व्यायामाच्या भानगडीचं गणित...

 

 व्यायामाच्या भानगडीचं गणित...


सक्काळी बरोबर साडे आठ वाजता फोन वाजला...चालू असलेला व्यायाम थांबवून लांब ठेवलेल्या फोनकडे गेले...स्क्रीनवरचं नाव पाहून कप्पाळावर आढी आली.  एका ओळखीच्या महिलेचा फोन होता...कुठलासा नंबर हवा असल्यावर फोन डिरेक्टरीसारखी ही थेट मला फोन करते...बरं नुसतं फोन नंबर घेऊन समाधान होत नाही...तर वरुन नकोसे असे सल्लेही देते,  आणि तेही न मागता...पण काहीही असो, मी शक्यतो फोन टाळत नाही...पण हा फोन घेऊ की नको हा विचार करेपर्यंत एकदा रिंग वाजायची थांबली...मात्र लगेच दुस-यावेळी गजर सुरु झाला.  त्यामुळे काही दुसरं काम असेल, अशी समजूत काढून फोन उचलला...फळवाल्याचा नंबर हवा होता...घरपोच फळं हवी होती...मी नंबर एसएमएस करते, असं सांगून फोन ठेवतं होते...तितक्यात तुला डिस्टर्ब करायचं नव्हतं...तुझी काय ती व्यायामाची भानगड चालू असेल ना आत्ता....बरं आहे बाई तुझं,  आमच्याकडे असलं काही नाही...घरची कामचं एवढी असतात की दिवसभर व्यायाम होतो....तुमच्यासारखा वेगळा व्यायाम करावाच लागत नाही...चल ठेवते...तुझं चालूदे...पुन्हा तेच...तिनं हवा तो नंबर माझ्याकडून काढून घेतला...आणि बदल्यात मला नको ते सल्ले दिले...मी काही सेकंद फोनकडे बघत राहीले...पण लगेच मनातले विचार सोडून माझा नेहमीचा कोपरा पकडला...आणि फोन येण्यापूर्वी ज्या व्यायामाच्या प्रकारावर थांबले होते,  तिथूनच पुन्हा व्यायामाला सुरुवात केली. 


व्यायामाला सुरुवात केली...मनात तो शब्द ठाण मांडून बसला....व्यायामाची भानगड...मला खुदकन हसायला आले...नव-यानं चमकून बघितलं...त्याला काही नाही, असं डोळ्यांनी सांगितलं...पुन्हा आम्ही दोघंही व्यायामाला लागलो...ते करतांना माझ्यासमोर बारा-तेरा वर्षापूर्वीचा काळ आला.  लेक तेव्हा पाच वर्षाचा होता.  मे महिन्यात गावाहून येतांना नव-याच्या पाठीला काही दुखापत झाली...पाठ सतत दुखायला लागली.  घरातल्या वेदनाशामक ट्यूब संपल्या तेव्हा डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला.  मे महिन्याचा शेवटचा दिवस...माझा वाढदिवस...त्यानं सुट्टी घेतली.  सकाळी डॉक्टरांकडे जाऊ आणि संध्याकाळी कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ म्हणून बेत ठरला.  एका स्पेशलिस्ट असलेल्या डॉक्टरांकडे गेलो...तिथं गेल्यावर त्या डॉक्टरांनी कितीतरी टेस्ट केल्या....नव-याच्या पाठीला दुखापत झाली आहे,  त्याला बेडरेस्ट अत्यावश्यक आहे.  आणि सोबत काही इंजेक्शनही...लगेच ट्रीटमेंट सुरु केली नाही तर दुखणं वाढणार आणि गंभीर स्वरुप घेईल अशी शक्यता बोलून दाखवली.  आत्तापर्यंत आम्ही वाढदिवसाच्या मूडमध्ये होतो.  तो मूड पार उतरला....डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हा, म्हणून सल्ला दिला.  निर्णय घेणारे आम्ही दोघंच...दुसरा एखादा सल्ला घ्यावा असा विचारही मनात आला नाही.  लेकाला आईकडे सोडलं होतं.  डॉक्टरांनी औषधाची मोठी लिस्ट दिली.  रिसेपनिस्टनं अॅडमिट होण्यासाठी काय करावं लागेल याची यादी दिली.  मी थोडी काळजीत पडले...नवरा रिलॅक्स होता...अग आठ दिवस आराम होईल...त्यात आपली मेडिकल पॉलिसी आहे, काळजी करु नकोस....असं बोलून मलाही रिलॅक्स होण्याचा सल्ला दिला.  आम्ही सरळ आईकडे आलो.  लेकाचा प्रश्न नव्हता.  तो आईकडे जास्त खूष होता.  त्याच संध्याकाळी नवरा अॅडमिट झाला.  मी त्याच्या सोबतीला.  एक दिवसानंतर

त्याचं दुखणं वाढलं.  तेव्हा डॉक्टरांनी ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं...आता आम्ही दोघंही घाबरलो...त्यातच दुस-या दिवशी नव-याला फणकून ताप भरला...एक दुखणं बाजूला राहीलं दुसरचं उद्भवलं...आम्ही दोघंही घाबरलो...ताप जावा म्हणून त्याच्यावर इंजेक्शनचा मारा सुरु झाला....शेवटी आजार बरा पण औषधं नको अशी वेळ आली.  ती रात्र आम्ही दोघांनी कशीबशी काढली.  आणि तिस-या दिवशी हॉस्पिटल सोडण्याचा निर्णय घेतला...सकाळी सहा वाजता आम्ही आवरुन निघालो....पैसे आधीच भरले होते...त्यामुळे अडवण्याचा प्रयत्न झाला...पण आम्ही त्याला प्रखर विरोध केला...ताप असलेल्या नव-याला घेऊन मी घरी आले.   त्यानंतर आमच्या फॅमिली डॉक्टरांना गाठले.  त्यांना सर्व रामायण सांगितले.  त्यांनी डोक्यावर हात मारुन घेतला.  आधीतरी सांगायचे...मेडीकल पॉलिसी आहे, म्हणून काय झाले,  शेवटी आपलं शरीर आहे,  त्याची पॉलिसी काढणे आणि ती जपणे आपल्या हातातच असते असा डोस दिला.  त्यांनी औषधोपचार केले...आणि त्यांच्या परिचित एका उत्तम डॉक्टरांचा संपर्क दिला.  त्या डॉक्टरांनीही अॅडमिट होण्याचा सल्ला दिला.  आम्ही त्यांना आधीचा अनुभव सांगितला...तेव्हा म्हणाले लिहून देतो,  फक्त व्यायामासाठी दाखल व्हा....बाकी औषध नाही.  त्यांचे बोल खरे होते.  अगदी नावापुरती औषधं आणि व्यायामाचे प्रकार...यामुळे आठवडाभरात नवरा ओके झाला.   मात्र या सर्व धावपळीत माझी मान प्रचंड दुखायला लागली.  एवढी की चक्कर यायला लागली.  स्पॉंडलिसीस झालं की काय ही भीती मनात बसली.  मग त्याच डॉक्टरांकडे पुन्हा माझीही तपासणी करुन घेतली...त्यांनी मग मलाही व्यायामाची आवश्यकता असल्याचे सांगितले...आणि आठवडाभर माझ्याकडूनही करुन घेतले. 


हॉस्पिटलमध्ये बारा वर्षापूर्वी काढलेला हा आठवडा आम्हा दोघांनाही कायमचा


एक धडा देऊन गेला.  त्या दिवसापासून नव-यानं निदान पंधरा मिनिटं तरी व्यायाम करायला हवा हा निश्चय केला.  या सर्वा दरम्यान मला आईचा खूप मोठा आधार झाला.  आम्ही दोघंही तिशी-पस्तीशीचे जिथे दुखण्यानं बेजार झालो होतो, तिथं माझी साठी जवळ असणारी आई, माझ्या लेकाचं आणि आम्हा दोघांचही सर्व आनंदानं करत होती.  आम्ही हॉस्पिटलमधून घरी आल्यावरही जेवणं, घरची इतर कामं, लेकाला शाळेतून आणणं, त्याचा आहार याची जबाबदारी तिनं घेतली होती.  एरवी फुलं तोडण्यासाठी भल्या सकाळी आई फिरते म्हणून तिला आम्ही नेहमी चिडवायचो.  पण या सर्वांत आई तासभर चालायची...शिवाय संध्याकाळीही मंदिरात जातांना रिक्षाचा आधार घेण्यापेक्षा चालण्यावरच तिचा भर होता.  या व्यायामानच तिला आमच्यापेक्षा फिट आणि फाईन ठेवलं होतं,  याची जाणीव झाली.  हे सर्व अनुभव घेतल्यावर घरी साधारण व्यायाम सुरु केला होता.  लवकरच लेकाची शाळा सुरु झाली.  त्याला बसमध्ये सोडण्यासाठी जाण्याच्या निमित्तानं मग आम्ही दोघांनीही सकाळी चालण्याच्या व्यायामाची सुरुवात केली.  साधारण चाळीस ते पन्नास मिनिटांचा बारा वर्षापूर्वी केलेला व्यायाम अखंड चालू राहीला, तो हा कोरोना येईपर्यंत...मध्यंतरी आम्ही दोघांनीही श्री श्री रवीशंकर यांचा बेसिक कोर्स केला.  व्यायाम, ध्यान याचे किती महत्त्व आहे, याची पहिल्यांदा आम्हाला योग्य माहिती मिळाली.  जसजसं शिकायला लागलो, तशी या व्यायामाची गोडी वाढली.  ऑफीसच्या गडबडीत नवरा अगदी मोजक्या वेळी व्यायाम करायचा....शनिवार आणि रविवार मात्र तो व्यायामाला अधिकचा वेळ देत असे.  मी मात्र तासभर व्यायामाला द्यायला शिकले. 


लॉकडाऊनमध्ये आम्हाला कोणी जास्त साथ दिली असेल तर ती या व्यायामानंच.  पहिल्यांदा लॉकडाऊन लागल्यावर संपूर्ण दिवस घरात बसून रहायचं होतं...अगदी सकाळच्या वॉकसाठीही बाहेर पडता येत नव्हतं.  तेव्हा नव-यानं चालण्याच्या व्यायाम घरी करण्यासाठी इंग्रजीतील 8 आकाराची पद्धती शोधून काढली.  त्यामुळे घराच्या हॉलमध्येच या आठ आकारात चालालयला सुरुवात केली.  सकाळी आठ वाजता इंडिया टिव्हीवर रामदेव बाबा यांचा योगावर प्रोग्राम येतो म्हणून कोणीतरी सांगितलं.  तो बघायला सुरुवात केली.  त्यातून आणखी व्यायामाचे प्रकार शिकलो.  यू ट्यूब, सोशल मिडीया यातून ब-याच चांगल्या क्लिप बघितल्या.  बघितलेला प्रत्येक व्यायाम करायचा असं नव्हे.  तर आपल्याला जमतो तो  आणि आपल्याला येतो तसा व्यायाम करायला लागलो.  मला तासभराची सवय होतीच....आता नवराही सोबतीला आला.  त्यात एकमेकांना मार्गदर्शन करु लागलो.  या सर्वांमुळे लॉकडाऊनमध्येही कधी निराश वाटलं नाही.  अनेकांचे फोन येतात, घरी बसून काय करायचं...कंटाळा येतोय...मनस्थिती बिघडतेय...आता काय होईल...आम्हाला अशा शंका येत नाहीत असं नाही....पण नेहमीच्या व्यायाम आणि ध्यान यामुळे या सर्वांवर सकारात्मक विचार करायला लागलो आहोत,  हे मात्र नक्की.

हा सर्व विचार करतांनाच परत भानगड शब्दाजवळ आले.  व्यायामाचे फायदे


किती तोटे किती हे मोजण्यासाठी तराजू हाती घेतला नाही.  पण त्याची व्यापकता मात्र अगणित आहे,  ती मिळाली की व्यायामासाठी घातलेल्या तासभऱाचे समाधान मिळतं.  त्यामुळेच ही व्यायामाची भानगड कायम करावी अशीच आहे.  फक्त थोडं नियोजन असली की सर्व जमतं...आणखी काय सांगू,  या भानगडीमुळेच वॉडरोबमधील कपड्यांचे माप कायम आहे.  अगदी लग्नातल्या शालूच्या ब्लाऊजचेही...हे या व्यायामाच्या भानगडीचेच यश...21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा होतोय...त्या दिवसाचा मुहूर्त साधून तुम्हीही तुमच्यासाठी दिवसातला तास वेगळा काढा...आणि या व्यायामाच्या भानगडीला लागा...बघा, इतर सर्व भानगडी आपोआप सुटतील...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. खूप छान सई. छान लिहिले आहेस. प्रत्येक व्यक्तीने फिटनेससाठी थोड्याफार प्रमाणात व्यायाम केलाच पाहिजे. मीही करतो पण सध्या हर्नियाच्या ऑपरेशन मुळे तात्पुरते थांबवले आहे. माझ्या मुलीने, प्राजक्ता ने करोनाच्या सुट्टीचा फायदा घेऊन रोज एक-दीड तास व्यायाम करून आपले वजन बरेच कमी केले आहे. १०८ सूर्यनमस्कार पण घालते.
    सर्वांना चांगला संदेश दिला आहेस या ब्लॉगच्या माध्यमातून. अभिनंदन. असेच लिहित राहा.
    - सदानंद खामकर.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मामा, प्राजक्ताचे कौतुक आहे. नियमीत व्यायामाने खूप फायदे होतात....तिला खूप शुभेच्छा....आणि मनापासून आभार.

      Delete
  2. सुरेख लेख

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद प्रिया...

      Delete
  3. Replies
    1. धन्यवाद विनया...

      Delete

Post a Comment