामुळे त्याची चव कशीही असली तरी आठवड्यातून एकदा तरी ही कोरफडीची पात आहारात येतेच. इथे मात्र जरा मोठीच कोरफडची पात होती. त्याच्याच बाजुला आपल्या कृष्ण तुळशीची पानं होती. छान फ्रेश असणारी ही पानं एका प्लॅस्टिकच्या पिशवीत छान पॅक केलेली होती. त्याची किंमतही अशीच डोळे मोठे करणारी होती. आपल्याकडे जेवणात तुळशीची पान फार घातली जात नाहीत. पण परदेशात सॅलेड किंवा पिझ्झा, पास्तामध्येही या पानांचा उपयोग होतो. यासोबत ब्रुसेल्स नावाचे कोबी वर्गातील छोटे कोबी होते. कोबीसारखी दिसणारी ही भाजी मला टीएलसी चॅनेलवरुनच कळली होती. अगदी छोटे कोबी. दोन भाग करुन तेलावर आलं, लसूण आणि काळीमिरीवर परतली की सॅलेडचाच अगदी एक वेगळा प्रकार तयार होतो. चवही छानच...
यासोबत इथे बेबी स्पिनीच...म्हणजेच पालकाची छोटी छोटी पानं...ही पानं
नुसती खायला भन्नाट लागतात. एरवी पालकांना थोडा उग्र वास येतो. त्या कच्च्या पानांना खाणं शक्य होणार नाही. पण पालकांच्या छोट्या पानांची चव गोड असते. यावर लिंबू आणि मिठ टाकलं ही कोशिंबीर तयार...माझा लेक खूप लहान असतांना एकदा त्याला शेती दाखवायला म्हणून एका फार्मवर गेलो होतो. त्यावेळी तिथे पालकाचा मळा होता. त्या फार्ममालकांनं आमच्या समोर छोटी पानं तोडून अशी कोशिंबीर आम्हाला खायला घातली होती. तेव्हापासून हे बेबी स्पिनीच आमच्या ताटात सामील झाले. असेच चेरी टोमॅटो, लाल पिवळ्या रंगाची सिमला मिरची, ब्रोकोली, सेलेरी, झुकीनी, पोर्टेबेलो मशरुम, ऑलिव्ह, फेनेल, अरुगुला अशा अनेक भाज्या वजा सॅलेडची पानं इथं होती. अर्थात ती माझ्या बास्केटमध्ये जमा झाली. यासोबत अॅव्हाकोडा हे फळही आलं. या फळाच्या प्रेमात आम्ही कुटुंबिय आहोत. सॅलेड असो किंवा चटणी किंवा त्याचं मस्त घट्ट ज्यूस....अॅव्हाकोडा हे आमचं लाडकं फळं...तेही बास्केटमध्ये जमा झालं.
बराच वेळ झाल्यानं नवरा भाज्यांच्या विभागात आला. माझ्या हातातील बास्केटमध्ये नजर टाकून म्हणाला आता काय आठवडा फक्त सॅलेडवर काढायचा का...पण आम्ही दोघंही हसलो...कारण हा प्रकार आमच्याकडे आवडता. मग त्यानंही या भाज्यांच्या विभागावर एक नजर टाकली. त्याला चहाची पात दिसली. भली मोठी पात कापून, थोडी सुकवून एका पिशवीत पॅक केली होती. ब्रोकोलीचा एक कांदा नव-यानं जास्तीचा घेतला. तो त्याला हिरवा फ्लॉवर म्हणतो. ब्रोकोली आणि पालकाचं सूप त्याच्या आवडीचं. त्यामुळे छान साफ केलेली मोठी पालकांची पानंही बास्केटमध्ये आली.
अजूनही काही गोष्टी तिथं होत्या. पण बास्केट भरलं होतं आणि वेळही संपत आली होती. त्यामुळे खरेदी आवरत घेतली. बिल करून मुलाच्या परीक्षा केंद्रावर गेलो. तो गाडीत बसला तेव्हा त्याची पहिली नजर या भाज्यांवरच गेली. आता काय आठवडा भर सूप आणि सॅलेड की काय...म्हणत तो हसत सुटला. त्याला आम्ही दोघांनीही साथ दिली.
गाडीनं आणि आम्हीही घराची वाट पकडली. माझ्या मनात जुन्या आठवणी गुंजी घालायला चागल्या. लहानपणी आमच्या रेवदंड्यात वालाच्या शेंगा यायला लागल्या की पोपटीचा कार्यक्रम व्हायचा. वालाच्या शेंगा, बटाटे, वांगी, रताळी, कांदे आणि सोबत भरपूर ओल्या नारळाची चटणी हे सर्व मिश्रण एका मातीच्या मडक्यात भरलं जायचं आणि वर लावला जायचा तो भांबुर्डीचा पाला. मग या मडक्याला एका जाळात टाकलं जायचं. या पोपटीची चव लाजवाब...पण ती जुळून यायची ती भांबुर्डीच्या पाल्यामुळे. हा पाला नसला तर पोपटीला चव नाही. या पाल्याचा धुरकट वास संपूर्ण पोपटीवर पसरला की ती चव अप्रतिम येते. आता ही सेलेडची पानं घेतल्यावर कळलं आमच्या कडेही अशा ब-याच वनस्पती आहेत, ज्यांची अधिक माहिती मिळवणं गरजेचं आहे. आता ब्रोकोलीची चव लागली. पण गावाकडे थंडीच्या सुमारास मिळणारा गावठी फ्लॉवर अप्रतिम गोडीचा असतो, हे विसरुन चालणार नाही. लहानपणी आई या फ्लॉवरची भाजी करतांना अगदी थोड्या सामुग्रीत करायची. एकतर हा फ्लॉवर कापायची कधी गरज लागली नाही. फक्त हातांनी तोडायचा आणि मिरची, तेल, मिठ, हळदीवर परतायचा. ब-याचवेळा ही भाजी भातासारखी
खाल्ली जायची. या फ्लॉवरची कच्ची कोशिंबीरही तेवढीच सरस असायची. फ्लॉवर किसून घ्यायचा. त्यावर शेंगदाण्याचा कूट आणि लिंबू, मिठ, कोथिंबीर आणि मिरची...वरुन तेल हिंगाची फोडणी हवी असेल तर ठिक नाहीतरी अशीही चव अप्रतिम...आता या विदेशी भाज्यांच्या मागे लागल्यावर या लहानपणीच्या चवी कुठे हरवल्याची खंत जाणवायला लागते. वास्तविक आपल्याकडे भाज्यांचं भंडार आहे. पण त्याचा अभ्यास आणि मार्केटींग झालं नाही. नवलकोल, लाल मुळा आपल्याकडेही होतात की, पण ते ठराविक भागापूरते मर्यादीत राहीले. त्यांचंही या इंग्रजी भाज्यांप्रमाणे मेकओव्हर करायची गरज आहे. आता कोरफडीला सुगीचे दिवस आले आहेत. कोरोनामुळे तर पुन्हा आपल्या खाद्यसंस्कृतीचं महत्त्व पटलं आहे. त्यामुळे भविष्यात कोरफडीच्या सोबतीला आंबटचूका, शेवाळ, मुळ्याच्या शेंगा दिसल्या तर आर्श्चय नको....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
लेख वाचून Salads ची चव जिभेवर रेंगाळते आहे.
ReplyDeleteधन्यवाद प्रिया....
DeleteChan shilpa poptichi atvan yete tula
ReplyDeleteधन्यवाद....पोपटीची चव ही कधीही विसरण्यासारखी नाही....
Delete