मेकींग ऑफ गोल्ड मिल्क....
तुमच्यात किती इम्युनिटी आहे...तुमच्या शरीरासाठी आवश्यक इम्युनिटी वाढवण्यासाठी तुम्ही काय करता...या इम्युनिटीसाठी बेस्ट उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...तो म्हणजे गोल्ड मिल्क...सकाळी व्यायाम करतांना फूड चॅनल बघण्याची सवय अलिकडे लागली आहे. त्यातल्याच एका फूड चॅनलवर इम्युनिटी फूड म्हणून टायटल आलं आणि माझा रिमोटवरील हात थांबला...त्या प्रोग्रॅमची अॅकर इम्युनिटी फूडची माहिती देत होती...आणि त्यातील शेफ गोल्ड मिल्क करायला शिकवणार होते...गोल्ड मिल्क म्हणजे आपलं हळदीचं दूध असावं हा विचार मनात आला, पण काही वेगळं असलं तर म्हणून व्यायाम करता करता नजर टिव्हीकडे ठेवून होते. आता तिथे शेफ आले, त्यानींही इम्युनिटी वाढवणारं फूड म्हणजे काय ते सांगतिलं...आणि गोल्ड मिल्क करण्यासाठी लागणरे पदार्थ सांगितले. दूध, हळद पावडर, वेलची पावडर,
काळीमिरी पावडर, जायफळ पावडर, साखर आणि वरुन केशरही घेतलं...दूध गरम करून त्यात या सगळ्यांची थोडी थोडी पावडर टाकून उकळी काढली आणि एका छानश्या ग्लासामध्ये हे दूध गाळलं...वर गारनिशिंग हवं म्हणून केशर आणि डायफ्रूट बारीक करुन टाकले...झालं गोल्डमिल्क...यानं इम्युनिटी कशी वाढते म्हणून ती अॅंकर परत सांगू लागली.
या मधल्या काळात मी माझा योगा थांबवून तोंडाचा आ करुन हे गोल्ड मिल्क करण्याची पद्धत बघत होते...माझ्याच बरोबर योगा करणारा नवरा माझ्याकडे आणि टिव्हीकडे अधून मधून बघत होता...काही न बोलता हलकेच हसत होता...गोल्ड मिल्क करुन झाल्यावर मी त्याच्याकडे बघितलं तेव्हा तर तो मोठ्यानं हसायला लागला...आपल्या घरातलं गोल्ड मिल्क झालंय का...म्हणत पुन्हा हसून घेतलं...रिमोट हातात घेऊन ते फूड चॅनेल बदलले आणि गाणी लावली...मला हातानंच व्यायाम सुरु कर म्हणून खूण केली. पण माझ्या मनातून काही ते गोल्ड मिल्क जाईना. या कोरोनामुळे कसले कसले शब्द समजले...आता हा इम्युनिटी...आमच्याकडे गेली कितीतरी वर्ष हळदीचं दूध सकाळी घेतलं जातयं...म्हणजे आपल्यात किती इम्युनिटी तयार झाली असेल काय माहीत...असा विचारही मनात आला. वास्तविक फूड चॅनेल मध्येही आता अशाच प्रकारचे पदार्थ दाखवत आहेत हे माहीत होतं...पण गोल्ड दूध अर्थात हळदीचं दूध करण्याची पद्धतही दाखविली जाईल
याची कल्पना नव्हती.
छोटा असतांना माझ्या लेकानं कधी बाटलीतील पावडर टाकलेलं दूध घेतलं नाही. एक प्रोटीन पावडर आवडत नाही म्हणून दुसरी आणली, व्हॅनिला, चॉकलेट सारखे फ्लेवर घेऊन झाले. पण त्यानं सर्वाना नकार दिला. शेवटी आईनं एक दिवस हळद टाकून दूध उकळवलं...आणि स्टीलच्या कपात भरुन त्याला पाजलं...ते दूध त्यांनी चाटून पुसून संपवलं...तेव्हा लेक दिड-दोन वर्षाचा असेल...तेव्हापासून रोज सकाळी आणि संध्याकाळी त्याचं हळदीचं दूध नेहमी होतं. तेव्हापासून त्याच्यासोबतच आम्ही दोघंही हळदीच्या दूधाच्या प्रेमात पडलो. त्यामुळे सकाळी उठलं की पहिल्यांदा फ्रीजमधून दूध काढायचं...नेहमीच्या टोपात ते अंदाजानं ओतायचं...त्यात चमचाभर हळद आणि साखर घालायची...वरुन अर्धा पेला पाणी टाकायचं...हे मिश्रण पहिलं गॅसवर चढवायचं मग बाकीची कामं...गेली कितीतरी वर्ष आमच्या घरातील हा एक रिवाज म्हणा हवतर...थंडीत किंवा पावसाळ्यात या दूधात कधीतरी हलकिशी सुंठ पावडर किंवा दोन काळीमिरी टाकल्या जातात. गरमी लागली की चवीसाठी जायफळ पावडर या दूधात पडते...पण काहीही असलं तरी त्यात टाकलेलं पाणी आटेपर्यंत दूध उकळवायचं...अगदी छान पिवळंधमक होईपर्यंत...काही वर्षापूर्वी लेक संध्याकाळी अॅथलॅटीक सरावासाठी ग्राऊंडवर जायचा...तेव्हा घाई झाली की कपात दूध घेऊन त्यातच हळद आणि साखर घालून मी त्याला देत असे. तसाच शॉटकट मारलेला हळदीच्या दुधाचा कप एकदा लेकाच्या हातात दिला. नेमकी त्याच वेळी आई आली होती. तिनं लेकासमोरच माझ्या पाठित धपाटा घातला...ते काय बाटलीतल्या पावडरीसारखं आहे...चमच्यानं ढवळून द्यायला...लेकाच्या हातातून दूधाचा कप घेऊन आईनं ते पुन्हा गरम केलं होतं...आणि मग त्याला ते दिलं. तेव्हापासून लेकही अध्येमध्ये विचारत असतो, आजीसारखं आहे ना...अर्थात मी यावर गुमान हो
म्हणते...
टिव्हीवरचा कार्यक्रम बघता बघता हे सर्व आठवलं...या हळदीचं दुध
पिण्याच्या सवयीनं असे कितीतरी किस्से घडले आहेत.
बाहेर कुठे फिरायला गेलं तरी लेकाच्या सोयीसाठी एका छोट्या डब्यात हळद आणि
साखर सोबत घेते. असेच एकदा महाबळेश्वरला
फिरायला गेलो होतो. एका घरगुती लॉजवर
थांबलो होतो. तिथे घरची मालकीणच स्वयंपाक
घरात राबत होती. तिच्या हाती हळदीचा डबा
देत हळदीचं दूध उकळवून देण्याची विनंती केली.
तेव्हा तिनं आमची घरची हळद आहे, तुमची नको म्हणत चांगलं ग्लासभर हळदीचं दूध
दिलं...दोन दिवसांनी जेव्हा लॉज सोडला तेव्हा या काकू भेटायला आल्या. निघतांना त्यांनी हातात हळदीची एक पुडी दिली...आमच्या
घरची हळद आहे. हल्ली कोणी हळदीचं दूध
फारसं घेत नाही...तुम्ही मागितलंत बरं वाटलं...म्हणून हळदीची पुडी हातात
दिली. तर एकदा संध्याकाळी एका
पाहुण्यांकडे गेलो होतो तेव्हा लेकासमोर चहा-कॉफीचा प्रस्ताव ठेवण्यात आला
होता...त्यावेळी त्यानं पिवळं दूध म्हणजेच हळदीचं दूध मागितलं. त्यावेळी त्या यमजानांनी काय आजारी-बिजारी आहेस
का म्हणत आमची आणि लेकाची चांगलीच खेचली होती.
मात्र आता हेच हळदीचं दूध गोल्ड मिल्क ठरलं आहे. काही गोष्टी वाईट असल्या तरी त्या आल्याशिवाय आपल्यातील चांगल्या गोष्टी पुढे येत नाहीत ना, तसंच या कोरोनाच्या बाबतीत झालं आहे. आपल्या परंपरेतलं हे हळदीचं दूध त्या बाटल्यांमधल्या प्रोटीनच्या आड झालं होतं. पण कोरोना काय आला, इम्युनिटी अर्थात रोगप्रतिकारक शक्ती कशात आहे, याचा शोध सुरु झाला. आणि समोर काय आलं तर आपल्याच आजी, आईनं सांगितलेले पदार्थ...आत्ता हेच पदार्थ नव्या रुपात आणि थोड्या वेगळ्या साधनसामुग्रीमध्ये केले जातात आणि त्याच्या आकर्षक सादरीकरण, नामकरणामुळे आपल्याला ते नवीन वाटत आहेत. दुनिया गोल आहे म्हणतात ना...तोच नियम इथे लागू होतो...
या इम्युनिटी फूड आणि गोल्ड मिल्कच्या नादात त्यादिवशी एक मात्र झालं, माझं सगळं टाईमटेबल चुकलं. आधीच बराच उशीर झालेला. लेकही हळदीचं दूध पिऊन आंघोळीसाठी गेला. अभ्यासाला बसण्यापूर्वी त्याला नाष्टा हवाच...आत्ता झटपट काय करावं म्हणून विचार करातांना गुळ चपाती आणि तुपाची आठवण झाली. झटपट चपात्या केल्या. त्यावर तुप लावलं आणि वरुन गुळाची पावडर पसरली....मग या चपात्यांची गुंडाळी करून ठेऊन दिली. लेकांनं आंघोळ केल्यावर पहिला प्रश्न विचारला तो नाष्टा काय हाच होता.
मग त्याला सरळ उत्तर देण्यापेक्षा मी इम्युनिटी बु्स्टर स्विट रोल म्हणून उत्तर दिलं...त्यानं चपाती रोल बघून डोक्याला हात मारला...मला वाटलं मालपुआ केलास की काय....ही तर तुप चपाती आहे. आता संध्याकाळी मालपुआ कर...मी लागलीच हो म्हटलं. मनात मालपुआची सामुग्री मोजली, गव्हाचं पीठ, गुळ, तुप आणि दूध...हे सर्व जिन्नसही त्या इम्युनिटी बुस्टरच्या यादीत बसत होते. मी यावेळी मनात आईचे शतशः आभार मानले. खाण्याचेही संस्कार असतात. माझ्या लेकावर हे संस्कार आईनं केले, त्यामुळेच इम्युनिटीच्या नावाखाली नाही तर पौष्टीक आणि सात्विक म्हणून आपलेसे असलेले आपले पदार्थ हमखास बनवले आणि खाल्ले जातात...अगदी भाजणीचं थालीपिठ केलं तर त्याच्यावर पांढराशु्भ्र लोण्याचा गोळाही....कालपरवाच कुठल्याश्या चॅनेलवरील बातम्यांमध्ये इम्युनिटी बुस्टर फूड म्हणून गुळ पोळी आणि तुपाचा उल्लेख केला....आमचं लहानपण या गुळपोळी, मालपुआ, थालिपीठ आणि याला नाही म्हटलं तर आईच्या मोठ्या डोळ्यांवरच गेलं....तेव्हा हा इम्युनिटी शब्द आहे हेही माहित नव्हतं....त्यामुळे की काय या पदार्थाला स्वर्गीय चवींचा आनंद होता...
एकुण सर्व इम्युनिटी फूड आपल्या स्वयंपाकघरात दडलेलं आहे. करोना असो वा नसो त्याची सवय करा...आणि सदैव
निरोगी रहा....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Khup chhan lekh
ReplyDeleteVery True....Old is Gold
ReplyDeleteVery True....Old is Gold
ReplyDelete