एक ध्यास आणि त्याचा पाठलाग...


जवळपास दिड-दोन महिन्याच्या अंतरानं लेकाची एकदाची परीक्षा जाहीर झाली.  परीक्षा मुंबईला.  तो दुपारी 12वाजता त्याच्या सेंटरमध्ये गेला.  आता तो बाहेर पडेपर्यंत, म्हणजे सायंकाळी पाच वाजेपर्यंत पेपर, पुस्तकं आणि लोकरीच्या विणकामावर वेळ काढावा लागणार होता.   आसपास नजर टाकली तर माझ्यासारख्या अनेक पालकांनी आपापल्या जागा पकडल्या होत्या, पेपर टाकून बैठका मारल्या होत्या.  मी सुद्धा लांबचा एक कोपरा पकडला.  मोबाईल बघून झाला.  सर्व आवरुन पुस्तक वाचायला सुरुवात करण्यापूर्वी आसपास एक नजर टाकली.  कोरोनामुळे सर्वच पालकांच्या तोडांवर मास्क...त्यामुळे कोणी ओळखीचा चेहरा असला तरी ओळखता येईल का ही शंका मनात आली...अशीच नजर फिरवतांना एक ओळखीचा चेहरा नाही तर डबा दिसला...एकमेकांवर ठेवलेले स्टिलचे चार डब्बे...त्यांना अडकवेला स्टिलचा क्लिप आणि त्याच्या बाजुला असलेले मोठे चमचे...हा डबा पाहिला आणि एकदम क्लिक झाले...एक ओळखीचे दांम्पत्य होते का ते...नजर शोधू लागली...लेकाच्या स्पर्धा परीक्षांच्या निमित्तानं गेली आठ ते नऊ वर्ष वेगवेगळ्या शहरात जाणे होतेय.  तेव्हा अनेक पालकांच्या ओळखी झाल्या...त्यापैकीच हे एक दांम्पत्य होतं...नक्कीच...मास्क असूनही त्या डब्यामुळे ओळख पटली...माझं सामान आवरुन त्यांच्याकडे गेले.  जरा लांबूनच त्यांना नमस्कार केला....आमची मुलं सहावीत असतांना पहिली भेट झाली होती,  नंतर स्पर्धा परीक्षांच्या क्लासला आम्ही एकत्र होतो...ती ओळख सांगितली...त्यांनाही ओळख पटली...पुन्हा एकदा नमस्कारांचे आदान प्रदान झाले.


लेक सहावीला असतांना एका परीक्षेच्या क्लासनिमित्तानं दुस-या शहरात जाणं होतं होतं.  दर शनिवार-रविवार असे ते चार तासांचे क्लास होते.  या क्लासला जाण्यासाठी दोन तास आधी घर सोडायचं...आणि क्लास संपल्यावर घरी येण्यासाठी पुन्हा दोन ते तीन तास...त्यामुळे दिवस या क्लासमध्ये जायचा.  अर्थात त्यामुळेच दोन-चार खाऊचे डबे जवळ ठेवावे लागायचे. क्साससंपल्यावर तिथेच पोटपुजा करायची आणि मग निघायचे, या दरम्यान एका दांम्पत्याबरोबर ओळख झाली.  दोघेही त्यांच्या मोठ्या मुलीला या क्लासला घेऊन यायचे.  मोठी क्लासमध्ये जायची आणि तिच्यापेक्षा लहान असलेल्या मुलीचा आई अभ्यास घेत क्सासबाहेर बसलेली असायची.  सोबत तिचे बाबाही मदतीला असायचे.  मोठीचा क्लास संपल्यावर सर्व कुटुंब सोबत असलेल्या मोठ्या डब्यातून आणलेले जेवण एकत्र जेवायचे, आणि परत पुढच्या क्लासला सर्व रवाना व्हायचे...दर शनिवार आणि रविवारी हे सर्व कुटुंब असेच सर्व क्लास बाय क्लास करत फिरायचे...पहिल्यांदा आपल्याच कोषात असलेली ही मंडळी नंतर ओळखीची झाली.  अगदी सुरुवातीला त्यांचा मोठाला डबा हा आमच्या सर्वांचा उत्सुकतेचा विषय होता.  नंतर जेव्हा या कुटुंबाचं शेड्युल समजलं तेव्हा या डब्याचं महत्त्व समजलं.  दर शनिवारी आणि रविवारी आपल्या दोन्हीही मुलींना वेगवेगळ्या क्लासला घेऊन हे दांम्पत्य फिरायचं.  दोन्ही मुलं हुशार...बहुधा सर्वच परीक्षा या मुली देत असत आणि त्यात चांगले नंबर ही येत होते...या दांम्पत्यंबरोबर ओळख झाल्यावर अनेक परीक्षाची माहिती मिळाली.  त्यांच्या दोन मुलींनी युपीएससी परीक्षेत चांगली रॅंक मिळवावी अशी त्यांची इच्छा होती.  पण त्याआधी एक मुलीला डॉक्टर तर एकीला इंजिनिअर करायचे होते.  त्यानंतर या मुलींनी युपीएससी द्यावी

असा त्यांचा प्रयत्न होता.  आपल्या मुलींना उच्चशिक्षण देण्यासाठी धडपडणारे हे दांम्पत्य मध्यमवर्गीय होतं.  दोन मुली असल्यानं नातेवाईक, समाजाकडून आलेले अनुभव त्यांना प्रोत्साहीत करुन गेले.  आपल्या मुली उच्चशिक्षण घेऊन भारतीय प्रशासकीय सेवेत सामिल होतील, हा ध्यास त्यांनी घेतला.  यासाठी मुली लहान असल्यापासून त्यांना युपीएससी परीक्षेत चांगले रॅकींग मिळवणारे अधिकारी, त्यांच्या पोस्ट, जबाबदारी याची माहिती ते करुन देत होते.  त्याबाबत युट्युबवर असणारे व्हिडीओ मुलींना दाखवत असत.  काही ठिकाणी कर्तबगार अधिका-यांच्या मुलाखती असत, तिथेही प्रत्यक्ष मुलींना नेत असत. यासर्वांतून मुली जिद्दी होतील, आणि प्रशासकीय सेवेत सामिल होण्यासाठी असलेल्या परीक्षांची तयारी करतील हा त्यांचा उद्देश होता.  त्यांच्या या प्रयत्नांना यशही मिळालं होतं.  या दोन्हीही मुली हुशार होत्या.  आईवडीलांचे परीश्रम जाणून होत्या.  मात्र अधिकारीपदावर जाण्यासाठी आपल्या मुली परीपूर्ण असाव्यात यासाठी त्यांनी आधी मेडीकल आणि इंजिनिअर शाखेत पदवी घ्यावी, जेणेकरुन त्यांना चांगली जबाबदारी मिळेल यासाठी त्यांच्या आईवडीलांचे प्रयत्न होते.   वास्तविक इंजिनिअरींग किंवा मेडीकल केल्यावर या दोघीं रग्गड पैसे कमवू शकत होत्या.  पण मुलींनी रग्गड पैसे कमवण्यापेक्षा त्यांनी देशाच्या विकासात या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून काहीतरी करावे असा प्रयत्न होता. 

या दांम्पत्याचा आर्थिक आधार म्हणजे त्यांचे दुकान.  दादरच्या मध्यवर्ती भागात त्यांचे दुकान होते.  मात्र शनिवारी आणि रविवारी हे दोघंही दुकान आपल्या कामगारांच्या भरवश्यावर सोडून मुलींच्या क्लास आणि परीक्षांसाठी सर्वत्र फिरत असत...मला भेटले तेव्हाही अशीच परीस्थिती होती.  फक्त वार शुक्रवार होता.  त्यांची मोठी लेक माझ्या मुलाबरोबरची.  आज तिचीही परीक्षा होती.  धाकटी तिच्यापेक्षा एक वर्षानं लहान.  ती मेडीकलसाठी प्रयत्न करत होती.  ओळख पटल्यावर एकमेकांच्या मुलांची चौकशी सुरु झाली.  पुढे काय करणार हाच त्यातला मुख्य विषय.  माझ्या लेकाला पहिल्यापासून इंजिनिअरींचा ध्यास लागलेला.  मी तसं स्पष्ट केलं.  त्यासाठी चाललेली तयारी सांगितली.  या दोघांच्या लेकीच्या ध्येयाची कल्पना मला होती.   त्यामुळे त्याबाबत विचारणा केली.  त्यांचे कौतुक केले.  मोठी मुलगी नक्की आयआयटी करणार आणि त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेत सामिल होणार याची त्यांना खात्री होणार.  धाकटी मुलगी मेडीकलसाठी उत्सुक होती.  मात्र मेडीकल तिला सैनिकी कॉलेजमध्ये करायचे होते.  दोघीही मुलींनी निवडलेल्या करीअरच्या पूर्तीसाठी त्या स्वतः आणि त्यांचे आईवडील कठोर परीश्रम करीत


होते.  वडीलांनी या मुलींच्या शिक्षणासाठी कर्जही काढले आहे.  त्यांना काहीच कमी पडू नये म्हणून ते तत्पर होते.  आता कोरोना काळात घरी अभ्याससाठी दोघींनाही लॅपटॉप घेऊन दिले होते.  मुली शब्दशः चोवीस तास अभ्यास करीत होत्या. आई वडील त्यांना हवं ते देण्यासाठी मेहनत घेत होते.  दोघंही तोंडभरून मुलींचं कौतुक करीत होते. 

प्रशासकीय सेवेत काम करण्याची सधी मिळणं हे अनेकांचं स्वप्न असतं.  या ध्येयानं प्रेरीत झालेले अनेक तरुण-तरुणी दिवसरात्र त्यासाठी परीश्रम करत आहेत.  पण जेव्हा याच मुलांची फरफट होतांना दिसते तेव्हा वाईट वाटते.  या दोघांबरोबर बोलतांनाही असंच वाटू लागलं.  अनेक उच्च विद्याविभूषीत अधिका-यांना बापपुण्याईवर नेते झालेल्यांपुढे झुकावे लागते.  त्यांचे आदेश मानावे लागतात.  तेव्हा त्या अधिका-याची मानसिकता कशी होत असेल...हा त्यांच्या पदवीचा....त्यांनी घेतलेल्या परीश्रमाचा अपमान नाही का...त्यापेक्षा आपल्या मुलींसाठी प्रायव्हेट सेक्टरमध्ये का संधी नाही बघत...परदेशातही त्या जाऊ शकतात...तिथे अजून चांगल्या संधी त्यांना उपलब्ध आहेत.  माझ्या मनात आले ते मी या दोघांजवळ बोलले...ते दोघंही त्याबरोबर एकाचवेळी हसले....म्हणाले, असा सल्ला देणा-या तुम्ही पहिल्या नाहीत.  अनेकांनी  आम्हाला सुचवलंय...मुलींना प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करुदे...परदेशी पाठवा...भरपूर पैसा मिळतील...तिथे सेटल होतील...मग काय प्रत्येकानं आपल्या मुलांना परदेशात पाठवायचं का...तिथे उप-यासारखी राहणारी मुलं काय मनस्थितीतून जातात याचाही विचार करायला हवा...आमच्या काही नातेवाईकांची मुलं परदेशात स्थाईक झाली आहेत.  आई वडील इथे...त्यांच्या मनाची होणारी ओढताण आम्ही पाहिली आणि अनुभवली आहे.  नोकरीमधील मान-अपमान या बद्दल सांगाल तर तो प्रायव्हेटमध्येच अधिक होतो.  तुमच्यात गुणवत्ता असेल तर कोणीही तुम्हाला झुकवू शकत नाही.  मग तो नेत असो वा त्याचा कार्यकर्ता...ही सर्व मंडळी ठराविक वर्षासाठी असतात.  आज प्रशासकीय सेवेतील अनेक अधिकारी आपल्या गुणवत्तेनं जनतेच्या


मनात मानाची जागा ठेऊन आहेत,  आमच्या मुलीही त्यापैकीच एक होतील अशी आमची अपेक्षा आहे. 

त्यांच्या या बोलांनी माझ्या डोळ्यात पाणी आलं.  नक्कीच तसंच होणार, म्हणून मी सुद्धा शुभेच्छा दिल्या.  आता वेळ माझी होती, कारण त्यांनी मला माझ्या लेकाबद्दल विचारलं....तो काय करणार...प्रायव्हेट मध्ये मोठ्या पगाराची नोकरी की अन्य काही....तेव्हा तो माझ्यासाठी अवघड ठरलेला शब्द आठवला...entrepreneur...एकदा मी त्याला विचारलं होतं, तेव्हा त्याच्याकडून मी हा शब्द ऐकला...कसाबसा शब्द लक्षात ठेऊन गुगलबाबांचा आधार घेतला.  मला अवघड वाटलेल्या शब्दाचा अर्थ शोधला...शब्द जेवढा अवघड होता तेवढा त्याचा अर्थ गोड होता...तो म्हणजे, स्वत: आर्थिक जोखीम सोसून नवीन उद्योग सुरू करणारा...तेव्हा मी खूप कौतुकानं त्याच्याकडे बघितलं होतं...त्यावर म्हणला होता, स्टार्टअप असेल...पण काय करणार ते आत्ताच विचारू नकोस...आत्ता परीक्षेची तयारी करु दे...मला गोड स्वप्नात सोडून तो पुन्हा त्याच्या तयारीला लागला.

मी हा प्रसंग या पालकांसोबत शेअर केला.  त्यांनी कौतुक केलं.  हे पण चांगलंच की,  मलाही शुभेच्छा मिळाल्या....एव्हाना दोन वाजून गेले होते.  आसपास बसलेल्या पालकांनी पोटपूजा आटोपून घेतली होती....आम्हालाही भुकेची जाणीव होत होती.  माझ्या समोरच्या पालकांनी त्यांचा तो स्पेशल डबा उघडायला सुरुवात केली.  मलाही त्यांना जॉईन करायला सांगितलं...पण कोरोनाचे नियम सगळ्यांना होते...तिथेही ग्रुप करुन बसायला परवानगी नव्हती.  त्यामुळे आम्ही वेगवेगळं बसून दुपारचे जेवण केले.  मी कॉफी प्रिमिक्स, गरम पाणी आणि पेपर ग्लास सोबत ठेवले होते.  माझी कॉफी त्यांच्याबरोबर शेअर केली.  पुढचे दोन तास पुस्तक आणि कॉफीच्या सोबतीनं पार झाले.  सव्वा पाचच्या सुमारास लेक बाहेर पडला.  त्या दांम्पत्याची मुलगीही बाहेर आली.  पुन्हा थोड्या गप्पा....फोन नंबरची आदानप्रदान


झाली...आणि दोघांनी आपापल्या वाटा पकडल्या...

घरी पोहचायला रात्रीचे आठ वाजले.  घरी पोहचले तेव्हा नवरा बातम्या बघत होता...एक तरुण मंत्री सांगत होता, मी अधिका-यांना सूचना दिल्या आहेत...हे वाक्य ऐकून हसू आलं....ते दांम्पत्य आणि त्यांच्या लेकी समोर आल्या...मग हेच बातम्यांमधील दृष्य त्या वडीलांच्या नजरेतून पाहू लागले.  तेव्हा तो मंत्री बोलतांना लटपटलेला दिसला...आणि त्याच्या मागचे अधिकारी ताठ मानेनं उभे असलेलं दिसलं...हे दृष्यचं कोण सक्षम आहे त्याची साक्ष देत होतं...धन्य त्यांच्या साधनेला....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

 

 

 

Comments

Post a Comment