अकेले...अकेले....
सध्या फोन वापरण्याचा सर्वांधिकार लेकाकडे आहे...फक्त त्याचा पेपर चालू असेल तेव्हा तीन तीन तास मध्ये गॅप घेऊन फोनचा ताबा मिळतो...अशावेळी मिळेल तितका वेळ मी फोन घेऊन जमेल त्यांना फोन करते...कोणाला फोन करायचे, याची ढोबळ यादी मनात असते...फोन ताब्यात मिळाला की फोन करत सुटायचे...नेहमी पहिला आईला, मग एखाद्या हक्काच्या मैत्रिणींला...तसाच अल्काला फोन केला....दोनदा रिंग वाजली...तिनं फोन उचलला नाही...म्हणून अजून दोन फोन झाले....पण हिचा फोन काही लागला नाही...आत्ता काळजी वाटायला लागली...त्यामुळे पुन्हा ट्राय केला....आत्ता लागला....तिनं फोन उचलला...आणि जाडसर आवाज ऐकू आला...बोल...बापरे, तुझ्या आवाजाला काय झालेय...तब्बेत कशी आहे...काय झालंय...कुठे आहेस....तिचा तो बसलेला आवाज ऐकून माझे हातपाय थंड पडले...हिचा नंबर लागला की काय...म्हणून मनात वाईट विचारही आला...पण तेवढ्यात ती बोलली...काहीही नाही...घरी आहे, व्यवस्थित आहे...फक्त आवाज बसलाय...सुटला की उद्या फोन करते...चल टाटा...मी पण तिला टाटा म्हटलं...आणि पुन्हा नको त्या विचार शृखंलेमध्ये अडकून गेले....वास्तविक काही अन्य फोनही झाले असते....पण अल्काचा फोन आल्याशिवाय आता कशातच मन लागणार नव्हतं...
काही वर्षापूर्वी लेकाच्या क्लासच्या निमित्तानं या अल्काची ओळख
झाली. मी जिथे क्लास लावला तोच तिच्या
मुलाचा क्लास होता. पण मी जेव्हा या
स्पर्धा परीक्षांच्या क्लासमध्ये गेले, तेव्हाच अल्का या सर्वातून मोकळी
झाली. त्याच वर्षी तिच्या मुलाला एका
चांगल्या इंस्टिट्यूटमध्ये इंजिनिअरींगसाठी अॅडमिशन मिळालं. मी त्यामानं नवखी...त्यामुळे क्लासमधून काही
माहिती हवी असल्यास अल्काबरोबर बोलण्यास सुचवण्यात आलं. तसं तिच्याबरोबर बोलले...आणि नंतर आमची चांगलीच
घट्ट मैत्री झाली. या मैत्रीची मुख्य दोन
कारणं...एक तर मुलांच्या प्रगतीसाठी सदैव तत्पर आणि दुसरं म्हणजे तिचा रोखठोक
स्वभाव...एकदम आवडला...
आत्ता हीच अल्का आजारी आहे की काय या चिंतेनं मला ग्रासलं होतं. एकदाची रात्र सरली...सकाळी किमान दहा पर्यंत तरी फोन माझ्या ताब्यात असतो....त्यामुळे तिला अगदी सकाळी मेसेज टाकला...दहापर्यंत फोन कर....तिचा लगेच, सकाळी साडेसातवाजताच फोन आला....तिचा आवाज थोडा ठिक आणि माझा काळजीचा...अग कोरोनाबिरोना नाय झालाय मला...काय घाबरतेस...हे वाक्य आलं आणि मग हुश्श केलं...पाठोपाठ तिचं मोठ्यानं हसणं...आभाळ मोकळं झाल्यासारखं...कॉफी पितेय...तू पण घे की...पण माझं सगळंच व्हायचं होतं...स्ट्रेचिंग...योगा...त्यामुळे मन असूनही गरम पाण्यावर वेळ मारुन नेली...पण काल तुझा आवाज का बसला होता ते सांग
आधी...कशी आहेस...काळजी घे....लेकाचा फोन आला होता का...अग एकदम ठिक आहे...आणि व्यवस्थित काळजी घेतेय...उलट पूर्वीपेक्षा जास्तच...लेकाचा फोन आला होता...तिकडे काही ठिकाणी ओपन झालंय सर्व...तो काल आयस्क्रीम खात होता...त्याच्याबरोबर बोलून झाल्यावर मी सुद्धा बाहेर पडले...वाण्याच्या दुकानाचं फक्त शटर बंद असतं...ते ठोठावलं...एक डब्बा चॉकलेक फ्लेवरचं आयस्क्रीम घेतलं...रात्री जुना पिक्चर लावला...अख्खा डबा संपवला...अगदी शेवटी शेवटी तर त्याचं मिल्कशेक झालं...तेही तसंच संपवलं...डबा छान धूवून ठेवलाय...आत्ता त्याच्यात आंब्याच्या बाटा टाकतेय रुजवायला...हे सर्व सांगितल्यावर मग पुन्हा अल्काचं मोठ्याचं हसू...मी मात्र तिथेच होते...अख्खा आयस्क्रीमचा डब्बा...तोही चॉकलेट फ्लेवर....तोही एकटीनं...बस्स लाळ टपकायची बाकी होती...तिला ते नक्कीच समजलं असणार...सिनिअर ना ती...म्हणाली, सई, अग कधी जगावं आपल्यासाठी आणि आपल्याला वाटेल तसं....याला काय वाटेल..त्याला काय वाटेल...तब्बेत कशी राहील...काही त्रास होणार तर नाही ना...या विचारात राहीलीस तर हमखास त्रास होणार बघ...मला माहित होतं एवढं आयस्क्रीम खाल्यावर घसा बसणार ते...म्हणून खाल्यावर काही वेळांनी गुळण्या केल्या...हळद गरम पाणी प्यायले...दुस-या दिवशीही चारवेळा गुळण्या केल्या...गरम पाणी तर आत्ता नेहमीचेच झालेय...पण एकदा मला खायचं होतं तो अख्खा डबा....किती तरी दिवस मनात होतं...आत्ता काही नाही...सर्व ठिक आहे....आवाज मोकळा झालाय...सर्व रुटीन पुन्हा चालू...पुन्हा ते तिचं हसणं...अरे किती काळजी करशील....तुला तर माझा स्वभाव माहित आहे ना...उगीचच कुणासाठी रडत बिडत बसायचं नाही...तो मेसेज येतो बघ वॉटसपला...बायकांचा आराम म्हणून...कधी वाटलं की ताणून देऊन आराम करा...असा काहीतरी...तो माझ्यावरुनच असणार...खरं सांगू का...माझा हा स्वभावच माझं कवच आहे...नाहीतर मी मुळमुळीत राहिले असते ना...आणि सर्वांना हो हो म्हणत राहीले असते ना....तर माझं काही खरं नव्हतं...माणसं जोडलेली असावीत...पण ती त्यांच्या वैयक्तीक फायद्यासाठी नको...त्यांच्या फायद्यासाठी आपला कधीही उपयोग करुन देऊ नये...असे कोणतेच नातेवाईक आणि मित्रपरिवार माझ्या खात्यात ठेवलाच नाही....क्वांटीटी नको...क्वालिटी हवी...मॅडम...आत्ता तूच बघ...मैत्रिणच ना फक्त...पण माझा बसलेला आवाज ऐकून किती काळजी केलीस माझी...चक्क सकाळचा योगा टाईम सोडून माझ्याबरोबर बोलतेस....अशी मैत्री असावी...किती मोठं माझं भाग्य...पुन्हा ते मोठ्ठं हसू...अल्काचा आवाज खरच मोकळा झाला होता...तिच्या स्वभावासारखाच...मग इकडच्या तिकडच्या गप्पा...दोघींच्या लेकांच्या गोष्टी झाल्या...आणि चल भेटूया म्हणत दोघींनी टाटा केलं...
एव्हाना अल्का कामाला लागली असेल...मी तिच्या भोवती फिरत
होते...सवयीनं योगा सुरु झाला...मन मात्र तिच्यातच...तिचा मुलगा साधारण पाचवीला असतांना तिचा घटस्फोट झाला. सगळं बील अल्कावरच फाडण्यात आलं...कारण बाई आधीच फटकळ म्हणून ओळखल्या जात होत्या...पण नंतर कळलं की तिचा नवरा एका दुस-या महिलेच्या प्रेमात होता...काही वर्ष चाललेलं हे प्रकरण अल्कालाही माहीत होतं...मुलाकडे बघून ती गप्प होती...मात्र नव-याचा पगारही नंतर गायब होऊ लागला. घरचा सगळा खर्च अल्का एकटीच चालवायची...बॅंकेमधली गुतवणूकही कमी झाली...तिला आणि मुलाला नवरा वेळही देत नव्हता...मग अल्कानं विचार केला, फक्त नावासाठी नवरा काय कामाचा...एक दिवस कसलाही विचार न करता वकीलाच्या ऑफीसमध्ये गेली...आणि नव-याला घटस्फोटाची नोटीस पाठवली...किती मोठा गोंधळ झाला असेल तेव्हा...नव-यानं तिची अक्कल काढली...मुलाला देणार नाही असं धमकावलं...मग नातेवाईक आले...इमोशनल गेम सुरु झाला...पण ही बाई ठाम राहीली...नवरा नको म्हणजे नकोच...मुलाची खूप अवस्था वाईट झाली होती...पण मधल्या काळात वडीलांचं वागणं त्यानंही पाहिलं होतं...त्यामुळे तो अल्काला कायम चिटकून असायचा...नोटीस दिल्यावर काही महिने नव-यासोबत एकाच घरात रहातांना दगड झाल्याचं तिनं सांगितलं होतं...कसं निभावलं कोण जाणे...पण सर्व धक्के पचवून ती वेगळी झाली...ऑफीसमधून दुस-या शहरात नोकरी करण्याची संधी होती...पण ती म्हणाली मी काय जाऊ दुस-या शहरात, तोंड लपवून...मी काय चूक केलीय...ज्यानं चूक केलीय तो जाईल हवतर...मी नाही...म्हणून हट्टानं इथेच राहीली...मुलाची शाळाही चालू होती...घटस्फोट झाल्यावर वाट्याला आलेलं एकटेपण...आणि समाजाची बदललेली नजर सर्व तिनं अनुभवलं...नशीबानं तिचा स्वभाव तिच्यासाठी कवच ठरला...सॉलिड
फटकळ बाई...हे बिरुद तिनं मानानं मिरवलं...तिच्या नव-यानं त्या दुस-या बाईबरोबर लग्न झाल्याचं तिला कळलं...पण अल्काचं जग स्वतंत्र झालं होतं...मोकळंही...मुलगा आणि ती सुट्यांमध्ये ट्रेकींगला जायचे...आणि आत्ताही ती जाते...बहुधा सर्व गड-किल्ले तिचे पाहून झालेत...त्यामुळे तिचा सर्व ग्रुप वेगळा बनला...नातेवाईक आहेत...पण त्यांच्यावर अवलंबून रहायचं नाही हे ठरवून वागली...आधीच घटस्फोटाच्यावेळी अल्काच्या रोकठोक भुमिकेमुळे त्यांची नाराजी झाली होती. नंतर तिच्या अलिप्त स्वभावामुळे त्यांच्यातील दुरी अजून वाढली. त्यांच्यातील टिकाकार लांब गेले...पण समजून घेणारे सोबत आहेत...या सर्वांत मुलाचं शिक्षण झालं...इंजिनिअर झाला. अल्काची नोकरी चालू होती...पण तिनं प्रचंड काटकसर केली. आत्ता हसून सांगते. या सर्वात नवीन ड्रेस, साडी काहीही घेतलं नाही. मुलांनही शिक्षण चांगल्या गुणांनी केलं. पुढचं शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेला. गेल्यावर्षी सगळीकडे कोरोनाचा कहर चालू असतांना अल्काच्या मुलाला तिकडेच नोकरी लागली...अल्कावरचा भार तेव्हा थोडा कमी झाला...अर्थात हे जेवढं लिहितांना सोप्प वाटतंय, तेवढ नक्कीच नव्हतं...एकटीला काय करायचंय...हा डायलॉग तिनं किती वेळा ऐकला असेल हे तिलाच माहित...एकदा तर माझ्याच समोर एकीनं तिला किलोभर टोमॅटो घेतले म्हणून तुला एकटीला किलोभर कशाला म्हणून विचारलं होतं...अल्काच ती...आंघोळीच्या पाण्यात टाकते....ज्युस करते...फार काय लादी पुसतांनाही टोमॅटो टाकते असं सांगितलं होतं....काय तर म्हणे त्यामुळे घरभर छान टोमॅटोचा वास रहातो...विचारणारी गुमान
निघून गेली होती...आणि आम्ही दोघी मनमुराद हसलो होतो...तेव्हाचा अल्काचा हसरा चेहरा आत्ताही आठवला...योगा थोडक्यात आटपला...सगळं काम झाल्याशिवाय कॉफी घेत नाही...पण नियम थोडीच आहे तो...कधीतरी मनाचंही ऐकावं...अल्काप्रमाणं...आज दोन कप कॉफी होईल...एक आत्ता आणि दुसरी सगळं काम झालं की...मनात आलं अशी मैत्रिण असावी...जीवनाकडे वेगळ्या दृष्टीनं बघण्याची उर्जा देणारी....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
सुरेख
ReplyDeleteधन्यवाद...
Deletekhup chhan lekh.
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteखूप छान
ReplyDeleteधन्यवाद...
DeleteMast
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteआयुष्य आनंदात घालवावे रडण्यात नाही.
ReplyDeleteनक्कीच...
Deleteमस्तच बायकांनी शिकण्यासारखे. खरंच आपलं जीवन स्वतःचा विचार करून जगावं. पण सर्वांना जमत नाही असे वागायला
ReplyDeleteहो हे खरं आहे...
DeleteMastach
ReplyDeleteधन्यवाद...
DeleteCongratulations साई मॅडम खूप छान लेख आहे
ReplyDeleteभीमराव पांडूरंग महाले जळगाव
Bhimraomahale@gmail.com
Mob 9423935033