चि. सौ. कां. चैतालीच्या निमित्ताने....
दोन तारखेला वॉटसअपवर मेसेज होता...चैतालीचं लग्न झालं...काल झालं...आम्ही इथे छान साजरं केलं लग्न...तुला फोटो पाठवलेत बघ...चार छोट्या छोट्या वाक्यांच्या या मेसेजनं मला चांगलाच धक्का बसला. हा मेसेज होता, माझ्या भाभींचा....सौ. मधुरा मेहता यांचा...आमचे भाई, म्हणजेच मनोज मेहता यांच्या पत्नी...पण भाईंपेक्षा या भाभीच जास्त आपल्या...नावाप्रमाणे मधुर...त्यामुळे माझी आणि त्यांची चांगलीच गट्टी जमलेली...सध्या फोन लेकाकडे असल्यामुळे बोलणं होत नाही...जाणं येणं नाही...पण वॉटसअपच्या माध्यमातून आमचं शेअरींग चालू असतं...त्यांची धाकटी लेक चैताली, अमेरिकेत एमबीए साठी गेली...आणि नोकरीनिमित्त तिथे स्थिरावली. या चैतालीचं लग्न झाल्याची बातमी भाभींनी शेअर केली तेव्हा मोठं आर्श्चय वाटलं....कारण या मेहता कुटुंबाचा मित्रपरिवार...नातेवाईक…न मोजता येईल असा मोठा गोतावळा....त्यामुळे धाकट्या लेकीचं लग्न म्हणजे मोठा उत्सवच झाला असता...पण या सर्वांना टाळून या कटुंबानं आणि त्यांच्या व्याही झालेल्या पवार कुटुंबियांनीही जो निर्णय घेतला तो सर्वांना डोळस करणारा आहे. ही दोन्ही कुटुंब सधन वर्गातील. पण त्यांची श्रीमंती ही धनाबरोबर विचारांचीही आहे...या कोरोना काळात काही नियम स्वतःहून आपल्यावर घालून घेतले तर आपला आणि आपल्यासोबत समजाचाही बचाव होणार आहे. आपल्याकडे आहे भरपूर, होऊद्या खर्च...ही भावना ठेऊन या संसर्गकाळातही हजारोंची गर्दी करणारे समारंभ झाले आहेत. आणि त्या समारंभांनं दिलेलं रिटर्न गिफ्ट किती जणांना महाग पडलं आहे, हे आपण पाहिलं आहे. अशावेळी फक्त धनाची नाही तर मनाची श्रीमंती दाखवत या दोन्ही कुटुंबांनी घेतलेला निर्णय हा सर्वांनाच आगामी काळातही मार्गदर्शक ठरेल असाच आहे.
जवळपास वीस वर्षापूर्वी डोंबिवलीतील ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत टोळ यांच्यामुळे मेहता परिवाराबरोबर माझी ओळख झाली. मनोज मेहता उत्तम आणि डोळस फोटोग्राफर...त्यांची पत्नी मधुरा गृहिणी आणि निकीता, चैताली या दोन मुली. एका मुलाखतीसाठी झालेली ही ओळख नंतर फॅमिली फ्रेंड...या व्याख्येपर्यंत झाली. याला मुख्य कारण म्हणजे सौ. मधुरा यांचा स्वभाव...घरी आलेल्या व्यक्तीची आवभगत कशी करावी ते या बाई कडून शिकावं....हाच स्वभाव दोन मुलींमध्येही...यशावकाश आमची दोन्ही घरं एकमेकांच्या चांगली परिचयाची झाली. माणसं मोठी, श्रीमंत...पण तरीही पाय जमिनीवर असलेली. माझ्याबरोबर माझ्या लेकाचं आणि या घराचं चांगलंच जमलं...मनोजभाई, मनोजमामा झाले...आणि या दोन लेकी ताई झाल्या....दोन्हीही लेकी आई-वडीलांसारख्याच...मायाळू स्वभावाच्या....धाकटी चैताली खेळाडू...जिमनॅस्टीक प्लेअर...तिच्याकडे बघून माझ्या लेकानं खेळाला आपलंसं केलं. लहानपणापासून एकदम शिस्तीची...विद्यानिकेतन शाळा आणि नंतर भोईर जिमखाना....पुढे कॉलेज...मग नाईट कॉलेज करुन काढलेला नंबर...वडील फोटोग्राफर तरीही कुठल्याश्या टॉप फोटोग्राफरकडे फोटोग्राफीचे धडे घेतले....या दरम्यान मोठी बहिण लंडनला गेलेली, फॅशन डिझायनींगकरता, तिथे मॉडेल म्हणून ही चैता आपल्या बहिणीच्या मदतीला गेली. पुढे याच मोठ्या बहिणीच्या लग्नात आणि तिच्या बाळंतपणातही एखाद्या आईसारखा सगळा भार आपल्या खांद्यावर घेतला...चैतालीची प्रत्येक गोष्ट कौतुकाची...माझ्या लेकाचा आदर्श म्हणजे चैताली ताई...पुढे चैताली अमेरिकेत एमबीएसाठी गेली...तिच्याबरोबर बोलणं कमी झालं...तरीही तेथील तिच्या प्रगती कळत होती. तिथेही या चैतालीच्या चैतन्याची जादू पसरली...चांगला मित्र परिवार गोळा केला...आई-वडीलांना अमेरिका दाखवली...कोरोना काळात तिच्याबद्दल भाभींबरोबर बोलणं झालं...सर्व साभांळून ती काम करत होती...कुटुंबापासून लांब असलेल्या या लेकीची त्यांनाही काळजी होती...यात अनपेक्षितणे भाभींनी चैतालीच्या लग्नाची गोड बातमी दिली. डोंबिवलीच्याच कुणाल पवार या
तरुणाबरोबर अगदी घरगुती समारंभात तिनं लग्न केल्याची माहिती मिळाली. बातमी गोड...पण तरीही मनात आलं...ही चैताली म्हणजे मेहतांची धाकटी लाडकी लेक...कोरोनाची लाट ओसरल्यावर काही महिन्यांनी लग्न इथे जोरदार, थाटात आणि सर्व पै पाहुण्यांच्या उपस्थितीत करता आलं असतं...पण असं न करता या मेहता आणि पवार कुटुंबानं असा वेगळा निर्णय का घेतला. लग्नात काही हौसमौज असते...ती मीस नाही केली का...पण हा प्रश्न मनात यायच्या आधी भाभींचे एकापेक्षा एक सरस फोटो वॉटसअपवर आले. अगदी हळद कांडणीपासून ते रुखवातापर्यंत सर्व काही घरात केलेलं. घरात म्हणजे इथे, भारतातल्या घरात...लग्न कुठ अमेरिकेत...पण त्यात काही फरक पडत नाही. परंपरा पाळल्या...हौसमौज केली. पण हे सर्व करतांना पहिला अग्रक्रम होता तो आरोग्याला, आपल्या मित्रपरिवाच्या आणि नातेवाईकांच्या सुरक्षितलेला...त्यामुळे दोन्ही कुटुंबांनी कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीला न सांगता घरातल्या घरात ई सोहळा पाहिला आणि पार पाडला.
चैतीली आणि कुणाल यांनी तिकडे अमेरिकेत साध्या पद्धतीनं लग्न
केलं. कोरोना आहे. परिस्थिती कधी सुधारणार याची नक्की माहिती
नाही. अशावेळी इथे किंवा तिकडे परदेशात
समारंभ करण्यापेक्षा या मेहता आणि पवार या दोन्ही कुटुंबांनी या भावी पिढीच्या
हातात सर्व मदार दिली. तुम्ही तिकडे लग्न
करा. आमचा आशीर्वाद आहे, असा आधार दिला. मग या दोघांनी साध्या घरगुती समारंभात, मोजक्या
मित्रपरिवाराच्या साक्षीनं भारतीय पद्धतीनं विवाह गाठ बांधली. दोन्हीही कुटुंब अमेरिकेत व-हाड घेऊन जाऊ शकत
होती. पण या सर्व शक्यतांना त्यांनी फाटा
दिला. परंपरा या पाळायच्या असतातच पण त्या
परिस्थितीनुसार पाळाव्यात...आपल्या परंपरांच्या अट्टाहासापोटी आपल्याला आणि आपल्या
परिजनांना आपण अडचणीत तर टाकत नाहीत नाही...हे आधी बघायला हवं. हे या दोन्ही कुटुंबांनी आपल्या या छोट्याश्या
पण महत्त्वपूर्ण कृतीतून दाखवून दिलं आहे.
आत्ता या चैतालीबद्दल अजून किती सांगू...ही चैताली म्हणजे मेहतांच्या
घरातले चैतन्याचे झाडच...सतत उत्साही...आनंदी....आणि सकारात्मक विचारांनी प्रेरीत
असलेली ही मुलगी आता पवारांच्या घराण्याची सून झालीय...तिचा हा चैतन्याचा झरा या
दोन्हीही घरांनाही उत्साही आणि आनंदी करणारा आहे.
सोबतच आमच्यासारख्या मित्रवर्गालाही....
हे सर्व सांगण्याचा हेतू हा की, मेहता आणि पवार ही दोन्हीही घरं श्रीमंत आहेत. पण त्यांची श्रीमंती ही धनाबरोबर विचारांचीही आहे. जी परिस्थिती असेल त्याला सोमोरे जायला हवं...आमच्यात हे चालत नाही....आमच्यात ते चालत नाही...सगळी हौसमौज केलीच पाहिजे...आमची एकच मुलगी...आमचा एकच मुलगा...असे डायलॉग आता बाजुला सारायला हवेत...हा करोना सर्वांचा बाप आहे....जरा कुठे फट दिसली की तो शिरकाव करतो. आणि आत्ता तर अवघ्या कुटुंबालाचा आपल्या कवेत घेतोय...त्यामुळे आमच्यात तुमच्यात बाजुला ठेवऊन आपल्यात हा शब्द रुजवायला हवा...
बरं या सर्वात मला या कुटुंबाचा आणखी एक सकारात्मक दृष्टीकोण दिसला तो
म्हणजे, लग्नाचे विधी यांनी आपल्या घरात केले तरी आपल्या हौसमौजेला कुठेही फाटा
दिला नाही. सर्व छान सजून, धजून अगदी आपण
विवाह मंडपात आहोत, असंच वागले. जाऊदे,
करायचं म्हणून करतोय, कुठे आणि कशाला चांगल्या साड्या घाला. कोण बघणार...नंतर उगीचच आपल्याला आवरा आवर
करायला लागेल...असले विचार करुन दुःखाचे उसासे मारले नाहीत, की चेहरे रडवेले केले
नाही...इथे तर इथे...पण करायचे तर छानच...साजरे...गोजरे हा विचार करत या मंडळींनी
अगदी छोट्या खलबत्यात हळद कुटली, गाणी
म्हटली...रुखवात सजवला...घर सजवलं...नव्या जावयासाठी त्याच्या आवडीचे पदार्थ
बनवले...नेहमी आपल्या कृतीतून सकारात्मकता दिसायला हवी, ती अशी.
आज कोरोना नावाचा हा रोग कधी शांत होईल ते सांगता येणार नाही. त्याचे नेमकं औषध काय...हा प्रश्न कायम
आहे, पण अशा उदाहरणामधून ते उत्तर
सापडतं. असंच केलं पाहिजे, हेच आले पाहिजेत...आमची माणसं...आमची
भावकी...हे सर्व अट्टाहास सध्यातरी आपल्याला बाजुला ठेवले पाहिजेत...कारण या सर्व
हट्टामुळे नको तेवढी गर्दी आणि कोरोनाचा धोका वाढतोय...गेल्या काही दिवसांमध्ये
लग्न ते अंतिम संस्कार अशा ठिकाणी गेलेल्या एखाद दुस-यामुळे अख्खच्या अख्खं कुटुंब
कोरोनाच्या विळख्यात आल्याच्या बातम्या येत आहेत.
त्या सर्वांना हे मेहता-पवार घराण्याचे उदाहरण डोळ्यात अंजन घालणारे आहे. आहात तिथेच थांबा...स्वतःला जपा आणि आपल्या
कुटुंबाला आणि त्याद्वारेच समजालाही....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Mast
ReplyDelete