अळूची बहार...

 

     अळूची बहार...


दुपारचा एक वाजून गेलेला....नेहमीची जेवणाची वेळ टळून गेली....तश्या लेकाच्या स्वयंपाकघरात फे-या चालू झाल्या...अजून किती वेळ लागणार...किती वेळा सांगतो,  ही भाजी करु नकोस...त्याला खूप वेळ लागतो...तुझ्या हातालाही खाज येते...चांगली लागते म्हणून किती त्रास घेशील...दुसरी काहीतरी भाजी कर...अशा त्याच्या सूचना झाल्या...पण मी त्याकडे दुर्लक्ष करीत भाजीच्या मोठ्या कढईवरील झाकण काढून त्याला खुणावलं...माझ्या चेह-यावरचे मिष्किल भाव...काहीतरी बोलणार होता...पण त्या कढईमधील अळूच्या भाजीची वाफ आणि भाजीचा घमघमाट एकदम बाहेर आले...स्वयंपाकघर त्या वासानं भरून गेलं...लेकानं खांदे उडवले आणि तो बाहेर गेला...अळूची भाजी त्याच्या फार आवडीची नाही....तरीही मक्याची कणसं आणि ओले शेंगदाणे घातलेली अळूची पातळ भाजी पावसाळ्यात आणि श्रावणात एकदा तरी घरी नेमानं होते....ही भाजी करण्याची खटपट खूप असली तरी भाजीच्या चवीपुढे फिक्की होते...अळूची पातळ भाजी, वाफळता भात आणि तांदळाच्या भाक-या...एवढाच बेत असला तरी मन तृप्त होतं...ज्या दिवशी अळू होतं,  तेव्हा जेवण करायला आणि नंतर ते जेवायलाही पुरेसा वेळ द्यावा लागतो...तरच त्या चवीचा आस्वाद मनमुराद घेता येतो...त्याप्रमाणे माझे काम चालू होते...भाक-या झाल्या आणि त्याच गरम तव्यावर अळूच्या वड्या तळायला टाकल्या...त्या वासांनी गाडी पुन्हा स्वयंपाकघरात...चला एकतरी माझ्या आवडीचं आहे म्हणत,  जेवणाची तयारी करु लागला.  अळू एकच...एक भाजीचं आणि दुसरं वड्यांचं...पण दोघांचीही पानं वेगळी...चव वेगळी...वड्याचं आळू वर्षभर मिळतं...त्यामुळे त्याचं फार कौतुक नाही...पण भाजीचं अळू पावसाळ्यात येणारं....त्यामुळे त्या पानाचं,  पर्यायानं त्याच्या भाजीचंही कौतुक...लेकालाही माहित होतं, कितीही नाक


मुरडलं तरी थोडी का होईना अळूची भाजी खावी लागणार होती.  सोबतीला असलेल्या अळूच्या वड्या मात्र त्याच्या आवडीच्या...वड्या तयार झाल्यावर ताट भरलं...त्याच्या ताटात छोट्या वाटीत अळूची भाजी आणि वड्यांचा डोंगर...आमच्या दोघांच्या ताटात मोठ्या डीशमध्ये अळूची पातळ भाजी,त्यात डुबकी मारणारे कणसांचे तुकडे आणि भाताचा डोंगर...बस्स....आत्ता सर्व आरामसे...

लेकाच्या सुरु झालेल्या परीक्षा अनेक अर्थांनं फायद्याच्या पडू लागल्या आहेत.  गेल्याच आठवड्यात एक परीक्षा भल्या सकाळी होती...वाशीमध्ये...पण शहरापासून लांब असलेल्या महाविद्यालयात त्याचा नंबर आला होता.  सकाळी सात वाजता त्याला परीक्षा सेंटरवर सोडलं...आता पुढचे किमान चार तास काढायचे...हा परिसर शहराबाहेर होता...तरीही


रस्त्यावर चांगलीच वर्दळ होती...थोडं पुढे चालत जाऊन पाहिलं आणि लॉटरी लागल्याचा आनंद झाला...त्या भागात रस्त्यावर बाजार भरला होता...थोडीफार गर्दी होती...आसपासच्या गावामधून पिकणा-या भाज्या घेऊन महिला विक्रेत्या त्या बाजारात आल्या होत्या...नव-यानं डोक्यावर हात मारुन घेतला...आणि मी त्याला जवळपास ओढत त्या विक्रेत्यांकडे घेऊन गेले....आम्हाला हा बाजार नवा होता,  त्यामुळे पहिल्यांदा एक फेरी मारली...आणि मग खरेदीची सुरुवात झाली...त्यात दोघांचीही पहिली पसंती होती ती अळूच्या पानांना...भाजीची अळूची पानं आकारानं थोडी लहान आणि रंगांनही थोडी गोरी....तर वड्यांच्या आळूची पानं त्याहून चांगलीच दामदुप्पट मोठी आणि रंगानंही काळसर...दोन्ही अळूची पानं छान ताजी होती...त्यांची खरेदीही जास्त झाली...याचवेळी अळूत घालण्यासाठी मक्याची कणसंही मिळाली....आणि शेंगदाण्याच्या शेंगाही...सोबतीनं कर्टूली,  जास्वंदीच्या कळ्या, पातीचा चहा,  कडीपत्ता, केळफूल यांचीही खरेदी झाली.  या सर्वात चांगला तासभर गेला.   लेकाची परीक्षा संपेर्यंत माझ्या शेंगदाण्याच्या शेंगा सोलून झाल्या होत्या.  दोन मक्याच्या कणसाचे दाणेही काढून झाले.  लेक आल्यावर त्यांनी पहिल्यांदा भाजीच्या पिशव्यांकडे पाहिलं...त्यातल्या अळूच्या पानांकडे पाहून त्याला दुस-या दिवशीच्या मेनूचा अंदाज आला.

अळूची भाजी जेवढी आवडीची तेवढीच खटपटीची आणि थोडी त्रासदायकही...अनेकवेळा अळूची पानं आणून ती हौसेनं कापायला घेतली आणि त्या पानांच्या खाजीनं हाताची लाहीलाही झाली....शेवटी नाईलाजानं पानं टाकून देण्याची वेळ आली आहे.  अशावेळी अळूची भाजी खायची आलेली हुक्की पोळीभाजी केंद्रावरुन तयार भाजी आणून भागवली आहे.  पण यावेळी आणलेली पानं अगदी छान निघाली...गोल सुंदर पोपटी रंगाची पानं कापतांनाच किती ताजी होती, याची जाणीव झाली.  या पानांसोबत त्यांचे दांडे सोलून या मिश्रणात शेंगदाणे आणि मक्याच्या कणसाचे तुकडे शिजवून घेतले....अळू कापणं, सोलणं आणि मक्याच्या कणसाचे तुकडे करणं हे एवढचं अवघड काम...पुढे अगदी सोप्प...साध्या तेल जि-याची फोडणी त्यात शिजलेलं आळू...आणि वरुन मक्याचे कच्चे दाणे, खोबरं, मिरची, धणे यांचं वाटण...अलीकडे आमच्या जेवणात चिंचेचा वापर कमी झाला आहे.  त्यामुळे चिंचेच्या कोळाऐवजी आवळ्याची पावडर या अळूत मी वापरते.  थोडासा चवीपुरता गूळ आणि मीठ...हे सर्व मिश्रण मंद आचेवर चांगलं रटरटायला लागलं की आसपास न सांगता अळू तयार होतोय, हा मेसेज पास होतो...अळूच्या भाजीचा हा घाट तर अळूच्या वड्यांचा थाटही भारी असतो...आम्ही इंदौरला एकदा अळूवड्या टेस्ट केल्या होत्या....त-हेत-हेचे मसाले घातलेल्या या अळूवड्या लेकाला पसंत पडल्या...त्यामुळे या इंदौरी कम महाराष्ट्रीयन अळूवड्या माझ्याकडे होतात.  त्यामध्ये चण्याच्या पिढाऐवजी मूगडाळीचे पीठ, तांदळाचे पिठ, गुळ, धणे जिरा पावडर, चाट मसाला, कसुरी


मेथी, आवळा पावडर, सुंठ पावडर, बडीशेप, लाल तिखट, मिठ याचा वापर होतो.  पानांचा आकार बघून हे मिश्रण जमवायचं...नाहीतर सर्व थाट फसला जातो...हा निकाल लागतो ते वड्या तळायला टाकल्यावर...छान कुरकुरीत वड्या झाल्या की समजायचे बेत परिपूर्ण....त्यादिवशीही असाच मसाला परिपूर्ण झाला...थोडा मसाला जास्त करुन दोन पानं आणि हा मसाला दुस-या दिवशीसाठी राखीव ठेवला.  दुसरा दिवस म्हणजे बुधवार...मच्छीचा वार...श्रावण महिना सुरु होण्यासाठी मोजके दिवस राहिलेले.  त्यामुळे या अळूच्या पानात ओली करंदी घालून केलेल्या वड्या भन्नाट लागतात...अगदी चटणी नसली तरी चालते...नुसत्या टोमॅटो सॉसबरोबर या वड्यांचा काही मिनिटात फडश्या पडतो...ब-याचवेळा या करंदी अळूवड्यांवरच लेकानं जेवणाची बोलवण केली आहे.  आज केलेले पातळ अळू त्याच्या नापसंतीचे...यादिवसाची सर्व कसर दुस-यादिवशी निघणार होती...अर्थात त्याच्यासाठी हे सरप्राईज होतं...

एरवी आमच्याकडे एक किंवा दोन चमचे तांदळाचा भात होतो.  तोही फारसा संपत नाही...पण आज त्याच्या दसपट भात झाला होता.  अळूबरोबर हा भात साफ झाला...फक्त त्या मक्याची रिकामी पांढरी झालेली कणसं शिल्लक राहीली...व्वा...मस्त म्हणत नवरा ताटावरुन उठला...अळू खूप दिवसांनी छान


जमलं होतं...पण तरीही एक चव कायम सरस ठरत होती...माझ्या माहेरी, आईकडे गणपतीमध्ये ऋषीपंचमीच्या दिवशी तेलाशिवाय अळूची पातळ भाजी केली जाते.  त्यात फक्त मक्याची कणसं, खोबरं, चिंच आणि चवीपुरतं मिठ सोबतीनं असतं...पण हे आई आणि वहिनीच्या हातचं अळू सुभान असतं...सकाळी आणि रात्रीच्या जेवणातही हे अळू, भात, तांदळाच्या भाक-या आणि खोब-याची चटणी हा मेनू अगदी ढेकर येईपर्यंत होतो...त्या अळूची चव गेल्यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे चाखता आली नाही...बघूया, बाप्पाची कृपा झाल्यास आतातरी हा कोरोना आटोक्यात येईल, आणि ऋषीच्या अळूची चव पुन्हा घेता येईल....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

    


Comments

  1. व्वा. छान. लेखही चविष्ट झाला आहे

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद शेखर सर....

      Delete
  2. छान वाटते वाचून. रेसिपी पण चांगली

    ReplyDelete
  3. वा छान श्रावणाची चाहुल लागली

    ReplyDelete
  4. रेसिपी सकट अळूची भाजी आणि वड्या यांचं नुसतं वर्णन वाचून सुद्धा भूक प्रदीप्त झाली. विषय एकदम साधा पण लिखाण मात्र खुसखुशीत आणि चवदार सुद्धा बरं का!!
    आगे बढो!! छान लिहिता. माझ्यासारखीला वाचावसं वाटतं यातच सर्व काही आलं.
    नलिनी पाटील.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद नलिनीताई...तुम्ही एवढ्या छान शब्दात शुभेच्छा देता की नव्या लेखाची प्रेरणा मिळते..

      Delete

Post a Comment