गिरे फिर भी....
काय ना...लोकांना हल्ली कोणाला मदत करायची पद्धत नाही....साधी शेजा-याची विचारपूस करण्याची पद्धत नाही...जो तो आपला विचार करतोय...बरं तुझं काय....बाहेर पडतेस का....काही फिरायला बिरायला गेलीस की नाही....घरातच ना...आम्ही आता ठिक झालोत....आता बघू परत केव्हा बेत होतोय ते...माझ्या एका परिचित महिलेचा अचानक फोन आल्यावर चाललेलं हे बोलणं होतं. काही दिवसांपूर्वी या महिलेचं संपूर्ण कुटुंब कोरोना बाधीत झालं होतं. त्याबाबतचा अनुभव ती मला न विचारता शेअर करत होती...कोरोना होण्यापूर्वी सर्व कुटुंब कुठेतरी फिरायला...मौजमजा करायला गेलं होतं...तिथेच बहुधा त्यांना कोरोनाची लागण झाली...त्यानंतरचा अनुभव ती मला सांगत होती. काही व्यक्तींबरोबर आपलं कधीही जमू शकत नाही, याची जाणीव मनात कायम असते. फोनवर बोलणारी महिला ही त्यापैकीच एक...त्यामुळे कधीही ती माझ्या मैत्रिणीच्या गटात सामिल झाली नाही. आत्ताही तोच प्रत्यय पुन्हा येत होता. कितीतरी भिन्न विचार प्रवृत्ती...आणि विचारही...त्यामुळे तिचा फोन आल्यावर कपाळाला आढी पडली होती. पण
कितीही वेळा टाळला तरी फोन उचलेपर्यंत पुन्हा पुन्हा हा फोन येतच रहाणार याची जाणीव होती. त्यामुळे नाईलाजास्तव फोन उचलला...तेव्हा कळलं की संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या जाळ्यात अडकलं होतं. त्याबाबतच बोलणं चालू होतं. पण ते बोलण ऐकतांना मनात एकच विचार येत होता....गिरे फिर भी....
या महिलेचं कुटुंब जवळपास रहाणारं...कधीही भेट झाली तरी आम्ही किती पार्ट्या केल्या...कश्या केल्या...कुठे केल्या...किती शॉपिंग केली...याचीच चर्चा असते. चर्चा म्हणजे, कायम त्यांचेच ऐकायचे आणि आपण फक्त हो का, अरे व्वा...किती छान...अशी पद जोडायची. आत्ताही बोलतांना तेच होतं. माझी फोनवर प्राथमिक चौकशी झाली, आणि मग विचारण्यात आलं, तुला माहीत आहे का, आम्हा सर्वांनाच कोरोना झाला होता. मी नाही म्हटलं. तेव्हा, मला वाटलचं, नाहीतर तू फोन केला असतास...असं म्हणत त्या महिलेनं संवादाची सर्व सूत्र तिच्या हातात घेतली. कोरोना काळात, लॉकडाऊनमध्ये त्यांना घरात कोंडल्यासारखं झालं होतं. नवरा घरात, एक मुलगा आणि मुलगी, दोन्हीही कॉलेजमध्ये शिकणारे...ते
दोघंही घरात...सर्वजण घरात असल्यामुळे घरातील कामाचा लोड वाढला होता. त्यातून दर शनिवार-रविवार हॉटेलिंगची सवय...किंवा घरात नेहमी पार्टीचा मौहल...पण लॉकडाऊनमुळे या सर्वांवर लॉक लागला. मध्यंतरी मित्रमंडळींना बोलवून घरी पार्टी केली, पण त्यावर सोसायटीनं आक्षेप घेतला. त्यावेळी बरीच वादावादी झाली. शेवटी कोरोना जाऊदे खड्ड्यात म्हणत कुटुंब बाहेर पडायला लागलं. मुलांनी आपल्या मित्रपरिवारासोबत पुन्हा गाठीभेटी करायला सुरुवात केली. आणि आईवडीलांनीही आपल्या ग्रुपबरोबर विकेन्ड पार्टी सुरु केल्या. कोरोना काय लगेच जाणार आहे का, मग त्याला घाबरुन काय कायम घरात बसायचं का...म्हणत हळूहळू दुस-या शहरात आऊटींगही सुरु झालं. गेल्या महिन्यात गाडी घेऊन सर्वजण आठवडाभर फिरायला गेले होते. भरपूर मजा केली. समुद्र किना-यावर मजा केली. येतांना मुलीच्या अंगात कणकण होती. तिनं समुद्राच्या पाण्यात भरपूर मजा केली, त्यामुळे अंग तापलं असेल अशी समजूत केली. पण परत येईपर्यंत तिला आणि मुलालाही ताप भरला. मग नव-याचाही नंबर लागला. घरी आल्याच्या रात्री घरातलीच औषधं घेतली, दुस-या दिवशी ताप गेला म्हणून सर्वजण डॉक्टरांकडे गेले. त्यांनी कोरोनाच्या तपासण्या करायचा सल्ला दिला. तिथेही वाद झाला. साधाच ताप आहे. डॉक्टरांना सांगण्यात आलं. नशिबानं ते ठाम राहिले. चाचण्या झाल्या. तेव्हा कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं स्पष्ट झालं. लक्षण फार नसल्यानं घरातच उपचार घ्या, असा सल्ला संबंधित डॉक्टरांनी दिला. या सर्वादरम्यान मला फोन केलेल्या महिलेची तब्बेत थोडी खराब झाली. खूप थकवा आला. डॉक्टरांनी झोपून रहाण्याचा सल्ला दिला. मुख्य प्रश्न जेवणाचा होता. एरवी सोसायटीमध्ये एकोप्याचे वातावरण...पण या कुटुंबानं जेव्हा दोन दिवस जेवणाची विनंती केली, तेव्हा काहींनी त्यांना पोळी भाजी केंद्राचे नंबर दिले. त्यांची घरपोच सेवा होती ते नंबर मोबाईलवर पाठवले. सगळ्यात वाईट म्हणजे पार्टी, गेटटूगेदर आणि आऊटींगसाठी ज्यांच्याबरोबर नेहमी जाणं व्हायचं त्यांनीही असेच नंबर पाठवले. सहाजिकच कोरोनाची धास्ती सगळ्यांना होती. सोसायटीत एकोपा होता, पण या कुटुंबानं विनंती करुनही नियम पाळले नाहीत. कोरोना काळात बाहेरील व्यक्तींना सोसायटीत प्रवेश नव्हता. पण आमचे पाहुणे, आमच्यात चालतं, आमचे खास आहेत...अशा
आमच्यांनी घात केला. आठ दिवस एका पोळीभाजी केंद्राकडून डबा मागवावा लागला. एरवी बाहेर फिरायला गेल्यावर तिथे जेवायला मजा येत होती. किती पैसे खर्च झाले याचा हिशोब नाही....पण सोशल मिडीयावर फोटो शेअर झालेच पाहिजेत या अट्टाहासामुळे खाद्य पदार्थांवर वारेमाप खर्च केला....आता कोरोना झाल्यावर पोळीभाजी केंद्राकडून डबा मागितल्यावर सगळं किती महाग झालंय याची जाणीव झाली. लोकं पैसे उकळतात फक्त...फळं, औषधंही घरपोच मागवावी लागली. त्याच्याही किंमती अव्वाच्या सव्वा उकळल्याचा साक्षात्कार झाला. शिवाय काही तपासण्याही घरीच राहून करण्याचा निर्णय घेतला...त्याचेही वाढीव पैसे लावले होते. आपल्याला कोरोना झाला आहे, त्यामुळे सगळ्यांनी सौम्य वर्तन करावे आणि शक्यतो सगळ्या सेवा मोफत द्याव्यात अशी माफक अपेक्षा होती. पण तीही पूर्ण झाली नाही. आता या बाई पूर्णपणे ब-या झाल्या आहेत. पण आपल्या आजारपणात किती लोकांनी कसा फायदा घेतलाय याची त्या सर्वांना फोन करून माहिती देत आहेत. या सर्वांमध्ये माझाही नंबर लागला, आणि मला फोन आला होता.
हे सगळं सागतांना अर्थातच कोरोना आपल्याकडे आला नव्हता तर आपण नियम मोडून त्याच्याकडे गेलो होतो, याचा उल्लेखही नव्हता. आम्ही व्यवस्थेचा भाग होणार नाही...त्याचे नियम पाळणार नाही...आम्हाला मात्र सगळ्यांनी सर्व सहकार्य करावे ही मनमानी होती... आम्ही सर्व करणार, आम्हाला कोणी अडवू नये...आम्हाला काही होणार नाही...अशा थाटतले जे असतात...त्याच वर्गातील हे कुटुंब आहे. त्यांना आपण त्यांची चूक सांगण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते ती चूक मान्य करणार नाहीत. त्यामुळे
सांगून काहीही उपयोग नाही...मीही तसा प्रयोग केला नाही. बराचवेळ ऐकून घेतल्यावर, जास्त बोलू नका, नाही तर त्रास होईल असं सांगून फोन बंद केला.
कोरोना काय किंवा अन्य कुठलंही संकट असूदे त्यामुळे माणुसकीला विराम
मिळालाय असं झालं नाही, आणि होणारही नाही.
फक्त मदतीची अपेक्षा ठेवतांना आपण कसे वागलोत हेही निर्मळ चष्मातून पाहणे
गरजेचे आहे. आपण कुठलेच नियम पाळायचे
नाहीत, मोठ्या गटात बिनधास्त पार्टी
करायची, सण साजरे करायचे...बाहेर फिरायला गेल्यावर तेथेही नियम पाळायचे नाही...आम्ही
काय कोणाकडे पैसे मागतोय का...आमचे आम्हीच खर्च करतोय ना...अशा थाटात वावरणा-यांनी
गेल्या दिड वर्षाहूनही अधिक काळ आपल्यासाठी राबणा-या वैद्यकीय सेवकांचा तरी विचार
करणे गरजेचे आहे.
कोरोना हा रोगच वेगळा आहे.
एकट्या दुकट्यानं नाही, तर तुम्ही, आम्ही अशा सगळ्यांनी सगळे नियम पाळले
तरच त्याला अटकाव लावता येणार आहे.
त्यासाठी आम्ही करु तेच खरं...आमच्यात चालतं...आमचे पाहुणे...आमच्या
पद्धती...या सर्व आम्हीला पहिल्यांदा पायबंद घातला पाहिजे....आपण...आम्ही...तुम्ही
काही काळानंतर पुन्हा पहिल्या सारखे होऊ शकतो...भेटू शकतो...पण आत्ता या सर्वांवर
स्वयं निर्बंध हवेत...नाहीतर पुन्हा पुन्हा हा रोग डोकं वर काढणार...या लाटा किती
येणार...कधी येणार...कशा येणार...याचे मग फक्त अंदाजच व्यक्त करता येणार आहेत. या लाटांना थोपवण्यासाठी अनेक हात प्रामाणिकपणे
प्रयत्न करत आहेत....त्यांच्यावर टिका करण्यापेक्षा त्यांना फक्त मम म्हणत पाठिंबा
दिला तरी खूप मदत होईल...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
👌
ReplyDeleteनेहमीप्रमाणे साधा सोपा सुटसुटीत लेख, मनाची पकड घेणारा आहे. थोडाफार मधाळ शेरेबाजी करणार , डोळ्यात अंजन घालून हलकेच डोळे उघडणारा, आवडला म्हणजे काय आवडलाच.
Deleteनलिनी पाटील.
धन्यवाद नलिनीताई...
Deleteसद्य परिस्थिती चे अतिशय योग्य असे त्रयस्थ मूल्यपापन ✍️👌👌
ReplyDeleteधन्यवाद पुष्कर...
Delete