घाट घातलाय....

 

      घाट घातलाय....


संध्याकाळच्या वॉकला नेहमीपेक्षा चांगलाच उशीर झाला होता....एव्हाना संध्याकाळची रात्र होत चालली होती...पण सध्या आमच्या घरचं घड्याळ लेझीबेबी टाईपमधलं झालं आहे...असो...त्यामुळे संध्याकाळ किंवा रात्र याचा फरक पडत नाही...वॉक महत्त्वाचा...हे नव-याचं तत्त्वज्ञान प्रमाण मानून आम्ही दोघंही चालायला बाहेर पडलो....नेहमीच्या दोन फे-या...साधारण अर्धा तास...सोसायटीच्या गेटमधून बाहेर पडलो,  अगदी दोन तीन पावलं चालले तोच छुक छुक असा आवाज आला....एकतर त्यादिवशी रस्त्यावर कधी नव्हे ते दिवे लागले नव्हते...काळोखात असा छुक...छुक आवाज आल्यावर आम्ही दोघांनीही मागे बघितले...कोणीतरी हात हलवत होते....अगदी काही सेकंदात लक्षात आलं माझीच एक मैत्रिण आहे...नव-यानं सहेतुक माझ्याकडे बघितलं....आता तुझा वॉक नाही टॉक टाईम असा त्यातला अर्थ होता...मी काही बोलायच्या आता तोच म्हणाला, मी जातो पुढे...आणि गेलाही...एवढ्याच वेळात त्या मैत्रिणीनं मला गाठलं...काय ग आज उशीर झाला तुला...मी काही म्हणायच्या आत ती म्हणाली...तुला किती फोन केले....कधी तरी उचलत जा...मी आता तुझ्याकडेच यायचा विचार करत होते....बरं झालं तु भेटलीस...घरी मी घाट घातलाय पुरणपोळ्यांचा....किलो भर डाळ घेतलीय....पण गुळ कमी पडलाय वाटतं...म्हणून दुकानात घ्यायला आलेय...तू जरा बघतेस का...एका दमात तिचं बोलून झाल्यावर मी एक एक प्रश्न विचारले...हे घाट घालणं....प्रकरण जरा उवघडच असतं...सरळ का म्हणत नाही,  पुरणपोळ्या करायला घेतल्या....घाट घातलं म्हटलं, की घाट लागतोच...हा माझा अनुभव...म्हणजेच घाट जसा वळणावळचा असतो...तसंच पदार्थाचं होतं...प्रक्रीया लांबत जाते...अगदी कधी एकदाचं हे संपेल असं होतं...आता हे मैत्रिणीचं घाट पुरण ऐकतांनाही तसच झालं होतं...एव्हाना नव-याची एक फेरी संपली...आणि मी मात्र मैत्रिणीच्या घाटातच अडकले...

 


होळी आणि पुरणपोळी हे एक समिकरण...पुरणपोळीशीवाय होळी सण साजरा होत नाही.  पण या सणाच्या आधीच माझी मैत्रिण पुरणपोळ्या करायला लागली होती.  थोडी घाई झाली...त्यामुळे पुरणपोळीचं साधं गणित बिघडलं...या मैत्रिणीचा नवरा ज्या कंपनीमध्ये कामाला आहे,  त्या कंपनीमध्ये कोरोनाकाळात नवीन नियम लागू करण्यात आला आहे.  सर्वांच्या सुरक्षेसाठी कामावर आलेल्यांना एक आठवडा कंपनीमध्येच रहायला लागत आहे.  त्यानंतरचा आठवडा घरातून काम आणि पुन्हा मग एक आठवडा कंपनीमध्ये...या काळात सर्व सुविधा कंपनीकडून देण्यात येतात.  त्यामुळे सर्वांचा प्रवास वाचतो आणि कोरोनाकाळात शक्य तेवढी काळजीही घेण्यात येतेय.  पण नेमंक होळी येतेय त्या आठवड्यात मैत्रिणीच्या नव-याला कंपनीमध्ये रहावे लागणार आहे.  त्यामुळे त्याच्यासोबत देण्यासाठी पुरणपोळ्या तिनं करायला घेतल्या.  आता ऑफीसमध्ये पुरणपोळ्या द्यायच्या म्हणजे एक-दोन वर काम भागणार नाही...अंदाजानं तिनं डाळ आणि गुळ घेतला...पण काहीतरी बिघडलं...ती जेव्हा हे सर्व सांगत होती तेव्हा माझ्या मनात मात्र एक शब्द गुंजी घालत होता...तो म्हणजे घाट घालणे...ही काय भानगड आहे कोण जाणे...पण ब-याचवेळा ऐकायला मिळतं...मी आज लाडवांचा घाट घातलाय....पुरणपोळीचा घाट...

 

आमच्याकडे प्रत्येक पदार्थावर बरेच प्रयोग करण्यात येतात....शेवटची मान्यता


लेकाची असते...चवीचा एकदम पक्का....अगदी किंचींतभरही मिठ जास्त झालं तरी त्याला ते लागतं...तसंच गोडाचंही...अगदी वेलची आणि जायफळही कमी जास्त झालं तरी त्याच्या लगेच रिप्लाय येतो...कधीकधी मनात येतं काय फरक पडतो...पण शेवटी चव चाखणारा मोठा...या न्यायानं लेकाच्या चवीनुसार घरात बनणा-या प्रत्येक पदार्थाला आकार आणि चव मिळाली.  प्रत्येक पदार्थावर नवा प्रयोग...बाहेर कुठे मैदा वापरुन पातळ पुरणपोळी केली असेल तर त्याचे कौतुक करेल...पण घरी आल्यावर मैदा आरोग्याला किती घातक याचे एक लांबलचक लेक्चर देईल....त्यामागे आपल्या घरात मैदा वापरुन काहीही करायचं नाही, हा सुचक संदेश असतो...याचा एक चांगला परिणाम झाला की खूप प्रयोग करुन का होईना आमच्या घरात शुद्ध गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या व्हायला लागल्या...या सर्व प्रयोगादरम्यान युटूब मधील पाककृतींचा आधार न घेता अनेक टिप्स माझ्या खात्यात जमा झाल्या,  त्यातलीच एक टीप मैत्रिणीला दिली....तिला पटली...ती निघून गेली...पण माझ्या मनात हा घाट घातलाय शब्द मात्र काही काळासाठी बसला...

अलिकडे नाही मात्र लहानपणी हा शब्द कायम कानावर पडायचा...आई घरात जेव्हा मोठे बेत करायची तेव्हा हा घाट घातलाय शब्द यायचा....बेसनाच्या


लावडाचा घाट घातलाय...नारळाच्या करंजांचा घाट घातलाय...आज काय चकल्यांचा घाट घातलाय...अर्थात ते दिवस वेगळे होते...हे घाट घालण्याचं प्रकरण जेव्हा घरी असायचं तेव्हा आजूबाजूच्या काकू, आत्या, वहिनी मदतीला यायच्या...मग अख्खी दुपार त्या घाटात जायची...घर मात्र त्या वासात घमघमायचं...खाऊचे डबे फुल्ल व्हायचे...तेव्हा या शब्दाचा विचार झाला नाही...पण आता मात्र घाट घातला हा शब्द ऐकला की हे सर्व आठवतं...आता तसे दिवस नाहीत...फार कमी ठिकाणी आजूबाजूचा गोतावळा जमून हे घाट घातलेले पदार्थ करायला मदत होते.  आता तर कोरोनामुळे जिथे हे प्रकार होत असतील तेथेही बंदी आलेली.  त्यामुळे एकटीनं घाट घालायचा आणि तो पार पाडायचा...

आमच्याकडे असा काही बेत असला की त्यासाठी दोन मुख्य गोष्टी असतात...एक तर निवांत वेळ...आणि दुसरं म्हणजे छान जुनी गाणी...या दोघांच्या साथीनं कितीही मोठा बेत असला तरी फार घाटात न अडकता तो सरळ पार पडतो.  आताही मैत्रिणीचा पुरण पोळीचा बेत ऐकून घरी रात्रीच्या जेवणात काहीतरी गोड करावं का म्हणून विचारात पडले होते.   रविवारी पुरणपोळी, कटाची आमची असा होळीला साजेसा बेत होणार होता.  पण त्याआधी दोन दिवस असचं काहीतरी गोडधोड कराययला काय हरकत म्हणून


झटपट काय करता येईल याचा विचार करत घरी परत आले.  लेकानं दरावाजा उघडताच पहिला प्रश्न केला...आता जेवायला काय करणार आहेस...मी पनीर, चपाती आणि खीर चालेल का म्हणून त्याला विचारलं...तर त्याचं तोंड वाकडं झालं...म्हणजे हा बेत बदलणार म्हणून मी त्याच्याकडे बघत राहिले...आता खीर कशाला....रविवारी पुरणपोळी होईलच ना...त्यापेक्षा वांग्याचं भरीत कर...मिरची घालून जरा तिखट आणि आपल्या भाक-याच कर...सोबत दोन तरी मिरच्या तळ...बस्स...मी हुश्श करत ऐकलं सरळ बाथरुम गाठलं...डोक्यातले सर्व गोडाधोडाचे विचार काढून टाकले.  आमच्याकडे कधीतरी पुरणपोळी मिरची टाकून होतेय का ते बघ एवढचं सांगायचं आणि करायचं बाकी आहे.  या तिखटाच्या पुरणपोळ्यांचाच घाट घातला पाहिजे असा विचार मनात आला...इथे मात्र घाट घालणे हा शब्दच हवा...कारण पुरण आणि मिरचीचे घाट घाटाचे वळन असल्या भलत्या कॉम्बिनेशनमध्येच होऊ शकते...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. छान लिहिलंयस पण हल्ली पूर्वी सारखे ‌घाट घालणं कमी झालंय! आॅर्डर दिली की झालं...

    ReplyDelete

Post a Comment