डावी
बाजू..
काहीतरी वेगळं कर ना...सारखी सारखी एकच प्रकारची भाजी करतेस...जरा वेगळ्या चवीचं काहीतरी कर...थोडं तिखट आणि गोड....ते आजी काहीतरी बनवते तसं कर ना कधीतरी...नाहीतर मसाला पापड तरी कर...सकाळी जेवणाच्या वेळी ताटावर बसतांना
लेकाची नेहमीची भूणभूण...त्यानं सांगितलेली सारखी तिच भाजी किमान पंधरा दिवसानं झालेली. पण तरीही त्याच्या लेखी ती सारखी होत असलेली...आता आयत्या वेळेला काय वेगळं करु, नुसते पापड चालणार नाहीत का...या प्रश्नवर लेकाचं उत्तर नाही...म्हणजे मसाला पापड लागणारच...कढई तापायला ठेवली. तोपर्यंत कांदा आणि कोथिंबीर कापून मसाला पापडाची तयारी केली. उडदाचे पापड तळले, त्यावर कांदा कोथिंबीर पेरुन वर मीठ, लाल तिखट, चाट मसला टाकला, थोडी भुरा शेव भुरभुरली...हे चार पापडांचे सजवलेले ताट मग लेकाच्या पुढे केले. नव-याच्या ताटात एक पापड ठेवला...आता कुठे गाडी वळणावर आली. भाकरीचा एक घास आणि पापडाचा एक तुकडा पटपट संपायला लागला. मी आणि नव-यानं एकमेकांकडे बघितलं...हसलो आणि जेवायला सुरुवात केली.
आमच्याकडे ताटतल्या डाव्या बाजुला अगदी मोजकचं मत जातं. बहुतांशी ही
डावी बाजु गाजर, बीट किंवा काकडी आणि लिंबाच्या फोडीनं व्यापलेली असते. ताटात भाजीही भरपूर....भाताची जागा भरुन काढणारी...सोबतीनं ज्वारीची भाकरी आणि डाळीची हमखास वाटी या चौघांनीच ताट आणि पर्यायानं पोट पुरेसं भरतं. त्यामुळे डाव्या बाजुनं काही हवं असा विचारही येत नाही. पण आता लेकानं आईची आठवण करुन दिली. ते आंबट गोड म्हणजे पंचामृत...आईच्या हातचा ब्रॅन्ड पदार्थ...गुळ, खोबरं, तीळ, शेंगदाणे आणि चिंचेचा कोळ यांचं भन्नाट मिश्रण म्हणजेच पंचामृत...पावसाळ्याचा दिवसात भाज्या कमी मिळाल्या की हे पंचामृत ती भाज्यांची जागा भरुन काढतं. आई कधी आमच्याकडे आली की तिच्याकडून हमखास हे पंचामृत मी करुन घेत असे. तेव्हा, अजूनही तुला काहीही करता येत नाही....आणि आजी, तुझ्यासारखं आईला करता येत नाही...या टिप्पण्णीसह मी अनेकवेळा या पंचामृताची रेसिपी आई करत असतांना लाईव्ह बघितली आहे. पण ते करण्याचं धाडस केलं नाही. पण आता लेकानं आईच्या नावानं डिचवल्यानं पंचामृत करायची हुक्की आली. बरं आईला फोन करायची सोय नाही, अजून करता येत नाही तुला, म्हणत तिनं फोनवरुनही लेक्चर दिलं असतं...त्यामुळे युट्यूब बाईंची मदत घेतली...दोन तिन रेसिपी बघितल्यावर किचनकडे मोर्चा केला, बाकी सर्व सामान घरी होतं....पण चिंच नव्हती. पण आवळ्याची पावडर कामी आली. एरवीही ही आवळ्याची पावडर चटण्या आणि कोशिंबीरमध्ये मी सढळ हातानं वापरते. त्यामुळे पंचामृत विथ आवळा पावडर हा नवा प्रयोग करण्यासाठी सज्ज झाले. तेलावर जिरं, हिंग, मेथी आणि मुठभर कडीपत्त्याची फोडणी पडली. लाल तिखट आणि हळद टाकून चांगला ठसका बसेपर्यंत परतून झालं. वरुन जिरं आणि धण्याची
खरड टाकली....आता वेळ त्या पाच खास जिन्नसांची...तिळ, शेंगदाणे, खोबरं, आणि गुळ त्या फोडणीत गेलं...त्यांचा चांगला घमघमाट सुटल्यावर वरुन थोडं घाबरत आवळ्याची पावडर थोड्या गरम पाण्यात भिजवून त्यात टाकली. काहीतरी वेगळं म्हणून शेंगदाण्यासोबत थोडे काजूही त्या मिश्रणात गेले. चांगली उकळी आली....वास छान येतोय...असा शेरा लेकानं अभ्यास करता करता दिला...तेव्हा हुश्श वाटलं...जमलंच असणार...हा विश्वास ठेऊन गॅस बंद केला. रात्रीच्या जेवणात ताटात या पंचामृताला जागा मिळाली. भाकरीचा पहिला घास घेतल्याबरोबर नव-यानं छान झालंय...हा नेहमीचा अभिप्राय नोंदवला...पण खरा परिक्षक अजून चाखून पहात होता. पहिला घास गेला, दुसरा संपला तरीही काहीही बोलेना म्हणून विचारलं...कसं झालंय..जमलंय का आजीसारखं...तेव्हा कुठे गाडी बोलती झाली...झालंय चांगलं...आजीसारखं नाही...काहीतरी वेगळं लागतंय..आजी काजूही घालत नाही...पण चव वेगळी असूनही छान लागतेय...आवळा पावडर जिरुन गेली बहुधा या विचारानं मी सुखावले.
जेवणात शंभर प्रयोग करायचा माझा स्वभाव येथेही कामी आला. एरवी मी
कोकणातली...आलिबाग, रेवदंडा, चौल या भागात बालपण गेलं. सहाजीकच आहाराच्या पद्धतीमध्ये या पट्ट्याचा मोठा प्रभाव आहे. पण काही वर्ष धुळे, नाशिक सारख्या भागातही रहायला मिळाली. रेवदंडा आणि धुळे ही दोन टोकं आहेत. एकीकडे झाडांच्या हिरव्या रंगावरुन नजर हटत नाही, तर दुसरीकडे झाड दिसत नाही...पण तरीही दोन्ही टोकं समृद्ध...दोन्हीकडील खाद्यसंस्कृती भिन्न तरीही तेवढीच परिपूर्ण. लहानपणापासून आम्ही पोहे खाल्ले ते ओल्या खोब-यानं भरुन वाहतील असेच..पण धुळ्यात आल्यावर पोह्यात शेंगदाणे असतात हे पहिल्यांदा समजलं. पोहे आणि लोणचं यांचं कॉम्बिनेशन भलतं सरस लागतं याचाही शोध लागला. आणखी पुढे सर्व प्रांतातील मित्रपरिवार मिळाला. त्यामुळे खाण्याच्या पद्धतीही एकांगी राहिल्या नाहीत. याचा सर्व परिणाम आमच्या घरातील खाद्यसंस्कृतीमध्ये दिसतो. एरवी ताटात डाव्या बाजुच्या पदार्थांची फार गरज लागत नाही. लोणचं हा प्रकार कितीही छान जमला, भिन्न प्रकारचा असला तरी आमचं त्याच्याबरोबर कधीही जमलं नाही. त्यामुळे आमच्या घरातील जेवणाच्या ताटात या लोणच्याला कधी जागा मिळवता आली नाही. ती जागा कोशिंबीरीनं व्यापून टाकली. आत्तापर्यंत किती प्रकारच्या कोशिंबीर केल्या असतील याची कल्पना नाही. आमच्या गावाकडे काकडी ते फ्लॉवर, कोबीचीही कोशिंबीर होते. त्यात हमखास खोबरं असणारच...धुळ्यात आल्यावर शेंगदाण्याचा कुटात तेल आणि तिखट घालायची पद्धत कळली...चव कळली. एकदम जिभेवर चुरचुरणारी...तिखट जरा जास्त पडलं तर जेवतांना घामटं काढणारी...नेहमी नाही, पण फक्त खिचडी, पापड असा बेत असेल तेव्हा मात्र मोकळी रहाणारी डावी बाजू भरुन काढण्यासाठी मी या शेंगदाणा कुटाची मदत घेते. नाशिकला असतांना आमच्या एचपीटी कॉलेजचे एक शिपाई काका ओल्या शेंगदाण्याची चटणी आणि भाक-या आणायचे...फक्त ओले शेंगदाणे आणि मिरची, मिठ एकत्र कुटलेलं....वरुन कच्चा कांदा हाही तसा घामटं काढणारा पदार्थ...भाकरी सोबत
अगदी या कुटाची चव चाखली होती...पुढे ही चव आठवून मी घरी त्यात खूप बदल केले. यात कच्चा कांदा, कोथिंबीर आणि शेवही वाढवली. वरुन लसणाची करपून फोडणी दिली. आणि वरुन लिंबाची फोड...ही भट्टी अप्रतिम जमली...इतकी की डाव्या बाजुचा असलेला नियम मोडला. डाव्या बाजुचे पदार्थ म्हणजे तोंडी लावणे वा तोंडाला चव येणे या गटात मोडतात...तो टप्पा या ओल्या शेंगदाण्याच्या चटणीनं पार केला. एरवीही या डाव्या बाजुला असलेले पापड आमच्याकडे ताटात कधीच बसले नाहीत. कारण उडदाचे पापड असले तर ते मसाला पापड म्हणूनच खायचे असतात हा नियम लेकानं पाडलेला....आणि पोह्याचे किंवा बटाट्याचे पापड कधी डाव्या जागेत मावलेच नाहीत. त्यांना स्वतंत्र जागा म्हणजे दुसरं ताटचं लागणार...एकूण काय कितीही प्रयत्न केले तरी आमच्याकडे हे डावे पदार्थ जरा दूरच राहीले आणि जे सामावले त्यांनी त्यांचं रुप आणि आकार दोन्हीही बदलले. ताटात चार पदार्थ असावेत पण ते परिपूर्ण असावेत...अगदी डाव्या बाजुला टाकलेले पदार्थही...डावे...उजवे हा भाग विसरुन ते आमच्याकडे ताटात अगदी ऐसपैस बसतात...तोच प्रकार पंचामृताबाबत झाला. ज्वारीची भाकरी, कांद्याच्या पातीचा सुका झुणका आणि सोबतीला हे आवळ्याची पूड घातलेलं पंचामृत मोजकेच केलेले....पण चव जमली आणि त्याची जागा वाढली...मग डाव्या उजव्याचा भेद बाजुला झाला आणि या पंचामृताच्या ताटातील ओघळाला निवांत संपण्याचा बेत सुरु झाला....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Khup chhan lekh
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteखूपच छान लेख
ReplyDeleteधन्यवाद....
ReplyDelete