दादा, तू कोणत्या रंगाचा.....

 

 दादा,  तू कोणत्या रंगाचा


आज सलग तिसरा दिवस....तो कोपरा संध्याकाळी मोकळा होता...आम्हा दोघांच्या संध्याकाळच्या वॉकमधला काही वेळ या कोप-यावर असणा-या मुलांवर बोलण्यात जात होता...पंधरा ते वीस जणांचा ग्रुप...वय फारतर अठरा ते वीसच्या आत...गार्डनजवळचा कोपर जणू त्यांनी काही वेळासाठी आपल्या ताब्यात घेतलेला असायचा...कधातरी हे तरुण आपल्या गाड्या आणि सायकलीवर धूम स्टाईल आसपासच्या परिसरातून फेरी मारायचे...त्यांचा आरडाओरडा...गाड्यांचा मोठा आवाज काढत जाणे....हे खरं तर त्रासदायक...त्यातूनही एका खटकणारी गोष्ट म्हणजे,  या घोळक्यात अगदी एक-दोन जण नावाला गळ्याभोवती मास्क घालणारे...बाकी सर्व रामभरोसे गटातले...चार दिवसांपूर्वीही हा घोळका ठराविक कोप-यावर होता...त्यादिवशी जरा आवाज मोठा वाटला...अगदी लांबून आवाज येत होता...दुस-या फेरीत तर ही आवाजाची पट्टी चांगलीच वाढली होती....एका घोळक्याचे दोन भाग झाले होते....एखाद दुसरा नकोसा शब्दही कानवर पडत होता....विशीच्या आतली ही मुलं,  एकमेकांच्या आईचा उद्धार करत होती...असं अचानक काय झालं...गेली काही महिने एकत्र असणा-या या घोळक्यात अशी काय ठिणगी पडली की सर्वांच्या भाषांचा सूर एकदम बिघडला...आणि बिघडला तर बिघडला तो थेट शिव्यांवर आला...आमच्या फे-या संपवून घराकडे परतलो...दुस-या दिवशी जरा लवकरच,  उत्साहानं निघालो...त्या घोळक्यातला वाद संपला का...आता तिथं असतील का...हा मनात प्रश्न होता...पण तो कोपरा खाली होता...आमच्या फे-या मारतांनाही त्यापैकी कोणीही धूम स्टाईल गाडी चालवत गेलं नाही...खरं तर ही शांतता चांगली होती...मनाला सुखावणारी होती....पण तरीही काहीतरी मीस केल्यासारखं वाटत होतं...या मुलांच्या आवाजाची,  त्यांच्या त्या धूम स्टाईलची सवय झाली होती...आता तीन दिवस हा कोपरा शांत असल्यामुळे काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं. 


याच कोप-यावर एक फळवाला असतो.   त्याच्याकडे तीन-चार दिवसांनी फे-या मारल्यावर जायचं नक्की असतं.   तशीच त्या दिवशीही गेलो...रात्रीचे आठ वाजत आले होते आणि तो त्याची गाडी एका कापडानं झाकून ठेवत होता.   नवीन कोरोना नियम...आम्ही घाईघाईनं फळं घेतली,  त्याला पैसे दिले...आमचे पैसे परत देण्याआधी त्यानं गाडी झाकून ठेवली.  तो निवांत झाल्यावर मी त्याला विचारलं...अरे ती मुलं कुठे गेली....त्यांच्यात भांडण झालं तेव्हापासून गायब आहेत.  त्यावर त्यांनी सांगितलेल्या उत्तरानं आम्ही आवाक झालो.  आम्ही जे या मुलांतील भांडण बघितलं होतं ती तर सुरुवात होती.  कुणा एका राजकीय पक्षाच्या बॅनरवरुन वाद सुरु झाला होता.  दोन मित्रांनी दोन पक्षांचे बॅनर आणले...ते लावण्यावरुन वाद सुरु झाला.  तुझा नेता मोठा की माझा नेता मोठा...शब्दावरुन शब्द वाढले...तो काय तुझा काका लागतो का...अशी भाषा सुरु झाली...आई...बहिणींवरुन शिव्या देऊन झाल्या....शेवटी पोरांनी एकमेकांची कॉलर ओढली.  पहिल्यांदा त्या ग्रुपमधील काहींना वाटलं गम्मत चालू आहे.  पण भांडण खरं होतं.  त्यांनी आपापल्या परीनं सोडवण्याचा प्रयत्न केला.  पण पोरं ऐकेनात....तरुण रक्त गरम असतं ना...तो अनुभव आजूबाजूच्यांना येत होता.  चांगलीच मारामारी झाली.  मध्ये कोण पडणार...एकतर रात्रीचे आठ वाजल्यामुळे सर्व दुकानंही बंद होत होती.  रस्त्यावर शांतता...त्यातून या मुलांच्या रोजच्या गोंधळाचा आजूबाजूला त्रासही होत होता...त्यामुळे जाऊ दे भांडण झालं तर होऊदे...हा सूर बघणा-यांचा होता...या सर्वांत हा पंधरा ते वीस जणांचा ग्रुप दोन भागात विभागला गेला होता...एरवी एका बाईकवरुन चौघंजण जात होती....आता तिच पोरं एकमेकांना तुला बघून घेईन...म्हणून धमकी देत होती...साधारण तासाभरांनं हे सर्व शांत झालं...त्यातलीच काही मुलं वाद घालणा-या या मुलांना ओढून आपापल्या गाड्यांवर टाकून घेऊन गेली...गार्डनच्या गेटवरच त्यांच्यापैकी काहींनी सायकली ठेवल्या होत्या...एरवी आपल्या मित्रांच्या सायकलीही जपणा-या या मुलांनी आपापल्या सायकली काढतांना आपल्या मित्रांच्या सायकलीही ढकलून दिल्या होत्या...त्यावरुनही मग बाचाबाची झाली.  शेवटी एक-दी़ड तासांनी हा कोपरा शांत झाला...तो आजतागायत...

तो फळवाला हातवारे करत या मुलांच्या भांडणाबद्दल सांगत होता.


  आमच्यासारखेच अन्यही चारजणं ऐकत होते...ज्या बॅनरवरुन हा वाद सरु झाला होता, तो बॅनर तसाच खाली पडला होता.  त्यातील व्यक्तींनी किती चांगली राजकीय कामगिरी केली हे माहित नाही,  पण या मित्रांच्या मनामध्ये मात्र अढी तयार केली होती.  अशी अढी या राजकीय पक्षांमुळे किती जणांच्या मनात होत असेल याची कल्पना नाही.  घराकडे जात असतांना तोच विचार होता.  नवराही तेच बोलला...ही राजकीय मंडळी वर एकमेकांशी चांगली असतात....खाली कार्यकर्ते मात्र एकमेकांच्या जीवावर उठतात...आता या दोन राजकीय पक्षांनी निवडणुकीत एकमेकांच्या गळ्यात गळे घातले तर त्यांचे कार्यकर्ते कुठल्या तोंडांनं एकमेकांना भेटतील काय माहीत...या प्रश्नाचं उत्तर ना त्याच्याकडे ना माझ्याकडे...

मात्र ही उदाहरणं प्रत्येक टप्प्यावर दिसणारी.  भेटणारी...सोशल मिडीयावर तर या बाबतचे पिक आलेले असते.  आपल्याला आवडणा-या नेत्याचे गुणगाण करणा-या एवढ्या पोस्ट टाकल्या जातात की ही नेतेमंडळी यांना फोन करुन आपल्याबद्दल माहिती देतात का हा प्रश्न पडावा...हे करतांना विरुद्ध पक्षातील नेता कितीही बुद्धीवान असला तरी त्याच्याबद्दल अगदी वाह्यात जोक टाकतांना धन्यता वाटते...या पक्षीय चाहतीमध्ये महिला नेत्यांबद्दल तर बोलायलाच नको...त्या कोणत्याही पक्षाच्या असोत...कितीही हुशार असोत....त्यांची तुलना फक्त आपली पार्टी की विरुद्ध पार्टी एवढीच होते.  त्यांच्याबदद्ल लिहीतांना मोबाईलवरील की बोर्ड जरा अधिकच वेगानं चालतो...या अशा पोस्ट अनेक नात्यांमध्ये....मैत्रीमध्ये काट्यासारख्या ठरल्या आहेत.  त्यावरुन वाद-विवाद आणि नंतर दुरावा आलेला आहे.  अर्थात ही सर्व खालची पातळी आहे,  म्हणजे पोस्टच्या लेवलची नाही तर कार्यकर्त्यांची...तिथे वर...ही सगळी नेतेमंडळी तुझा गळा माझा गळा अशी असतात...


पक्ष असावा...आणि कार्यकर्ताही...काही मंडळी पक्ष किंवा नेता बघून सामाजिक कार्य करीत नाहीत.  त्यांची वृत्ती आणि प्रवृत्ती ही समाजसेवेची असते...त्याला आधार म्हणून ते फक्त एखाद्या राजकीय पक्षाचा हात पकडतात....इथपर्यंत ठिक आहे...पण त्यामागे वहावत जातात,  तिथे अढी निर्माण होते...

मनात या सर्व विचारांचे काहूर उढले होते.  घरी आलो, तेव्हा पहिला लेकाचा प्रश्न, एवढी उशीर का झाला....आज काय चार फे-या मारल्यात का...तेव्हा कुठे आम्ही कुठेतरी हरवलो आहोत याची जाणीव झाली.  चांगला तासभर झाला होता.  सॅनेटाईजचा वापर करुन नवरा आंघोळीसाठी गेला.  त्याची वाट बघेपर्यंत बातम्या लावल्या....त्यावर एका नेत्यांच्या कुटुंबाच्या सहलीची बातमी आणि फोटो दाखवत होते.  इथे कोरोनाचा कहर चालू असतांना या नेत्यानं सहकुटुंब सहपरिवार सहल काढली होती.  त्याच्यासोबत दुस-या एका पक्षाचा नेताही होता....चांगले हसत खेळत फोटो काढले होते...अगदी मास्कला बाजुला ठेऊन....मनात या सर्वांना कोप-यापासून नमस्कार केला...जी मंडळी अशा नेत्यांसाठी आपापसात भांडतात, त्यांनी निदान या अशा बातम्यांवरुन तरी काही शिकावे...आपापसात वाद किंवा अढी निर्माण करणा-या पोस्ट टाकून या नेत्यांची भलाभण करण्यापेक्षा नात्यातला...मैत्रीतला ओलावा जपायला शिकलं पाहिजे...तरच राजकीय रंगापेक्षा आपापसातील रंग अधिक सुखावह होतील.....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 


Comments

  1. अप्रतिम पोस्ट आणि सत्य परिस्थिती चे वर्णन

    ReplyDelete

Post a Comment