दरवर्षीचं रसाळ प्रेम....

 

  दरवर्षीचं रसाळ प्रेम....


आयुष्यात प्रेम एकदाच होतं म्हणतात...पण तरीही काही अशा गोष्टी आहेत, ज्या दरवर्षी प्रेमात पाडतात...अगदी पार बरबटवतात...त्यातली एक गोष्ट म्हणजे आंबा...हापूस किंवा अन्य कोणताही...दरवर्षी हा आंबा नव्यानं प्रेमात पाडतो...नेहमी सुरुवात हापूसपासून आणि शेवट तोतापुरी, केसर, दशेरी...असा कुठलाही...ताटात एक फोड आणि बाट असली की मन एकदम प्रसन्न...अर्थात यावर्षी जरा नेम चुकला...आत्तापर्यंत लेकाच्या वाढदिवसाला,  म्हणजेच रामनवमीला एक हापूसची पेटी घरात यायचीच...मग त्या मधूर स्वादाची पूजा...एक आंबा देवाला...आणि मग त्याची चव बघायला मोकळं...पहिल्यांदा


पेटी आल्यावर एक नियम होतो...आता नेहमी दोनच कापायचे...मग दोनाचे तीन होतात...मग अचानक सकाळी आंब्याचीच भूक लागते.  कधीतरी दुपारी जेवणावरची वासनाच उडते...पण आंबा मात्र खावासा वाटतो.  तर कधी पोटभर जेवण होऊनही लगेच भूक लागते...मग अशावेळी बिचारा आंबाच नजरेसमोर येतो.  अशातच कधी रात्री एकदम गर्मीचा त्रास होतो...जेवण अगदी नकोसेच होते...मग काय पुन्हा आंबाच ना...एकूण काय आंबा घरात आल्यावर नावापुरता नियम होतो.  पण जसा या आंब्याचा वास घरात घुमायला लागतो...तस तसं कसला नियम आणि कसलं काय....प्रत्येकवेळी आंब्याचा फडशा पाडायचा असाच नेम आणि नियम होऊन जातो...

यावर्षी मात्र पहिल्यांदा नियम तुटला...हापूस येण्याआधी फळवाल्या गाडीवर आलेला लाल रंगाचा आंबा खाऊन झाला.  कुठला होता हे माहीत नाही...पण याला हापूसची सर नाही,  असं वाक्य प्रत्येकवेळा त्या कापलेल्या आंब्यावर फेकत त्याची बाट पार पांढरी होईपर्यंत चोखून झाली.  तरीही हापूसची पेटी


आणण्याचं धाडस होत नव्हतं.  सोशल मिडीयावर हापूसच्या फोटोंचा पाऊस सुरु होता...हा देवगडचा...हा रत्नागिरीचा...चव अप्रतिम...अशी जाहीरातही होत होती.  पण गेल्यावेळी अशाच एका पोस्टनं आम्हाला पहिल्यांदा फसवलं...हापूसची पहिली पेटी घरात आली...पण आम्ही पार फसलो गेलो होतो...अगदी कवळा असा आंबा पदरात पडला...चव नाहीच...पण तरीही तो आंबाच...कसा तरी संपवला...एरवी आंबा खरेदीमध्ये कोणीही फसवू शकणार नाही,  एवढी माझ्या नव-याची नजर पारखी...पण गेल्यावर्षी पहिल्याच पेटीला फसवणूक झाल्यानं यावर्षी जरा आस्ते कदम धोरण ठेवलं होत...अनेक फोटो बघून झाले.  इकडे माझी आणि लेकाची घालमेल चालू होती...वाढदिवसाचा मुहूर्त चुकला...वरुन आठवडा गेला...पण बाहेर पडून बघण्याचीही सोय नाही....कोरोनामुळे अस्सल चवीचे आणि पारखीचे दोन्हीही घरी बसलेले...अशावेळी आमचे एक मित्र केदार पाध्ये यांची सोशल मिडीयावरची पोस्ट पाहिली...सुरेख रंगाच्या हापूसची फोड तेवढ्यात सुरेखपणे कापलेला फोटो समोर आला.  फोटो पाहिल्याबरोबर नवरा पहिल्यांदा म्हणाला, फोन कर त्यांना...आपल्यासाठी पेटी बुक कर...हुश्श...किती गोड शब्द...लगेच एक पेटी बुक केली...दोन दिवसांनी ही आंब्याची पेटी घरपोच आली.  पॅकींगमधून दिसणा-या छोट्या गोलमधून नव-यानं पहिल्यांदा त्या सोनेरी फळाचं दर्शन घेतलं...झरोका झलक...आंबा चांगला आहे...उद्या पेटी फोडूया...असं म्हणून तो कामाला लागला...मी आणि वरद त्या पेटीभोवत

घुटमळत राहिलो...नजरेनं बोलत होतो...फोडूया का...पण नकोच...कारण आंब्याच्या बाबतीत बाबाचं मत एकदम परफेक्ट...लेकानं नजरेनं सांगितलं...त्यामुळे दुस-या दिवशीची प्रतीक्षा करीत आम्हीही दोघं आमच्या कामाला लागलो...

अखेर आमच्या बाबांनी आंब्याची पेटी फोडली.  देवाला आंबा दाखवला.  मग पाण्यात दोन आंबे घालून ठेवले.  चार वाजता कापूया...वरद आणि मी दोघेही चारच्या ठोक्याल उठलो...पहिला आंबा कापतांना उत्सवच जणू साजरा होत होता.  दोघेही न सांगता किचनमध्ये आलेले....आंबा कापल्यावर त्याच्या सोनेरी रंगानं आणि त्यांच्या अस्सल अंबेरी चवीनं घर न्हावून गेलं.  पहिली फोड तोंडात गेली तेव्हा व्वा...शिवाय काहीही मनात आलं नाही.  यावेळेची पहिली पेटी सार्थकी लागली.  केदार पाध्येंना धन्यवाद देत,  आता ती पेटी संपवायच्या मागे लागलो आहोत. 

आत्तापर्यंत जी फळं हाती आलीत त्यांची मिठाई, सरबत किंवा फिलींग केली आहेत.  चिकू, पेरु, जांभूळ, द्राक्ष, स्टॉबेरी,  अननस, डाळींबासह कुठल्याही फळाला सोडलं नाही.  फारकाय ड्रॅगनफ्रूट, किवी, स्टारफ्रूट, अॅव्हकोडा अशा विदेशी फळांनाही सोडलं नाही.  नुसतं खाण्यापेक्षा या सर्व फळांच्या मिठायाच आमच्या घरात जास्त होतात.  अननस, डाळींब, स्टारफ्रूट, अॅव्हकोडा यांचे तर झणझणीत पदार्थही होतात.  फ्युजन प्रकारातले पिझ्झा,  स्टफ पास्ता,  रायव्होली असे नको नको ते पदार्थ या फळांबरोबर हमखास होतात.  पण आंब्याच्या बाबतीत ही हिम्मत कधी झाली नाही.  आणि होणारही नाही.  का तर आंब्याच्या प्रती असलेलं निखळ प्रेम...आंब्याला खाण्यापुरते कापायचे आणि मग एक क्षणाचाही विलंब न करता त्याला ओरपायला लागायचे.


  त्याच्यावर अन्य काही प्रोसेस करुन मग त्याची चव चाखायची...एवढी उसंत कोणाकडे आहे...बरं आंब्यावर प्रेम एवढं की त्याला बारीक कापून मग त्याच्यावर पुढचे अग्निसंस्कार करायचे म्हटलं तरी अंगावर काटा येतो.  आंब्याला एवढा त्रास द्यायला माझ्या कायम जीवावर आलं आहे.  आंब्याचा सिझन चालू झाला की सोशल मिडीयावर त्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या फोटोची जणू स्पर्धा लागते.  मैत्रिणींचे फोन चालू होतात.  आज आमच्याकडे आंब्याचा शिरा केला.  आज काय तर आंब्याची पुरणपोळी...तर दुसरीकडे आंब्याचे मोदक...आत्ता तर आंब्याचा केक बनवून त्याचे फोटोही मैत्रिणी मुद्दामून पाठवतात...मी या सर्वांच्या विरोधातली आहे.  आंब्याला नुसता चोखून खाण्यात जी मजा आहे, ती दुसरी कशातही नाही.  यावर मी ठाम आहे.  म्हणूनच की काय आमच्याकडे साधा आमरसही होत नाही.  उगीचच आधीच रसाळ असणा-या या अमृततुल्य फळाला पिळून त्याचा रस काढायचा आणि मग तो चाखत बसण्यात काय अर्थ आहे.  त्यापेक्षा त्याला कापायचा आणि फोडी चोखून खायच्या...मग राहिलेला बाटा अगदी पांढरा होईपर्यंत आणि त्याच्यावरचे केस किती लांब आहेत, हे समजेपर्यंत चोखत रहायचे.  फार सोफिस्टिकेटेड नसाल तर आंबा हातात घेऊन सालं सोलून काढायचा...आणि नुसता चावून खायचा...असं करतांना कपडे, आपला चेहरा यांचा विचार बाजुला ठेवायचा...ही सर्व लहानपणीची मजा...तेव्हाचं सुख काही वेगळंच होतं.  आत्तासारखे आंबे मोजून खाल्ले जात नसत.  कितीही ख्खा...आणि कसेही ख्खा...आमची आई तर अंब्यांचा सिझन सुरु झाला की कपडेही वेगळे काढायची.  मार्च, एप्रिल, मे महिन्यात घालण्यासाठी गडद रंगाचे कपडे असायचे.  मे महिन्याच्या अखेरपर्यंत या गडद रंगावरही आंब्याचे पिवळे डाग दिसायला लागायचे.  असो...बालपणीचा काळ सुखाचा तो यासाठीच.

आत्ताशी कुठे आंब्याची सुरुवात झाली आहे.  दरवर्षी मार्च महिना लागला की मी ठाण्याच्या बाजारात फक्त आंबे, काजू आणि ताडगोळ्यांसाठी फे-या मारायचे.  मात्र गेल्यावर्षी आणि यंदाही कोरोनामुळे या फे-या चुकल्या आहेत.  ठाण्याच्या बाजारात जायचे ते चोखायच्या आंब्यासाठी.  अगदी सकाळी गेलं की आसपासच्या खेड्यातून आलेल्या कातकरी महिला टोपल्यातून हा आंबा घेऊन येतात.  अगदी पहिल्या फेरीत चांगला चोखायचा आंबा निवडायला वेळ लागतो.  एकदा का असा परफेक्ट बिट्ट्या आंबा मिळाला की मग  शोध थांबवायचा.  नंतर जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये फेरी होईल, तेव्हा फक्त त्या आंबा विक्रेत्या महिलेचा शोध घ्यायचा.  भावामध्ये कोणतीही घासाघीस न करता चोखायचा आंबा, अर्थात बिट्ट्या आंबा ताब्यात घ्यायचा.  या आंब्याचा हिशोब नाही.  म्हणजेच हापूस खातांना जरा तरी हिशोब होतो.  पण हा बिट्ट्या खातांना सर्व हिशोब गुंडाळून ठेवायचा.  गेल्यावर्षी आणि आताही हे सुख मिळणार नाही.  माझा लेक आंबा खाण्याच्या


बाबतीत अगदी सोफिस्टिकेटेड...चोखायचा आंबा पहिल्यांदा खायचा नाहीच...कारण कपडंयावर डाग पडतात...त्याचा रस हातावर कसाही ओघळतो...चेहरा या आंब्याच्या रसात बुडला जातो...त्याला असं काही पसंद नाही.  हापूससुद्धा पहिल्यांदा काट्यानं खायचा...मी तेव्हा डोक्याला हात मारुन घ्यायचे.  अलिकडील एक-दोन वर्षात गाडी सुधारतेय...म्हणजेच आंबा चोखून खाल्ला की त्याची चव वाढते हे त्याला कळायला लागले आहे.  मात्र आंब्याच्या अन्य प्रकाराबाबत तो तर माझ्याही एक पाऊल पुढे आहे.  आंब्यापासून बनवलेला कुठलाही पदार्थ त्याला आवडत नाहीच पण आंब्याचे ज्युस किंवा चॉकलेटही त्याला आवडत नाही.  आंबा म्हणजे आंबाच...त्यापासून अन्य काहीही नाही...कधीही नाही....यावर तो आत्तातरी ठाम आहे.  मला मात्र त्याचा हा ठामपणा पाहून समाधान वाटतं...वारसा..वारसा...म्हणतात तो हाच असावा...

असो...मंडळी आत्तातर पहिली पेटी आलीय...आता हा आंबाप्रेमाचा सिलसिला सुरु झालाय.  आत्ता सर्व भार हापूसवर आहे.  मे महिन्यापर्यंत हापूसवरच या प्रेमाची सर्व भिस्त...मग केसर, दशेरी, निलम, तोतापुरी, पायरी...अशा


सर्वांवर हे प्रेम विभागले जाते.  काहीजण पहिला पाऊस पडला की आंबा खात नाही...का, तर त्याची चव उतरते म्हणे...पण आम्ही तर धो धो पाऊस पडला तरी आंब्याला सोडत नाही.  शेवटी अगदी फळवाल्याच्या गाडीवर जोपर्यंत आंबा आहे, तोपर्यंत त्याला आमच्या घरात स्थान आहे.  पार ऑगस्ट-सप्टेंबर पर्यंतही हा सिलसिला चालू रहातो...पण या सर्वांना हापूसची सर आणि चव दोन्हीही नसते...त्यामुळे खातांना याला हापूसची सर नाही असं छापील वाक्य काढायचं आणि तेवढ्याच तन्मयतेनं या आंब्याला चाखायचं...एकूण काय आत्ता पहिली सुरुवात झालीय...यावर्षीचा पहिला आंबा सरसच निघालाय...अगदी एक फोड आणि बाट वाट्याला आली तरी तृप्तीची भावना येतेय..त्यामुळे पुढचे महिने याच चवीमध्ये ओथंबलेले असणार हे नक्की....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. खूप सुंदर वर्णन.माझ्या नावाचा उल्लेख केला त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.ही खरी पोचपावती.

    ReplyDelete
    Replies
    1. खरतर तुमचेच धन्यवाद....अस्सल हापूस तुमच्यामुळे मिळाला....

      Delete
  2. हापूस सोलून खाण्यात च मज्जा असते. खूप छान लेख.

    ReplyDelete

Post a Comment