माळ्यावरच्या खास सामानाची गोष्ट....
हुश्श....जमलं एकदाचं...किती सोप्पं...पण आपल्या भाषेतलं आणि स्वादातलं केलं की झालं....हे झालं...जमलं...ते म्हणजे सुशी...जपान देशातला एक पदार्थ...जवळपास गेलं वर्षभर ही सुशी मला त्रास देत होती...लेकाची फर्माइश...एकदा करुन तर बघ...आणि माझी पळवाट...अरे भात असतो तो फक्त...भाज्यांमध्ये गुंडाळायचा...बस्स...त्यात काय विशेष...असा आमचा दोघांचा संवाद अनेक दिवस चालू होता...अखेर मी कंटाळले...एकदाची करते ती सुशी...म्हणत गुगलबाबांवर थोडं सर्च केलं...प्रश्न फक्त त्या सुशी नॉरीचा होता...हिरवी पानांची गुंडाळी...पण आपल्या पालकांची पानं कामी आली...एकदाची सुशी झाली...लेकाला दाखवलं...त्यानं पसंती दिली...म्हणजे एक परीक्षा पास झाले...आत्ता दुसरी परीक्षा...म्हणजे चवीची...त्याआधी म्हटलं फोटोसेशन करुया...नेहमीच्या डीश काढल्या...त्यात एकामागून एक सुशीचे पीस लावले...सॉसच्या नावावर आपली टोमॅटो चटणी टेकवली...लेकाला म्हटलं जरा फोटो तर काढ...तर तो नुसता बघत बसला...अग पदार्थ वेगळा तर डीश का वेगळ्या नाहीत...आपल्याकडे दुस-या डीश आहेत ना...मी मान हलवली...माळ्यावर दोन चांगले डीनर सेट निट गुंडाळून ठेवले होते...काचेचे...पाहुणे आले तर काढूया...काचेचे आहेत...फुटायला नको...कधीतरी सणाला काढू...अशा पटीतील कारणांनी हे सेट माळ्यावर गुंडाळून ठेवलेले...ते ज्या कारणांसाठी ठेवले त्या कारणांनी कधी खाली आलेच नाहीत. लेकाला हे कळल्यावर त्यानं कधी नव्हे तो पुढाकार घेतला...टेबल आणून सेट काढण्याचा प्रयत्न करु लागला...त्याच्या मदतीला वर्क फ्रॉम होम करणारा बाबा आला...मी मात्र अजूनही नेहमीच्या डीश वर ठाम होते...अरे नको...एखादी डीश फुटली बीटली तर सेट वाया जायचा...मी शेवटचा प्रयत्न केला...वाया जायचा...अग वर ठेऊन कुठे तो कामी येतोय...काय करणार नुसता माळ्यावर ठेऊन हे सेट...कधी आणि कोण वापरणार त्यांना...सेट काढतांना लेकाची प्रश्नावली चालू झाली...आणि मी वास्तवात आले...खरंच कधी वापरणार...फुटतील...पाहुणे आल्यावर त्यांना होतील...मग आपलं काय...आपण कधी त्याचा उपभोग घेणार...मी त्याच्याकडे बघत होते...बॉक्स उघडून त्यांनं जेवणासाठी डीश, चमचे, बाऊल, छोट्या वाट्या काढल्या...किती
छान आहे...सर्व...साठवून काय करणार आई...रोज वापरुया हे...म्हणत तो बाहेर गेला...मी त्या काचेच्या डीशकडे बघून हसायला लागले...अगदी छोट्या का होईना पण एका क्षणानं मी ताळ्यावर आले...आहे त्याचा आत्ता उपभोग घ्या...कोणा पाहुण्यांपेक्षा आपल्या खास वस्तूंचा आपण किती उपभोग घेतो, हे सुद्धा महत्त्वाचं आहेच की...आणि आपल्या घरातले आपण खास असतो....आपल्या या खासपणासाठी तरी जपून ठेवलेल्या वस्तूंचा उपभोग घेतला पाहिजे....
लॉकडाऊनमुळे नाही तर एरवीही आमच्याकडे पदार्थांची बहार असते. मोमोज, रॅव्हीओली, अमेरिकन चॉप्सी, पॅन केक...असे कितीतरी पाश्चात्य घरातले
पदार्थ इंडियन मोडमध्ये ब-यापैकी करता येतात...टीएससी चॅनल दिवस रात्र बघितल्यावर हे अस केलंच पाहिजे...हे लेकाचं त्यामुळे आवडतं वाक्य...असो...सर्व पाश्चात्य पाककृती आपल्या भारतीय पाकशास्त्राप्रमाणे करण्याची मला भारी हौस...आलं...लसूण...मिरची...काळीमिरी आणि कांदा या पंचमचा वापर सर्व जगभरातील पदार्थांमध्ये असतो, हे मी घरी पटवून दिलं आहे. त्यामुळे त्यांच्या साथीनं आत्तापर्यंत अनेक पाश्चात्य पदार्थ सहज केलेत...आणि ते घरी आवडलेतही...पण या सुशीच्या वाट्याला मी कधी गेले नव्हते...त्याच्यावर गुगलबाबांच्या मदतीनं ब-यापैकी संशोधन केलं...पण चिकट भात एका हिरव्या पानात गुंडाळायचा...गुंडाळतांना त्यामध्ये तीळ, अव्हाकॅडो, गाजर, सिमला मिरची, फ्रेंच फ्राईज, कोलंबी कधी सुरमईचे तुकडे तर कधी चिकन, वर काकडीचे पातळ काप...यापैकी काय हवं ते टाकायचं...या सर्वांवर काळ्या पांढ-या तिळाचं आवरण...आणि ते नॉरी नावाचं हिरवं पान...आपल्या अळूवड्यांसारखंच सारं...पण भात..तोही चिकट आणि थोडा आंबट...मी लेकाला कितीतरी वेळा समजावलं...अरे भात-भाजी किंवा भात चिकन, मच्छी खाण्यासारखे आहे...सुशी केलं की फक्त सर्व एकदम एका घासात खाल्लं जात...तरीपण त्याचा हट्ट चालू होता...शेवटी कधीतरी अंगात येतं ना...येत नाही म्हणजे काय...त्यातलाच प्रकार झाला....पालकांची मोठी पानं मिळाली. त्यातच सर्व जमवून आणलं
आणि सुशीसारखी मायसुशी तयार झाली.
अर्थात आत्ता कुठलाही नवीन पदार्थ
केल्यावर त्याची टेस्ट बघण्यापेक्षा त्याचा फोटो काढण्याची घाई जास्त असते. तशीच झाली...हिरव्या पानात गुंडाळलेला ह
पदार्थ...त्याला टोमॅटो चटणी सोबत वाढली...पान सजलं...आत्ता फोटो काढले की पोटात
ठकलायला मोकळं...म्हणून सगळी सूत्र लेकाकडे दिली...तर त्यानं मुळ मुद्दा बाजुला
ठेऊन दुस-याच मुद्द्याला चालना दिली.
नेहमीच्या डीश चांगल्या दिसत नाही म्हणे...का नाही दिसत...कितीही कंटाळा आला
तरी भांडी चांगली जोर लावून घासते...चकाचक असतात...त्याच जुनं नव कुठे आलं...पण तो
काही ऐकायला तयार झाला नाही...नेहमीच्या वाईट नाहीत, पण त्या वरच्या काय वाईट आहेत...खालीच
काढूया...म्हणून हटून बसला...त्या सुशी बाजुला राहिल्या...हे वेगळंच रामायण सुरु
झालं...
दोन वर्षापूर्वी नव-याला भेट म्हणून
एक छानसा डीनर सेट मिळाला...तो आला तेव्हा बघितला...खूप छान...नाजूक
नक्षीदार...पांढ-या शुभ्रु काचेच्या डीश...पहिल्या नजरेतच आवडला...तसाच तो वर
माळ्यावर ठेऊन दिला. कोणी पाहुणे आले की
काढू...काचेचा आहे, सांभाळायला
लागेल...एखादी डीश गेली तरी सगळा सेट वाया जाईल...म्हणून तो वर व्यवस्थित
ठेवला. नंतर काही खरेदीला गेल्यावर एक
आणखी सेट आवडला. मातीच्या रंगाचा...चौकोनी
डीश...बाऊल आणि चमच्यांचे आकारही वेगळे...त्याच्या वेगळेपणामुळे तोही घरात दाखल
झाला. काही दिवस नव्याचे झाल्यावर याला
जपायला हवं...रोज रोज नको...हे कारण पुढे आलं...मग त्याचंही पुन्हा व्यवस्थित
पॅकींग झालं. आधीच्या सेटच्या बाजुला तोही
सोबत करायला माळ्यावर जाऊन बसला...तो आत्तापर्यंत...
लेकांनं हे दोन्हीही बॉक्स खाली काढले होते. तेव्हा त्याकडे बघत विचार चालू
होता...कशाला जपलं यांना...एकतर काचेचं सामान...या लेबलखाली...फुटलं तर...एक तर स्वभाव धडपडा...नेहमीची भांडी घासतांनाही किती घाई होते...तशाच घाईत ही काचेची भांडी घासली तर असे सेट महिन्याला दोन तरी लागतील...पण तरीही या लेबलखाली काही वापरायचंच नाही का...मग ते ठेवायचं कोणासाठी...कोण वापरणार....पाहुणे आल्यावर कोण घाई होते ती आपल्यालाच माहीत...शिवाय असे सहाच पाहुणे थोडेच येतात...आली तर झुंबड उडते...आणि त्यातल्या लहान मुलांनी या डिशचे चार भाग केले तर...त्यापेक्षा आपणच केलेले काय वाईट...लेकांनं हौसेनं काढलेल्या डीश धुतांना हे सर्व विचार मनात येत होते...पुढे कोण वापरणार...कोणासाठी वापरणार....यापेक्षा आपण आपलं कधी वापरणार हे महत्त्वाचे होते...डीश स्वच्छ झाल्या...त्याला बोलावलं...ओल्या डीश त्यानं कोरड्या केल्या...आणि सुशी त्यात सजवू लागला...टोमॅटो चटणीही छोट्या बाऊलमध्ये बसली...काचेचे छान नाजूक चमचे त्यात ठेवले...खरतर ती सुशी कुठल्या चवीची झाली असेल हे कळत नव्हतं....पण ती खूप सुंदर दिसत होती...अगदी वॉव फॅक्टरमधली...त्यामुळे तिचं फोटोसेशनही चांगलंच होणार होतं...ते तसं झालंही...बाप लेकांनी मिळून जेवणाची सर्व भांडी बाहेर मांडली...कसं हॉटेलसारखं वाटतं नाही...म्हणून त्यांची बोलाचाली सुरु झाली...मी अजूनही किचनमध्येच घुटमळत होते...बेसिन नेहमीच्या भांड्यांनी भरली होती...ओटयावर वरचे बॉक्स पडले होते...आत्ता यांनाही धुवायला पुसायला लागणार....म्हणून माझा मिटर चालू झाला...पण अशी भांडी जपायची होती तर घेतलीच कशाला हा विचार नशिबानं मनात आला...त्यामुळे ते बॉक्स बेसिनमध्ये खाली केले...नळ चालू केला...त्यावरील धुळ साफ झाली...मनावरीलही...जे आहे, त्या साधनांचा आत्ता उपभोग घ्या...उद्याच्या विचारात हातातल्या आज निसटायला नको...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Khup chhan lekh
ReplyDeleteSolid......
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteछान लेख
ReplyDelete