वायफाय प्रमोटवीर....

 

  वायफाय प्रमोटवीर....


काय झालं...पुढे गेली ना...तेच होणार होतं...उगीचच एवढा वेळ का घेतला, काय माहीत...बस्स य चार वाक्यात लेकाचं विश्लेषण झालं.  बारावीच्या परीक्षा वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पुढे गेल्या.  सायंकाळी टिव्हीवरच्या बातम्या बघतांना परीक्षांची बातमी आली,  त्यावर एवढ्या चार वाक्यात प्रतिक्रीया देत लेक पुन्हा त्याच्या जागी गेला...आणि अभ्यास सुरु झाला.  गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या अर्ध्यावर सर्व व्यवहार थांबले...घरातून शिक्षण चालू झाले...तेव्हापासून त्यानं एक कोपरा पकडला आहे.  तोच कोपरा पुन्हा पकडला आणि अभ्यास सुरु केला.  आम्ही दोघंही  आळीपाळीनं टिव्हीकडे आणि त्याच्याकडे बघत होतो...खरचं काहीच वाटलं नसेल त्याला...हा आमच्या दोघांच्याही मनातला प्रश्न...शेवटी टिव्ही बंद केला...दोघंही शांत होऊन विचार करत बसलो...नंतर चर्चा...आमचा एक मुलगा...पण या निर्णयामुळे अशा लाखो परीक्षार्थी विद्यार्थ्यांवर...त्यांच्या मनावर परिणाम झाला असणार...त्याचा कोण विचार करणार...मोबाईलद्वारे...नेटद्वारे अख्खं जग घरात बसून बघता येतं,  म्हणणारे आपण, परीक्षांचा सेटअप मात्र उभा करण्यात नापास झालो की काय इथपर्यंत आमची चर्चा चालली...जे होईल ते चांगल्यासाठीच...असा सारासार विचार करत या चर्चेचा समारोप केला पण मनात अनेक प्रश्न मागे लागले होते.


कोरोनाचा वाढता कहर पहाता बोर्डाच्या परीक्षा पुढे जाणार याची जाणीव होत होती.  फक्त ते जाहीर होत नव्हतं...म्हणून चलबिचल चालली होती.  दोन आठवड्यांवर परीक्षा तरीही हा निर्णय झालेला नव्हता तेव्हा मात्र चिडचिड होऊ लागली.  नक्की काय करायचं हा आमच्यापुढचा मोठा प्रश्न....कारण बोर्डाच्या अभ्यासाबरोबर अन्य स्पर्धा परीक्षांची तयारी घरात जोरात चालू आहे.  त्याचं ठराविक वेळापत्रक ठरलं आहे.  पहिली फेरी...दुसरी फेरी यांच्या तारखा आधीच जाहीर झाल्यात..त्यानुसार अभ्यासाची विभागणी केलेली.  बोर्डाच्या परीक्षा पंधरा दिवसावर आल्यामुळे त्यांच्याही अभ्यासाला वेळ द्यावा लागत होता.  यासर्वांमध्ये बाहेरील परिस्थितीचा अंदाज बाहेर न पडताही येत होता.  कोरोनाचं प्रमाण वाढतंय,  कदाचित लॉकडाऊन जाहीर होईल अशी परिस्थिती...त्यामुळे परीक्षा पुढे जाणार याची थोडीफार कल्पना येत होती.  पण हा निर्णय जाहीर व्हायला उशीर का होतोय, याचाच अंदाज येईना...अखेर तो अपेक्षित निर्णय अगदी आयत्या वेळी का होईना जाहीर झाला.  पण त्यातही मोठं प्रश्नचिन्ह आहे,  आत्ता परीक्षा पुढे गेल्या...पण पुढे काय...

हा पुढे काय....हाच प्रश्न मोठा रंजक आहे.  गेल्या वर्षापर्यंत आपल्याला पुढे


काय हे माहीत होतं.  पण कोरोनानं सगळी गणितं...अंदाज...फार काय ज्योतिषांचे दावेही फोल पाडलेत...पुढे काय म्हणजे...कोरोना म्हणेल तेच पुढे...काही दिवसांत हा प्रकोप कमी होईल अशी भावना प्रत्येकाचीच आहे.  सगळं पूर्ववत होईल...पण ते केव्हा होईल, हे कोणीही सांगू शकत नाही.  कोरोनाबाबतीच अनेक शास्त्रीय दावे झाले आणि ते बाराच्या भावात गेले.  हे सगळं सांगायचं म्हणजे, परीक्षा पुढे ढकलल्या...पण त्या पुढे कधी आणि कशा घेणार...घेणार असल्यास त्याच्या नियोजनाला निदान आत्तापासून तरी तयारी सुरु केली आहे की तेव्हाही तहान लागल्यावर चर्चांच्या फे-या करणार...आणि एवढं करुनही पुढेही परीक्षा पुढे ढकलल्या तर...किंवा तेव्हा त्या रद्दच केल्या तर...या जर तर ला पर्याय नाही.  आणि असेल तर तो परीक्षा पुढे घेण्यापेक्षा त्या आहेत त्या ठरलेल्या वेळी का नाही. 

दहावी आणि बारावी हे दोन बोर्ड...यातील बारावीच्या परीक्षेनंतर अनेक विद्यार्थी आपल्या आयुष्यातील ध्येय गाठण्याकडे वाटचाल करतात.  इंजिनिअरींग, मेडीकल, आर्केटेक्चर यासारख्या वेगवेगळ्या शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी याच टप्प्यातले विद्यार्थी तयारी करतात...त्यात परदेशातील विद्यापिठात प्रेवश घेण्यासाठी तयारी करणा-यांचीही संख्या मोठी आहे...हे सर्व विद्यार्थी त्या-त्या प्रवेश परीक्षांच्या वेगळ्या अभ्यासक्रमाप्रमाणे तयारी करत असतात...माझा लेक सातवीला असताना या परीक्षांच्या तयारीला लागला.  त्याच्याप्रमाणेच लाखो विद्यार्थी या वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करत आहेत.  


गेल्यावर्षी कोरोना सुरु झाल्यावर अशी लाखो मुलं घरातून,  आपल्या संगणकाच्या माध्यमातून अभ्यासात गुंतली आहेत.  बोर्डाचा आणि या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास,  असा टास्क या मुलांनी घरात बसून केलाय...ऑनलाईन अभ्यासक्रम आणि त्याद्वारे ऑनलाईन परीक्षा...मुळ स्पर्धा परीक्षेच्या आधी त्याचप्रमाणे परीक्षा या मुलांनी घरात बसून दिली आहे.  आणि ती मान्यही करण्यात आली.  पण इथे प्रश्न पडतो की बोर्डाची परीक्षा अशाप्रकारे का घेतली जाऊ शकत नाही.  या मुलांनी घरात बसून जर अभ्यास केला असेल, बाहेर परिस्थिती बिकट आहे,  अशावेळी निदान ट्रायल म्हणून जरी नुसती एक प्रिलियम ऑनलाईन घेतली असती तर दोन्हीकडून आपली कितपत तयारी आहे, याचा अंदाज आला असता.   

खरं सागायचं तर कोरोनामुळे आपण किती पाण्यात आहोत, याचाच अंदाज आला.  आत्तापर्यंत आपण फक्त 21 व्या शतकाच्या बाता मारत होतो.  हा आधुनिक काळ आहे,  यंत्रयुग आहे...अशा गप्पा चालू होत्या...मात्र कोरोनामुळे आपण कितीतरी दशकं मागे गेलो आहोत.  एका रोगानं आपल्या आरोग्यव्यवस्थेला बेजार करुन टाकलं आहे.  सर्व व्यवस्थाच कोरोनामय झाली आहे.  या सर्वांचा मोठा फटका शिक्षण व्यवस्थेला बसला आहे.  कोरोनाच्या लॉकडाऊनं ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे आणला.  ज्या छोट्यांना मोबाईल मागितला की आईचा धपाटा पाठीत मिळायचा,  त्यांनाच आता आई स्वतःहून मोबाईल देत आहे.  किंवा लॅपटॉपसमोर बसवत आहे.  अख्खं वर्ष ऑनलाईन झालं...त्यांच्या परीक्षाही ऑनलाईनच झाल्या आत्ता ही मुलं ऑनलाईनच पुढच्या वर्षात गेली आणि पुन्हा ऑनलाईन अभ्यासाला लागली.  पण बोर्डाच्या बाबतीत नियम वेगळे.  त्या परीक्षा किमान ऑफलाईन व्हाव्यात असा प्रयत्न सुरु होता.   गेलं वर्ष या सगळ्या नियोजनात गेलं.  पण अचानक कोरोनाचा स्पोट झालायं आणि हे ऑफलाईनचं शेड्यूल स्थगित झालं.  पण कोरोनाचा अंदाजच या सगळ्या मान्यवरांनी घेतला नव्हता का....आज कोरोना फक्त आपल्याकडे आहे की जगभर आहे.  जगभर त्यानं कसा हाहाकार उडवलाय याची माहितीही या मान्यवरांना असणार.  अशा परिस्थितीत परीक्षा ऑफलाईन घेण्याचा आग्रह करण्याबरोबर निदान त्या ऑनलाईन होतील का याची एकदा तरी चाचपणी करायला हवी होती.  बारावीच्या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी बसतात...यांच्यासमोर ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्हीही पर्याय असायलाच हवे होते.   जे विद्यार्थी गेली वर्षभर आपापल्या घरातून दोन्ही अभ्यासक्रम सांभाळत आहेत, त्यांच्याकडे ब-यापैकी सेटअप आहे.  अशा विद्यार्थ्यांपुढे ऑनलाईनचा प्रस्ताव द्यायला काय हरकत होती.  आत्ता मे महिन्यामध्ये परीक्षा घेण्यात येतील असे जाहीर झाले असले तरी त्यावेळेची परिस्थिती बघून निर्णय घेण्यात येणार आहे.  त्यापूर्वी ऑनलाईन परीक्षा कितपत यशस्वी होतात, याची एकदा तरी ट्रायला घ्यायला काय हरकत होती.

या सर्वांबाबत विचार करुन डोकं बधिर झालं.  आपल्याला एवढे उपाय सुचतात. तर ज्यांना परीक्षा द्यायचीय त्यांचं काय...हा विचार आला.  लेकाला विचारलं...त्याचही तेच मतं...आजचं उद्यावर ढकलण्यापेक्षा आजचं आजचं व्हायला पाहिजे...त्यासाठी निदान चाचपणी तरी करा...अशी परीक्षा पद्धती यशस्वी झाली असती तर ठरलेल्या वेळी परीक्षा देऊन या विद्यार्थ्यांनी पुन्हा पुढच्या परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली असती.  आता कशातच काही नाही अशी परिस्थिती...कधी होणार हे निश्चित नाही.  पण स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक आत्तापर्यंत तरी स्थिर आहे.  त्यामुळे या परीक्षांमध्ये पुन्हा बोर्डाचा अभ्यास करावा लागणार का या विवंचनेत विद्यार्थी सापडले आहेत.  बारावीनंतर वेगवेगळ्या वाटांवर जाणा-या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या प्रवेश परीक्षा जेवढ्या महत्त्वाच्या असतात,  तेवढेच त्यांच्या बोर्डांच्या गुणांनाही असतं.  त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झालेली...


या सर्वांचा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम किती होत असेल याचा विचारही व्हावा...माझ्या लेकाला मी त्याबाबत विचारलं तर म्हणाला...जे होईल ते सर्वांसोबत होईल...मला माहीत आहे, त्याचं उत्तर तेच असणार...तोही वैतागतो...मग अभ्यास सोडून बुद्धीबळाच्या सोंगट्यांवर आपला सर्व ताण बाहेर काढतो...त्यातून मोकळा होता...पण हे आमच्या घरातलं...बाकीच्या मुलांचं काय...त्यांच्यावर नाहक ताण टाकणा-या आपल्या परीक्षा प्रणालीचं काय...या प्रश्नाचा भुंगा परत माझ्या मागे लागला.  गेल्या वर्षात कोरोनामुळे घरात बसलेल्या मुलांच्या मानसिक अवस्थेबाबत विचार व्हायला हवा होता...तो विचार निदान यातरी वर्षात व्हावा.  शहरी भागात थोडं तरी ठिक आहे,  पण ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाचा प्रवाह किती पोहचला हे कोडंच आहे.  त्यामुळं या मुलांच्याही मानसिक आरोग्याचा प्रश्न वेगळ्या पातळीवर आहे.  त्याचा किती आणि कोणी विचार केलाय हाही एक नवा प्रश्न....एकूण काय परीक्षेच्या तणावावर प्रश्नांचं जाळं तयार झालंय...ते जाळं कधी सुटणार हा नवा प्रश्न....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

Post a Comment