भेटीची पिशवी आणि सॅनिटाईज मन...

 

भेटीची पिशवी आणि सॅनिटाईज मन....


सकाळी सहा-साडेसहाची वेळ...कोणतरी कचकचून बेल वाजवत होतं...सध्या सकाळी सहा म्हणजे माझ्यासाठी पहाटेची वेळ...उठायला कंटाळा आला होता...पण बेल वाजवणारा थांबत नव्हता...नव-याला हाक मारली,  तर त्यानं गाडी पुसणारा असेल,  नंतर बघू, म्हणत ब्लॅकेट ओढलं..लेकाचा तर प्रश्नच नव्हता...नाईलाजस्तव मीच उठले...बेल वाजतच होती...शेवटी वैतागलेल्या चेह-यानं जार उघडलं...सेफ्टी डोअरच्या आडून बघितलं,  कोणीतरी अनोळखी व्यक्ती मोठी कापडी पिशवी हातात घेऊन उभी होती...कोण...मी डोळे मिचमिचे करत विचारलं...कारण नेमका बाहेरच्या पॅसेजचा लाईटही नव्हता...ताई, मी माक्समुळे ओळखलं नाहीत का...ताराचा नवरा शांताराम...खूप वेळ बेल वाजतोय...ही पिशवी घ्या लवकर...खाली गाडी उभी आहे आंब्यांची...तारा नंतर फोन करेल तुम्हाला...परत त्यानं लांबून पिशवीचा हात पुढे केला...मी तारा कोण हे एक सेकंद आठवत राहीले, मग एकदम


प्रकाश पडला....ओहो तारा...माझी आंबेवाली मैत्रिण...गेल्या काही वर्षापासून मी या ताराकडून आंबे घेते...या आंब्यासोबत मे महिन्याच्या शेवटी ती गावांवरुन येतांना गावची भेट म्हणून अनेक गोष्टी घेऊन येते.  पण यावर्षी ही भेट कशी आली...कारण काल परवा झालेल्या त्या वादळानं तिच्याही आईच्या घरची दाणादाण उडाल्याचं कळलं होतं.  काही आंब्यांची कलमं पार झोपली...उत्पादनाची साधनं गेली...अशा परिस्थितीतही ही आपल्यासाठी भेट घेऊन आली, हा विचार मनात आला आणि नकळत हात पुढे गेला...तिचा नवरा शांताराम घाईत होता...मी ती पिशवी घेऊन बाजूला ठेवली...मग सॅनिटाईज करुन बघू, असा विचार केला...या सर्वात पंधरा मिनीटं गेली....अजून एखादा तास झोप काढायची का, हा विचार करत असतानांच फोन आला....तो त्या ताराचा...

मी पुन्हा घड्याळाकडे बघितलं...सात अजून वाजायचे होते....फोनही


मगासारखा,  बेलसारखा वाजत होता...शेवटी उचलला...कानाला लावयच्या आधीच ताराचा मोठा आवाज कानावर पडला...आले का ग हे पिशवी घेऊन...तुझा खाऊ आहे...यावर्षी जरा कमीच आहे हो...ते वादळ झालं ना...त्यामुळे काजू जरा कमी आहेत...भाजलेले काजू ओले झाले हो त्या वादळानं...कोकमंही कमी मिळाली...आईनं मिळेल तसं बांधलंय...तू ते कंद आणि आबोली, चहापात सांगितली होतीस ना मागे...ती आहे का बघ...आईला सांगितलं होतं...वादळ झालं ना...त्यात झाडांचीपण वाट लागली...आईनं नसेल पाठवलं, तर मी जाईन तेव्हा आणिनं आठवणीनं...चल, तुझी घाई असेल ना सकाळची...बाबू कसा आहे,  भाऊंना पण सांग विचारलंय...हे सगळं एका लयीत बोलून माझं काही ऐकून घेईपर्यंत बाईनं फोन ठेवलाही...मी इकडे फक्त हं...हो...बोलत होते...त्यावर तिचं समाधान झालेलं...आत्ता ती पुन्हा दुस-या फोनवर बोलत असणार नक्की...अशाच अनेक पिशव्या आठवणीनं ती कोणाकोणासाठी आणते, ते तिचं तिलाच माहीत...

आत्ता झोप पार उडाली.  ती पिशवी खुणावत होती.  गावाकडे वापरतात तशी साधी कापडाची पिशवी...त्यावर माझं नाव लिहिलेलं...म्हणजे नक्कीच अशा आणखी चार पिशव्या गावाकडून आल्या असणार...शेवटी सॅनेटाईजचा स्प्रे आणि टिश्यू पेपर जवळ घेतले...एक पेपर घेतला त्यावर ती पिशवी रिकामी करायला सुरुवात केली...सर्व वस्तू पेपरमध्ये गुंडाळलेल्या होत्या...त्यामुळे एक-एक पुड्या काढून त्याला पहिलं सॅनिटाईज केलं...आणि मग त्या सर्व पुड्या


सोडायला सुरुवात केली.  या पुड्या सुटायला लागल्या आणि माझ्या मनात बांधलेल्या पुड्याही सुटायला लागल्या.  सकाळी ताराच्या नव-याला दारात बघितल्यावर पहिला विचार आला होता,  हा कसा काय वर आला.  कारण सोसायटीत बाहेरच्या व्यक्तीला यायला परवानगी नाही.  मग हा कसा काय आला...त्यात त्याच्याकडून पिशवी घेतल्यावर हात चांगले साबणानं धुतले होते.  पण हे सर्व करतांना देणा-याच्या मनातील भावना काय होती...त्याचं मन तर निर्मळ होतं...कोरोना,  त्यामुळे घ्यायची काळजी एका बाजुला पण या रोगामुळे मनात कुठेतरी आपण संकुचित होत चाललोय की काय, हे विचार करायला लावणारी भेट माझ्या समोर होती...काय नव्हतं त्या पिशवीत...कोकणाची सर्व जादू त्यात होती.  आमसुलं,  काजूच्या बिया,  सोबत भाजलेले काजू,  थोडे कुळीद,  प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधलेली नाचणी, भाजीचा फणस, सुके गरे,  आठल्या,  फणसाच्या आणि आंब्याच्या पोळ्या,  सुकवलेल्या कैरीच्या फोडी,  कोकमं,  चोखायची आंबे,  भाजीचं आणि वडीची आळूची पानं...तिही व्यवस्थित गुंडाळून...मध्ये पानांच्या कापलेल्या दांड्या व्यवस्थित ठेवलेल्या...आणि या सर्वांवर कडी म्हणजे, कागदात गुंडाळलेल्या लाल-पिवळ्या जास्वंदीच्या कळ्या...त्यातल्या आजच्या कळ्या फुलू पहात

होत्या...पण दुस-या दिवशी फुलणा-याही कळ्या आठवणीनं ठेवल्या होत्या.  त्यासोबत अनंताच्या कळ्या आणि ती मी कधीतरी तिला सांगितलेली फुलझाडांची कंद...मे फ्लॉवर म्हणून ओळखल्या जाणा-या पावसाळी झाडांचं रान आहे म्हणे ताराच्या घरी.  ती नेहमी सांगायची...इथं कुंड्यात लावतात...आमच्याकडे रान आहे.  कोण बघत नाही त्यांच्याकडे म्हणून,  तेव्हा मी तिला माझ्यासाठी त्याचं कंद आणायला सांगितलं होतं...ते कंद आणि सोबतच थोड्या ओल्या मातीत मुळं गुंडाळलेली आबोली आणि पातीच्या चहाची छोटी रोपटी....मी त्या सर्वांकडे पहात होते.  दरवर्षी तारा हे असं सर्व स्वतः घेऊन यायची...अशीच भल्या पहाटे...कोणताही मोबदला न घेता हे सर्व हक्कानं द्यायची....घे ग, मी कुठे विकत आणते मी,  घरचं तर आहे.  हे बोलून निघायची...

या सर्वांकडे बघत ताराला फोन केला...दोन-तीन वेळा ट्राय केल्यावर एकदा लागला.  अग तारा किती दिलंय आईनं...मी बोलायला पहिल्यांदा सुरुवात केली.  ओ, कुठे काय फार दिलंय ताई....एवढं करुन फणस द्यायला विसरली बघा...दारातला तयार फणस...वादळात पडला ना...मग आईनं सगळे लागलेले फणस काढले...आत्ता वाटतेय....त्या आंब्याच्या गाडीसोबत इथे पाठवणार होती...पण आयत्यावेळी विसरली...गावात लाईटपण नाय ना...तेवढं राहीलं बघा...आत्ता पुढच्या वर्षीपासून दारातला गोड फणसाचा गरा नाही मिळणार...बाकी फार नाही आहे...आमसुलं थोडी सुकवून मग बरणीत भरुन


ठेवा...आटल्यापण लगेच डब्यात भरु नका...ती आबोली लावा लगेच...कुळीद भाजून घरीच मिक्सरवर बारीक करा...अशा ताराच्या नेहमीसारख्या सूचना सुरु झाल्या...मी पुन्हा फक्त हो...हं....बरं वर आले...ती तिकडून हक्कानं बोलत होती...पोटतिडकीनं बोलतात तसं...

कालपरवा झालेल्या वादळानं या ताराच्या आईकडे खूप नुकसानं झालंय.  तिचा नवर आंब्याच्या सिझनमध्ये आंबे विकतो....त्याचंही मोठ नुकसान झालंय....पण त्याबद्दल नाराजी नाही की दुःख नाही....वादळ आलं तेव्हा ही इथे होती.  मोठ्या मुलगा दहावीला.  त्याचा ऑनलाईन क्साल चालू आहे.  गावाकडे नेटचा प्रॉब्लम म्हणून तारा यावेळी गावी गेली नाही....पण नवरा आंब्यासाठी गावी गेला होता...त्यानं वादळाचे फोटो पाठवले मोबाईलवर...ते बघून तिला फोन केला होता...तेव्हाही मलाच दोन शब्द ऐकावे लागले होते.  आता जे होईल ते होईल....रडत बसून काय होतंय...एवढंच बोलून तारा कामाला लागलेली...कोकणची माणसं खरच साधी भोळी...गेल्यावर्षी निसर्ग नावाच्या वादळानं सर्व उद्धस्त झालं...आता हे नवं वादळ आलं.  यापुढेही येणार आहेत म्हणे....पण या बापुड्यांना काही फरक पडत नाही.  मदतीसाठी कुठलंही आंदोलन नाही की मोर्चे नाही....म्हणूनच की काय या कोकणी माणसांची


मोजदाद करायला सरकार नावाची व्यवस्था कायम कमी पडली आहे.  पण येथेही कोकणी माणूस सरस...कारण ही व्यवस्था कोणीही चालवूदे...त्यांच्याशी यांचं काही सोयरसुतक नसतं...काही राग नाही की लोभ नाही...कोणी मदत दिली तरी तो भला नाही दिली तरीही तो भला....या माणसांचा हात मात्र सदैव देता...आळवाच्या पानात जसं पाणी टीकत नाही ना तसंच...आपल्या दारातल्या आंब्याचा किंवा फणसाचा स्वाद आपल्या पै पाहुण्यांना नाही घेता आला की यांचा जीव तुटतो...आमच्या तारासारखा...

आणि आमचं काय....आम्ही सॅनिटाईजसारखे झाले आहोत बहुधा....सर्वांवर संशय व्यक्त करायचा...आणि शंभरवेळा हात साफ करायचा...मनात नाही नाही त्या शंका काढून ऑनलाईन मिळतं म्हणून वारेमाप सामान घरात भरुन ठेवायचं...आणि या तारासारख्यांनी आपल्या हातातलं सर्व हसतहसत रितं करावं...वर थोडं राहीलं ग...नंतर देते आठवणीनं म्हणत आमचीच लाज काढावी....धन्य ही मंडळी...मनमोकळी....म्हणूनच सदैव मनात रहाणारी....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

Comments

  1. खरी मैत्री कळतेच लगेच.

    ReplyDelete
    Replies
    1. कुंतलबाई...खरच हो....तुझी खूप आठवण येते...

      Delete
  2. आपल्यातलं माणूसपण मरत चाललंय आणि संशयित मन जिवंत आहे.
    नलिनी पाटील

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर ताई....करोना म्हणजे चक्रव्यूहासारखा मागे लागलाय....माणूस त्यात अडकलाय...

      Delete
  3. Khup chhan lekh .... Sai...Keep it up.

    ReplyDelete

Post a Comment