आई....बाबा...अनं रिकामा कोपरा....

 

 आई....बाबा...अनं रिकामा कोपरा....


आई अजून जगली असती ग...बरी होत आली होती...जेवण जेवत होती...फोनवर बोलत होती...फक्त तुमची आठवण येते असं बोलायची...तिला एकदा तरी भेटू दिलं असतं ना तर बरी झाली असती...माझ्या बायकोला जरी बघितलं असतं ना तिनं तरी बरी झाली असती ग...माझ्यापेक्षा सुनेवर जीव होता तीचा...एका मित्राची आई गेल्या आठवड्यात कोरोनामुळं गेली...त्याला चार-पाच दिवसांनी फोन केला...तेव्हा कुठे थोडा आईच्या दुःखातून बाहेर येत होता.  सत्तरीच्या वयाची त्याची आई खमकी होती.  गावाला रहायची...मात्र मित्राचं लग्न झालं, संसार वाढला, तसा हा आईला घेऊन आला.  त्याच्या मुलांना आजीची सवय...मित्राची बायकोही नोकरी करणारी...त्यामुळे त्या दोघांना आईचा खूप आधार होता.  परीक्षा संपल्या की ही आजी नातवांना पकडून गावी घेऊन जायची, ती पार जून महिन्याच्या मध्ये मुंबईला परतायची...येतांना वर्षाला पुरेल इतका गावचा खाऊ सोबत असायचा...बरं स्वभावही लाघवी..त्यामुळे सुनेला तिच्या आईपेक्षा सासूच जास्त आवडायची इतकं जमायचं...कोरोनाची लाट आली तेव्हा आजी नातवांना घेऊन गावाला गेली होती...पण आत्ता काही महिन्यांपूर्वी सगळं ठिक होतंय असं वाटलं म्हणून ती परत आली.  कारण ऑनलाईन शाळा चालू होती.  तिला त्यातलं काहीही समजत नव्हतं...त्यामुळे पुन्हा मुंबई गाठली.  या घरात कसाकोण जाणे कोरोना आला.  आणि त्यानं थेट त्या आजीवरच धावा केला.  पहिलं साधा ताप वाटला...नंतर आजी खोकायला लागली, म्हणून टेस्ट केली ती पॉझिटिव्ह...तिला तसंच हॉस्पिटलमध्ये हलवलं...घरातून जातांना ती तोंडाला मास्क लावून...तिची नातवंडं आणि सुनही तशीच...सर्वांच्या डोळ्यात पाणी...आजी लवकर ये...आई लवकर बरे व्हा...म्हणत तिला निरोप दिला...तो शेवटचाच ठरला...हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तिथलं वातावरण...ती पीपीटी किटमध्ये वावरणारी माणसं बघितली आणि आजीच्या मनात धस्स झालं...ती रडू लागली...पण काहीही होणार नाही...आठ दिवसात घरी येशील बघ, हे सांगण्यापलिकडे मित्र काहीही करु शकला नाही.  आईला नर्सच्या ताब्यात


देऊन आणि पैसे भरुन हा घरी परतला तोच दुःखी मनानं...सकाळ संध्याकाळी रोज आईला फोन होत होता...सून नातवंडं व्हीडीओ कॉल करुन तिला धीर देत होते...तब्बेत सुधारु लागली होती...बरं वाटत असतानाच आजीची ऑक्सीजन लेव्हल कमी होऊ लागली...एका रात्री याला आई व्हेंटीलेटरवर गेल्याचा फोन आला...आईला मला फक्त भेटू दे...मी माझ्या पीपीटी किटचा खर्च करतो...तिच्याबरोबर बोलतो...अशी विनंती त्यानं डॉक्टरांना केली...पण नियम सगळ्यांना सारखा...शिवाय संसर्ग अधिक न वाढू देण्याची जबाबदारी डॉक्टरांवर आणि हॉस्पिटलच्या प्रशासनावर...त्यामुळे त्यांचाही नाईलाज झाला..


मित्र हमसून हमसून रडत होता...एकीकडे आईची आठवण काढत होता...एकुलता एक मुलगा...वडील गेल्यावर त्यानं आईला खूप जपलं होतं...आईनंही गावाला राहून, शेतीची कामं करुन त्याच्या शहरातील शिक्षणाला आणि नंतर संसाराला मदत केलेली...आणि अजूनही करत होती...तिच आई अशी गेली.  आई गेली पण तिला शेवटचं भेटताही आलं नाही...तिचा हात हातात घेऊन, मी आहे, तू काळजी करु नकोस...असा साधा धिर देता आला नाही...याचंच दुःख त्या मित्राला अधिक होतं...साधारण तासभर फोन चालला...नंतर त्याची बायकोही बोलली...घरातला आईंचा कोपरा रिकामा झाला...तो कसा भरणार म्हणून तीही रडू लागली...कोरोनाचा कहर म्हणतात तो या सर्वांनी चांगलाच सहन केलेला...त्यांच्याही टेस्ट कराव्या लागल्या.  रिपोर्ट निगेटिव्ह आले तरी सर्वांना कोरंटाईन होण्याच्या सूचना होत्या...ज्या सासूनं आईपेक्षाही जास्त माया लावली होती, तिचं शेवटचं दर्शनही झालं नाही...की निट अंत्यसंस्कार करता आले नाहीत...कसले हे दिवस,  म्हणत तीही हमसून रडत होती...मला आठवलं जवळपास वर्षापूर्वी माझी वहिनीही अशीच रडत होती...आमचे वडील गेले...असेच...त्यांनाही शेवटचं भेटता आलं नाही...वडील गेल्यावर जाणवलं त्यांची जागा खास होती...ती जागा कधीही भरुन निघणार नाही...त्यांना शेवटचं बघता आलं नाही...बोलता आलं नाही...ही आयुष्यभराची बोच रहाणार आहे. 

आज घराघरात असंच वातावरण आहे.  गेल्या आठवड्यापासून जवळपास रोज एकाला फोन करायची वेळ येतेय...सोशल मिडीयावर तर भावपूर्ण श्रद्धांजली हा शब्द कॉपी—पेस्ट—कॉपी—पेस्ट असा वापरावा लागतोय...कधी झालं...शेवटचं भेटता आलं का...तुम्ही कॉरंटाईन आहात का...बेड मिळाला का...रेमडेसिविर मिळालं का...असे छापील झालेले प्रश्न विचारावे लागत आहेत...घऱातील वयोवृद्ध मंडळी या कोरोनाच्या चक्रात सापडली की अर्धी खचून जात आहेत.  त्यांना मानसिक आधाराची जास्त गरज आहे.  मुळात हॉस्पिटलमध्ये गेल्यावर भल्याभल्यांना भीती वाटते.  त्यात आत्ताचं वातावरण भयावह


आहे.  या वातावरणानं या जेष्ठांच्या मनाची काय अवस्था होत असेल...सर्वत्र पीपीटी कीट घातलेली मंडळी...त्यातून घरचं कोणीच नाही...बायको, मुलं, नातवंड, सूना, मित्र कोणीही बरोबर नाही...त्यामुळे एकाकीपणाची भावना मनात येत असणार....यातून ही मंडळी खचलेली मंडळी औषधोपचार करुन घेत आहेत.  सध्या कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे.  आणि त्यात अडकलेल्या वयोवृद्धांची अवस्था बिकट आहे.  इथे डॉक्टरांना दोष देऊन उपयोग नाही.  वाढत्या रुग्ण संख्येचा त्यांच्यावरही प्रचंड ताण...शेवटी त्यांचाही जीव आहे, कुटुंब आहे...आणि मुख्य म्हणजे तिही आपल्यासारखी माणसंच की...आज आलेल्या युद्धपरिस्थितीला ही वैद्यकीय क्षेत्रातली मंडळी आपापल्या क्षमतेनं तोंड देत आहेत.   त्यांच्याकडून अजून किती अपेक्षा ठेवणार... कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणा-या वयोवृद्धांसाठी काहीतरी वेगळी व्यवस्था करण्याची गरज आहे.  ती मानसिक आधार देणारी असावी...ब्राझिलमध्ये एका नर्सनं केलेला प्रयोग मोठा वाटला...हॅँण्ड ग्लोजमध्ये पाणी भरुन तो हात पेशंटंच्या हातात दिला...कोणाचा तरी आधार म्हणून...या साध्याश्या गोष्टीचा खूप फायदा झाला...म्हणजेच कोरोना हा मानसिक आजारच जास्त झालाय...कोरोना झाला म्हटलं की अर्ध अवसान गळतं...त्यात अशा वयोवृद्धांचं काय होत असेल...त्यामुळे त्यांना मानसिक आधार मिळेल अशी व्यवस्था हवी...

अर्थात ही व्यवस्था कोण करेल असं विचारुनच नका...ती सुद्धा आपली


आपल्यालाच करावी लागणार...कारण कोरोनानं जणू विचारावरच आक्रणण केलं आहे.  काल परवा बातम्या लावल्या तर त्यावर तर आनंदाची बातमी म्हणून फ्लॅश दाखवत होते...कोरोना गेला की काय...मनात पहिला विचार आला...तर लगेच पुढे अॅंकर बातमी वाचू लागली...शहरात जम्बो कोव्हीड सेंटर सुरु झालं होतं...नेते मंडळी आणि त्यांचे कार्यकर्ते त्या कोव्हीड सेंटरची पाहणी करत होते...मग एका कार्यकर्त्यांचा बाईट दाखवला...साहेबांनी करुन दाखवलं...आता काळजीचं कारण नाही...मी डोक्याला हात मारुन घेतला...यात काय करुन दाखवलं...बातम्या देणारी अॅंकर भरभरुन बोलत होती...आता दिलासादायक बातमी आली म्हणून तिचं गुणगाण चालू होतं...या अशा वातावरणात आपल्या घरातील माणूस हॉस्पिटलमध्ये दाखल झालाच तर त्याच्या मानसिक स्थितीचा विचार होईल हा विचारच करायला नको...

त्यामुळे मंडळी काळजी घ्या...आपल्या घरातील प्रत्येकाची....कारण घरातली एखादी जागा जर खाली झाली तर ती पुन्हा कधीही भरुन काढता येत नाही...आणि त्यांच्यासाठी शेवटच्या क्षणी आपण काहीही करु शकलो नाही ही मनातली खंतही कधी पुसता येत नाही....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

Post a Comment