अढळ स्थानांचे घरभेदी वाद....

 

 अढळ स्थानांचे घरभेदी वाद....



शलाकाचा,  माझ्या मैत्रिणीचा चांगला चारवेळा फोन येऊन गेला.  या आठवड्यातही एक परीक्षा होती.  फार लांब नाही, ठाण्यात.  शलाकाच्याही लेकाचा पेपर माझ्या लेकाच्या सेंटरवर होणार होता.  सारखी वेळ.  पण ती येणार नव्हती.  तिथे तिच्या लेकाची काळजी घ्यायची जबाबदारी माझ्यावर आली.  पेपर झाल्यावर त्याला गाडी करुन द्यायची होती.  शलाकाच्या भावा-बहिणींनी दिड वर्षानंतर एक छोटसं गेटटूगेदर जमवलं होतं. त्यासाठी शलाका तिथे जाणार होती.  ठाण्याच्या पुढे एका फार्म हाऊसवर ही मंडळी जमणार होती.  नेमका पेपर त्याच दिवशी आला.  बरीच फोनाफोनी झाली....खूप दिवसांनी होत असलेल्या गेटटूगेदरला जाण्याची...बहिण भावांना भेटण्याची इच्छा आणि लेकाच्या परीक्षेची काळजी.  या सर्वात तिच्या लेकानंच मार्ग काढला.  मुलामुलांचा फोन झाला.  शलाका सेंटरवर लेकाला माझ्याजवळ सोडून पुढे जाणार होती. तिच्यासाठी आम्ही किमान एकतासतरी आधी सेंटरवर पोहचणार होतो.  परीक्षा संपल्यावर तिचा लेकही या गेटटूगेदरला जाणार होता.  त्यामुळे त्याला गाडी करुन द्यायची..त्या ड्रायव्हरचा नंबर...गाडीचा नंबर, शलाकाला कळवण्याची जबाबदारी माझ्यावर आली.  या सर्वांत  शलाकाचा गेटटूगेदरचा मार्ग मोकळा झाला. पेपर दुपारी अडीचचा...एक तास आधी रिपोर्टींग...आणि त्याही आधी एक तास पोहचायचे...त्यात पावसाचा धडाकेबाज नूर बघता आम्ही साधारण दहा वाजताच निघायचं नक्की केलं.  डब्याची तयारी केली.  शलाकाच्या लेकाचाही डबा...त्यामुळे मोठं बास्केट डब्यांनी भरुन गेलं.  दहाचे साडेदहा झाले....मुसळधार पाऊस...आजूबाजूची हिरवळ...सकाळ असूनही काळोखं भरलेलं वातावरण....अधेमधे रस्त्यात साचलेलं पाणी आणि मध्येच मोठ्याला खड्ड्यात आपटणारी गाडी...बरोबर दोन तासांनी आम्ही हुश्श करत सेंटरवर


पोहचलो...पहिले शलाकाच्या लेकाला शोधायचे...छत्री घेऊन या शोधमोहिमेला बाहेर पडले,  तोच समोरुन हाक मारत शलाका माझ्यासमोर उभी.  अजून गेली नाहीस,  हे वाक्य अगदी ओठांवर आलं आणि थांबलं...कारण तिच्या मागे तिचा नवरा आणि लेक उभे होते...दोघंही डोळ्यांनी काहीतरी सुचवत होतं...त्यांचे हावभाव बघून शलाकाकडे पुन्हा बघितलं...आणि माझं ओठात असलेलं वाक्य मागे आलं....

आपल्या चेह-याचीही एक भाषा असते.  माझ्या समोर उभ्या असलेल्या


शलाकाचाही चेहरा काहीतरी बोलत होता.  तिच्या मागे तिचा नवरा आणि मुलगाही तशाच हावभावात न बोलताही बोलत होते.  त्यामुळे जे बोलायचे ते शब्द मागे घेत,  काय कसं काय  म्हणत आम्ही औपचारीक गप्पा सुरु केल्या....पाऊस मी म्हणत होता.  परीक्षेच्या सेंटरवर पावसाच्या धाकापायी अनेक विद्यार्थी आणि पालक आमच्यासारखेच दोन तास तरी आधी आले होते.  परीक्षा असलेल्या संबंधित कॉलेजनं हे ओळखून त्यांच्या कॅन्टीनमध्ये बसण्याची परवानगी दिली होती...पण त्यातही कोरोना नियमांचे पालन होतेच.  मी खाऊचे बास्केट काढून शलाकाबरोबर कॅन्टीनची वाट पकडली.  आमची मुलं आणि दोघींचे नवरेही पाठोपाठ आले.  एक मोठस टेबल पकडलं...त्यात आम्ही चौघं विशिष्ट गॅप ठेऊन बसलो...मुलांनी मात्र परिस्थिती ओळखून दुसरं छोटं टेबल पकडलं आणि अभ्यासाला सुरुवात केली.  शलाकाकडे डबे नव्हते...तिच्या नव-यानं सुचवलं आपण काही कॅन्टीनमधून मागवूया...तोपर्यंत मी सहा डीश लावून भरायला सुरुवात केली होती.  मुलांचा नंबर पहिला...शलाकानं न सांगता संत्री सोलायला घेतली.  मुलांच्या डीशमध्ये संत्री, थेपले, चटणी ठेवली आणि त्या

डीश त्यांच्याकडे पास झाल्या....आमच्याही डीश तयार झाल्या...थेपले आणि चटणी...पहिला घास तोंडात गेल्यावर मी न राहून विचारलं....काही सांगणार की न बोलताच खायचं ते पण सांग...

यावरही शलाका शांत होती...वातावरण अजून गंभीर झालं...तिनं डोळ्याला रुमाल लावला.  शेवटी शलाकाचा नवरा म्हणाला,  मी सांगतो.  खूप उत्साह भरल्यावर त्यात माशी शिंकते ना तसं झालं.  जवळपास पंधरा दिवस आमच्या घरचं वातावरण गेटटूगेदरमय झालं होतं.  वास्तविक या सर्व भावाबहिणींचं असं गेटटूगेदर ठरलं, तेव्हा माझा सुरुवातीला विरोध होता.  मुलाची परीक्षा आणि कोरोनाचं संकंट यामुळे जास्त गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे, असं मी शलाकाला सांगितलं.  पण फक्त पस्तीस जणं होणार...आणि आपण सर्व काळजी घेऊया म्हणून ती मागे लागली.  आठ दिवसापूर्वी गेटटूगेदरची जागा ठरली,  मेनू ठरला, फारकाय या बहिणींनी ड्रेसकोड आणि तिथे खेळायचे गेमही फिक्स केले.  गेला आठवडाभर तर रोज व्हिडीओ कॉल होत होते आमच्याकडे...कसला उत्साह होता...पण एक


दिवसापूर्वी सगळं बिनसलं...त्याला कारण ठरलं ताईचे मिस्टर...शलाकाची मोठी बहिण अल्का, स्वभावानं खूप कडक होती.  तिचा नवराही नको तेवढा स्पष्ट वक्ता...अगदी त्यांच्या मनासारखं काही झालं नाही तर कोणासमोरही एखाद्याचा अपमान करतील, एवढा स्पष्टपणा...वरुन आमची जीभ थोडी तिखटच...म्हणत ते स्वतःच स्वतःचं समर्थन करतात...आम्हा मैत्रिणींना या स्वभावाची माहिती होती.  शलाकाकडे तिच्या लेकाच्या वाढदिवसाला फुगे फोडण्यावरुन आम्हा सर्व मैत्रिणींना त्यांनी तिखट प्रसाद दिला होता...मात्र शलाकाकडे बघत आम्ही तो तिथल्या तिथे पचवला होता...असो...हे ताईंचे मिस्टर एका पक्षाचे कट्टर समर्थक...सर्व चांगलं कोण करु शकेल, तर तो या पक्षाचा नेताच...त्याच्या विरुद्ध असलेले सर्व पक्ष आणि त्यांचे नेते म्हणजे त्यांच्या भाषेत भंगार...सोशल मिडीयावरही त्यांच्या पोस्ट अशाच भाषेत...आपल्या नेत्याला विरोध करणा-या प्रत्येकाला ते सोशल मिडीयावरही खालच्या भाषेत प्रत्युतर देतात...अशीच एक पोस्ट शलाकाच्या वाचनात आली.  गेटटूगेदरमय वातावरणात एकदा फोनवर शलाकानं ताईला या पोस्टबद्दल सांगितलं...आणि भाओजींना जरा आवर घालायला सांग...अशी भाषा बरी नव्हे, असं ती बोलली...ताईंनं फोन चालू असतानाच तिच्या नव-याला याबद्दल सांगितलं....झालं...त्याच क्षणी त्या फोनकॉलचा आणि सर्व संभाषणाचा ताबा भाओजींनी घेतला...वॉटसअपच्या माध्यमातून किमान आठ बहिण-भावंड संवाद साधत होते,  त्यात शलाका एकटी पडली...कारण सर्वांना मोठ्या भाओजींच्या स्वभावाची माहिती होती...ते कोणाचंही ऐकून घेणार नव्हते.  आपण किती बरोबर आणि दुसरे कसे चुकीचे हेच ते सांगणार होते. 

त्यांनी शलाकाची अगदी शाळा घेतली.  ती कशी चुकीची आहे.  ती मानत असलेला पक्ष आणि त्याचा नेता कशी जनतेची दिशाभूल करीत आहे.  देशाची कशी वाट लावली आहे,  किती चुकीची धोरणं आखली आहेत,  आर्थिक निती कशी अयोग्य आहे...आदी विषयावर शलाकाला पंधरा ते वीस मिनीटं लेक्चर दिलं.  या दरम्यान बाकीच्या भावंडांनी आपला फोन बंद करण्यात समाधान मानलं...कारण ताईच्या नव-याला कोणी मध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांच्यावरही भडकणार...आणि नाहक वाद वाढणार अशी परिस्थिती निर्माण झाली.  बोलतांना सरतेशेवटी आपण गेटटूगेदरला भेटल्यावर तुला प्रत्यक्षच समजावतो, तुझा नेता किती लबाड आहे ते...म्हणत त्यांनी शलाकाला भावी संकटाची जाणीवही करुन दिली होती.  हे सर्व झाल्यावर शलाकाचा मूड बदलला...तिनं फॅमिली ग्रुपवर लेकाच्या परीक्षेचे कारण पुढे करत गेटटूगेदरला येत नसल्याचं सांगितलं...तिच्या पाठोपाठ आणखी दोन बहिणींनीही आपली अडचण पुढे केली.  एका वहिनीला अचानक सर्दी झाली.  त्यामुळे ती येणार नव्हती.  तर दुस-या वहिनीच्या आईची तब्बेत बिघडली...शेवटी शलाकाच्या एका भावानं गेटटूगेदर कॅन्सल करुया का...असा मेसेज शेअर केला...त्याला सर्वांनी होकार दिला...आणि आदल्या दिवशी पंधरा दिवसांच्या चर्चांनी, ठरलेलं गेटटूगेदर रद्द झालं.  फार्म हाऊसचे पैसे भरले होते.  ते पाच हजार रुपये बुडीत खात्यात जमा झाले. 

शलाकाचा नवरा ही स्टोरी सांगत असतांना शलाकानं दोन थेपले संपवले...दोन-चारवेळा रुमालही डोळ्यांना लावून झाला.  राजकीय अढळ स्थानांनी या कुटुंबाच्या ऐक्यावर चांगलाच आघात केला होता.  हसावं की रडावं हेच कळेना...एकतर कोरोना काळात अशी गेटटूगेदर करणं म्हणजे संपूर्ण कुटुंबालाच धोक्यात घालण्यासारखे होते...त्यात कुठल्याश्या राजकारण्यांमुळे एका कुटुंबात दुही निर्माण झाली होती....त्याचा त्या नेत्यावर काही परिणाम झाला होता का...तर तो शून्य...मी शलाकाला म्हटलं, आपण सर्वसामान्य...राजकारण्यांवर सल्ला देण्याचा हक्कच नाही आपला...आणि लेकाची परीक्षा महत्त्वाची की गेटटूगेदर....शलाका रडवेली झाली होती...तिथेच


तर पहिलं चुकलं माझं...मी हो म्हणायलाच नको होतं...मुलाची परीक्षा आणि अॅडमिशन होईपर्यंत कुठेही फिरायला जायचं नाही हे आमचं ठरलं होतं.  पण सर्व बहिणी भेटणार म्हणून मनात लालच निर्माण झाली...आणि फसले.  गेटटूगेदर रद्द झालं याचं वाईट वाटत नाही...पण एकाही बहिणींनी किंवा भावांनी मला साथ दिली नाही.  भाओजी वाटेल तसं बोलत होतं...ताईंनही त्यांना रोखलं नाही.  त्यांचा नेता म्हणजे नेताच...आणि आमचा नेता म्हणजे एखादा वाटमारु...अशा शब्दात त्यांनी अवहेलना केली...माझी फक्त एवढी अपेक्षा होती की मी त्यांच्या नेत्याचा मान ठेवते...त्यांनीही माझ्या नेत्याचा मान ठेवावा...पण त्यांनी एक शब्द माझं ऐकून घेतलं नाही...बरं...त्यांना कोणीही काहीही बोललं नाही...किती हौशेनं आम्ही तयारी केली होती...सर्व मागे पडली...अचानक सर्व भावंडांना एकमेकांच्या चुका दिसायला लागल्या...कोणी काय केलं...याची उजळणी व्हायला लागली...कोण कसं केव्हा चुकलं...हे वाद सुरु झालं...एका दिवसात नव्हे तर काही तासात आमचं गेटटूगेदर हवेत नाही तर राजकारणात विरघळून गेलं...

शलाका परत शांत झाली...एव्हाना मुलं परीक्षेला गेली होती...दुपारचे तीन वाजून गेलेले...पेपर सायंकाळी सहाला संपणार होता...म्हणजे हातात तीन तास होते.  कॅन्टीनमधून कॉफी घेतली...तरीही शांतता...शेवटी शलाकाचाच नवरा म्हणाला...जे झालं ते चांगलंच झालं...मला आणि माझ्या मुलाला बरं वाटलं...आम्ही तिघांनीही त्याच्याकडे बघितलं...तेव्हा हसून तो म्हणाला,  म्हणजे असं बिघडायला नको होतं...पण कोरोनाकाळात असं काही गेटटूगेदर करावं या मताचे आम्ही नव्हतोच...पण हिच्यात भलताच उत्साह संचारला...त्याचापुढे मुलाची परीक्षाही फिकी झाली...त्यामुळे आम्हीही काही बोललो नाही...आम्हा दोघांनाही त्याचं म्हणणं पटलं...शलाकाला समजावलं...भाओजींचा स्वभाव सर्वांना माहित आहे,  त्यामुळे तुला कोणी वाईट म्हणणार नाहीत...सगळी आपलीच आहेत...पुन्हा गेटटूगेदर नाही...पण फोनवरुन एकमेकांच्या संपर्कात रहा...नात्यात त्या राजकारणामुळे कटूता आणू नको...हे बोलत असतांनाच तिच्या फॅमिली ग्रुपवर लेकाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देणारे संदेश यायला लागले...अगदी अल्काताईचाही मेसेज होता...ते बघून शलाकाची कळी खुलली...चला एक टप्पा पार पडला...आता पुढचे तीन तास मार्गी लावायच्या कामाला लागले..सेंटरसमोरच्या मॉलकडे मोर्चा वळवला...आठवड्याच्या भाज्या आणि फळांची खरेदी...शलाकाचाही हाच विकपॉईंट...नक्कीच ती  सगळं विसरेल...म्हणून दोघींही बास्केट घेऊन


कामाला लागलो...हाहा म्हणता सहा वाजले...मुलं बाहेर आली...पेपर एकदम चांगला असणार...दोघांचीही कळी खुललेली होती...शलाकाही नॉर्मल झालेली...आमच्या दोघींच्या कुटुंबांनी एकमेकांचा निरोप घेत आपापला मार्ग पकडला...परतीच्या वाटेवरही धो धो पाऊस होता...ट्रॅफीकही जाम झालेलं...काळोखामुळे हिरवळ दिसत नव्हती...पण कुठले कुठले फ्लेक्स बोर्ड चमकत होते.  नेत्यांचे वाढदिवस...स्वागत...शुभेच्छा देणारे भलेमोठे बोर्ड आणि त्यावर नेतेमंडळीचे फोटो चमकत होते...हे अस्सं राजकारणी व्हावं लागतं...मत देणारे कितीही खड्ड्यात असले तरी आपण हसत रहावं लागतं...हे आमच्या साध्या भोळ्या शलाकाला कसं समजणार....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

 

 

 

Comments